कलस्सैकर यांना पत्र १:१-२९

  • नमस्कार (१, २)

  • कलस्सैकरांच्या विश्‍वासाबद्दल आभार (३-८)

  • पवित्र शक्‍तीद्वारे वाढ होण्यासाठी प्रार्थना (९-१२)

  • ख्रिस्ताची मुख्य भूमिका (१३-२३)

  • मंडळीसाठी पौलचे कठीण परिश्रम (२४-२९)

 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून, २  कलस्सै इथे ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांना आणि विश्‍वासू बांधवांना: देव जो आपला पिता याच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा आणि शांती मिळो. ३  आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा तेव्हा देवाचे, म्हणजेच आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे आभार मानतो. ४  कारण आम्ही ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्‍वासाबद्दल आणि सर्व पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकलं आहे. ५  ही मनोवृत्ती, स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे तुम्ही दाखवता.+ या आशेबद्दल तुम्ही पूर्वी त्या वेळी ऐकलं, जेव्हा आनंदाच्या संदेशाबद्दलचं सत्यवचन ६  तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात फलदायी होत आहे आणि वाढत आहे.+ त्याचप्रमाणे, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या अपार कृपेबद्दल खऱ्‍या अर्थाने ऐकलं आणि अचूकपणे जाणून घेतलं, त्या दिवसापासून हा संदेश तुमच्यामध्येही फलदायी होऊन वाढत चालला आहे. ७  आमचा प्रिय सहकारी एपफ्रास+ याच्याकडून तुम्ही हेच शिकून घेतलं आहे. तो आमच्या वतीने कार्य करणारा ख्रिस्ताचा एक विश्‍वासू सेवक आहे. ८  तुम्ही देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मदतीने उत्पन्‍न केलेल्या प्रेमाबद्दल त्यानेच आम्हाला सांगितलं. ९  यामुळेच, ज्या दिवसापासून आम्ही हे ऐकलं त्या दिवसापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायचं सोडलं नाही.+ आम्ही देवाला हीच विनंती करत आहोत, की तुम्हाला त्याच्या इच्छेबद्दलचं अचूक ज्ञान आणि सर्व बुद्धी, तसंच पवित्र शक्‍तीद्वारे दिली जाणारी समज भरपूर प्रमाणात मिळावी.+ १०  हे यासाठी, की तुम्ही यहोवाच्या* सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट करावं, प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्‍न करत राहावं आणि देवाच्या अचूक ज्ञानात वाढत जावं.+ ११  त्याच प्रकारे, सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा, म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्‍तीने ताकद मिळावी.+ १२  तसंच, ज्याने तुम्हाला प्रकाशात पवित्र जनांच्या वारशाचे+ भागीदार व्हायला योग्य केलं, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत. १३  त्याने अंधाराच्या अधिकारातून सुटका करून+ आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या राज्यात आणलं. १४  त्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे, म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+ १५  तो अदृश्‍य देवाचं प्रतिरूप+ आणि निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला आहे.+ १६  कारण त्याच्याद्वारेच स्वर्गात आणि पृथ्वीवर, इतर सगळ्या दृश्‍य आणि अदृश्‍य गोष्टी निर्माण करण्यात आल्या.+ मग ती सिंहासनं असोत, अधिपती, सरकारं किंवा अधिकार असोत, सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारे+ आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आल्या. १७  तसंच, तो इतर सगळ्या गोष्टींच्या आधीचा आहे+ आणि त्याच्याचद्वारे इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या. १८  तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं. १९  कारण देवाला हे योग्य वाटलं, की ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता असावी.+ २०  आणि त्याने वधस्तंभावर* वाहिलेल्या रक्‍ताद्वारे+ शांती स्थापन करून इतर सगळ्या गोष्टींचा,+ मग त्या पृथ्वीवरच्या गोष्टी असोत किंवा स्वर्गातल्या, त्यांचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करावा. २१  खरं पाहिलं, तर एकेकाळी तुम्ही देवापासून दुरावलेले आणि त्याचे शत्रू होता. कारण तुमची मनं दुष्ट कामांकडे लागलेली होती. २२  पण ख्रिस्ताने आपलं मानवी शरीर अर्पण केल्यामुळे, त्याच्या मरणाद्वारे देवाने तुमच्यासोबत समेट केला आहे. हे यासाठी, की तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं स्वतःपुढे सादर करावं.+ २३  पण याकरता हे आवश्‍यक आहे, की तुम्ही विश्‍वासात टिकून राहावं+ आणि इमारतीच्या पायावर स्थापन केलेलं+ आणि स्थिर+ असं राहावं. तसंच, जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला आणि ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली,+ त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. मी पौल, याच आनंदाच्या संदेशाचा सेवक झालो आहे.+ २४  तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे.+ ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहायला मी तयार आहे. कारण माझं हे दुःख सहन करणं ख्रिस्ताच्या शरीरासाठी,+ म्हणजे मंडळीसाठी+ फायद्याचं ठरेल. २५  देवाने माझ्यावर जो कारभार सोपवला आहे,+ त्याप्रमाणे मी तुमच्याकरता या मंडळीचा सेवक बनलो. हे यासाठी, की मी देवाच्या वचनाची पूर्णपणे घोषणा करावी. २६  हे पवित्र रहस्य+ पूर्वीच्या जगाच्या व्यवस्थांपासून*+ आणि पूर्वीच्या पिढ्यांपासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. पण आता ते देवाच्या पवित्र जनांना प्रकट करण्यात आलं आहे.+ २७  हे गौरवी आणि मौल्यवान पवित्र रहस्य विदेश्‍यांमध्ये घोषित करणं देवाला योग्य वाटलं.+ ते रहस्य म्हणजे, तुमच्यासोबत ऐक्यात असलेला ख्रिस्त, ज्याच्या गौरवात सहभागी होण्याची तुम्हाला आशा आहे.+ २८  त्याच्याबद्दलच आम्ही घोषणा करत आहोत आणि सर्वांना समजावून सांगत आहोत आणि सर्व सुबुद्धीचं शिक्षण देत आहोत. हे यासाठी, की प्रत्येक माणसाला ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला आणि प्रौढ,* असं देवापुढे सादर करावं.+ २९  म्हणूनच मी कठोर परिश्रम करत आहे आणि माझ्यामध्ये शक्‍तिशाली रितीने कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याने झटत आहे.+

तळटीपा

अति. क५ पाहा.
किंवा “पूर्वीच्या काळांपासून.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पूर्ण.”