प्रेषितांची कार्यं ४:१-३७

  • पेत्र आणि योहान यांना अटक (१-४)

    • विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या ५,००० इतकी झाली ()

  • न्यायसभेसमोर चौकशी (५-२२)

    • “बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही” (२०)

  • धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना (२३-३१)

  • शिष्य आपल्या वस्तू एकमेकांसोबत वाटून घेतात (३२-३७)

 ते दोघं लोकांशी बोलत असताना याजक, मंदिराचा अधिकारी आणि सदूकी लोक+ त्यांच्याजवळ आले. २  ते सगळे चिडले होते, कारण प्रेषित लोकांना शिकवत होते आणि येशूला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे* असं* उघडपणे सांगत होते.+ ३  म्हणून त्यांनी त्यांना पकडलं* आणि संध्याकाळ झाली असल्यामुळे दुसऱ्‍या दिवसापर्यंत कैदेत ठेवलं.+ ४  पण प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या होत्या, त्यांपैकी बऱ्‍याच जणांनी विश्‍वास ठेवला आणि अशा रितीने त्यांची* संख्या सुमारे ५,००० इतकी झाली.+ ५  दुसऱ्‍या दिवशी त्यांचे अधिकारी, वडीलजन आणि शास्त्री यरुशलेममध्ये एकत्र जमले. ६  मुख्य याजक हन्‍ना,+ कयफा,+ योहान, आलेक्सांद्र आणि मुख्य याजकाचे सगळे नातेवाईकही तिथे होते. ७  त्यांनी पेत्र आणि योहान यांना मध्ये उभं करून विचारलं: “तुम्ही कोणाच्या सामर्थ्याने किंवा नावाने हे काम केलं?” ८  तेव्हा पेत्र पवित्र शक्‍तीने* भरून गेला+ आणि त्यांना म्हणाला: “लोकांच्या अधिकाऱ्‍यांनो आणि वडीलजनांनो, ९  आम्ही या पांगळ्या माणसासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल+ आणि तो कसा बरा झाला याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय का? १०  तर मग तुम्ही सगळे जण आणि इस्राएलचे सर्व लोक ही गोष्ट लक्षात ठेवा: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने+ हा माणूस आज इथे तुमच्यासमोर धडधाकट उभा आहे. तुम्ही तर येशूला वधस्तंभावर* खिळून ठार मारलं,+ पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं.+ ११  ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी, म्हणजे तुम्ही जो दगड तुच्छ लेखला आणि जो कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय,’ तोच हा आहे.+ १२  शिवाय, तारण आणखी कोणाच्याही द्वारे मिळणं शक्य नाही, कारण ज्याद्वारे आपलं तारण होऊ शकेल,+ असं आकाशाखाली माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव नाही.”+ १३  जेव्हा त्यांनी पाहिलं, की पेत्र आणि योहान खूप धैर्याने* बोलत आहेत आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की खरंतर ते अशिक्षित* आणि सर्वसाधारण आहेत,+ तेव्हा त्यांना फार आश्‍चर्य वाटलं. आणि ही माणसं येशूसोबत असायची हे त्यांनी ओळखलं.+ १४  पण ज्याला बरं करण्यात आलं होतं, तो माणूस तिथेच उभा असल्यामुळे+ त्यांना त्यांच्याविरुद्ध काहीच बोलता आलं नाही.+ १५  म्हणून त्यांनी त्यांना न्यायसभेच्या* बाहेर जायला सांगितलं आणि ते आपसात चर्चा करू लागले. १६  ते म्हणू लागले: “या माणसांचं आपण काय करावं?+ कारण त्यांनी खरोखरच एक अद्‌भुत चमत्कार केलाय. शिवाय, यरुशलेमच्या सर्व लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलं असल्यामुळे+ आपण ते नाकारूही शकत नाही. १७  पण आता ही गोष्ट लोकांमध्ये आणखी पसरू नये, म्हणून आपण त्यांना धमकावू आणि पुन्हा या नावाने कोणाशीही बोलू नका अशी ताकीद देऊ.”+ १८  मग त्यांनी त्यांना आत बोलावलं आणि असा आदेश दिला, की त्यांनी येशूच्या नावाने काहीच बोलू किंवा शिकवू नये. १९  पण पेत्र आणि योहान यांनी त्यांना असं उत्तर दिलं: “आम्ही देवाऐवजी तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. २०  पण आमच्याबद्दल विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.”