व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशू ख्रिस्त कोण आहे?

१. येशूच्या जीवनाची सुरुवात कधी आणि कुठे झाली?

लहान मुलंसुद्धा येशूशी मोकळेपणाने बोलायची, याचं काय कारण होतं?—मत्तय ११:२९; मार्क १०:१३-१६.

येशू इतर मानवांपेक्षा वेगळा आहे. कारण पृथ्वीवर जन्म होण्याआधी येशू स्वर्गात राहत होता. तो एक स्वर्गदूत होता. (योहान ८:२३) देवाने सर्वात आधी त्याला बनवलं आणि मग त्याने बाकीच्या सर्व गोष्टी बनवायला देवाला मदत केली. यहोवाने ज्याला स्वतः बनवलं असा तो एकटाच आहे आणि म्हणून त्याला देवाचा ‘एकुलता एक’ मुलगा म्हटलं आहे. (योहान १:१४) येशूला ‘मसीहा’ किंवा ‘ख्रिस्त’ असंही म्हटलं जातं. या शब्दांचा अर्थ, ‘देवाने एका खास कामासाठी नेमलेला’ असा होतो.—नीतिवचनं ८:२२, २३, ३०; कलस्सैकर १:१५, १६ वाचा.

२. येशू पृथ्वीवर का आला होता?

देवाने आपल्या मुलाला पृथ्वीवर पाठवण्यासाठी, त्याचं जीवन स्वर्गातून पृथ्वीवर, मरीया नावाच्या एका यहुदी कुमारीच्या पोटी घातलं. त्यामुळे, येशूला जन्म देणारा कोणीही मानवी पिता नव्हता. (लूक १:३०-३५) येशू पृथ्वीवर का आला होता? तो (१) देवाबद्दलचं सत्य शिकवण्यासाठी, (२) कठीण परिस्थितीत असतानाही मानव देवाच्या इच्छेप्रमाणे कसं वागू शकतात, हे स्वतःच्या उदाहरणातून दाखवण्यासाठी आणि (३) त्याचं परिपूर्ण जीवन “खंडणी” म्हणून अर्पण करण्यासाठी आला होता.—मत्तय २०:२८ वाचा.

३. आपल्याला खंडणीची गरज का आहे?

एखाद्याला मारून टाकण्याची धमकी दिली जाते, तेव्हा त्याला सोडवण्यासाठी दिलेल्या किंमतीला खंडणी म्हणतात. (निर्गम २१:२९, ३०) देवाने सुरुवातीला मानवाला बनवलं होतं, तेव्हा त्याने म्हातारं होऊन मरून जावं अशी देवाची इच्छा नव्हती. असं आपण का म्हणू शकतो? कारण, देवाने पहिला मानव, आदाम याला असं सांगितलं होतं की जर त्याने देवाची आज्ञा मोडून “पाप” केलं, तर तो मरेल. याचा अर्थ, जर आदामने पाप केलं नसतं, तर तो कधीच मेला नसता. (उत्पत्ती २:१६, १७; ५:५ ) पण, आदामने पाप केलं, आणि म्हणूनच बायबल आपल्याला सांगतं की आदाममुळे मरण जगात “आलं.” आदामने आपल्या सगळ्या वंशजांना पाप आणि त्याची शिक्षा म्हणून मृत्यूही वारशाने दिला. आदामकडून मिळालेल्या या मृत्यूच्या शिक्षेपासून सुटका मिळण्यासाठीच आपल्याला खंडणीची गरज आहे.—रोमकर ५:१२; ६:२३ वाचा.

मग मृत्यूपासून आपली सुटका करण्यासाठी एखादा मानव ही खंडणी भरू शकत होता का? नाही. कारण सर्व मानव अपरिपूर्ण आहेत. म्हणजेच, आपल्या सर्वांनाच आदामकडून वारशाने पाप मिळालं आहे. त्यामुळे आपण आपलं जीवन जरी अर्पण केलं, तरी आपण फक्‍त स्वतःच्याच पापांची किंमत भरू शकतो. कोणताही अपरिपूर्ण माणूस दुसऱ्‍यांच्या पापांची भरपाई करू शकत नाही.—स्तोत्र ४९:७-९ वाचा.

४. येशू का मेला?

येशू आपल्यासारखा नव्हता. तो परिपूर्ण होता. त्याने कोणतंच पाप केलं नव्हतं. त्यामुळे, त्याला त्याच्या पापांसाठी मरायची गरज नव्हती. तो स्वतःच्या नाही, तर दुसऱ्‍यांच्या पापांसाठी मेला. देवाने त्याच्या मुलाला पृथ्वीवर पाठवलं आणि मानवांच्या म्हणजेच आपल्या पापांसाठी त्याला मरू दिलं. यावरून यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. तसंच, येशूनेही त्याच्या पित्याची आज्ञा पाळली आणि आपल्या पापांसाठी त्याचं जीवन अर्पण केलं. असं करून त्यानेही दाखवून दिलं, की त्याचं आपल्यावर प्रेम आहे.—योहान ३:१६; रोमकर ५:१८, १९ वाचा.

येशूला का मरावं लागलं?  हा व्हिडिओ पाहा

५. आज येशू काय करत आहे?

येशू पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने आजारी लोकांना बरं केलं, मेलेल्या लोकांना जिवंत केलं आणि संकटात सापडलेल्या लोकांना वाचवलं. यावरून, भविष्यात तो सगळ्या आज्ञाधारक मानवांसाठी काय करेल याची एक झलक त्याने दिली. (मत्तय १५:३०, ३१; योहान ५:२८) येशूचा मृत्यू झाल्यावर देवाने त्याला एक शक्‍तिशाली स्वर्गदूत म्हणून पुन्हा जिवंत केलं. (१ पेत्र ३:१८) त्यानंतर, यहोवाने त्याला संपूर्ण पृथ्वीवर राज्य करायचा अधिकार देईपर्यंत, तो त्याच्या उजव्या हाताला थांबून राहिला. (इब्री लोकांना १०:१२, १३) आज येशू स्वर्गात राजा म्हणून राज्य करत आहे. आणि ही आनंदाची बातमी त्याचे शिष्य संपूर्ण जगात घोषित करत आहेत.—दानीएल ७:१३, १४; मत्तय २४:१४ वाचा.

लवकरच, येशू एक शक्‍तिशाली राजा या नात्याने सर्व दुःखांचा आणि त्यांसाठी जबाबदार असलेल्या लोकांचा नाश करेल. जे लोक येशूच्या आज्ञा पाळून त्याच्यावर विश्‍वास असल्याचं दाखवून देतात, ते पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम आनंदाने राहतील.—स्तोत्र ३७:९-११ वाचा.