व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 क२

बायबलच्या या भाषांतराची वैशिष्ट्यं

इंग्रजी भाषेत, ख्रिस्ती ग्रीक शास्त्र​—नवे जग भाषांतर  १९५० मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. आणि पवित्र शास्त्र​—नवे जग भाषांतर  याची संपूर्ण आवृत्ती १९६१ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. मूळ भाषांमधून अनुवाद केलेलं हे भाषांतर अचूक आणि वाचायला सोपं आहे. आणि तेव्हापासून २१० पेक्षा जास्त भाषांमध्ये याचं भाषांतर करण्यात आलं आहे आणि लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे.

पण, गेल्या पन्‍नासएक वर्षांत भाषांमध्ये खूप बदल झाले आहेत. आणि आजच्या वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी, भाषेतले हे बदल लक्षात घेऊन भाषांतर करणं खूप गरजेचं आहे, ही गोष्ट सध्याच्या नवे जग भाषांतर समितीने ओळखली. त्यामुळे बायबलच्या या आवृत्तीत भाषेच्या शैलीत आणि शब्दांत बदल करण्यात आले आहेत. पुढे दिलेल्या गोष्टी साध्य करता याव्यात म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. त्या गोष्टी म्हणजे:

  • सहज समजेल अशी आजच्या काळातली भाषा वापरणं. या भाषांतरात, जुने आणि कठीण शब्द बदलून, त्यांच्या जागी सहज समजतील असे रोजच्या भाषेतले शब्द वापरले आहेत. उदाहरणार्थ, “जारकर्म” या शब्दाचं भाषांतर “अनैतिक लैंगिक कृत्यं,” असं केलं आहे. आणि “कामातुरपणा” या शब्दाचं भाषांतर “निर्लज्ज वर्तन” असं केलं आहे. (गलतीकर ५:१९-२१) तसंच, रोजच्या भाषेत “निर्बंध” हा शब्द सहसा वापरला जात नाही. शिवाय, या शब्दाचा अर्थ “बंधन घालणं” असा होतो. आणि त्यामुळे त्यातून मूळ भाषेतल्या अर्थापेक्षा अगदीच वेगळा अर्थ जातो. म्हणून बायबलच्या या आवृत्तीत त्याचं भाषांतर “स्मरण-सूचना,” म्हणजे आठवणीत आणून दिलेल्या सूचना असं करण्यात आलं आहे.​—स्तोत्रं ७८:५.

    प्राचीन हिब्रू आणि ग्रीक भाषेत “बीज” हा शब्द बियाण्यांसाठी, तसंच माणसाच्या संततीसाठी, वंशजांसाठी किंवा शुक्राणूसाठी वापरण्यात आला आहे. पण, माणसांच्या बाबतीत बोलताना आता मराठी भाषेत हा शब्द वापरला जात नाही. त्यामुळे या शब्दाचं भाषांतर करताना मूळ भाषेतल्या शब्दांतून जो अर्थ निघायला हवा, तो देण्यासाठी मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेऊन शब्दांची निवड करण्यात आली आहे. (उत्पत्ती १:११; २२:१७; ४८:४; मत्तय २२:२४; योहान ८:३७) तसंच, या भाषांतरात “संतती” हा शब्द खासकरून देवाने एदेन बागेत दिलेल्या अभिवचनासाठी वापरला आहे; ते अभिवचन आपल्याला उत्पत्ती ३:१५ मध्ये पाहायला मिळतं.

    मराठी भाषेतले काही शब्द जुने झाले आहेत किंवा आता रोजच्या भाषेत ते वापरले जात नाहीत. म्हणून बायबलच्या या भाषांतरात अशा शब्दांच्या जागी सहज समजतील असे सोपे शब्द वापरले आहेत. उदाहरणार्थ, “राजांच्या अमदानीत” या शब्दाऐवजी “राजांच्या दिवसांत,” “कारकीर्द” ऐवजी “शासनकाळ,” “पदासन” ऐवजी “पायांसाठी आसन,” “ऋतुकाल” ऐवजी “मासिक पाळी,” “शिंदळकी” ऐवजी “वेश्‍येची कामं” आणि “कराराचा कोश” ऐवजी “कराराची पेटी” असे शब्द वापरले आहेत.

