योहानने सांगितलेला संदेश ८:१२-५९

  • पिता येशूबद्दल साक्ष देतो (१२-३०)

    • येशू “जगाचा प्रकाश” (१२)

  • अब्राहामची मुलं (३१-४१)

    • “सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल” (३२)

  • सैतानाची मुलं (४२-४७)

  • येशू आणि अब्राहाम (४८-५९)

 १२  मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+ १३  तेव्हा परूशी त्याला म्हणाले: “तू स्वतःच आपल्याबद्दल साक्ष देतोस. त्यामुळे तुझी साक्ष खरी नाही.” १४  येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी स्वतःबद्दल साक्ष देत असलो, तरी माझी साक्ष खरी आहे. कारण मी कुठून आलोय आणि कुठे जातोय हे मला माहीत आहे.+ पण तुम्हाला मात्र मी कुठून आलो आणि कुठे जात आहे हे माहीत नाही. १५  तुम्ही वरवर दिसतं, त्याप्रमाणे* न्याय करता.+ पण मी कोणाचाही न्याय करत नाही. १६  आणि जरी मी कोणाचा न्याय केला, तरी माझा न्याय खरा असतो. कारण मी एकटा नाही, तर ज्याने मला पाठवलं तो पिता माझ्यासोबत आहे.+ १७  शिवाय, तुमच्याच नियमशास्त्रात लिहिलंय: ‘दोन माणसांची साक्ष खरी मानावी.’+ १८  मी स्वतः आपल्याबद्दल साक्ष देतो आणि ज्याने मला पाठवलं तो पिताही माझ्याबद्दल साक्ष देतो.”+ १९  तेव्हा ते त्याला म्हणाले: “कुठे आहे तुझा पिता?” येशूने उत्तर दिलं: “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही.+ जर तुम्ही मला ओळखलं असतं, तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं.”+ २०  मंदिरात जिथे दानपात्रं ठेवली होती,+ तिथे शिकवत असताना तो या गोष्टी बोलला. पण कोणीही त्याला पकडलं नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती.+ २१  म्हणून तो पुन्हा त्यांना म्हणाला: “मी जातोय आणि तुम्ही मला शोधाल. पण तुम्ही आपल्या पापी अवस्थेतच मराल.+ जिथे मी जातोय तिथे तुम्ही येऊ शकत नाही.”+ २२  तेव्हा यहुदी म्हणू लागले: “हा स्वतःचा जीव घेणार आहे की काय? कारण तो म्हणतो, ‘जिथे मी जातोय तिथे तुम्ही येऊ शकत नाही.’” २३  नंतर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे.+ तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही. २४  म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो, की तुम्ही तुमच्या पापी अवस्थेत मराल. कारण, मीच तो आहे असा विश्‍वास जर तुम्ही ठेवला नाही, तर तुम्ही नक्कीच तुमच्या पापी अवस्थेत मराल.” २५  तेव्हा ते त्याला म्हणू लागले: “तू आहेस तरी कोण?” येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतच नाही, मग तुमच्याशी बोलून काय उपयोग? २६  तुमच्याबद्दल मला पुष्कळ गोष्टी बोलायच्या आहेत आणि कित्येक गोष्टींचा न्याय करायचा आहे. खरंतर, ज्याने मला पाठवलं तो खरा आहे आणि मी त्याच्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या, त्याच जगाला सांगतोय.”+ २७  तो आपल्याशी पित्याबद्दल बोलत आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही. २८  तेव्हा येशू म्हणाला: “तुम्ही मनुष्याच्या मुलाला वधस्तंभावर* खिळल्यानंतर+ तुम्हाला समजेल, की मीच तो आहे.+ आणि मी स्वतःच्या मनाने काहीही करत नाही,+ तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणेच मी या गोष्टी बोलतोय. २९  आणि ज्याने मला पाठवलं तो माझ्यासोबत आहे. त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण मी नेहमी त्याला आवडणाऱ्‍या गोष्टी करतो.”+ ३०  तो या गोष्टी बोलत असताना बऱ्‍याच लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. ३१  मग ज्या यहुद्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला होता, त्यांना तो म्हणाला: “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्‍या अर्थाने माझे शिष्य ठराल. ३२  तुम्हाला सत्य समजेल+ आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.”+ ३३  तेव्हा इतर यहुदी त्याला म्हणाले: “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत आणि आजपर्यंत आम्ही कोणाचेही दास नव्हतो. मग, ‘तुम्ही बंधनातून मुक्‍त व्हाल’ असं तू कसं काय म्हणतोस?” ३४  येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो पाप करतो तो पापाचा दास आहे.