व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क३

बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?

बायबल हे मुळात देवाकडून आहे. त्यानेच त्याचं लिखाण करून घेतलं आहे आणि ते सुरक्षितही ठेवलं आहे. पुढे जे म्हटलंय ते लिहायची प्रेरणासुद्धा देवानेच दिली आहे.

“आमच्या देवाचं वचन सर्वकाळ टिकून राहतं.”—यशया ४०:८.

हे विधान अगदी खरं आहे. आज बायबलची मूळ हस्तलिखितं, म्हणजे हिब्रू व अरामी शास्त्रवचनांची a आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची मूळ हस्तलिखितं टिकून राहिलेली नाहीत; पण, देवाचं वचन मात्र आजपर्यंत टिकून राहिलं आहे. तर मग प्रश्‍न आहे, की देवाच्या प्रेरणेने लिहिलेली मूळ लिखाणांमधली माहिती आणि आज आपल्याकडे जे बायबल आहे त्यातली माहिती एकसारखीच आहे हे आपण ठामपणे कसं म्हणू शकतो?

लिखाणांच्या प्रती तयार करणाऱ्‍यांनी देवाचं वचन सुरक्षित ठेवलं

सर्वात आधी आपण हिब्रू शास्त्रवचनांबद्दल पाहूयात. या शास्त्रवचनांतली माहिती मूळ लिखाणांतल्या माहितीसारखीच आहे. याचं एक कारण म्हणजे, प्राचीन काळात देवाने घालून दिलेली एक प्रथा; या प्रथेनुसार मूळ लिखाणांच्या प्रती तयार कराव्या लागायच्या. b उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएलच्या राजांना आज्ञा दिली होती, की त्यांनी स्वतःसाठी नियमशास्त्राच्या प्रती तयार कराव्यात. (अनुवाद १७:१८) याशिवाय, देवाने लेव्यांनाही नियमशास्त्र शिकवायची आणि ते सुरक्षित ठेवायची जबाबदारी दिली होती. (अनुवाद ३१:२६; नहेम्या ८:७) पुढे, यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासात गेले, त्यानंतर लिखाणांच्या प्रती तयार करणाऱ्‍या लोकांचा एक वर्गच तयार झाला; त्यांना शास्त्री (सोफेरीम) असं म्हटलं जायचं. (एज्रा ७:६, तळटिपा) काळ सरत गेला तसं या शास्त्र्यांनी हिब्रू शास्त्रवचनांतल्या ३९ पुस्तकांच्या अनेक प्रती तयार केल्या.

शास्त्र्यांनी अनेक शतकांपर्यंत या पुस्तकांची फार काळजीपूर्वक नक्कल केली. मग मध्य युगाच्या काळात (इ.स. ५०० ते इ.स. १५००) मॅसोरेट्‌स नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या यहुदी शास्त्र्यांच्या गटाने ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्या गटाने तयार केलेली सर्वात जुनी आणि संपूर्ण हस्तलिखित प्रत लेनीनग्राड कोडेक्स या नावाने ओळखली जात असून, ती इ.स. १००८/१००९ या काळातली आहे. पण १९५० च्या सुमारास मृत समुद्राजवळ काही गुंडाळ्या सापडल्या. त्यांत बायबलची जवळजवळ २२० हस्तलिखितं किंवा त्या हस्तलिखितांचे काही तुकडेही सापडले. बायबलची ही हस्तलिखितं लेनीनग्राड कोडेक्सपेक्षा एक हजाराहून जास्त वर्षं जुनी आहेत. मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांची आणि लेनीनग्राड कोडेक्सची तुलना केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे: मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमधल्या शब्दांत आणि लेनीनग्राड कोडेक्समधल्या शब्दांत थोडाफार फरक असला, तरी मूळ संदेशात मात्र काहीच फरक नाही.

