व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय अठरा

तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”

तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”

१, २. मरीयेच्या प्रवासाचं वर्णन करा, आणि तिला अवघडल्यासारखं का झालं असावं ते स्पष्ट करा.

बऱ्याच तासांपासून गाढवावर बसलेल्या मरीयेला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. तिनं थोडी हालचाल करून व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न केला. गाढवाच्या पुढं योसेफ चालला होता आणि ते बेथलेहेमच्या दिशेनं निघाले होते. तेवढ्यात, मरीयेला पुन्हा एकदा बाळानं हालचाल केल्याचं जाणवलं.

मरीया गरोदर होती आणि अहवालावरून असं दिसतं, की तिचे दिवस भरत आले होते. (लूक २:५, ६) वाटेत, एकेक शेत मागं टाकत ते जोडपं पुढं जात असताना, शेतांत काम करणारे कदाचित आपलं काम थांबवून त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहत असतील. अशा या अवस्थेत ही बाई प्रवासाला का निघाली असावी, असा कदाचित ते विचार करत असतील. पण खरंच, नासरेथला राहणारी मरीया इतक्या दूरच्या प्रवासाला का बरं निघाली होती?

३. मरीयेला कोणतं काम देण्यात आलं होतं, आणि आपण तिच्याविषयी काय शिकणार आहोत?

याचं कारण म्हणजे, काही महिन्यांआधी या यहुदी तरुणीला एक असं काम सोपवण्यात आलं होतं, जे आजवरच्या इतिहासात कोणत्याच व्यक्तीला देण्यात आलं नव्हतं. ती एका बाळाला जन्म देणार होती, जो पुढं मसीहा किंवा देवाचा पुत्र म्हणून ओळखला जाणार होता! (लूक १:३५) बाळाच्या जन्माची वेळ जवळ येऊ लागली, तेव्हा अचानक त्यांना या प्रवासाला निघावं लागलं. या प्रवासामुळं, मरीयेला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं; अशी आव्हानं ज्यांमुळं तिचा विश्वास पारखला गेला. पण तरीसुद्धा ती कशामुळे आपला विश्वास मजबूत ठेवू शकली, हे आता आपण पाहू या.

बेथलेहेमला जाण्याचा निर्णय

४, ५. (क) योसेफ आणि मरीया बेथलेहेमला का निघाले होते? (ख) कैसरानं काढलेल्या फर्मानामुळं कोणत्या भविष्यवाणीची पूर्णता शक्य झाली?

फक्त योसेफ आणि मरीयाच प्रवासाला निघाले होते, असं नाही. कैसर औगुस्त यानं नुकतंच असं फर्मान काढलं होतं, की सबंध साम्राज्यातल्या लोकांची नोंदणी केली जावी. आणि यासाठी प्रत्येकानं आपापल्या जन्मगावी जाऊन नाव नोंदवावं अशी आज्ञा त्यानं दिली. मग, योसेफानं काय केलं? अहवालात असं म्हटलं आहे: “योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला.”—लूक २:१-४.

नेमक्या याच वेळी कैसरानं असं फर्मान काढलं होतं, हा काही योगायोग नव्हता. कारण, जवळजवळ सातशे वर्षांआधीच लिहून ठेवण्यात आलेल्या एका भविष्यवाणीत, मसीहाचा जन्म बेथलेहेममध्ये होईल असं सांगण्यात आलं होतं. तसं तर, नासरेथपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरही बेथलेहेम नावाचं एक गाव होतं. पण, भविष्यवाणीनुसार मसीहाचा जन्म ज्या गावी होईल त्याचं नाव फक्त बेथलेहेम नव्हे, तर “बेथलेहेम एफ्राथा” असेल, असं सांगण्यात आलं होतं. (मीखा ५:२ वाचा.) आणि या विशिष्ट गावी जाण्यासाठी, नासरेथहून शोमरोनाच्या वाटेनं डोंगराळ प्रदेशातून जवळजवळ १३० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. योसेफाला याच बेथलेहेमला जावं लागणार होतं. कारण ते दावीद राजाच्या घराण्याचं मूळ गाव होतं आणि योसेफ आणि त्याची बायको मरीया हे दोघंही दाविदाच्या कुळातले होते.

६, ७. (क) बेथलेहेमला जाणं मरीयेसाठी सोपं का नव्हतं? (ख) लग्न झाल्यानंतर मरीयेच्या जीवनात कोणता मोठा बदल घडून आला? (तळटीपही पाहा.)