+ ३५  शिवाय, दास घरात कायम राहत नाही, पण मुलगा कायमचा राहतो. ३६  त्यामुळे, जर मुलाने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं, तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल. ३७  तुम्ही अब्राहामचे वंशज आहात हे मला माहीत आहे. पण तुम्ही मला ठार मारायचा प्रयत्न करताय, कारण माझी शिकवण तुम्ही स्वीकारत नाही. ३८  मी माझ्या पित्यासोबत असताना ज्या गोष्टी पाहिल्या त्याच गोष्टी बोलतो.+ पण तुम्ही तुमच्या पित्याकडून ऐकलेल्या गोष्टी करता.” ३९  त्यांनी त्याला उत्तर दिलं: “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही अब्राहामची मुलं असता,+ तर अब्राहामसारखी कार्यं केली असती. ४०  पण ज्याने देवाकडून ऐकलेलं सत्य तुम्हाला सांगितलं+ अशा माणसाला, म्हणजे मला तुम्ही ठार मारायचा प्रयत्न करत आहात. अब्राहामने असं केलं नाही. ४१  तुम्ही तुमच्या पित्याची कार्यं करत आहात.” ते त्याला म्हणाले: “आम्ही व्यभिचारातून* जन्माला आलो नाही. आमचा एकच पिता म्हणजे देव आहे.” ४२  येशू त्यांना म्हणाला: “देव तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं.+ कारण मी देवाकडून आलो आणि आता इथे आहे. मी स्वतःच्या इच्छेने आलो नाही, तर त्याने मला पाठवलंय.+ ४३  मी जे सांगतो ते तुम्हाला का समजत नाही? कारण तुम्हाला माझी शिकवण स्वीकारायची इच्छा नाही. ४४  तुम्ही तुमचा पिता, सैतान* याच्यापासून आहात आणि तुम्हाला तुमच्या पित्याच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.+ तो तर सुरुवातीपासूनच खुनी आहे+ आणि तो सत्यात टिकून राहिला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटं बोलतो तेव्हा त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणेच बोलतो, कारण तो खोटारडा आणि खोटेपणाचा बाप आहे.+ ४५  पण मी तुम्हाला खरं सांगत असल्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवत नाही. ४६  मी पापी आहे असं तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकतो का? आणि जर मी खरं बोलतो, तर मग तुम्ही माझ्यावर विश्‍वास का ठेवत नाही? ४७  जो देवापासून असतो तो देवाची वचनं ऐकतो.+ पण तुम्ही ऐकत नाही, कारण तुम्ही देवापासून नाही.”+ ४८  तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “‘तू शोमरोनी+ आहेस आणि तुला दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलंय,’ असं आम्ही म्हणालो ते योग्यच नाही का?”+ ४९  येशूने उत्तर दिलं: “मला दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेलं नाही. मी तर माझ्या पित्याचा सन्मान करतो, पण तुम्ही माझा अपमान करता. ५०  मी स्वतःसाठी गौरव मिळवण्याचा प्रयत्न करत नाही.+ पण मला गौरव द्यायला उत्सुक असणारा एक जण आहे आणि तोच न्याय करणारा आहे. ५१  मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जर कोणी माझ्या शिकवणीचं पालन केलं, तर त्याला मरण येणारच नाही.”+ ५२  यहुदी लोक त्याला म्हणाले: “तुला दुष्ट स्वर्गदूताने पछाडलंय याची आता आम्हाला खातरी पटली आहे. अब्राहाम, तसंच संदेष्टेही मरण पावले आणि तू म्हणतोस, ‘जर कोणी माझ्या शिकवणीचं पालन केलं, तर त्याला मरण येणारच नाही.’ ५३  तू आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस का? तो तर मेला आणि संदेष्टेही मेले. मग तू स्वतःला काय समजतोस?” ५४  येशूने उत्तर दिलं: “मी जर स्वतःचाच गौरव केला, तर त्या गौरवाला काहीच अर्थ नाही. पण तुम्ही ज्याला तुमचा देव म्हणता, तो माझा पिता माझा गौरव करतो.+ ५५  तुम्ही त्याला ओळखलं नाही,+ पण मी त्याला ओळखतो.+ आणि मी त्याला ओळखत नाही, असं जर मी म्हणालो, तर तुमच्यासारखाच मीही खोटा ठरीन. कारण खरं पाहिलं, तर मी त्याला ओळखतो आणि त्याच्या वचनांचं पालनही करतो. ५६  तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या आशेने खूप आनंदित झाला. त्याने तो पाहिला आणि त्याला आनंद झाला.”+ ५७  तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “तू अजून ५० वर्षांचा झाला नाहीस आणि तू अब्राहामला पाहिलं आहेस?” ५८  येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, अब्राहामचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून मी अस्तित्वात आहे.”+ ५९  तेव्हा त्यांनी त्याला मारायला दगड उचलले, पण येशू लपला आणि मंदिराबाहेर निघून गेला.

तळटीपा

शब्दशः “शरीराप्रमाणे.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यातून.” ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.