मार्कने सांगितलेला संदेश १२:१-४४

  • दुष्ट माळ्यांचं उदाहरण (१-१२)

  • देव आणि कैसर (१३-१७)

  • पुनरुत्थानाबद्दल प्रश्‍न (१८-२७)

  • सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञा (२८-३४)

  • ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (३५-३७क)

  • शास्त्र्यांबद्दल इशारा (३७ख-४०)

  • गरीब विधवेची दोन नाणी (४१-४४)

१२  मग तो उदाहरणं देऊन त्यांच्याशी बोलू लागला आणि म्हणाला, “एका माणसाने द्राक्षमळा+ लावला आणि त्याच्याभोवती कुंपण घातलं आणि त्यात द्राक्षं तुडवण्यासाठी द्राक्षकुंड खणलं आणि पहाऱ्‍यासाठी एक मचाण बांधलं.*+ मग माळ्यांना आपल्या द्राक्षमळ्याचा ठेका देऊन तो परदेशी गेला.+ २  फळांचा हंगाम आला तेव्हा त्याने द्राक्षमळ्याच्या फळांपैकी काही फळं मागण्यासाठी एका दासाला माळ्यांकडे पाठवलं. ३  पण त्यांनी त्याला धरून बेदम मारलं आणि रिकाम्या हाती परत पाठवलं. ४  मग त्याने आणखी एका दासाला त्यांच्याकडे पाठवलं, पण त्यांनी त्याला डोक्यावर मारलं आणि त्याचा अपमान केला.+ ५  त्यानंतर त्याने पुन्हा एकाला पाठवलं, पण त्यांनी त्याला मारून टाकलं. पुढे त्याने इतर बऱ्‍याच जणांना पाठवलं, पण त्यांपैकी काहींना त्यांनी मारहाण केली, तर काहींना ठार मारलं. ६  आता त्याच्याजवळ एकच जण उरला होता, त्याचा लाडका मुलगा.+ म्हणून शेवटी त्याने असा विचार करून त्याला त्यांच्याकडे पाठवलं, की ‘निदान ते माझ्या मुलाचा तरी मान राखतील.’ ७  पण ते माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे.+ चला आपण त्याला मारून टाकू म्हणजे त्याच्या वारशाची जमीन आपली होईल.’ ८  म्हणून, त्यांनी त्याला धरून मारून टाकलं आणि त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिलं.+ ९  आता द्राक्षमळ्याचा मालक काय करेल? तो येऊन माळ्यांना ठार मारेल आणि द्राक्षमळ्याचा ताबा दुसऱ्‍यांना देईल.+ १०  तुम्ही कधी शास्त्रात हे वाचलं नाही का, की ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय;+ ११  हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्‌भुत आहे’?”+ १२  येशूने आपल्यालाच मनात ठेवून हे उदाहरण दिलं, हे त्याच्या विरोधकांच्या लक्षात आल्यामुळे त्याला धरण्याची* त्यांची इच्छा होती, पण ते लोकांना घाबरत होते. म्हणून ते त्याला सोडून तिथून निघून गेले.+ १३  मग त्याला बोलण्यात पकडण्यासाठी त्यांनी काही परूश्‍यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना त्याच्याकडे पाठवलं.+ १४  ते येशूकडे येऊन त्याला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता हे आम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही कोणाची मर्जी मिळवायचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही कोणाचं तोंड पाहून बोलत नाही, तर देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता. म्हणून आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही? १५  आम्ही तो द्यावा की नाही?” त्यांचा ढोंगीपणा ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? मला दिनाराचं* नाणं दाखवा.” १६  तेव्हा त्यांनी त्याला दिनाराचं नाणं आणून दिलं. तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” ते म्हणाले: “कैसराचं.” १७  तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग जे कैसराचं आहे ते कैसराला द्या,+ पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ हे ऐकून ते थक्क झाले. १८  नंतर, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणारे सदूकी* लोक+ त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ १९  “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलंय, की एखाद्याच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्यांना मूलबाळ नसलं, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करून आपल्या भावाचा वंश चालवावा.