करिंथकर यांना पहिलं पत्र १६:१-२४

  • यरुशलेममधल्या ख्रिश्‍चनांसाठी दान (१-४)

  • पौलच्या प्रवासाची योजना (५-९)

  • तीमथ्य आणि अपुल्लो यांच्या भेटींच्या योजना (१०-१२)

  • प्रोत्साहन आणि नमस्कार (१३-२४)

१६  आता पवित्र जनांसाठी दान गोळा करण्याच्या बाबतीत,+ मी गलतीयातल्या मंडळ्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याच तुम्हीही पाळा. २  दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे काही रक्कम बाजूला काढून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यावर दान गोळा करायची गरज पडणार नाही. ३  पण ज्या माणसांची तुम्ही तुमच्या पत्रांत शिफारस केली,+ त्यांना मी आल्यावर तुमची उदार देणगी नेण्यासाठी यरुशलेमला पाठवीन. ४  जर माझंही तिथे जाणं आवश्‍यक असेल, तर मी त्यांच्यासोबत जाईन. ५  मासेदोनियाचा दौरा पूर्ण केल्यावर मी तुमच्याकडे येईन, कारण मी मासेदोनियातून जाणार आहे.+ ६  आणि कदाचित मी तुमच्याकडे राहीन किंवा तुमच्या इथे हिवाळाही घालवीन. मग, मी पुढच्या प्रवासाला निघेन तेव्हा तुम्हाला काही अंतरापर्यंत माझ्यासोबत येऊन मला निरोप देता येईल. ७  कारण या वेळी तुम्हाला फक्‍त धावती भेट द्यायची माझी इच्छा नाही. उलट यहोवाची* इच्छा असेल, तर तुमच्याकडे काही काळ राहायची मी आशा करतो.+ ८  पण, पेन्टेकॉस्टच्या सणापर्यंत मी इफिसमध्येच राहणार आहे.+ ९  कारण प्रभूची जास्त प्रमाणात सेवा करता यावी, म्हणून संधीचं एक मोठं दार माझ्यासाठी उघडण्यात आलं आहे;+ पण विरोध करणारे बरेच आहेत. १०  आता तीमथ्य+ तिथे आला तर त्याला निश्‍चिंतपणे सेवा करता यावी म्हणून त्याला सहकार्य करा. कारण माझ्याप्रमाणेच तोही यहोवाची* सेवा करतो.+ ११  तेव्हा कोणीही त्याला कमी लेखू नका. त्याला शांतीने निरोप द्या म्हणजे तो माझ्याकडे येऊ शकेल; कारण मी इतर बांधवांसोबत त्याची वाट पाहत आहे. १२  आपला भाऊ अपुल्लो+ याला मी इतर बांधवांसोबत तुमच्याकडे येण्याची गळ घातली. आताच तुमच्याकडे येण्याचा त्याचा विचार नव्हता; पण संधी मिळताच तो तुमच्याकडे येईल. १३  जागे राहा,+ विश्‍वासात स्थिर राहा,+ धैर्यवान*+ आणि सामर्थ्यशाली व्हा.+ १४  तुम्ही जे काही करता ते सगळं प्रेमाने करा.+ १५  आता बांधवांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो: तुम्हाला माहीत आहे, की स्तेफनाचं घराणं हे अखयाचं पहिलं फळ आहे आणि पवित्र जनांची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. १६  तुम्हीसुद्धा अशा लोकांच्या, तसंच सहकार्य आणि मेहनत करणाऱ्‍या सर्वांच्याच अधीन राहा.+ १७  स्तेफना,+ फर्तूनात आणि अखायिक हे इथे असल्यामुळे मला आनंद होतो. कारण तुम्ही इथे नसल्याची कमी त्यांनी भरून काढली आहे. १८  त्यांनी मला आणि तुम्हालाही प्रोत्साहन दिलं आहे. तेव्हा, अशा माणसांची नेहमी कदर करा. १९  आशियातल्या मंडळ्या तुम्हाला नमस्कार सांगतात. तसंच, अक्विल्ला आणि प्रिस्का आणि त्यांच्या घरात जमणारी मंडळी+ हे सर्व तुम्हाला सप्रेम नमस्कार सांगतात. २०  सगळ्या बांधवांचा तुम्हाला नमस्कार. एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या. २१  आता मी पौल, माझ्या स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार लिहितो. २२  जर कोणी प्रभूवर प्रेम करत नसेल, तर तो शापित असो. हे आमच्या प्रभू, ये! २३  प्रभू येशूची अपार कृपा तुमच्यावर असो. २४  ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सगळ्यांना माझं प्रेम.

तळटीपा

अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “मर्दासारखं वागा.”