गलतीकर यांना पत्र ३:१-२९

  • नियमशास्त्रातली कार्यं आणि विश्‍वास यांची तुलना (१-१४)

    • नीतिमान विश्‍वासामुळे जिवंत राहील (११)

  • अब्राहामला दिलेलं अभिवचन नियमशास्त्राद्वारे नव्हतं (१५-१८)

    • अब्राहामची संतती म्हणजे ख्रिस्त (१६)

  • नियमशास्त्राची सुरुवात आणि उद्देश (१९-२५)

  • विश्‍वासाद्वारे देवाची मुलं (२६-२९)

    • जे ख्रिस्ताचे आहेत तेसुद्धा अब्राहामची संतती (२९)

 अरे मूर्ख गलतीकरांनो! वधस्तंभावर* खिळलेल्या येशू ख्रिस्ताबद्दल तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजावण्यात आलं असूनही,+ तुमची अशी फसवणूक कोणी केली?+ २  मला तुम्हाला एकच विचारायचं* आहे: तुम्हाला पवित्र शक्‍ती* कशी मिळाली? नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे, की तुम्ही जे ऐकलं त्यावर विश्‍वास ठेवल्यामुळे?+ ३  तुम्ही इतके मूर्ख आहात का? सुरुवातीला तुम्ही देवाच्या पवित्र शक्‍तीवर अवलंबून राहत होता. मग आता तुम्ही माणसांच्या विचारसरणीप्रमाणे चालत आहात का?+ ४  तुम्ही सोसलेली सगळी दुःखं व्यर्थ होती का? ती नक्कीच व्यर्थ नव्हती. ५  जो तुम्हाला पवित्र शक्‍ती पुरवतो आणि तुमच्यामध्ये अद्‌भुत कार्यं घडवून आणतो,+ तो तुम्ही करत असलेल्या नियमशास्त्रातल्या कार्यांमुळे असं करतो का? की, जे ऐकलं त्यावर तुम्ही विश्‍वास ठेवल्यामुळे तो असं करतो? ६  कारण अब्राहामनेही “यहोवावर* विश्‍वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”+ ७  तुम्हाला तर माहीतच असेल, की जी विश्‍वास ठेवतात तीच अब्राहामची मुलं आहेत.+ ८  विदेशी लोकांना विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवलं जाईल, हे देवाने पूर्वीच शास्त्रात सांगितलं होतं. म्हणूनच, अब्राहामला आधीपासूनच हा आनंदाचा संदेश घोषित करण्यात आला, की “तुझ्यामुळे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.”+ ९  अब्राहामने यावर विश्‍वास ठेवला. म्हणूनच जे विश्‍वास ठेवतात त्यांनाही अब्राहामसोबत आशीर्वाद मिळत आहेत.+ १०  जे नियमशास्त्रातल्या कार्यांवर अवलंबून राहतात ते सगळे शापित आहेत. कारण असं लिहिलं आहे: “जो कोणी नियमशास्त्राच्या गुंडाळीत लिहिलेल्या या सर्व गोष्टी करण्यात टिकून राहत नाही, तो शापित असो.”+ ११  शिवाय, नियमशास्त्राद्वारे कोणीही देवापुढे नीतिमान ठरत नाही हे स्पष्टच आहे.+ कारण असं लिहिलं आहे, “नीतिमान त्याच्या विश्‍वासामुळे जगेल.”+ १२  नियमशास्त्र हे विश्‍वासावर आधारित नाही. उलट त्यात असं म्हटलं होतं, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.”+ १३  ख्रिस्ताने आपल्याला विकत घेतलं+ आणि आपल्याऐवजी स्वतः शापित होऊन त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्‍त केलं.+ कारण असं लिहिलं आहे: “वधस्तंभावर टांगलेला प्रत्येक माणूस शापित असो.”+ १४  यामागे असा उद्देश होता की अब्राहामला ज्यांबद्दल वचन दिलं होतं, ते आशीर्वाद ख्रिस्त येशूद्वारे इतर राष्ट्रांनाही मिळावेत.+ हे यासाठी, की वचन दिलेली पवित्र शक्‍ती आपल्याला विश्‍वासाद्वारे मिळावी.