योसेफानं बेथलेहेमला जायचा निर्णय घेतला. पण, मरीयेविषयी काय? तिच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा असणार नव्हता. कदाचित तो ऑक्टोबर महिना असावा. उन्हाळा संपण्याचा काळ. त्यामुळं, पावसाचीही शक्यता होती. शिवाय, बेथलेहेम हे २,५०० फूट उंचावर वसलेलं होतं; त्यामुळं योसेफ “वर यहूदीयातील . . . बेथलेहेम गावी गेला” असं जे अहवालात म्हटलं आहे ते योग्यच आहे. तिथं पोहोचण्यासाठी बऱ्याच दिवसांचा खडतर प्रवास करून आणि बरंच चढण पार करून जावं लागायचं. त्यात मरीया गरोदर असल्यामुळं रस्त्यात त्यांना अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणं भाग होतं. त्यामुळं बेथलेहेमला पोहोचायला त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार होता. बाळंतपण जवळ आलेल्या कोणत्याही स्त्रीला साहजिकच आपल्या घरी, आपल्या माणसांजवळ राहावंसं वाटतं, जेणेकरून प्रसूतीच्या वेदना सुरू होताच ते आवश्यक मदत देऊ शकतील. त्यामुळं, मरीयेनं अशा अवस्थेत बेथलेहेमच्या प्रवासाला निघणं हे खरोखरच धाडसाचं काम होतं.

बेथलेहेमचा प्रवास सोपा नव्हता

पण तरीसुद्धा लूकच्या अहवालात आपण असं वाचतो, की नाव नोंदवण्यासाठी मरीयाही योसेफासोबत गेली. तसंच, ती योसेफाची “लग्नाची बायको” असल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे. (लूक २:४, ५, पं.र.भा.) योसेफाशी लग्न झाल्यानंतर निर्णय घेण्याच्या बाबतीत मरीयेच्या जीवनात एक मोठा बदल घडून आला. देवाच्या दृष्टीनं योसेफ आपल्या कुटुंबाचा प्रमुख आहे ही गोष्ट तिनं ओळखली. तसंच, त्याच्या निर्णयांना सहकार्य करून त्याची साहाय्यक या नात्यानं आपली भूमिका पार पाडण्यास ती तयार होती. * अशा रीतीनं, सोपं किंवा सोयीस्कर नसूनही, आपल्या पतीच्या निर्णयानुसार बेथलेहेमला जाण्याद्वारे मरीयेनं विश्वासाच्या बाबतीत एक उल्लेखनीय उदाहरण मांडलं.

८. (क) योसेफाच्या अधीन राहायला मरीयेला आणखी कोणत्या गोष्टीमुळं प्रेरणा मिळाली असावी? (ख) मरीयेचं उदाहरण आपल्या सर्वांना कोणतं प्रोत्साहन देतं?

योसेफाच्या अधीन राहायला मरीयेला आणखी कोणत्या गोष्टीमुळं प्रेरणा मिळाली असावी? मसीहाचा जन्म बेथलेहेमात होईल असं भविष्यवाणीत सांगितलं असल्याचं तिला माहीत असावं का? याविषयी बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण, कदाचित तिला ही भविष्यवाणी माहीत असावी, कारण धर्मपुढाऱ्यांना आणि बऱ्याच सर्वसामान्य लोकांनाही ती माहीत होती. (मत्त. २:१-७; योहा. ७:४०-४२) आणि मरीयेला तर शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. (लूक १:४६-५५) मग, मरीयेनं बेथलेहेमला जाण्याचा निर्णय नेमका कशामुळं घेतला? आपल्या पतीच्या आज्ञेमुळं, कैसराच्या फर्मानामुळं, यहोवानं केलेल्या भविष्यवाणीमुळं, की या सर्व कारणांमुळं? हे तर सांगता येत नाही. पण, तिनं आपल्यासाठी एक अतिशय उत्तम उदाहरण मांडलं एवढं मात्र निश्‍चित! अशा प्रकारची नम्र आणि आज्ञाधारक मनोवृत्ती दाखवणाऱ्या स्त्रीपुरुषांची यहोवा खूप कदर करतो. आज आपल्या काळात दुसऱ्यांच्या अधीन राहणं लोकांना मुळीच आवडत नाही, पण मरीयेचं उदाहरण आपल्या सर्वांना हा चांगला गुण दाखवण्याचं प्रोत्साहन देतं.

ख्रिस्ताचा जन्म

९, १०. (क) बेथलेहेमजवळ आल्यावर मरीया आणि योसेफ यांच्या मनात कोणते विचार आले असावेत? (ख) योसेफ आणि मरीया यांनी गोठ्यात राहायचं का ठरवलं?