  • बायबलच्या शब्दांचा अचूक अर्थ देणं. मराठी भाषेत असलेल्या बायबलच्या बऱ्‍याच भाषांतरांमध्ये असे काही शब्द वापरण्यात आले आहेत, ज्यांमुळे खोट्या शिकवणींना आधार मिळतो. उदाहरणार्थ, हिब्रू शब्द शिओल  आणि ग्रीक शब्द हेडीस या शब्दांचं भाषांतर काही भाषांतरांमध्ये “अधोलोक” असं करण्यात आलं आहे. असं मानलं जातं, की अधोलोक म्हणजे “पाताळ,” किंवा मेल्यावर माणसं जिवंत राहतात असं एक ठिकाण. पण शिओल  आणि हेडीस  या शब्दांचा खरा अर्थ म्हणजे, असं एक लाक्षणिक ठिकाण जिथे सगळ्या मेलेल्या माणसांना पुरण्यात आलं आहे. त्यामुळे, या भाषांतरात “अधोलोक” या शब्दाऐवजी “कबर” हा शब्द वापरला आहे.​—स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कार्यं २:२७.

    बायबलच्या अनेक भाषांतरांमध्ये हिब्रू शब्द रूआख  आणि ग्रीक शब्द न्यूमा  यांचं भाषांतर “आत्मा” असं करण्यात आलं आहे. पण यामुळे अमर आत्म्याच्या खोट्या शिकवणीला आधार मिळतो. खरंतर, रूआख  आणि न्यूमा  या शब्दांचा मूळ अर्थ “श्‍वास” असा होतो. याशिवाय, या शब्दांचे इतर काही अर्थही होऊ शकतात; जसं की मनोवृत्ती, चांगले आणि वाईट स्वर्गदूत, जीवन, मन, शक्‍ती, पवित्र शक्‍ती, आवेश, वारा इत्यादी. त्यामुळे या आवृत्तीत, रूआख  आणि न्यूमा  या शब्दांसाठी मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेऊन योग्य ते शब्द वापरले आहेत.​—उत्पत्ती ६:१७; गणना १४:२४; १ राजे २२:२१; स्तोत्र ३१:५; नीतिवचनं १८:१२; दानीएल ४:८; मत्तय २८:१९, २०; लूक १:१७.

    तसंच, बायबलमध्ये ‘गुरदा’ हा शब्द शाब्दिक आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थाने वापरण्यात आला आहे. त्यामुळे जिथे खरोखरच्या अवयवाबद्दल बोलण्यात आलं आहे तिथे “गुरदा” हाच शब्द ठेवला आहे. पण, जिथे तो लाक्षणिक अर्थाने वापरला आहे, जसं की स्तोत्र ७:९ आणि २६:२ आणि प्रकटीकरण २:२३, तिथे मात्र मूळ भाषेत जो अर्थ सांगायचा होता तोच अर्थ देण्यात आला आहे. अशा ठिकाणी या शब्दाचं भाषांतर, “खोल भावना,” किंवा “खोल विचार,” “गुप्त विचार,” असं केलं आहे; तसंच त्याचा शब्दशः अर्थ तळटीपेमध्ये दिला आहे.

    याशिवाय, बायबलच्या काही भाषांतरांमध्ये “गेहेन्‍ना”  या शब्दाचं “नरक” असं भाषांतर करण्यात आलं आहे. पण त्यातून, “मेलेल्या लोकांचा छळ करण्यासाठी सतत जळत असलेलं एक ठिकाण” असा चुकीचा अर्थ जातो. (मत्तय ५:२२, २९, ३०; मार्क ९:४३; लूक १२:५) या भाषांतरात मात्र “गेहेन्‍ना”  हा मूळ भाषेतलाच शब्द वापरला आहे आणि त्यासाठी तळटीपही दिली आहे. ही तळटीप वाचकांना शब्दार्थसूचीकडे घेऊन जाते. त्या ठिकाणी गेहेन्‍ना  म्हणजे नेमकं काय याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • वाचन सोपं करणं. या भाषांतरात, सर्वसामान्य मराठी माणूस आपल्या रोजच्या जीवनात जी भाषा वापरतो ती भाषा वापरण्यात आली आहे. हे भाषांतर वाचायला आणि समजायला सोपं असावं म्हणून अशी भाषा वापरण्यात आली आहे. याशिवाय, वाचताना शब्दांचा उच्चार सहज करता यावा म्हणून काही अवघड शब्द सोप्या पद्धतीने लिहिण्यात आले आहेत. जसं की, अलमोनदिबलाथाईम हा शब्द अलमोन-दिबलाथाईम, अराममाका हा शब्द अराम-माका आणि हददेजर हा शब्द हदद-एजर असा लिहिण्यात आला आहे.

