योहानने सांगितलेला संदेश १५:१-२७

  • खऱ्‍या द्राक्षवेलाचं उदाहरण (१-१०)

  • ख्रिस्तासारखं प्रेम करायची आज्ञा (११-१७)

    • “यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही” (१३)

  • जग येशूच्या शिष्यांचा द्वेष करतं (१८-२७)

१५  खरा द्राक्षवेल मी आहे आणि माझा पिता माळी आहे. २  फळ न देणारी माझ्यातली प्रत्येक फांदी तो कापून टाकतो आणि फळ देणाऱ्‍या प्रत्येक फांदीने आणखी फळ द्यावं,+ म्हणून तो ती छाटून स्वच्छ करतो. ३  मी शिकवलेल्या गोष्टींमुळे तुम्ही आधीच शुद्ध आहात.+ ४  माझ्यासोबत ऐक्यात राहा आणि मीही तुमच्यासोबत ऐक्यात राहीन. फांदी द्राक्षवेलात राहिली नाही, तर ती स्वतःहून फळ देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्यासोबत ऐक्यात राहिला नाहीत,+ तर फळ* देऊ शकणार नाही. ५  द्राक्षवेल मी आहे आणि तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यासोबत आणि मी ज्याच्यासोबत ऐक्यात राहतो तो भरपूर फळ देतो.+ कारण माझ्यापासून वेगळं होऊन तुम्ही काहीही करू शकत नाही. ६  जो माझ्यासोबत ऐक्यात राहत नाही तो अशा फांदीसारखा आहे, जी बाहेर फेकून दिली जाते आणि सुकून जाते. लोक अशा फांद्या गोळा करून आगीत फेकून देतात आणि त्या जळून जातात. ७  तुम्ही माझ्यासोबत ऐक्यात राहिला आणि मी शिकवलेल्या गोष्टी मनात ठेवल्या, तर तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला दिली जाईल.+ ८  तुम्ही भरपूर फळ देता आणि माझे शिष्य असल्याचं दाखवून देता, तेव्हा माझ्या पित्याचा गौरव होतो.+ ९  पित्याने माझ्यावर प्रेम केलं,+ तसंच मीही तुमच्यावर प्रेम केलंय. माझ्या प्रेमात टिकून राहा. १०  ज्याप्रमाणे मी पित्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या प्रेमात टिकून राहिलो, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा माझ्या आज्ञांचं पालन केलं, तर माझ्या प्रेमात टिकून राहाल. ११  जसा मी आनंदी आहे तसं तुम्ही आनंदी व्हावं आणि तुमचं मन आनंदाने भरून जावं, म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.+ १२  मी तुम्हाला आज्ञा देतो, की जसं मी तुमच्यावर प्रेम केलंय, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.+ १३  कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.+ १४  मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही केलं, तर तुम्ही माझे मित्र ठराल.+ १५  आता मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण मालक काय करतो हे दासाला माहीत नसतं. पण मी तर तुम्हाला मित्र म्हटलंय. कारण माझ्या पित्याकडून ऐकलेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. १६  तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलंय. आणि मी तुम्हाला यासाठी नेमलंय, की तुम्ही जावं आणि फळ देत राहावं आणि तुमचं फळ टिकून राहावं. म्हणजे माझ्या नावाने तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं तर तो तुम्हाला देईल.+ १७  तुम्ही एकमेकांवर प्रेम करावं, म्हणून मी या गोष्टींबद्दल तुम्हाला आज्ञा देतो.+ १८  जगाने तुमचा द्वेष केला, तरी तुमचा द्वेष करण्याआधी त्याने माझा द्वेष केलाय, हे विसरू नका.+ १९  तुम्ही जगाचा भाग असता, तर तुम्ही आपलेच आहात हे ओळखून जगाने तुमच्यावर प्रेम केलं असतं. पण आता तुम्ही जगाचा भाग नाही,+ तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतलंय. यामुळेच जग तुमचा द्वेष करतं.+ २०  मी तुम्हाला जे सांगितलं ते आठवणीत असू द्या. दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.+ जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही शिकवणी पाळतील. २१  पण माझ्या नावामुळे ते तुमच्याविरुद्ध या सगळ्या गोष्टी करतील, कारण ज्याने मला पाठवलं त्याला ते ओळखत नाहीत.+ २२  जर मी आलो नसतो आणि त्यांना या गोष्टी सांगितल्या नसत्या, तर त्यांच्यावर पापाचा दोष आला नसता.+ पण आता त्यांच्या पापासाठी त्यांना कोणतंही कारण देता येणार नाही.+ २३  जो माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.+ २४  पूर्वी कोणीही केली नव्हती अशी कार्यं जर मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्यावर पापाचा दोष आला नसता.+ पण आता तर त्यांनी मला पाहिलंय. तसंच, माझा आणि माझ्या पित्याचा द्वेषही केलाय. २५  पण हे यासाठी घडलं, की त्यांच्या नियमशास्त्रात लिहिलेले हे शब्द पूर्ण व्हावेत: ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला.’+ २६  मी तुम्हाला पित्याकडून सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्‍ती* पाठवीन.+ ती पित्याकडून येते आणि ती माझ्याबद्दल साक्ष देईल.+ २७  आणि तुम्हीही साक्ष द्याल,+ कारण तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत होता.

तळटीपा

हे चांगल्या कार्यांना सूचित करतं.