व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७

देवाचं राज्य काय आहे?

देवाचं राज्य काय आहे?

१. देवाचं राज्य काय आहे?

येशू सगळ्यात चांगला राजा का आहे?—मार्क १:४०-४२.

देवाचं राज्य हे स्वर्गातून राज्य करणारं एक सरकार आहे. हे सरकार बाकीच्या सगळ्या सरकारांना काढून टाकेल. आणि या सरकाराद्वारे देव स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण करेल. ही आपल्यासाठी खरंच एक आनंदाची बातमी आहे. कारण, आज मानवांना एका चांगल्या सरकाराची खूप गरज आहे. आणि देवाचं राज्य असंच एक सरकार असेल, जे लवकरच त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. या सरकारच्या शासनाखाली, पृथ्वीवरचे सगळे लोक एकतेने राहतील.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; २४:१४ वाचा.

राज्य आहे, म्हणजे साहजिकच एक राजाही असलाच पाहिजे. यहोवाने त्याच्या राज्याचा राजा होण्यासाठी आपल्या मुलाला म्हणजे येशू ख्रिस्ताला नियुक्‍त केलं आहे.—प्रकटीकरण ११:१५ वाचा.

देवाचं राज्य काय आहे? हा व्हिडिओ पाहा

२. येशू सगळ्यात चांगला राजा आहे असं का म्हणता येईल?

देवाचा मुलगा येशू हाच सगळ्यात चांगला राजा आहे. कारण तो दयाळू आहे आणि नेहमी योग्य तेच करतो. (मत्तय ११:२८-३०) तसंच, मानवांच्या सगळ्या समस्या काढून टाकण्याची शक्‍ती त्याच्याजवळ आहे. तो स्वर्गातून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. येशूचं पुनरुत्थान झाल्यावर तो स्वर्गात गेला. आणि यहोवाकडून राज्य करण्याचा अधिकार मिळेपर्यंत, तो त्याच्या उजव्या हाताला थांबून राहिला. (इब्री लोकांना १०:१२, १३) आणि मग काही काळाने देवाने त्याला राज्य करण्याचा अधिकार दिला.—दानीएल ७:१३, १४ वाचा.

३. येशूसोबत कोण राज्य करतील?

‘पवित्र जन’ म्हटलेल्या लोकांचा एक गट येशूसोबत स्वर्गात राज्य करेल. (दानीएल ७:२७) या पवित्र जनांपैकी येशूच्या विश्‍वासू प्रेषितांना सगळ्यात आधी निवडण्यात आलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत यहोवा विश्‍वासू पुरुषांना आणि स्त्रियांना या पवित्र जनांपैकी एक होण्यासाठी निवडत आला आहे. त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा येशूप्रमाणेच त्यांनाही अदृश्‍य शरीरात उठवलं जातं.—योहान १४:१-३; १ करिंथकर १५:४२-४४ वाचा.

स्वर्गात एकूण किती लोक जातील? येशूने त्यांना ‘लहान कळप’ असं म्हटलं. (लूक १२:३२) त्यांची एकूण संख्या १,४४,००० इतकी असेल. ते येशूसोबत मिळून स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतील.—प्रकटीकरण १४:१ वाचा.

४. येशूने राज्य करायला सुरुवात केली तेव्हा काय झालं?

१९१४ * या वर्षी येशूने देवाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली. राजा या नात्याने येशूने सगळ्यात आधी सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना खाली पृथ्वीवर फेकून दिलं. यामुळे सैतान खूप संतापला आणि त्याने संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळी संकटं आणायला सुरुवात केली. (प्रकटीकरण १२:७-१०, १२) आणि तेव्हापासून मानवाजातीसमोर असलेल्या समस्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. लढाया, दुष्काळ, महामाऱ्‍या आणि भूकंप या सगळ्या गोष्टी येशूने दिलेल्या एका ‘चिन्हाचा’ भाग आहेत. आणि या गोष्टींवरून दिसून येतं की देवाचं राज्य आता लवकरच या पृथ्वीवर शासन सुरू करेल.—लूक २१:७, १०, ११, ३१ वाचा.

५. देवाचं राज्य आज काय करत आहे, आणि ते भविष्यात काय करेल?

आज देवाच्या राज्याद्वारे सबंध जगात प्रचाराचं कार्य केलं जात आहे. आणि या कार्याद्वारे सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांच्या एका मोठ्या लोकसमुदायाला एकत्र केलं जात आहे. लाखो नम्र लोक देवाच्या राज्याचे नागरिक बनत आहेत. देवाचं राज्य या दुष्ट जगाचा नाश करेल, तेव्हा या नम्र लोकांचं संरक्षण केलं जाईल. म्हणून ज्यांना देवाच्या राज्याचे आशीर्वाद मिळवायची इच्छा आहे, त्यांनी त्याचे नागरिक बनण्यासाठी येशूच्या आज्ञा पाळायला शिकून घेतलं पाहिजे.—प्रकटीकरण ७:९, १४, १६, १७ वाचा.

१,००० वर्षांच्या काळात, हे राज्य मानवजातीसाठी असलेला देवाचा मूळ संकल्प पूर्ण करेल. संपूर्ण पृथ्वी एक सुंदर नंदनवन बनेल. आणि १,००० वर्षांच्या शेवटी, येशू आपलं राज्य पुन्हा आपल्या पित्याला सोपवून देईल. (१ करिंथकर १५:२४-२६) देवाच्या राज्याबद्दल मिळालेली ही माहिती तुम्हाला आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना सांगायला आवडेल का?—स्तोत्र ३७:१०, ११, २९ वाचा.

 

^ परि. 6 १९१४ बद्दल बायबलमध्ये काय भविष्यवाणी केली होती, याबद्दल जाणून घेण्यासाठी बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  या पुस्तकात पृष्ठ २१७ वर २२ वी अंत्यटीप पाहा.