मत्तयने सांगितलेला संदेश ५:१-४८

  • डोंगरावरचा उपदेश (१-४८)

 पुष्कळ लोक जमलेले पाहून तो डोंगरावर गेला. तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. २  मग तो त्यांना शिकवू लागला. तो म्हणाला: ३  “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे* ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे. ४  जे शोक करतात ते सुखी आहेत, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.+ ५  जे नम्र* ते सुखी आहेत,+ कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+ ६  ज्यांना नीतिमत्त्वाची* तहान आणि भूक आहे ते सुखी आहेत,+ कारण त्यांना तृप्त केलं जाईल.+ ७  जे दयाळू ते सुखी आहेत,+ कारण त्यांच्यावर दया केली जाईल. ८  ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत,+ कारण ते देवाला पाहतील. ९  जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात* ते सुखी आहेत,+ कारण त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल. १०  नीतिमत्त्वासाठी* ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. ११  माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान+ आणि छळ करून+ तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.+ १२  हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा,+ कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+ तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.+ १३  तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात.+ पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.+ १४  तुम्ही जगाचा प्रकाश आहात.+ डोंगरावर वसलेलं शहर लपू शकत नाही. १५  लोक दिवा लावून टोपलीखाली ठेवत नाहीत, तर एखाद्या उंच ठिकाणी ठेवतात. त्यामुळे घरातल्या सर्वांना प्रकाश मिळतो.+ १६  त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या,+ म्हणजे ते तुमची चांगली कामं+ पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.+ १७  मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचं लिखाण रद्द करायला आलोय, असं समजू नका. मी ते रद्द करायला नाही, तर पूर्ण करायला आलोय.+ १८  मी तुम्हाला खरं सांगतो, की एकवेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.+ १९  त्यामुळे जो यातली सर्वात लहान आज्ञा मोडतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो, त्याला स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात लहान म्हटलं जाईल. पण, जो या आज्ञांचं पालन करतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हटलं जाईल. २०  कारण मी तर तुम्हाला सांगतो, की तुमचं नीतिमत्त्व शास्त्री आणि परूशी यांच्या नीतिमत्त्वापेक्षा जास्त नसलं,+ तर स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मुळीच जाता येणार नाही.+ २१  पूर्वीच्या काळातल्या लोकांना जे सांगण्यात आलं होतं ते तुम्ही ऐकलंय, की ‘खून करू नका+ आणि जो खून करतो त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल.’+ २२  पण मी तर तुम्हाला म्हणतो, की जो आपल्या भावाबद्दल मनात राग बाळगतो+ त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल. जो आपल्या भावाला शिव्याशाप देतो त्याला सर्वोच्च न्यायालयात जाब द्यावा लागेल. आणि जो त्याला ‘अरे नीच मूर्खा!’ असं म्हणतो, तो गेहेन्‍नाच्या* आगीत टाकला जाण्यासाठी पात्र ठरेल.+ २३  तर मग, तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना,+ तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, २४  तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.+ २५  जो तुझ्याविरुद्ध खटला भरणार आहे त्याच्यासोबत न्यायालयात जात असतानाच लवकरात लवकर वाद मिटव. नाहीतर, तो तुला न्यायाधीशाच्या हाती सोपवेल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शेवटी तुला तुरुंगात टाकलं जाईल.+ २६  मी तुला नक्की सांगतो, की तू त्याची एकेक दमडी* फेडेपर्यंत तुला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही. २७  ‘व्यभिचार करू नका,’+ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. २८  पण, मी तर तुम्हाला सांगतो, की जो एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने* पाहत राहतो,+ त्याने केव्हाच आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाय.+ २९  म्हणून, जर तुझा उजवा डोळा तुला अडखळायला लावत असेल,* तर तो उपटून टाक आणि फेकून दे.+ कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात* टाकलं जावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.+ ३०  तसंच, तुझा उजवा हात तुला अडखळायला लावत असेल,* तर तो कापून टाक आणि फेकून दे.+ कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात* पडावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.+ ३१  तसंच, असंही सांगण्यात आलं होतं, की ‘जो आपल्या बायकोला घटस्फोट देतो त्याने तिला सोडचिठ्ठी द्यावी.’+ ३२  पण मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय* इतर कोणत्याही कारणाने आपल्या बायकोला घटस्फोट देतो, तो तिला व्यभिचार करायला प्रवृत्त करतो. आणि जो अशा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.+ ३३  शिवाय, तुम्ही हेही ऐकलंय, की पूर्वीच्या काळातल्या लोकांना असं सांगण्यात आलं होतं: ‘घेतलेली शपथ मोडू नका.+ यहोवाला* केलेले नवस पूर्ण करा.’+ ३४  पण मी तर तुम्हाला म्हणतो: शपथच घेऊ नका.+ स्वर्गाची घेऊ नका, कारण स्वर्ग देवाचं राजासन आहे; ३५  पृथ्वीची शपथ घेऊ नका, कारण ती त्याच्या पायाचं आसन आहे.+ आणि यरुशलेमचीही घेऊ नका, कारण ते महान राजाचं नगर आहे.+ ३६  आपल्या डोक्याची शपथ घेऊ नका, कारण तुमचा एकही केस तुम्ही पांढरा किंवा काळा करू शकत नाही. ३७  त्यामुळे तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं.+ कारण यापेक्षा जे काही जास्त, ते त्या दुष्टाकडून आहे.+ ३८  ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात,’ असं म्हणण्यात आलं होतं हे तुम्ही ऐकलंय.+ ३९  पण मी तर तुम्हाला सांगतो: दुष्ट माणसाचा प्रतिकार करू नका, तर जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा.+ ४०  जर कोणी न्यायालयात तुमच्याविरुद्ध तक्रार करून तुमचा झगा घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला तुमचं बाहेरचं वस्त्रही द्या.+ ४१  जर एखाद्या अधिकाऱ्‍याने त्याची काही सेवा करायला तुम्हाला एका मैलापर्यंत* जायला भाग पाडलं, तर त्याच्यासोबत दोन मैल जा. ४२  जो तुमच्याकडे काही मागतो त्याला ते द्या आणि ज्याला तुमच्याकडून काही उसनं* घ्यायचंय त्याच्याकडे पाठ फिरवू नका.+ ४३  ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कर+ आणि आपल्या शत्रूचा द्वेष कर,’ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. ४४  पण मी तर तुम्हाला सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा+ आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ ४५  असं केलं, तर तुम्ही स्वर्गातल्या तुमच्या पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल.+ कारण तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.+ ४६  कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार?+ जकातदारसुद्धा तसंच करत नाहीत का? ४७  आणि जर तुम्ही फक्‍त आपल्या भावांनाच नमस्कार करत असाल, तर तुम्ही विशेष असं काय करता? विदेशी लोकसुद्धा तसंच करत नाहीत का? ४८  म्हणूनच, स्वर्गातला तुमचा पिता जसा परिपूर्ण आहे, तसेच तुम्हीही परिपूर्ण व्हा.+

तळटीपा

किंवा “जे पवित्र शक्‍तीसाठी भीक मागतात.”
किंवा “सौम्य वृत्तीचे.”
किंवा “जे शांतिप्रिय.”
यरुशलेमच्या बाहेर केरकचरा जाळण्याची जागा. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “क्वॉड्रन.”
म्हणजे, कामुक भावना उत्तेजित होतील अशा प्रकारे.
किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”
किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”
ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
म्हणजे, बिनव्याजाने.