कलस्सैकर यांना पत्र ४:१-१८
४ मालकांनो, स्वर्गात तुमचाही एक मालक आहे हे लक्षात ठेवून, आपल्या दासांशी नीतीने आणि न्यायाने वागा.+
२ बांधवांनो, नेहमी प्रार्थना करत राहा.+ या बाबतीत जागे राहा आणि उपकारस्तुती करा.+
३ त्याच वेळी, आमच्यासाठीही प्रार्थना करा.+ हे यासाठी, की वचनाचा प्रचार करण्याकरता, म्हणजे ख्रिस्ताबद्दलचं पवित्र रहस्य घोषित करण्याकरता देवाने आमच्यासाठी संधीचं दार उघडावं. याच पवित्र रहस्यासाठी मी कैदेत आहे.+
४ तसंच अशीही प्रार्थना करा, की मी ते जितक्या स्पष्टपणे घोषित केलं पाहिजे, तितक्या स्पष्टपणे मला ते करता यावं.
५ वेळेचा चांगला उपयोग करून* बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागा.+
६ तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्यासारखं असावं,+ म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.+
७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्वासू सेवक आणि माझा सोबतीचा दास, तुखिक+ तुम्हाला माझ्याबद्दल सगळी माहिती देईल.
८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे.
९ तुमच्यातलाच एक असलेला माझा विश्वासू आणि प्रिय भाऊ अनेसिम+ याच्यासोबत तो येत आहे. इथे घडत असलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल ते तुम्हाला कळवतील.
१० माझ्यासोबत कैदेत असलेला अरिस्तार्ख+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तसंच, बर्णबाचा नातेवाईक मार्क+ (ज्याच्याबद्दल तुम्हाला सूचना मिळाल्या होत्या, की तो आला तर तुम्ही त्याचं स्वागत करावं)+
११ आणि युस्त म्हटलेला येशू हेसुद्धा तुम्हाला नमस्कार सांगतात. हे सुंता झालेल्यांपैकी आहेत. देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आहे.*
१२ तुमच्यापैकीच असलेला ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तुम्ही शेवटपर्यंत प्रौढांप्रमाणे आणि देवाच्या इच्छेबद्दल पक्की खातरी असलेल्यांप्रमाणे स्थिर उभं राहावं, म्हणून तो नेहमी तुमच्यासाठी जीव ओतून प्रार्थना करत असतो.
१३ तुमच्यासाठी, तसंच लावदिकीया आणि हेरापली इथल्या सगळ्यांसाठी तो किती मेहनत घेतो, याची मी स्वतः साक्ष देतो.
१४ आपल्या सगळ्यांचा लाडका वैद्य लूक+ आणि देमास+ हेही तुम्हाला नमस्कार सांगतात.
१५ लावदिकीयातल्या बांधवांना, तसंच नुंफा आणि तिच्या घरी जमणाऱ्या मंडळीला माझा नमस्कार सांगा.+
१६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा.
१७ तसंच, अर्खिप्प याला सांगा:+ “प्रभूमध्ये तू स्वीकारलेली सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”
१८ आणि आता मी पौल, स्वतःच्या अक्षरांत लिहून तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ माझी तुरुंगवासातली बंधनं+ आठवणीत असू द्या. देवाची अपार कृपा तुमच्यावर असो.
तळटीपा
^ शब्दशः “नियुक्त वेळ विकत घेऊन.”
^ किंवा “कृपायुक्त.”
^ किंवा “ते मला धीर देणारे सहायक आहेत.”