या भाषांतराची इतर वैशिष्ट्यं:

बायबलच्या या भाषांतरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तळटिपा:

  • “किंवा” हिब्रू, अरामी आणि ग्रीक या भाषांमधल्या शब्दांचा मूळ अर्थ न बदलता वेगळ्या पद्धतीने केलेलं भाषांतर.​—उत्पत्ती १:२, “क्रियाशील शक्‍ती”, आणि यहोशवा १:८, “मनन” यासाठी असलेली तळटीप.

  • “किंवा कदाचित” एखाद्या वचनाचा वेगळा, पण योग्य असलेला अर्थ देण्यासाठी केलेलं भाषांतर.​—उत्पत्ती २१:६, “माझ्यासोबत हसेल”; जखऱ्‍या १४:२१, “कनानी.”

  • “शब्दशः” हिब्रू, अरामी किंवा ग्रीक भाषेतल्या शब्दांचा शब्दशः अर्थ, किंवा त्या भाषेतल्या शब्दाचा मूळ अर्थ.​—निर्गम ४:१२, “तुझ्यासोबत असेन”; अनुवाद ३२:१४, “द्राक्षांची मदिरा.”

  • शब्दांचा अर्थ आणि त्यांच्याशी संबंधित असलेली माहिती नावांचे अर्थ (उत्पत्ती ३:१७, “आदाम”; निर्गम १५:२३, “मारा”); वजनांची आणि मापांची माहिती (उत्पत्ती ६:१५, “हात”); सर्वनाम कोणाला सूचित करतं ही माहिती (रूथ ४:१५, “त्याच्यामुळे”); अतिरिक्‍त लेखांत आणि शब्दार्थसूचीत दिलेली फायदेकारक माहिती.​—उत्पत्ती ३७:३५, “कबरेत”; मत्तय ५:२२, “गेहेन्‍नाच्या.”

बायबलच्या या भाषांतरात सुरुवातीला “देवाच्या वचनाबद्दल थोडी माहिती” दिली आहे. त्यात बायबलच्या मूलभूत शिकवणींबद्दल थोडक्यात सांगितलं आहे. बायबलच्या शेवटच्या पुस्तकानंतर लगेच “बायबल पुस्तकांची सूची,” “बायबलच्या शब्दांची सूची” आणि “बायबलची शब्दार्थसूची” दिली आहे. बायबलमध्ये काही शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आले आहेत हे वाचकाला समजण्यासाठी शब्दार्थसूची मदत करते. अतिरिक्‍त लेख क यात पुढील भाग दिले आहेत: “बायबलचं भाषांतर कोणत्या तत्त्वांवर आधारित असलं पाहिजे?, बायबलच्या या भाषांतराची वैशिष्ट्यं,” “बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?,” “हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव,” “ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचं नाव,” “तक्‍ता: यहूदाचे आणि इस्राएलचे संदेष्टे आणि राजे,” आणि “येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या मुख्य घटना.” याशिवाय, अतिरिक्‍त लेख ख यात बायबलचा सखोल अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांसाठी नकाशे, तक्‍ते आणि इतर उपयुक्‍त माहितीही दिली आहे.

बायबलमधल्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला त्या पुस्तकाची रूपरेषा दिली आहे. त्यामुळे त्या संपूर्ण पुस्तकात काय सांगितलं आहे याची वाचकाला थोडक्यात माहिती मिळते. याशिवाय, प्रत्येक अध्यायात त्यातल्या वचनांशी संबंधित असलेली दुसऱ्‍या वचनांची एक सूचीही दिली आहे.