व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९

तुमचं कुटुंब आनंदी असावं म्हणून तुम्ही काय करू शकता?

तुमचं कुटुंब आनंदी असावं म्हणून तुम्ही काय करू शकता?

१. कुटुंब आनंदी होण्यासाठी कायदेशीर विवाह होणं का गरजेचं आहे?

आनंदाची बातमी यहोवाकडून आहे. तो एक आनंदी देव आहे. आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येक कुटुंबाने आनंदी असावं. (१ तीमथ्य १:११) विवाहाच्या व्यवस्थेची सुरुवात त्यानेच केली आहे. कुटुंब आनंदी होण्यासाठी एका जोडप्याचा कायदेशीर रित्या विवाह होणं गरजेचं आहे. कारण यामुळे मुलांना एका सुरक्षित वातावरणात वाढवणं आईवडिलांना शक्य होतं. म्हणून, ज्यांना देवाच्या आज्ञांप्रमाणे जगायचं आहे त्यांनी विवाहाच्या नोंदणीबद्दल आपल्या देशातल्या कायद्यांचं पालन केलं पाहिजे.—लूक २:१, ४, ५ वाचा.

विवाहाबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? देवाच्या दृष्टीने विवाहाचं बंधन हे कायमचं बंधन आहे. यहोवाची इच्छा आहे की नवरा-बायकोने नेहमी एकमेकांना विश्‍वासू राहावं. (इब्री लोकांना १३:४) त्याला घटस्फोटाची घृणा वाटते. (मलाखी २:१६) पण जर एखाद्या व्यक्‍तीने व्यभिचार केला, तर यहोवा त्या व्यक्‍तीच्या जोडीदाराला घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करायची परवानगी देतो.—मत्तय १९:३-६,  वाचा.

२. नवरा-बायकोने एकमेकांशी कसं वागलं पाहिजे?

पुरुषाने आणि स्त्रीने आपल्या वैवाहिक जीवनात एकमेकांना साहाय्य करावं, या उद्देशाने यहोवाने त्यांना निर्माण केलं होतं. (उत्पत्ती २:१८) पती हा कुटुंबाचा प्रमुख असतो. आणि म्हणून कुटुंबाच्या शारीरिक गरजा पूर्ण करायची, तसंच त्यांना देवाबद्दल शिकवायची प्रमुख जबाबदारी त्याची आहे. त्याने आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि स्वतःचा स्वार्थ पाहण्याऐवजी तिच्या गरजांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवरा-बायको दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांचा आदर केला पाहिजे. त्या दोघांकडूनही चुका होत असल्यामुळे त्यांनी एकमेकांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. असं केल्यामुळेच त्यांचं कौटुंबिक जीवन आनंदी होईल.—इफिसकर ४:३१, ३२; ५:२२-२५, ३३; १ पेत्र ३:७ वाचा.

३. एकमेकांशी पटत नाही म्हणून जोडीदाराला सोडून देणं योग्य ठरेल का?

तुमचं एकमेकांशी पटत नसेल, तर तुम्ही एकमेकांशी प्रेमाने वागायचा आणखी जास्त प्रयत्न केला पाहिजे. (१ करिंथकर १३:४, ५) वैवाहिक जीवनात लहानमोठ्या समस्या येणं साहजिक आहे. पण अशा समस्यांमुळे आपल्या जोडीदारापासून वेगळं होण्याचा सल्ला देवाचं वचन देत नाही.—१ करिंथकर ७:१०-१३ वाचा.

४. मुलांनो, देवाची तुमच्यासाठी काय इच्छा आहे?

यहोवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदी राहावं. आणि आनंदी होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल तो तुम्हाला सगळ्यात चांगला सल्ला देतो. तुमच्या आईबाबांजवळ जी बुद्धी आणि अनुभव आहे, त्यापासून तुम्ही फायदा करून घ्यावा असं त्याला वाटतं. (कलस्सैकर ३:२०) तसंच, यहोवा तुमचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळे जो आनंद मिळतो, तो तुम्हालाही मिळावा अशी त्याची इच्छा आहे.—उपदेशक ११:९–१२:१; मत्तय १९:१३-१५; २१:१५, १६ वाचा.

५. आईवडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना आनंदी व्हायला कशी मदत करू शकता?

तुमच्या मुलांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. (१ तीमथ्य ५:८) पण आनंदी होण्यासाठी फक्‍त एवढंच पुरेसं नाही. तुम्ही आपल्या मुलांना देवावर प्रेम करायला आणि त्याच्याबद्दल शिकून घ्यायलाही मदत केली पाहिजे. (इफिसकर ६:४) तुमचं देवावर मनापासून प्रेम आहे हे तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसून आलं पाहिजे. यामुळे तुमच्या मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम होईल. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनातून आपल्या मुलांना शिकवता, तेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या विचारांना आकार देता.—अनुवाद ६:४-७; नीतिवचनं २२:६ वाचा.

तुम्ही आपल्या मुलांना प्रोत्साहन देता आणि त्यांची प्रशंसा करता तेव्हा त्यांना फायदा होतो, ही गोष्ट तर खरी आहे. पण कधीकधी, त्यांच्या चुका सुधारायची आणि त्यांना शिस्त लावायचीही गरज पडू शकते. असं केल्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करण्यापासून त्यांचं संरक्षण करू शकता, ज्यांमुळे त्यांचं नुकसान होईल किंवा त्यांच्या जीवनात दुःख येईल. (नीतिवचनं २२:१५) पण, शिस्त लावताना कधीही त्यांच्यासोबत कठोरपणे किंवा निर्दयीपणे वागू नका.—कलस्सैकर ३:२१ वाचा.

यहोवाच्या साक्षीदारांनी अशी बरीच पुस्तकं प्रकाशित केली आहेत, ज्यांमुळे खासकरून आईवडिलांना आणि मुलांना फायदा होऊ शकतो. ही पुस्तकं बायबलवर आधारित आहेत.—स्तोत्र १९:७, ११ वाचा.