व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क१

बायबलचं भाषांतर कोणत्या तत्त्वांवर आधारित असलं पाहिजे?

बायबल खरंतर प्राचीन हिब्रू, अरामी आणि ग्रीक भाषांमध्ये लिहिलं गेलं होतं. आज संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग ३,००० हून जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. पण ज्या मूळ भाषांमध्ये बायबल लिहिण्यात आलं होतं, त्या भाषा आज बायबल वाचणाऱ्‍या अनेकांना समजत नाहीत. म्हणून त्यांना भाषांतर केलेल्या बायबलची गरज पडते. मग बायबलचं भाषांतर करताना कोणती तत्त्वं किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायची गरज आहे? आणि पवित्र शास्त्र—नवे जग भाषांतर  या बायबलचं भाषांतर करताना ही तत्त्वं कशी लागू करण्यात आली आहेत?

काही लोक असं म्हणतील, की बायबलचं भाषांतर जर मूळ भाषेतून शब्दशः, म्हणजे जसंच्या तसं केलं तरच मूळ भाषेत नेमकं काय सांगितलं होतं ते वाचकांपर्यंत पोहोचेल. पण असं नेहमीच होत नाही. याची काही कारणं विचारात घ्या:

  • प्रत्येक भाषेचं व्याकरण, शब्दसंग्रह आणि वाक्यरचना वेगवेगळी असते. हिब्रू भाषेचे एक प्रोफेसर, एस. आर. ड्रायव्हर असं म्हणतात, की प्रत्येक भाषेचं “व्याकरण आणि त्यातल्या शब्दांचा उगम वेगळा असतो; इतकंच नाही तर वाक्यांमध्ये ज्या प्रकारे विचार मांडले जातात त्यातसुद्धा फरक असतो.” प्रत्येक भाषेत विचार करायची पद्धत अगदी वेगळी असते. त्यामुळे प्रोफेसर ड्रायव्हर पुढे म्हणतात, की “वेगवेगळ्या भाषांची वाक्यरचना एकसारखी नसते.”

  • आजच्या काळातल्या कोणत्याही भाषेचा शब्दसंग्रह आणि त्या भाषेचं व्याकरण बायबल काळातल्या हिब्रू, अरामी आणि ग्रीक भाषेसारखं नाही. त्यामुळे जर बायबलचं शब्दशः भाषांतर केलं, तर त्याचा अर्थ स्पष्ट होणार नाही, आणि काही वेळा तर त्यातून चुकीचा अर्थही निघू शकतो.

  • एखाद्या शब्दाचा किंवा वाक्यांशाचा अर्थ त्याच्या मागच्या-पुढच्या संदर्भानुसार वेगवेगळा असू शकतो.

बायबलच्या काही भागांचं मूळ भाषेतून शब्दशः भाषांतर करणं शक्य आहे. पण भाषांतर करणाऱ्‍याने हे फार काळजीपूर्वक करायला हवं.

शब्दशः भाषांतर केल्यामुळे चुकीचा अर्थ कसा जाऊ शकतो, याची काही उदाहरणं पाहा:

  • बायबलमध्ये “झोप” हा शब्द खरोखरच्या झोपेलाही सूचित करतो आणि मृत्यूलाही सूचित करतो. (मत्तय २८:१३; प्रेषितांची कार्यं ७:६० तळटीप) ज्या वेळी हा शब्द मृत्यूला सूचित करण्यासाठी वापरला जातो, त्या वेळी बायबलचं भाषांतर करणारे त्याचं भाषांतर सरळ “मृत्यू” किंवा “मृत्यूची झोप घेणं” असं करू शकतात. त्यामुळे एखाद्या वचनात खरोखरच्या झोपेबद्दल म्हटलं आहे की मृत्यूबद्दल याविषयी वाचकाचा गोंधळ होत नाही.​—१ करिंथकर ७:३९; १५:५१; १ थेस्सलनीकाकर ४:१३; २ पेत्र ३:४.

  • प्रेषित पौलने इफिसकर ४:१४ मध्ये एका वाक्यांशाचा उपयोग केला आहे. त्याचं शब्दशः भाषांतर, “माणसांचे फासे खेळताना” असं केलं जाऊ शकतं. हा जुन्या काळातला एक वाक्प्रचार असून त्याचा अर्थ फाशांच्या खेळात समोरच्या व्यक्‍तीला फसवणं असा होतो. बऱ्‍याच भाषांमध्ये जर या वाक्यांशाचं शब्दशः भाषांतर केलं, तर त्यातून वाचकांना काहीच समजणार नाही. पण तेच जर त्याचं भाषांतर, “चलाख माणसांकडून फसवलं जाणं,” असं केलं तर त्याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो.

  • ग्रीक भाषेत, रोमकर १२:११ या वचनात एका वाक्यांशाचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचा शब्दशः अर्थ, “पवित्र शक्‍तीने उकळणं” असा होतो. पण या वाक्यांशातून खरंतर जो अर्थ निघायला हवा, तो मराठी भाषेत येत नाही. त्यामुळे बायबलच्या या भाषांतरात त्याचं भाषांतर “पवित्र शक्‍तीने आवेशी असणं” असं करण्यात आलं आहे.

