निर्गम ६:१-३०

  • पुन्हा सुटकेचं वचन (१-१३)

    • यहोवाच्या नावाची पूर्णपणे ओळख झाली नव्हती (२, ३)

  • मोशे आणि अहरोन यांची वंशावळ (१४-२७)

  • मोशेला पुन्हा फारोसमोर जायला सांगितलं जातं (२८-३०)

 मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी आता फारोचं काय करतो, ते तू बघ.+ माझ्या लोकांना पाठवून द्यायला, मी माझ्या शक्‍तिशाली हाताने त्याला भाग पाडीन आणि माझ्या हाताचा पराक्रम पाहिल्यावर, त्याला माझ्या लोकांना आपल्या देशातून घालवून द्यावंच लागेल.”+ २  देव मोशेला पुढे म्हणाला: “मी यहोवा आहे. ३  मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्यासमोर सर्वशक्‍तिमान देव म्हणून प्रकट व्हायचो.+ पण यहोवा या माझ्या नावाने+ मी त्यांना माझी ओळख दिली नव्हती.+ ४  ज्या कनान देशात ते विदेशी म्हणून राहिले, तो देश त्यांना देण्यासाठी मी त्यांच्यासोबत माझा करारही केला.+ ५  आता इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना गुलाम केल्यामुळे, त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलाय आणि माझ्या कराराची मला आठवण आहे.+ ६  म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘मी यहोवा आहे आणि इजिप्तच्या लोकांनी तुमच्यावर लादलेल्या ओझ्याखालून मी तुम्हाला बाहेर काढीन; मी तुम्हाला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्‍त करीन+ आणि त्यांना कठोर शिक्षा देऊन, माझ्या शक्‍तिशाली हाताने* तुम्हाला सोडवीन.+ ७  मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारीन आणि तुमचा देव होईन.+ तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून बाहेर काढणारा, मीच तुमचा देव यहोवा आहे, याची तुम्हाला खातरी पटेल. ८  मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना जो देश देण्याची शपथ घेतली होती,* त्या देशात मी तुम्हाला घेऊन जाईन आणि तो देश तुमच्या मालकीचा होईल.+ मी यहोवा आहे.’”+ ९  नंतर मोशेने हा निरोप इस्राएली लोकांना दिला. पण निराशेमुळे आणि गुलामगिरीत त्यांच्यावर होत असलेल्या क्रूर छळामुळे, त्यांनी मोशेचं ऐकलं नाही.+ १०  मग यहोवा मोशेला म्हणाला: ११  “इजिप्तचा राजा फारो याच्याकडे जाऊन त्याला सांग, की इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ दे.” १२  पण मोशे यहोवाला म्हणाला: “इस्राएली लोकांनीच माझं ऐकलं नाही,+ तर फारो माझं कसं ऐकेल? त्यात, मला नीट बोलताही येत नाही.”+ १३  पण इस्राएली लोकांना इजिप्तच्या देशातून बाहेर आणण्यासाठी, त्यांना आणि इजिप्तचा राजा फारो याला कोणत्या आज्ञा द्यायच्या, हे यहोवाने पुन्हा मोशेला आणि अहरोनला सांगितलं. १४  आपापल्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख असलेल्या पुरुषांची नावं ही आहेत: इस्राएलचा प्रथमपुत्र रऊबेन+ याला हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी ही मुलं झाली.+ ही रऊबेनपासून झालेली घराणी आहेत. १५  शिमोनला यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, सोहर आणि एका कनानी स्त्रीपासून झालेला शौल ही मुलं झाली.+ ही शिमोनपासून झालेली घराणी आहेत. १६  ही लेवीच्या+ वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावं आहेत: गेर्षोन, कहाथ आणि मरारी.+ लेवी एकूण १३७ वर्षं जगला. १७  गेर्षोनला लिब्नी आणि शिमी ही मुलं झाली. त्यांच्यापासून त्यांच्या नावाची घराणी आली.+ १८  कहाथला अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल ही मुलं झाली.+ कहाथ एकूण १३३ वर्षं जगला. १९  मरारीला महली आणि मूशी ही मुलं झाली. ही लेव्यांच्या वंशावळीप्रमाणे त्यांची घराणी होती.+ २०  अम्रामने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याशी लग्न केलं.+ तिच्यापासून त्याला अहरोन आणि मोशे ही मुलं झाली.+ अम्राम एकूण १३७ वर्षं जगला. २१  इसहारला कोरह,+ नेफेग आणि जिख्री ही मुलं झाली. २२  उज्जियेलला मीशाएल, एलसाफान+ आणि सिथरी ही मुलं झाली. २३  अहरोनने अम्मीनादाबची मुलगी आणि नहशोनची+ बहीण अलीशेबा हिच्याशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार आणि इथामार ही मुलं झाली.+ २४  कोरहला अस्सीर, एलकाना आणि अबीयासाफ ही मुलं झाली.+ ही कोरहपासून झालेली घराणी होती.+ २५  अहरोनचा मुलगा एलाजार+ याने पुटीयेल याच्या एका मुलीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला फिनहास हा मुलगा झाला.+ ही लेव्यांच्या कुळांचे प्रमुख असलेल्या पुरुषांची, त्यांच्या घराण्यांनुसार नावं आहेत.+ २६  हेच ते अहरोन आणि मोशे आहेत, ज्यांना यहोवा म्हणाला: “इस्राएली लोकांना इजिप्त देशातून, गटागटाने* बाहेर आणा.”+ २७  इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी, इजिप्तचा राजा फारो याच्याशी बोलणारे, हेच ते मोशे आणि अहरोन होते.+ २८  इजिप्त देशात यहोवा मोशेसोबत बोलला, त्या दिवशी २९  यहोवा मोशेला म्हणाला: “मी यहोवा आहे. मी तुला सांगत असलेल्या सर्व गोष्टी, इजिप्तचा राजा फारो याला सांग.” ३०  तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला: “पण, मला नीट बोलता येत नाही, तर फारो माझं कसं ऐकेल?”+

तळटीपा

किंवा “उगारलेल्या हाताने.”
शब्दशः “मी आपला हात वर केला.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”