+ १५  बांधवांनो, मी रोजच्या जीवनातलं एक उदाहरण देतो: जेव्हा एखादा करार पक्का केला जातो, मग तो माणसाने केलेला असला, तरी एकदा का तो पक्का करण्यात आला, की मग कोणीही तो रद्द करू शकत नाही किंवा त्यात कशाची भर घालू शकत नाही. १६  तर, जी अभिवचनं देण्यात आली होती, ती अब्राहामला आणि त्याच्या संततीला* देण्यात आली होती.+ शास्त्रात “तुझ्या वंशजांना,”* असं पुष्कळ जणांना उद्देशून म्हणण्यात आलं नाही. उलट, “तुझ्या संततीला”* असं म्हणण्यात आलं, म्हणजे फक्‍त एकाला आणि तो ख्रिस्त आहे.+ १७  मी असंही म्हणतो: ४३० वर्षांनंतर आलेलं नियमशास्त्र,+ देवाने पूर्वीच पक्का केलेला करार रद्द करून त्याचं अभिवचन व्यर्थ ठरवू शकत नाही. १८  कारण जर देव नियमाच्या आधाराने वारसा देत असेल, तर मग तो अभिवचनाद्वारे नाही; पण देवाने अब्राहामवर कृपा करून त्याला अभिवचनाद्वारे वारसा दिला आहे.+ १९  मग, मुळात नियमशास्त्र कशासाठी? जिला अभिवचन देण्यात आलं होतं, ती संतती* येईपर्यंत+ अपराध प्रकट करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं होतं.+ आणि ते स्वर्गदूतांद्वारे+ एका मध्यस्थाच्या हातून देण्यात आलं.+ २०  जेव्हा एकाच व्यक्‍तीचा समावेश असतो, तेव्हा मध्यस्थाची गरज नसते आणि अभिवचन देणारा देव हा एकच आहे. २१  तर मग, नियमशास्त्र देवाच्या अभिवचनांच्या विरोधात आहे का? नक्कीच नाही! कारण जो जीवन देऊ शकेल, असा नियम देण्यात आला असता, तर मग माणूस नियमशास्त्राच्या आधारावर नीतिमान ठरू शकला असता. २२  पण शास्त्राने सगळ्या गोष्टी पापाच्या स्वाधीन केल्या. हे यासाठी, की येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे मिळणारं अभिवचन, विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना देण्यात यावं. २३  खरा विश्‍वास येण्याआधी, आपण नियमशास्त्राच्या संरक्षणात होतो. आपल्याला त्याच्या स्वाधीन करण्यात आलं होतं आणि पुढे प्रकट होणार असलेल्या विश्‍वासाची आपण वाट पाहत होतो.+ २४  अशा रितीने, आपल्याला विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवलं जावं,+ म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्तापर्यंत नेणारा मार्गदर्शक* होतं.+ २५  पण खरा विश्‍वास आला असल्यामुळे,+ आता आपण मार्गदर्शकाच्या* अधीन नाही.+ २६  ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्‍वासाद्वारे+ तुम्ही सर्व खरंतर देवाची मुलं आहात.+ २७  कारण तुम्हा सगळ्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा* झाला असून, तुम्ही ख्रिस्तासारखे बनला आहात.*+ २८  तुमच्यात कोणी यहुदी नाही आणि कोणी ग्रीक नाही,+ कोणी दास नाही आणि कोणी स्वतंत्र नाही,+ कोणी पुरुष नाही आणि कोणी स्त्रीही नाही.+ कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही सगळे एक आहात.+ २९  शिवाय, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही खरोखर अब्राहामची संतती*+ आणि त्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे+ वारस आहात.+

तळटीपा

शब्दशः “जाणून घ्यायचं.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “बीजाला.”
शब्दशः “बीजांना.”
शब्दशः “बीजाला.”
शब्दशः “बीज.”
मूळ ग्रीक भाषेतल्या शब्दाचा अर्थ, मुलांची काळजी घेणारा किंवा रक्षण करणारा असा आहे.
मूळ ग्रीक भाषेतल्या शब्दाचा अर्थ, मुलांची काळजी घेणारा किंवा रक्षण करणारा असा आहे.
शब्दशः “ख्रिस्ताला धारण केलं आहे.”
शब्दशः “बीज.”