नीतिवचनं १४:१-३५

  • “मनाला आपलं दुःख माहीत असतं” (१०)

  • योग्य वाटणारा मार्ग मृत्यूकडे नेऊ शकतो (१२)

  • “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो” (१५)

  • “श्रीमंत माणसाला भरपूर मित्र असतात” (२०)

  • शांत मन शरीराला जीवन देतं (३०)

१४  जी स्त्री खरंच बुद्धिमान असते, ती आपलं घर बांधते,+पण मूर्ख स्त्री आपल्याच हातांनी ते पाडून टाकते.  २  जो सरळपणे चालतो, तो यहोवाला भिऊन वागतो,पण ज्याचे मार्ग कपटीपणाचे* असतात, तो देवाला तुच्छ लेखतो.  ३  मूर्खांचं गर्विष्ठ बोलणं काठीसारखं असतं,पण बुद्धिमानांचे ओठ त्यांचं संरक्षण करतील.  ४  गाय-बैल नसले, तर गोठा स्वच्छ राहतो,पण बैलाच्या ताकदीमुळे भरपूर पीक मिळतं.  ५  विश्‍वासू साक्षीदार खोटं बोलणार नाही,पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.+  ६  थट्टा करणारा बुद्धीचा शोध घेतो, तरी त्याला ती सापडत नाही,पण ज्याच्याजवळ समजशक्‍ती असते, त्याच्यासाठी ज्ञान घेणं सोपी गोष्ट असते.+  ७  मूर्ख माणसापासून दूर राहा,कारण त्याच्या ओठांवर तुला ज्ञान सापडणार नाही.+  ८  शहाण्या माणसाला बुद्धीमुळे आपला मार्ग कळतो,पण मूर्ख आपल्याच मूर्खपणामुळे फसतात.*+  ९  मूर्ख आपला दोष* थट्टेत उडवतात,+पण सरळ लोक समेट करायला तयार असतात. १०  मनाला आपलं दुःख* माहीत असतं,त्याच्या आनंदात दुसरा कोणी सामील होऊ शकत नाही. ११  दुष्टाचं घर नष्ट होईल,+पण सरळ माणसाचा तंबू समृद्ध होईल. १२  माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,+पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+ १३  हसतानाही मन दुःखी असू शकतंआणि आनंदाचा शेवट शोकाने होऊ शकतो. १४  देवाचा अनादर करणारा आपल्या कामांचं फळ भोगेल,+आणि चांगल्या माणसाला त्याच्या कार्यांचं प्रतिफळ मिळेल.+ १५  भोळा* प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो,पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.+ १६  बुद्धिमान सावध असतो आणि वाइटापासून दूर राहतो,पण मूर्ख बेपर्वा* असतो आणि फाजील आत्मविश्‍वास दाखवतो. १७  लगेच रागावणारा मूर्खपणे वागतो,+पण नीट विचार करून वागणाऱ्‍याचा द्वेष केला जातो. १८  भोळे* मूर्खपणे वागतील,पण शहाण्या माणसांच्या डोक्यावर ज्ञानाचा मुकुट असतो.+ १९  वाईट लोकांना चांगल्या लोकांपुढे झुकावं लागेलआणि दुष्ट लोक नीतिमानांच्या फाटकांसमोर वाकतील. २०  गरिबाचे शेजारीही त्याचा द्वेष करतात,+पण श्रीमंत माणसाला भरपूर मित्र असतात.+ २१  जो आपल्या शेजाऱ्‍याला तुच्छ लेखतो, तो पाप करतो,पण दीनदुबळ्यांना दया दाखवणारा आनंदी असतो.+ २२  जे दुसऱ्‍याचं वाईट करण्याची योजना करतात, ते भरकटणार नाहीत का? पण चांगलं करण्याची इच्छा असलेल्यांसोबत लोक एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणे वागतील.+ २३  मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो,पण नुसती बडबड केल्याने गरिबी येते.+ २४  बुद्धिमानांची संपत्ती त्यांचा मुकुट आहे;पण मूर्ख आपला मूर्खपणा सोडत नाहीत.+ २५  खरा साक्षीदार जीव वाचवतो,पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो. २६  यहोवाची भीती बाळगणारा सर्व गोष्टींत त्याच्यावर भरवसा ठेवतो+आणि यामुळे त्याच्या मुलांना आश्रय मिळेल.+ २७  यहोवाची भीती म्हणजे जीवनाचा झरा;ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते. २८  मोठी प्रजा म्हणजे राजाचं वैभव,+पण प्रजा नसलेल्या राजाची सत्ता टिकत नाही. २९  जो लगेच रागावत नाही, तो फार समंजस असतो,+पण उतावळा माणूस आपला मूर्खपणा दाखवतो.+ ३०  शांत मन शरीराला आरोग्य* देतं,पण ईर्ष्या हाडांना सडवून टाकते.+ ३१  दीनदुबळ्या माणसाची फसवणूक करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+पण जो गरिबाला दया दाखवतो, तो देवाचा गौरव करतो.+ ३२  दुष्टाचा त्याच्याच वाईट कामांमुळे नाश होईल,पण नीतिमानाला त्याच्या खरेपणामुळे संरक्षण मिळेल.+ ३३  समजशक्‍ती असलेला माणूस आपल्या बुद्धीचा दिखावा करत नाही,+पण मूर्ख आपल्याला किती ज्ञान आहे, हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. ३४  नीतिमत्त्वामुळे राष्ट्राचा गौरव होतो,+पण पापामुळे राष्ट्रावर कलंक येतो. ३५  सखोल समज दाखवणाऱ्‍या सेवकामुळे राजाला आनंद होतो,+पण निर्लज्जपणे वागणाऱ्‍याचा त्याला संताप येतो.+

तळटीपा

किंवा “वाकडे.”
किंवा कदाचित, “मूर्ख इतरांना फसवतात.”
किंवा “भरपाई करण्याला.”
किंवा “आपल्या जिवाचा खेद.”
किंवा “अनुभव नसलेला.”
किंवा “तापट.”
किंवा “अनुभव नसलेले.”
किंवा “जीवन.”