+ २०  तर एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण तो मेला तेव्हा त्याला मूलबाळ नव्हतं. २१  मग दुसऱ्‍याने तिच्याशी लग्न केलं पण तोसुद्धा मूलबाळ नसतानाच मेला आणि तिसऱ्‍याच्या बाबतीतही असंच झालं. २२  सातही भाऊ मूलबाळ न होताच मेले. शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. २३  मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.” २४  येशू त्यांना म्हणाला: “तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि देवाचं सामर्थ्यही माहीत नाही. म्हणूनच तुमचा गैरसमज झालाय.+ २५  कारण मेलेल्यांतून उठल्यावर, पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही. तर ते स्वर्गदूतांसारखे असतात.+ २६  पण, मेलेल्यांना पुन्हा उठवण्याबद्दल, मोशेच्या पुस्तकातल्या झुडपाच्या अहवालात तुम्ही वाचलं नाही का? तिथे देव मोशेला म्हणाला: ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे.’+ २७  तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय.”+ २८  तिथे आलेला एक शास्त्री त्यांचा वाद ऐकत होता. येशूने त्यांना किती चांगलं उत्तर दिलं, हे पाहून त्याने त्याला विचारलं: “सगळ्यात पहिली* आज्ञा कोणती?”+ २९  येशूने उत्तर दिलं: “पहिली आज्ञा ही आहे: ‘इस्राएली लोकांनो ऐका, यहोवा* आपला देव हा एकच यहोवा* आहे, ३०  आणि तुम्ही आपला देव यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने,* पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करा.’+ ३१  दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’+ या दोन आज्ञांपेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीच आज्ञा नाही.” ३२  तो शास्त्री त्याला म्हणाला: “गुरुजी तुम्ही बोललात ते योग्य आणि खरं आहे. ‘तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही,’+ ३३  आणि त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम करणं, हे सगळ्या होमार्पणांपेक्षा आणि बलिदानांपेक्षा जास्त मोलाचं आहे.”+ ३४  त्या शास्त्र्याने सुज्ञपणे दिलेलं उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला: “तू देवाच्या राज्यापासून जास्त दूर नाहीस.” त्यानंतर त्याला आणखी काही विचारायचं कोणाचं धाडस झालं नाही.+ ३५  नंतर, मंदिरात शिकवताना येशू म्हणाला: “ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे असं शास्त्री कसं काय म्हणतात?+ ३६  पवित्र शक्‍तीच्या* प्रेरणेने+ दावीद स्वतःच असं म्हणाला होता, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणतो: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस.”’+ ३७  जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”+ लोकांचा मोठा समुदाय आनंदाने त्याचं ऐकत होता. ३८  मग शिकवत असताना तो पुढे म्हणाला: “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवायला, बाजारांत लोकांकडून नमस्कार घ्यायला+ ३९  आणि सभास्थानांत पुढच्या* आसनांवर आणि मेजवान्यांत सगळ्यात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.+ ४०  ते विधवांची मालमत्ता* हडपतात आणि लोकांना दाखवण्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.” ४१  मग तो मंदिरातल्या दानपात्रांजवळ+ बसला होता, तेव्हा तो लोकांना त्यांत पैसे टाकताना पाहू लागला. बरेच श्रीमंत लोक दानपात्रांत पुष्कळ नाणी टाकत होते.+ ४२  मग एक गरीब विधवा आली आणि तिने फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* दानपात्रात टाकली.+ ४३  तेव्हा तो आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो की दानपात्रांत पैसे टाकणाऱ्‍या सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.+ ४४  कारण त्या सगळ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून टाकलं. पण ती इतकी गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.”+

तळटीपा

किंवा “माळा बांधला.”
शब्दार्थसूचीत “कोपऱ्‍याचा दगड” पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “अटक करण्याची.”
किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “महत्त्वाची.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “सगळ्यात चांगल्या.”
किंवा “घरं.”
शब्दशः “दोन लेप्टा,  म्हणजे एक क्वॉड्रन.”  अति. ख१४ पाहा.