पेत्र याचं पहिलं पत्र ५:१-१४

  • देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा (१-४)

  • नम्र असा आणि जागे राहा (५-११)

    • सगळ्या चिंता देवावर टाकून द्या ()

    • सैतान गर्जणाऱ्‍या सिंहासारखा आहे ()

  • निरोपाचे शब्द (१२-१४)

 म्हणून, तुमच्यामध्ये असलेल्या वडिलांना मी, जो तुमच्यासारखाच एक वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि भविष्यात प्रकट होणार असलेल्या गौरवाचा भागीदार आहे,+ अशी विनंती करतो:* २  तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा.+ देखरेख करणारे* या नात्याने नाइलाजाने नाही, तर देवासमोर स्वखुषीने सेवा करा.+ तसंच, बेइमानीने कमवलेल्या पैशाच्या लोभाने नाही,+ तर उत्सुकतेने सेवा करा. ३  जे देवाची संपत्ती आहेत, त्यांच्यावर अधिकार गाजवू नका+ तर कळपासाठी उदाहरण बना,+ ४  म्हणजे प्रमुख मेंढपाळ+ प्रकट झाल्यावर तुम्हाला कधीही नष्ट न होणारा गौरवी मुकुट मिळेल.+ ५  त्याच प्रकारे तरुणांनो, वडीलधाऱ्‍या माणसांच्या* अधीन राहा.+ पण, तुम्ही सगळेच एकमेकांशी नम्रतेने वागत जा.* कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.+ ६  म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७  आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+ ८  सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्‍या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+ ९  पण तुम्ही विश्‍वासात दृढ राहून त्याचा विरोध करा,+ कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव* अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.+ १०  तुम्ही थोड्या काळापर्यंत दुःखं सोसल्यावर, सर्व प्रकारची अपार कृपा करणारा देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल. त्याने तुम्हाला आपल्या सर्वकाळाच्या गौरवात बोलावलं आहे,+ कारण तुम्ही ख्रिस्तासोबत ऐक्यात आहात. तो तुम्हाला दृढ करेल,+ तुम्हाला बळ देईल+ आणि स्थिर उभं राहायला मदत करेल. ११  सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन. १२  मी ज्याला एक विश्‍वासू भाऊ मानतो त्या सिल्वानच्या*+ हातून मी थोडक्यात तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. हे यासाठी, की तुम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि हीच देवाची खरी अपार कृपा आहे अशी प्रामाणिक साक्ष द्यावी. या अपार कृपेत तुम्ही स्थिर राहा. १३  जी बाबेलमध्ये आहे आणि तुमच्यासारखीच निवडलेली आहे, ती तुम्हाला नमस्कार सांगते. तसंच माझा मुलगा, मार्क+ हाही तुम्हाला नमस्कार सांगतो. १४  एकमेकांना भेटताना प्रेमाचं चुंबन घ्या. ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सर्वांना शांती मिळो.

तळटीपा

किंवा “असं प्रोत्साहन देतो.”
किंवा “कळपाची काळजीपूर्वक राखण करणारे.”
किंवा “वडिलांच्या.”
किंवा “नम्रतेचं वस्त्र घाला.”
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “संपूर्ण बंधुसमाज.”
याला सीला असंही म्हणतात.