करिंथकर यांना दुसरं पत्र ९:१-१५

  • दान देण्याचं प्रोत्साहन (१-१५)

    • आनंदाने देणारा देवाला आवडतो ()

 पवित्र जनांसाठी असलेल्या या सेवेच्या बाबतीत+ खरंतर मी तुम्हाला काहीही लिहायची गरज नाही. २  कारण मदत द्यायला तुम्ही किती उत्सुक आहात हे मला माहीत आहे. तुमच्याबद्दल मी मासेदोनियातल्या बांधवांना अभिमानाने सांगत असतो, की अखयातल्या बांधवांनी तर गेल्या एका वर्षापासूनच मदत तयार ठेवली आहे. तुमच्या आवेशामुळे त्यांच्यातल्या बऱ्‍याच जणांना उत्तेजन मिळालं आहे. ३  म्हणूनच मी बांधवांना पाठवत आहे. हे यासाठी की, तुमच्याबद्दल आम्ही अभिमानाने जे सांगितलं होतं, ते व्यर्थ ठरू नये. तर, मी जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे तुम्ही खरोखरच तयार असावं. ४  नाहीतर, मासेदोनियाचे बांधव माझ्यासोबत आले आणि तुम्ही तयार नाही असं दिसलं, तर तुमच्यावर भरवसा ठेवल्यामुळे आम्हाला आणि आमच्यासोबत तुम्हालाही लाजिरवाणं वाटेल. ५  त्यामुळे, या बांधवांना अगोदरच तुमच्याकडे येण्याचं उत्तेजन देणं मला आवश्‍यक वाटलं. म्हणजे, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे हे बांधव तुमची उदार देणगी गोळा करून तयार ठेवतील. असं केलं, तर तुमची ही देणगी, बळजबरीने घेतलेली नाही, तर उदार मनाने दिलेली देणगी ठरेल. ६  या बाबतीत, जो हात राखून पेरणी करतो, तो त्याचप्रमाणे कापणी करेल आणि जो मोकळ्या हाताने पेरणी करतो, तो त्याचप्रमाणे कापणीही करेल.+ ७  प्रत्येकाने आपल्या मनात जसं ठरवलं आहे, तसंच द्यावं. त्याने कुरकुर करत* किंवा देणं भाग पडतं म्हणून देऊ नये;+ कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.+ ८  शिवाय, तुमच्याकडे नेहमी सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात असाव्यात आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टीही भरपूर प्रमाणात असाव्यात, म्हणून देव तुमच्यावर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करायला समर्थ आहे.+ ९  (शास्त्रातसुद्धा लिहिलं आहे: “त्याने उदारतेने वाटलं आणि गरिबांना दिलं. त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.”+ १०  जो पेरणी करणाऱ्‍याला भरपूर प्रमाणात बी देतो आणि खाणाऱ्‍याला भरपूर अन्‍न देतो, तो तुम्हालाही पेरणी करण्यासाठी बी देईल आणि ते बऱ्‍याच पटींनी वाढवेल. तसंच, तो तुमच्या नीतिमत्त्वाची कार्यं फलदायी करेल.) ११  सर्व प्रकारच्या उदारतेसाठी तुम्हाला सर्व गोष्टींत समृद्ध केलं जात आहे आणि यामुळे आम्ही देवाचे आभार मानतो. १२  कारण ही जनसेवा फक्‍त पवित्र जनांच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवण्यासाठी नाही,+ तर देवाला आणखी जास्त आभार व्यक्‍त केले जावेत यासाठीही आहे. १३  मदत पुरवण्याच्या या सेवेवरून तुम्ही कशा प्रकारचे लोक आहात हे दाखवून देता. आणि तुम्ही जाहीरपणे कबूल केल्याप्रमाणे ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार वागता. तसंच, पवित्र जनांना आणि एकंदरीत सगळ्यांनाच तुम्ही उदारता दाखवता, त्यामुळे ते देवाचा गौरव करतात.+ १४  तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा भरभरून वर्षाव होत असल्यामुळे, तुमच्यासाठी देवाकडे याचना करताना ते तुमच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करतात. १५  देवाने दिलेल्या अवर्णनीय मोफत देणगीबद्दल त्याचे आभार!

तळटीपा

किंवा “नाखुशीने.”