  • मत्तय ५:३

    शब्दश: “दीन वृत्तीचे”

    मूळ अर्थ: “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे”

    डोंगरावरच्या सुप्रसिद्ध उपदेशात, येशूने एका वाक्यांशाचा उपयोग केला. त्याचं सहसा भाषांतर “जे दीन वृत्तीचे आहेत ते धन्य” असं करण्यात आलं आहे. (मत्तय ५:३, मराठी कॉमन लँग्वेज ) पण, “दीन वृत्तीचे” या वाक्यांशातून मूळ भाषेत जे काही सांगितलं होतं तो अर्थ येत नाही. कारण इथे येशू दीनतेबद्दल किंवा नम्रतेबद्दल शिकवत नव्हता, तर तो लोकांना हे शिकवत होता, की खरा आनंद मिळवायला आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे; फक्‍त रोजच्या गरजा पूर्ण केल्याने आपल्याला खरा आनंद मिळत नाही. (लूक ६:२०) म्हणून, काही बायबलमध्ये या वाक्यांशाचं भाषांतर “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे” किंवा “आपल्याला देवाची गरज आहे याची ज्यांना जाणीव आहे,” असं केलं आहे. अशा प्रकारे केलेल्या भाषांतरातून मूळ भाषेतल्या शब्दांचा खरा अर्थ मिळतो.​—मत्तय ५:३; द न्यू टेस्टामेन्ट इन मॉर्डन इंग्लिश.

  • बऱ्‍याच शास्त्रवचनांत ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर “ईर्ष्या” असं करण्यात आलं आहे, त्याचा अर्थ जवळच्या व्यक्‍तीने केलेल्या विश्‍वासघातामुळे येणारा राग, किंवा इतरांजवळ असलेल्या धनसंपत्तीमुळे वाटणारा त्यांचा हेवा असा होतो. (नीतिवचनं ६:३४; यशया ११:१३) पण हाच हिब्रू शब्द एका सकारात्मक अर्थानेही वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ: यहोवाला आपल्या सेवकांबद्दल असलेल्या “आवेशासाठी” किंवा त्यांचं संरक्षण करण्याच्या त्याच्या तीव्र इच्छेसाठी तो वापरण्यात आला आहे. तसंच, “फक्‍त आपलीच उपासना केली जावी” या यहोवाच्या अपेक्षेसाठीही हा शब्द वापरण्यात आला आहे. (निर्गम ३४:१४; २ राजे १९:३१; यहेज्केल ५:१३; जखऱ्‍या ८:२) याशिवाय हा शब्द, देवाच्या विश्‍वासू सेवकांना देवाबद्दल आणि त्याच्या उपासनेबद्दल असलेल्या “आवेशासाठी” किंवा देवाविरुद्ध कोणताही अविश्‍वासूपणा खपवून न घेण्याच्या त्यांच्या मनोवृत्तीसाठीही वापरण्यात आला आहे.​—स्तोत्रं ६९:९; ११९:१३९; गणना २५:११.

  • हिब्रू शब्द याध  याचं भाषांतर सहसा “हात” असं केलं जातं. पण मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेऊन त्याचं भाषांतर “अधिकार,” “उदारता,” “ताकद” असे शब्द किंवा इतर शब्द वापरून केलं जाऊ शकतं.

    हिब्रू भाषेत हातासाठी सहसा जो शब्द वापरण्यात आला आहे, त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. म्हणून मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेऊन या शब्दाचं भाषांतर “अधिकार,” “उदारता” किंवा “ताकद” असं केलं जाऊ शकतं. (२ शमुवेल ८:३; १ राजे १०:१३; नीतिवचनं १८:२१) खरंतर, पवित्र शास्त्र—नवे जग भाषांतर  याच्या इंग्रजी आवृत्तीत या शब्दाचं ४० वेगवेगळ्या प्रकारे भाषांतर करण्यात आलं आहे.

या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, बायबलचं भाषांतर करताना मूळ भाषेतल्या एखाद्या शब्दासाठी प्रत्येक वेळी एकाच शब्दाचा उपयोग करणं योग्य ठरणार नाही. मूळ भाषेतले विचार आपल्या भाषेत योग्य प्रकारे मांडण्यासाठी भाषांतर करणाऱ्‍याने विचारपूर्वक शब्दांची निवड केली पाहिजे. याशिवाय, त्याने आपल्या भाषेच्या व्याकरणाचे नियम लक्षात घेऊन वाक्यरचना केली पाहिजे, म्हणजे ते भाषांतर वाचायला सोपं जाईल.

