व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १२

तुम्ही देवासोबत एक जवळचं नातं कसं जोडू शकता?

तुम्ही देवासोबत एक जवळचं नातं कसं जोडू शकता?

१. देव सगळ्यांच्याच प्रार्थना ऐकतो का?

देव सगळ्या प्रकारच्या लोकांना सांगतो की त्यांनी त्याला प्रार्थना करावी आणि त्याच्या जवळ यावं. (स्तोत्र ६५:२) पण तो सगळ्यांच्याच  प्रार्थना ऐकत नाही. उदाहरणार्थ, बायबल सांगतं की जर एखादा माणूस आपल्या बायकोशी वाईट वागत असेल, तर त्याच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. (१ पेत्र ३:७) तसंच, जेव्हा इस्राएली लोक वाईट गोष्टी करत राहिले, तेव्हा यहोवाने त्यांच्याही प्रार्थना ऐकल्या नाहीत. यावरून हे अगदी स्पष्ट आहे, की प्रार्थना करणं हा एक मोठा सन्मान आहे, जो फक्‍त काही लोकांना मिळतो. देव गंभीर पाप करणाऱ्‍यांच्या प्रार्थना ऐकायलाही तयार आहे. पण यासाठी आधी त्यांनी आपल्या पापांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप केला पाहिजे.—यशया १:१५; ५५:७ वाचा.

देव सगळ्याच प्रार्थना ऐकतो का? हा व्हिडिओ पाहा

२. आपल्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत?

प्रार्थना आपल्या उपासनेचा एक भाग आहेत. म्हणून आपण फक्‍त आपल्या निर्माणकर्त्याला, म्हणजे यहोवालाच प्रार्थना केली पाहिजे. (मत्तय ४:१०; ६:९) तसंच, आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपण येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. कारण त्याने आपल्या पापांसाठी त्याचं जीवन अर्पण केलं. (योहान १४:६) आपण तोंडपाठ केलेल्या प्रार्थना म्हणाव्यात किंवा लिहिलेल्या प्रार्थना फक्‍त वाचाव्यात, अशी यहोवाची इच्छा नाही. तर आपण प्रार्थनेत अगदी मनापासून त्याच्याशी बोलावं अशी त्याची इच्छा आहे.—मत्तय ६:७; फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.

आपण मनातल्या मनात केलेल्या प्रार्थनासुद्धा यहोवा ऐकू शकतो. (१ शमुवेल १:१२, १३) त्याची इच्छा आहे, की आपण नेहमी त्याला प्रार्थना करावी. जसं की सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्याआधी, जेवणाच्या वेळी आणि आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा.—स्तोत्र ५५:२२; मत्तय १५:३६ वाचा.

३. आपण सभांना का गेलं पाहिजे?

देवासोबत एक जवळचं नातं जोडणं सोपं नाही. कारण आज आपण अशा जगात राहतो, जिथे लोकांचा देवावर विश्‍वास नाही. तसंच, या पृथ्वीवर शांती आणण्याचं जे वचन त्याने दिलं आहे, त्यावरही त्यांचा भरवसा नाही. (२ तीमथ्य ३:१, ४; २ पेत्र ३:३, १३) म्हणूनच आपण सभांना गेलं पाहिजे. कारण, तिथे आपण आपल्या भाऊबहिणींना भेटू शकतो आणि एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतो.—इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.

ज्यांचं देवावर प्रेम आहे, त्यांच्यासोबत मिळून त्याची उपासना केल्यामुळे आपल्याला देवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत होईल. सभांमध्ये आपल्या भाऊबहिणींचा मजबूत विश्‍वास पाहून, आपलाही विश्‍वास मजबूत होतो.—रोमकर १:११, १२ वाचा.

४. देवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे?

यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी तुम्ही त्याच्या वचनातून जे काही शिकता त्यावर विचार करा. त्याच्या कार्यांवर, त्याच्या सल्ल्यांवर आणि त्याच्या अभिवचनांवर खोलवर विचार करा. अशा प्रकारे मनन केल्यामुळे आणि सोबतच प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनात देवाच्या प्रेमाबद्दल आणि बुद्धीबद्दल कदर वाढेल.—यहोशवा १:८; स्तोत्र १:१-३ वाचा.

देवासोबत एक जवळचं नातं जोडण्यासाठी, तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्‍वास असला पाहिजे. पण विश्‍वास एका रोपट्यासारखा आहे. रोपट्याला जसं सतत पाणी घालावं लागतं, तसंच तुम्हीही शिकलेल्या गोष्टींबद्दल नेहमी मनन करत राहिलं पाहिजे. यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल.—मत्तय ४:४; इब्री लोकांना ११:१,  वाचा.

५. यहोवासोबत जवळचं नातं जोडल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

जे यहोवावर प्रेम करतात त्यांची तो काळजी घेतो. ज्या गोष्टींमुळे ते त्यांचा विश्‍वास आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा गमावू शकतात, अशा सगळ्या गोष्टींपासून तो त्यांना वाचवतो. (स्तोत्र ९१:१, २, ७-१०) ज्यामुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं किंवा आपल्या जीवनात दुःख येऊ शकतं, अशा धोक्यांबद्दल तो आपल्याला आधीच सावध करतो. खरंच, यहोवा आपल्याला जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग शिकवतो.—स्तोत्र ७३:२७, २८; याकोब ४:४,  वाचा.