+ २१  तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावलं आणि त्यांची सुटका केली, कारण त्यांना शिक्षा देण्यासाठी कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. तसंच, त्यांना लोकांचीही भीती होती,+ कारण ते सगळे घडलेल्या चमत्काराबद्दल देवाचा गौरव करत होते. २२  ज्या माणसाला चमत्काराने* बरं करण्यात आलं होतं, त्याचं वय चाळीसपेक्षा जास्त होतं. २३  मग त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या लोकांकडे गेले. मुख्य याजकांनी आणि वडीलजनांनी त्यांना काय म्हटलं होतं, हे त्यांनी त्यांना सांगितलं. २४  हे ऐकून त्या सगळ्यांनी मिळून देवाला मोठ्याने अशी प्रार्थना केली: “हे सर्वोच्च प्रभू, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यांतल्या सगळ्या गोष्टी बनवल्या तो तूच आहेस.+ २५  आणि तूच पवित्र शक्‍तीद्वारे आमचा पूर्वज आणि तुझा सेवक दावीद याच्या तोंडून असं म्हटलं:+ ‘राष्ट्रं का खवळली आहेत आणि लोक व्यर्थ गोष्टींवर विचार का करत आहेत? २६  पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या* आणि त्याच्या अभिषिक्‍ताच्या* विरोधात उभे राहिले आणि अधिकारी त्यांच्याविरुद्ध एकत्र आले.’+ २७  आणि हे असंच घडलं. कारण खरोखरच हेरोद आणि पंतय पिलात,+ तसंच विदेशी लोक आणि इस्राएली लोकही, तू अभिषिक्‍त केलेला तुझा पवित्र सेवक येशू+ याच्या विरोधात या शहरात एकत्र झाले होते. २८  तू आपल्या सामर्थ्याप्रमाणे आणि संकल्पाप्रमाणे जे आधीच ठरवलं होतं, ते करावं म्हणून ते एकत्र झाले होते.+ २९  तर आता, हे यहोवा* त्यांच्या धमक्यांकडे लक्ष दे आणि तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहायला तुझ्या सेवकांना बळ दे. ३०  आणि तू आपला हात पुढे करून लोकांना बरं कर आणि तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने+ चिन्हं आणि चमत्कार घडवून आण.”+ ३१  त्यांनी अशी याचना* केली, तेव्हा ज्या ठिकाणी ते सगळे एकत्र जमले होते ती जागा हादरली. आणि ते सगळेच्या सगळे पवित्र शक्‍तीने भरून गेले+ आणि देवाचं वचन धैर्याने सांगू लागले.+ ३२  शिवाय, ज्यांनी विश्‍वास ठेवला होता ते सगळे एकदिलाने आणि ऐक्याने राहायचे आणि त्यांच्यापैकी कोणीही आपल्या मालकीच्या वस्तू स्वतःच्या आहेत, असं म्हणत नव्हता. तर, ते सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत वाटून घ्यायचे.+ ३३  शिवाय, प्रभू येशू मेलेल्यांतून उठला आहे* याबद्दल प्रेषित खूप प्रभावीपणे साक्ष देत राहिले.+ आणि देव त्या सगळ्यांवर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करत होता. ३४  खरंतर त्यांच्यापैकी कोणीही गरजू नव्हतं.+ कारण ज्या कोणाच्या मालकीची शेतं किंवा घरं होती, तो ती विकून त्यातून मिळालेला पैसा, ३५  प्रेषितांच्या पायांजवळ आणून ठेवायचा.+ मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे ते पैसे वाटून दिले जायचे.+ ३६  उदाहरणार्थ, कुप्र इथला रहिवासी योसेफ, जो लेवी होता आणि ज्याला प्रेषितांनी बर्णबा+ (ज्याचा अर्थ “सांत्वनाचा मुलगा” असा होतो) असं नाव दिलं होतं, ३७  त्याच्याही मालकीची एक जमीन होती. त्याने ती विकली आणि मिळालेले पैसे आणून प्रेषितांच्या पायांजवळ ठेवले.+

तळटीपा

किंवा “पुनरुत्थान झालं आहे.”
किंवा “येशूचं उदाहरण घेऊन मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल.”
किंवा “अटक केली.”
शब्दशः “माणसांची.”
किंवा “उघडपणे.”
किंवा “निरक्षर,” म्हणजे, रब्बींच्या शाळांमध्ये शिक्षण न घेतलेले; त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं असा अर्थ नाही.
म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “चिन्ह.”
अति. क५ पाहा.
किंवा “त्याच्या ख्रिस्ताच्या.”
अति. क५ पाहा.
किंवा “कळकळीने प्रार्थना.”
किंवा “पुनरुत्थान झालं आहे.”