आता आपण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतल्या २७ पुस्तकांबद्दल पाहूयात. ही पुस्तकं येशू ख्रिस्ताच्या काही प्रेषितांनी आणि सुरुवातीच्या काही शिष्यांनी लिहिली होती. यहुदी शास्त्र्यांच्या परंपरेप्रमाणेच सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनीही या पुस्तकांच्या प्रती तयार केल्या. (कलस्सैकर ४:१६) रोमी सम्राट डायक्लेशन आणि इतर काहींनी, सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांचं सगळं साहित्य नष्ट करायचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा प्राचीन काळातली हजारो हस्तलिखितं आणि त्यांचे काही तुकडे आज आपल्या काळातही सुरक्षित आहेत.

ख्रिस्ती लिखाणांचं इतर भाषांमध्येही भाषांतर केलं गेलं. सुरुवातीला ज्या भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं गेलं, त्यांमध्ये काही प्राचीन भाषाही होत्या; जसं की अर्मेनियन, कॉप्टिक, इथियोपिक, जॉर्जियन, लॅटिन आणि सीरियाक.

भाषांतरासाठी कोणत्या लिखाणांना प्रमाण मानावं हे ठरवण्यात आलं

बायबलच्या सगळ्याच प्राचीन हस्तलिखितांमधले शब्द एकसारखे नाहीत. तर मग, मूळ भाषेत नेमकं काय म्हटलं होतं हे आपल्याला कसं कळेल?

हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. समजा एका शिक्षकाने आपल्या १०० विद्यार्थ्यांना पुस्तकातला एक धडा जसाच्या तसा लिहून काढायला सांगितला. मग त्यानंतर पुस्तकातला तो धडा जरी हरवला, तरी विद्यार्थ्यांच्या त्या १०० प्रतींची तुलना करून मूळ धड्यात काय म्हटलं होतं ते आपल्याला समजेल. हे खरं आहे, की धडा जसाच्या तसा लिहून काढताना प्रत्येक विद्यार्थ्याकडून काही चुका व्हायची शक्यता आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांकडून एकसारख्याच चुका होण्याची शक्यता फार कमी आहे. अगदी तसंच, विद्वान जेव्हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बायबलच्या पुस्तकांच्या हजारो प्राचीन प्रतींची आणि त्या प्रतींच्या तुकड्यांची तुलना करतात, तेव्हा नक्कल करताना झालेल्या चुका ते ओळखू शकतात आणि त्यावरून मूळ लिखाणांत काय म्हटलं होतं हे ते समजू शकतात.

“आपण खातरीने म्हणू शकतो, की या लिखाणांसारखं दुसरं कोणतंही प्राचीन लिखाण आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचलेलं नाही”

बायबलच्या मूळ लिखाणांमध्ये जे विचार मांडले होते, ते आपल्यापर्यंत जसेच्या तसे पोहोचले आहेत याची आपण खातरी बाळगू शकतो का? हिब्रू शास्त्रवचनांच्या लिखाणांबद्दल बोलताना विल्यम एच. ग्रीन हे विद्वान म्हणतात: “आपण खातरीने म्हणू शकतो, की या लिखाणांसारखं दुसरं कोणतंही प्राचीन लिखाण आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचलेलं नाही.” आणि नवा करार म्हटलेल्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांबद्दल बोलताना बायबलचे एक विद्वान एफ. एफ. ब्रूस असं लिहितात: “जुन्या काळातल्या प्रसिद्ध लेखकांची अशी कितीतरी लिखाणं आहेत ज्यांच्या खरेपणाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण करायचा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. पण त्या लिखाणांच्या तुलनेत आपल्या नव्या कराराची लिखाणं खरी आहेत हे सिद्ध करणारे कितीतरी जास्त पुरावे उपलब्ध आहेत.” पुढे ते असंही म्हणतात: “नव्या करारातली पुस्तकं ही जर धार्मिक पुस्तकं नसती, तर ती खरी आहेत की नाही याबद्दल कोणीही शंका घेतली नसती.”

मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमध्ये असलेला यशया पुस्तकाचा ४० वा अध्याय (इ.स.पू. १२५ ते १००)

या गुडाळ्यांची तुलना सुमारे हजार वर्षांनंतर सापडलेल्या हस्तलिखितांशी केल्यावर त्यात अगदीच किरकोळ फरक दिसून आला, आणि तोसुद्धा जास्त करून शब्दलेखनात

अलेप्पो कोडेक्स यातला यशया पुस्तकाचा ४० वा अध्याय. मॅसोरेट्‌स म्हटल्या जाणाऱ्‍या शास्त्र्यांनी इ.स. ९३० च्या सुमारास तयार केलेली एक महत्त्वाची हिब्रू हस्तलिखित प्रत

हिब्रू शास्त्रवचनं: हिब्रू शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर  (१९५३-​१९६०) हे रूडॉल्फ किटल यांच्या बिब्लिया हेब्राइका  या लिखाणावर आधारित होतं. पण काही काळानंतर हिब्रू लिखाणांच्या नवीन आवृत्त्या तयार करण्यात आल्या. त्या म्हणजे बिब्लिया हेब्राइका स्टुटगार्टेनसिया  आणि बिब्लिया हेब्राइका क्विन्टा.  या आवृत्त्यांमध्ये अलीकडे सापडलेली नवीन माहिती समाविष्ट करण्यात आली. ही नवीन माहिती, मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांवरून आणि इतर प्राचीन हस्तलिखितांवरून घेण्यात आली. विद्वानांनी तयार केलेल्या या आवृत्त्यांच्या मुख्य लिखाणांत लेनीनग्राड कोडेक्स ठेवण्यात आलं, तर तळटिपांमध्ये इतर हस्तलिखितांमधली माहिती ठेवण्यात आली; जसं की, समॅरिटन पेन्टेट्यूक, मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्या, ग्रीक सेप्टुअजिंट,  अरामी टारगम्स, लॅटिन वल्गेट  आणि सीरियाक पेशिटा  या हस्तलिखितांमधली माहिती. त्यामुळे, नवे जग भाषांतर  याची इंग्रजीतली सुधारित आवृत्ती तयार करताना बिब्लिया हेब्राइका स्टुटगार्टेनसिया  आणि बिब्लिया हेब्राइका क्विन्टा  या दोन्ही आवृत्त्यांची मदत घेण्यात आली आहे.

ग्रीक शास्त्रवचनं: १९ व्या शतकाच्या शेवटी बी. एफ. वेस्टकॉट आणि एफ.जे.ए. हॉर्ट या विद्वानांनी त्यांच्या काळात उपलब्ध असलेल्या आणि त्यांच्या मते अचूकतेच्या बाबतीत मूळ लिखाणांच्या अगदी जवळ असलेल्या बायबलच्या हस्तलिखितांची व हस्तलिखितांच्या तुकड्यांची तुलना केली. आणि त्यापासून त्यांनी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचं एक प्रमाण लिखाण तयार केलं. या प्रमाण लिखाणाच्या आधारावर, १९५० च्या सुमारास नवे जग बायबल भाषांतर समितीने ग्रीक शास्त्रवचनांचं भाषांतर केलं. तसंच, समितीने प्राचीन काळातल्या काही पपायरस हस्तलिखितांचाही उपयोग केला. असं मानलं जातं, की ही हस्तलिखितं दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या शतकांतली आहेत. आणि पुढे जाऊन तर आणखी कितीतरी पपायरस हस्तलिखितं सापडली. याशिवाय, नेस्टले व ॲलेन्ड, आणि ‘युनाइटेड बायबल सोसाइटीज’ यांनीही प्रमाण लिखाणं तयार केली; यांत, विद्वानांनी संशोधन केलेली अगदी अलीकडची माहिती समाविष्ट आहे. त्यामुळे नवे जग भाषांतर  याच्या इंग्रजीतल्या सुधारित आवृत्तीत या संशोधनातल्या काही माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रमाण लिखाणांवरून हे अगदी स्पष्ट होतं, की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या जुन्या भाषांतरांमध्ये, जसं की किंग जेम्स व्हर्शनमध्ये  असलेली काही वचनं, ही प्रती तयार करणाऱ्‍यांनी नंतर जोडली आहेत. पण ही वचनं खरंतर देवप्रेरित शास्त्रवचनांचा कधीच भाग नव्हती. बायबलच्या भाषांतरांमध्ये वचनांची विभागणी कशी केली जावी हे १६ व्या शतकातच ठरवण्यात आलं होतं, आणि सर्वसामान्यपणे हेच प्रमाण मानलं गेलं. त्यामुळे नव्याने जोडण्यात आलेली वचनं काढून टाकल्याने बायबलच्या अनेक भाषांतरांत मधे मोकळी जागा राहते. ही वचनं म्हणजे: मत्तय १७:२१; १८:११; २३:१४; मार्क ७:१६; ९:४४, ४६; ११:२६; १५:२८; लूक १७:३६; २३:१७; योहान ५:४; प्रेषितांची कार्यं ८:३७; १५:३४; २४:७; २८:२९; रोमकर १६:२४. बायबलच्या या भाषांतरातसुद्धा ही वचनं गाळण्यात आली आहेत आणि तिथे तळटिपा दिल्या आहेत.