पण त्याच वेळी भाषांतर दुसऱ्‍या टोकाला जाणार नाही, म्हणजे ते सारांश रूपात होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. भाषांतर करणारा जेव्हा बायबलचं आपल्या मनाप्रमाणे सारांश रूपात भाषांतर करतो, तेव्हा त्यातून चुकीचा अर्थ जाऊ शकतो. तो कसा? भाषांतर करणारा नकळतपणे मूळ भाषेतल्या माहितीत आपले विचार जोडण्याची, किंवा मूळ भाषेतली एखादी महत्त्वाची माहिती सोडून द्यायची शक्यता असते. त्यामुळे सारांश रूपात केलेलं भाषांतर वाचायला जरी सोपं असलं, तरी त्यातून बऱ्‍याच वेळा मूळ भाषेतले विचार वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत.

एखादा भाषांतरकार ज्या धार्मिक शिकवणी मनापासून मानतो, त्यांचासुद्धा त्याच्या भाषांतरावर परिणाम होऊ शकतो. एक उदाहरण विचारात घ्या. मत्तय ७:१३ म्हणतं: “नाशाकडे जाणारा . . . रस्ता पसरट आहे.” पण धार्मिक शिकवणींनी प्रभावित झालेल्या काही भाषांतरकारांनी “नाश” या शब्दाऐवजी “नरक” असा शब्द वापरला आहे. खरंतर, मूळ ग्रीक भाषेत यासाठी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ “नाश” असाच होतो.

बायबलचं भाषांतर करणाऱ्‍यांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे, बायबल हे सर्वसामान्य लोकांच्या भाषेत, म्हणजे शेतकरी, मेंढपाळ आणि मासेमारी करणारे यांच्यासारख्या लोकांच्या भाषेत लिहिण्यात आलं होतं. (नहेम्या ८:८, १२; प्रेषितांची कार्यं ४:१३) त्यामुळे ज्या भाषांतरातून प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबलचा संदेश सहज समजतो ते भाषांतर एक चांगलं भाषांतर आहे असं म्हणता येईल; मग हे प्रामाणिक मनाचे लोक कोणत्याही पार्श्‍वभूमीचे असोत. भाषांतर करताना सर्वसामान्य माणूस रोजच्या भाषेत जे साधेसोपे, सहज समजतील असे शब्द वापरतो ते वापरणं योग्य राहील; तो सहसा वापरत नाही असे शब्द टाळायला हवेत.

बायबलचं भाषांतर करणाऱ्‍या अनेकांनी आधुनिक भाषांतरांमधून ‘यहोवा’ हे देवाचं नाव काढून टाकलं आहे. आणि आपण केलेलं हे काम योग्य असल्याचं ते कधीही सिद्ध करू शकत नाहीत. कारण, बायबलच्या अनेक प्राचीन हस्तलिखितांमध्ये देवाचं नाव दिलेलं असताना त्यांनी ते काढून टाकलं आहे. (अतिरिक्‍त लेख क४ पाहा.) अनेक भाषांतरांमध्ये देवाच्या नावाऐवजी “परमेश्‍वर,” “प्रभू” किंवा यासारखी दुसरी एखादी पदवी वापरण्यात आली आहे. आणि काही भाषांतरांमध्ये तर देवाला एक नाव आहे ही गोष्टसुद्धा लपवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, योहान १७:२६ मध्ये दिलेल्या येशूच्या प्रार्थनेचं अशा प्रकारे भाषांतर केलं गेलं आहे: “मी त्यांना तुझी ओळख करून दिली आहे.” तर योहान १७:६ मध्ये, “तू मला दिलेल्या लोकांना मी तुझी ओळख पटवून दिली आहे,” असं भाषांतर करण्यात आलं आहे. पण येशूच्या प्रार्थनेचं अचूक भाषांतर हे आहे: “मी त्यांना तुझं नाव  प्रकट केलंय,” आणि “जे लोक तू मला . . . दिले होते, त्यांना मी तुझं नाव प्रकट केलंय.”

नवे जग भाषांतर  याच्या पहिल्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत असं सांगितलं होतं: “आम्ही शास्त्रवचनांचं सारांश रूपात भाषांतर केलेलं नाही. तर आधुनिक इंग्रजी भाषेत जिथे शक्य आहे, तिथे शब्दशः भाषांतर करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. पण ज्या ठिकाणी शब्दशः भाषांतरामुळे भाषांतर किचकट होऊन मूळ अर्थ स्पष्ट होत नाही, तिथे आम्ही शब्दशः भाषांतर करायचं टाळलं आहे.” त्यामुळे नवे जग बायबल भाषांतर समितीने या भाषांतरात अशा शब्दांचा आणि वाक्यांशाचा उपयोग केला आहे जे मूळ भाषेच्या शैलीसारखे आहेत. पण जिथे अशी भाषाशैली वापरल्याने भाषांतर विचित्र वाटतं किंवा जिथे मूळ अर्थ स्पष्ट होत नाही, तिथे अशी भाषाशैली वापरण्याचं टाळण्यात आलं आहे. यामुळे हे भाषांतर वाचायला सहज आणि सोपं आहे. शिवाय, वाचक याची पूर्ण खातरी बाळगू शकतात, की या भाषांतरात देवाच्या प्रेरित वचनांत दिलेल्या संदेशाचं अचूक भाषांतर करण्यात आलं आहे.​—१ थेस्सलनीकाकर २:१३.