मत्तयने सांगितलेला संदेश ६:१-३४

  • डोंगरावरचा उपदेश (१-३४)

    • ढोंगीपणा टाळा (१-४)

    • प्रार्थना कशी करावी (५-१५)

      • आदर्श प्रार्थना (९-१३)

    • उपास (१६-१८)

    • पृथ्वीवर आणि स्वर्गात संपत्ती साठवणं (१९-२४)

    • चिंता करू नका (२५-३४)

      • आधी राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा (३३)

 सांभाळा, लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून त्यांच्यासमोर चांगली कामं करू नका;*+ नाहीतर स्वर्गातल्या तुमच्या पित्याकडून तुम्हाला कोणतंही प्रतिफळ मिळणार नाही. २  म्हणून, तुम्ही दानधर्म करता तेव्हा लोकांनी आपली वाहवा करावी म्हणून ढोंगी लोकांसारखं सभास्थानांत आणि रस्त्यांवर गाजावाजा* करू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. ३  उलट तुम्ही दानधर्म करता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका; ४  म्हणजे तुमचा दानधर्म गुप्त राहील आणि तुमचा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल.+ ५  तसंच, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंगी लोकांसारखी करू नका.+ कारण लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून सभास्थानांत आणि चौकांत उभं राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं.+ मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. ६  उलट, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या आणि तुमच्या अदृश्‍य पित्याला* प्रार्थना करा.+ मग, तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. ७  प्रार्थना करताना विदेश्‍यांसारखं त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका. कारण आपण पुष्कळ बोललो तर आपली प्रार्थना ऐकली जाईल असं त्यांना वाटतं. ८  तेव्हा त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागायच्या आधीच तुमच्या पित्याला माहीत असतं.+ ९  म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा:+ ‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव+ पवित्र मानलं जावो.+ १०  तुझं राज्य+ येवो. तुझी इच्छा+ जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.+ ११  आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.+ १२  आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलंय, तसं तूही आमची कर्जं* माफ कर.+ १३  आम्हाला मोहात पडू देऊ नकोस,*+ तर त्या दुष्टापासून वाचव.’*+ १४  कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करेल.+ १५  पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.+ १६  तुम्ही उपास करता+ तेव्हा ढोंगी लोकांसारखं चेहरा उदास करायचं सोडून द्या. कारण आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसावं, म्हणून ते मुद्दामहून स्वतःकडे दुर्लक्ष करतात.+ मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. १७  पण तू उपास करताना आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपलं तोंड धू; १८  म्हणजे तू उपास करत आहेस हे माणसांना नाही, तर फक्‍त तुझ्या अदृश्‍य* पित्याला दिसेल. मग तुझा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुला प्रतिफळ देईल. १९  पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवायचं सोडून द्या.+ तिथे कसर* आणि गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. २०  त्याऐवजी स्वर्गात संपत्ती साठवा.+ तिथे कसर आणि गंज लागून ती नष्ट होत नाही+ आणि चोर घर फोडून ती लुटत नाहीत. २१  कारण जिथे तुझं धन आहे, तिथे तुझं मनही असेल. २२  डोळा हा शरीराचा दिवा आहे.+ म्हणून जर तुमची नजर एकाग्र* असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३  पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल,+ तर तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधार किती मोठा असेल! २४  कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल,+ किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहील आणि दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.+ २५  म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं+ अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का?+ २६  आकाशातल्या पक्ष्यांकडे निरखून पाहा.+ ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का? २७  चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर* वाढवू शकतं का?+ २८  तसंच, काय घालावं याची चिंता का करता? रानातल्या फुलांकडून शिका. ती कशी वाढतात? ती तर कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत. २९  पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोन इतका वैभवी राजा असूनही त्यानेसुद्धा+ कधी या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. ३०  रानातली झाडंझुडपं आज आहेत, पण उद्या ती भट्टीत टाकली जातील. त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी* लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? ३१  म्हणून, ‘काय खावं?’, ‘काय प्यावं?’ किंवा ‘काय घालावं?’ याची कधीही चिंता करू नका.+ ३२  कारण या गोष्टी मिळवण्यासाठी जगातले लोक धडपड करत आहेत. पण तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे. ३३  म्हणून, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व* मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+ ३४  त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका,+ कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.

तळटीपा

किंवा “नीतिमत्त्वाने वागू नका.”
शब्दशः “आपल्यापुढे कर्णा वाजवू नका.”
किंवा “गुप्त ठिकाणी राहणाऱ्‍या पित्याला.”
किंवा “पापं.”
शब्दशः “मोहात पाडू नकोस.”
किंवा “सोडव.”
किंवा “गुप्त ठिकाणी राहणाऱ्‍या.”
किंवा “कीड.”
किंवा “निर्दोष.” शब्दशः “साधी.”
शब्दशः “वाईट; दुष्ट.”
किंवा “कमी विश्‍वास असलेल्या.”