मार्क पुस्तकाच्या १६ व्या अध्यायात दिलेली मोठी समाप्ती (वचन ९-२०) आणि छोटी समाप्ती; तसंच योहान ७:५३ ते ८:११ ही वचनं मूळ हस्तलिखितांचा भाग नव्हती हे स्पष्ट आहे. त्यामुळे ही नकली वचनं या बायबल भाषांतरात दिलेली नाहीत. c

बायबलच्या मूळ लिखाणांमधला अर्थ अचूकपणे मांडण्यासाठी काही वचनं अमुक पद्धतीनेच मांडली जावीत असं विद्वानांचं मत आहे. त्यामुळे बायबलच्या या आवृत्तीत काही वचनांतल्या शब्दांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, काही हस्तलिखितांमध्ये मत्तय ७:१३ हे वचन अशा प्रकारे मांडण्यात आलं आहे: “अरुंद दरवाजाने आत जा. कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा  रुंद आणि रस्ता पसरट आहे आणि त्यातून जाणारे बरेच आहेत.” नवे जग भाषांतर  याच्या आधीच्या इंग्रजी आवृत्तीत या वचनात “दरवाजा” हा शब्द टाकला नव्हता. पण, हस्तलिखितांच्या पुराव्यांचा आणखी अभ्यास केल्यावर हे दिसून आलं, की मूळ लिखाणांमध्ये “दरवाजा” हा शब्द होता. म्हणून इंग्रजीच्या नवीन आवृत्तीत तो शब्द टाकण्यात आला आहे. यासारख्याच आणखीही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पण हे बदल अगदीच किरकोळ आहेत, आणि त्यांमुळे देवाच्या वचनातला मूळ संदेश बदलत नाही.

२ करिंथकर ४:१३–५:४ ही वचनं असलेली इ.स. २०० च्या आसपासची एक पपायरस हस्तलिखित प्रत

a इथून पुढे याला फक्‍त हिब्रू शास्त्रवचनं असं म्हटलं आहे.

b प्रती तयार करण्यामागचं एक कारण म्हणजे, मूळ लिखाणं ही जास्त काळ न टिकणाऱ्‍या साधनांवर लिहिण्यात आली होती.

c ही वचनं नकली आहेत असं का म्हणता येईल, याबद्दलची अधिक माहिती १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या पवित्र शास्त्राचे नवे जग भाषांतर​—संदर्भासहित,  या बायबलच्या तळटिपांमध्ये वाचायला मिळते.