करिंथकर यांना पहिलं पत्र ११:१-३४

  • “माझं अनुकरण करा” ()

  • मस्तकपद आणि डोकं झाकणं (२-१६)

  • प्रभूच्या सांजभोजनाचा विधी पाळणं (१७-३४)

११  जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तसं तुम्हीही माझं अनुकरण करा.+ २  तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या* त्यांचं काटेकोरपणे पालन करता, याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो. ३  पण, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे;+ प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे;+ आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे,+ हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतं. ४  जो पुरुष आपलं डोकं झाकून प्रार्थना किंवा भविष्यवाणी करतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. ५  तसंच, जी स्त्री डोकं न झाकता प्रार्थना किंवा भविष्यवाणी करते,+ ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. कारण अशी स्त्री मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच आहे. ६  एखादी स्त्री जर डोकं झाकत नसेल, तर तिने आपले केस कापून टाकावे; पण, केस कापून टाकणं किंवा मुंडण करणं हे जर तिच्यासाठी लाजिरवाणं असेल, तर तिने आपलं डोकं झाकावं. ७  पुरुषाने आपलं डोकं झाकू नये, कारण तो देवाचं प्रतिरूप+ आणि गौरव आहे. पण स्त्री ही पुरुषाचा गौरव आहे. ८  कारण पुरुष स्त्रीपासून आला नाही, तर स्त्री पुरुषापासून आली.+ ९  इतकंच काय, पुरुषाला स्त्रीसाठी नाही, तर स्त्रीला पुरुषासाठी निर्माण करण्यात आलं होतं.+ १०  म्हणूनच, स्वर्गदूतांमुळे स्त्रीच्या डोक्यावर अधीनतेचं चिन्ह असणं आवश्‍यक आहे.+ ११  असं असलं, तरी ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये, स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी नाही आणि पुरुषसुद्धा स्त्रीपेक्षा वेगळा नाही. १२  कारण ज्याप्रमाणे स्त्री ही पुरुषापासून आहे,+ त्याचप्रमाणे पुरुषही स्त्रीपासून आहे. पण सर्वकाही देवापासून आहे.+ १३  तुम्हीच ठरवा, एखाद्या स्त्रीने डोकं न झाकता देवाला प्रार्थना करणं योग्य आहे का? १४  निसर्गच हे शिकवत नाही का, की पुरुषाचे लांब केस असणं ही त्याच्यासाठी अपमानाची गोष्ट आहे; १५  पण, स्त्रीचे लांब केस ही तिची शोभा आहे? कारण केस तिला पदराऐवजी* देण्यात आले आहेत. १६  पण, जर कोणी वाद घालून दुसऱ्‍या कोणत्या प्रथेचं समर्थन करत असेल, तर त्याने हे लक्षात घ्यावं, की आमच्यामध्ये किंवा देवाच्या मंडळ्यांमध्ये दुसरी कोणतीही प्रथा नाही. १७  पण, तुम्हाला या सूचना देताना मी तुमची प्रशंसा करत नाही; कारण तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमचं भलं होण्याऐवजी, नुकसानच होतं. १८  पहिली गोष्ट म्हणजे, मंडळीत तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमच्यामध्ये फुटी असतात, असं माझ्या ऐकण्यात आलं आहे. आणि काही प्रमाणात हे खरं असल्याचं मी मानतो. १९  कारण, तुमच्यामध्ये वेगवेगळे पंथ* नक्कीच असतील.+ पण, यावरून देव कोणाला मान्यता देतो हे स्पष्ट होईल. २०  तुम्ही एका ठिकाणी एकत्र येता, तेव्हा प्रभूचं सांजभोजन+ करणं शक्य नसतं. २१  कारण सांजभोजन करण्याआधीच प्रत्येकाने आपलं संध्याकाळचं जेवण केलेलं असतं. त्यामुळे, एक उपाशी राहतो, तर दुसरा प्यायलेला असतो. २२  तुम्हाला खायला-प्यायला घरं नाहीत का? की तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ लेखता आणि ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना लज्जित करता? आता मी तुम्हाला काय बोलू? तुमची प्रशंसा करू का? या बाबतीत तरी मी तुमची प्रशंसा करणार नाही. २३  खरंतर, सांजभोजनाबद्दल मी तुम्हाला जे शिकवलं ते मला प्रभूकडूनच मिळालं. कारण, ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिलं जाणार होतं, त्या रात्री+ त्याने भाकर घेतली, २४  आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली. मग तो म्हणाला: “ही भाकर माझ्या शरीराला सूचित करते.+ ते तुमच्यासाठी देण्यात आलं आहे. माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+ २५  मग, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं.+ तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ माझ्या रक्‍ताने हा करार स्थापित केला जाईल.+ जेव्हाही तुम्ही यातून प्याल, तेव्हा माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+ २६  कारण प्रभू येईपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाल आणि या प्याल्यातून प्याल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या मृत्यूची घोषणा कराल. २७  त्यामुळे, योग्यता नसताना जो ही भाकर खातो किंवा प्रभूच्या प्याल्यातून पितो, तो प्रभूच्या शरीराच्या आणि रक्‍ताच्या बाबतीत दोषी ठरेल. २८  प्रत्येकाने आधी स्वतःचं परीक्षण करून, आपण योग्य आहोत की नाही हे ठरवावं.+ त्यानंतरच त्याने ती भाकर खावी आणि त्या प्याल्यातून प्यावं. २९  कारण प्रभूचं शरीर कशाला सूचित करतं हे समजून न घेता, जो खातो आणि पितो तो स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतो. ३०  म्हणूनच, तुमच्यापैकी बरेच जण अशक्‍त आणि आजारी आहेत आणि बरेच जण मरण पावले आहेत.*+ ३१  खरंतर, आपण योग्य आहोत की नाही याचं आपण स्वतःच परीक्षण केलं, तर आपल्याला दोषी ठरवलं जाणार नाही. ३२  पण, आपल्याला दोषी ठरवलं जातं, तेव्हा आपल्याला यहोवाकडून* ताडन मिळतं.+ आणि यामुळे आपण जगासोबत शिक्षेसाठी पात्र ठरणार नाही.+ ३३  म्हणून बांधवांनो, तुम्ही प्रभूच्या सांजभोजनासाठी एकत्र येता तेव्हा एकमेकांसाठी थांबा. ३४  कोणाला भूक लागली असेल, तर त्याने घरी खावं, म्हणजे तुमचं एकत्र येणं न्यायदंडाचं कारण बनणार नाही.+ बाकीचे प्रश्‍न मी तिथे आल्यावर सोडवीन.

तळटीपा

किंवा “ज्या परंपरा तुम्हाला घालून दिल्या.”
किंवा “झाकण्यासाठी.”
किंवा “तुमच्यामध्ये फुटी.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “मृत्यूत झोपले आहेत.” हे खरोखरच्या मृत्यूला नाही, तर देवासोबत त्यांच्या तुटलेल्या नात्याला सूचित करतं.
अति. क५ पाहा.