इफिसकर यांना पत्र ५:१-३३

  • शुद्ध वागणंबोलणं (१-५)

  • प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चाला (६-१४)

  • पवित्र शक्‍तीने परिपूर्ण होत जा (१५-२०)

    • वेळेचा चांगला उपयोग करा (१६)

  • पतीपत्नींसाठी सल्ला (२१-३३)

 म्हणून, देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा+ २  आणि प्रेमाने वागत राहा.+ कारण ख्रिस्तानेही आपल्यावर* प्रेम केलं+ आणि देवासाठी जणू गोड सुगंध असलेलं अर्पण आणि बलिदान म्हणून स्वतःला आपल्यासाठी* दिलं.+ ३  तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं,* कोणत्याही प्रकारचा अशुद्धपणा आणि लोभ यांचा उल्लेखही होऊ नये.+ कारण हे पवित्र लोकांना शोभत नाही.+ ४  तसंच, लाजिरवाणं वर्तन, मूर्खपणाच्या गोष्टी किंवा अश्‍लील विनोद यांचाही तुमच्यामध्ये उल्लेख होऊ नये.+ कारण या गोष्टी पवित्र लोकांसाठी योग्य नाहीत. याउलट, तुम्ही नेहमी देवाची उपकारस्तुती करावी.+ ५  कारण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे आणि याची पुरेपूर जाणीव आहे, की अनैतिक लैंगिक कृत्यं करणारा,*+ अशुद्ध कामं करणारा किंवा लोभी माणूस+ (जो मूर्तिपूजा करणाऱ्‍यासारखा आहे), यांच्यापैकी कोणालाही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा मिळणार नाही.+ ६  कोणीही पोकळ शब्दांनी तुमची फसवणूक करू नये. कारण अशाच गोष्टींमुळे आज्ञा न मानणाऱ्‍यांवर देवाचा क्रोध येत आहे. ७  त्यामुळे, अशा गोष्टी करण्यात त्यांच्यासोबत सहभागी होऊ नका. ८  कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा. ९  कारण प्रकाशाचं फळ म्हणजे सर्व प्रकारचा चांगुलपणा, नीती आणि सत्य आहे.+ १०  प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.+ ११  अंधाराच्या निरुपयोगी कामांत सहभागी व्हायचं सोडून द्या.+ याउलट, त्यांचा पर्दाफाश करा. १२  कारण ते गुप्तपणे जी कामं करतात, त्यांचा उल्लेख करणंसुद्धा लाजिरवाणं आहे. १३  पर्दाफाश केल्या जाणाऱ्‍या* सगळ्या गोष्टी प्रकाशाद्वारे उघडकीस आणल्या जातात, कारण जी उघडकीस आणली जात आहे अशी प्रत्येक गोष्ट प्रकाश आहे.* १४  म्हणूनच, असं म्हटलं आहे: “अरे झोपलेल्या माणसा, जागा हो; आणि मेलेल्यांतून ऊठ,+ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर चमकेल.”+ १५  म्हणून तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. १६  वेळेचा चांगला उपयोग करा,*+ कारण दिवस वाईट आहेत. १७  यामुळे, बुद्धिहीन लोकांसारखं वागायचं सोडून द्या आणि यहोवाची* इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.+ १८  तसंच, मद्य* पिऊन धुंद होऊ नका,+ कारण ते स्वैराचार* करायला प्रवृत्त करतं. याउलट, पवित्र शक्‍तीने भरून जा. १९  स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना धीर द्या.+ तसंच, आपल्या हृदयात मधुर संगीताच्या सोबतीने+ यहोवासाठी* गीतं गा.+ २०  आणि सगळ्या गोष्टींसाठी, प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने+ आपला देव आणि पिता याला धन्यवाद देत राहा.+ २१  ख्रिस्ताची भीती बाळगून एकमेकांच्या अधीन राहा.+ २२  पत्नींनी जसं प्रभूच्या, तसंच आपल्या पतींच्या अधीन असावं.+ २३  कारण, जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक*+ आणि या शरीराचा तारणकर्ता आहे, तसंच पतीसुद्धा पत्नीचं मस्तक* आहे.+ २४  खरंतर, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, त्याचप्रमाणे पत्नींनीही सगळ्या गोष्टींत आपल्या पतींच्या अधीन राहावं. २५  पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केलं आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केलं,+ त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करा.+ २६  ख्रिस्ताने स्वतःला यासाठी अर्पण केलं, की मंडळीला देवाच्या वचनाच्या पाण्याने धुऊन पवित्र करावं.+ २७  हे यासाठी, की त्याने तिला पूर्ण वैभवाने स्वतःपुढे सादर करावं; म्हणजे, तिच्यावर कोणताही डाग, सुरकुती किंवा यासारखं काहीही नसून+ ती पवित्र आणि निष्कलंक असावी.+ २८  त्याचप्रमाणे, पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. जो माणूस आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो. २९  कारण कोणताही माणूस स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही. उलट, तो त्याचं पालनपोषण करतो, जसं ख्रिस्तही मंडळीचं पालनपोषण करतो. ३०  कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.+ ३१  “या कारणामुळे, माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील.”+ ३२  हे पवित्र रहस्य+ महान आहे. आता मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे.+ ३३  तरीसुद्धा, तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.+ त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.+

तळटीपा

किंवा कदाचित, “तुमच्यावर.”
किंवा कदाचित, “तुमच्यासाठी.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूचीत “अनैतिक लैंगिक कृत्यं” पाहा.
किंवा “दोषी ठरवलेल्या.”
किंवा “सत्य प्रकट करते.”
शब्दशः “नियुक्‍त वेळ विकत घ्या.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “द्राक्षारस.”
किंवा “बेतालपणा.”
अति. क५ पाहा.
किंवा “नेतृत्व करणारा.”
किंवा “नेतृत्व करणारा.”