सर्व पिकांमध्ये जैतुनांचा हंगाम सर्वात शेवटी असायचा; त्यामुळं, डोंगराळ भागांतून प्रवास करत असताना योसेफ व मरीयेला वाटेत बऱ्याच जैतुनांच्या बागा दिसल्या असतील. शेवटी, जेव्हा दुरून बेथलेहेम गाव दिसलं, तेव्हा मरीयेला किती हायसं वाटलं असेल याची कल्पना करा. कदाचित मरीया आणि योसेफ यांना या लहानशा गावाचा इतिहास आठवला असेल. खरंतर, हे गाव इतकं लहान होतं, की मीखा संदेष्ट्यानं म्हटल्याप्रमाणे यहुदाच्या नगरांमध्ये त्याची गणनादेखील केली जात नव्हती. पण याच गावात हजार वर्षांपेक्षा जास्त काळाआधी बवाज, नामी आणि नंतर दाविदाचाही जन्म झाला होता, हे योसेफ व मरीयेला माहीत होतं.

१० बेथलेहेमात आल्यावर मरीया आणि योसेफ यांना तिथं बरीच गर्दी असल्याचं आढळलं. त्यांच्याआधीच इतर जणही नाव नोंदवण्यासाठी आले होते, त्यामुळं धर्मशाळेत त्यांना जागा मिळाली नाही. * एका गोठ्यात रात्र काढण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. पण, अचानक मरीयेला तिनं पूर्वी कधीही अनुभवली नव्हती अशी वेदना जाणवली. वेदनेनं व्याकूळ झालेल्या मरीयेला पाहून योसेफाची काय अवस्था झाली असावी, याची कल्पना करा. ज्याची भीती होती तेच झालं, मरीयेला त्या गोठ्यात कळा यायला सुरुवात झाली.

११. (क) जगातल्या कोणत्याही भागात राहणाऱ्या स्त्रिया मरीयेची स्थिती का समजू शकतात? (ख) येशू कोणकोणत्या अर्थानं “प्रथमपुत्र” होता?

११ जगातल्या कोणत्याही भागात राहणाऱ्या स्त्रिया मरीयेची स्थिती समजू शकतात. मानव इतिहासाच्या सुरुवातीलाच यहोवानं भाकीत केलं होतं की वारशानं आलेल्या अपरिपूर्णतेमुळं स्त्रियांना बाळंतपणात वेदना होतील. (उत्प. ३:१६) त्यामुळं, मरीयेलाही नक्कीच वेदना झाल्या असतील. पण, या नाजूक विषयावर जास्त प्रकाश न टाकता, लूकच्या अहवालात फक्त इतकंच म्हटलं आहे की “तिला तिचा प्रथमपुत्र झाला.” (लूक २:७) हो, “प्रथमपुत्र,” कारण पुढं मरीयेला आणखी कमीतकमी सहा मुलं झाली. (मार्क ६:३) पण तिचा हा प्रथमपुत्र त्या सर्वांपेक्षा नेहमीच वेगळा असणार होता. आणि तो फक्त तिचाच प्रथमपुत्र नव्हता; तर, तो यहोवाच्या “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असा त्याचा एकुलता एक पुत्र होता.—कलस्सै. १:१५.

१२. मरीयेनं बाळाला कुठं ठेवलं, आणि सहसा दाखवलं जातं त्यापेक्षा वास्तविक परिस्थिती वेगळी कशी होती?

१२ अहवालात पुढं म्हटलं आहे, “त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले.” (लूक २:७) गव्हाणीचं ते दृश्य सर्वांच्या ओळखीचं आहे. खरंतर, नाताळाच्या वेळी सादर केल्या जाणाऱ्या नाटकांत, चित्रांत आणि देखाव्यांत या दृश्याचं काहीसं अवास्तविक चित्रण केलं जातं. जणू येशूचा जन्म होण्यासाठी ते अगदी योग्य ठिकाण होतं. पण, खऱ्या परिस्थितीची कल्पना करून पाहा. ‘गव्हाणी’ असं भाषांतर केलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा अर्थ, गुराढोरांना चारापाणी घालण्याचं भांडं, किंवा मोठी टोपली असा होतो. साहजिकच गोठ्यात, फक्त त्या काळातच नाही, तर आजसुद्धा शुद्ध हवा किंवा स्वच्छता असणं शक्य नाही. मग, कोणत्याही आईवडिलांनी दुसरा पर्याय असताना, आपल्या मुलाच्या जन्मासाठी असं ठिकाण खरंच निवडलं असतं का? सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांना सगळ्यात उत्तम गोष्टी देण्याची इच्छा असते. आणि मरीया व योसेफ हे तर खुद्द देवाच्या पुत्राचे आईवडील होते. त्यामुळं त्याला सर्वात उत्तम ते देण्याचाच त्यांचा प्रयत्न होता!

१३. (क) मरीया व योसेफ यांनी आहे त्या परिस्थितीत आपल्या बाळाची सर्वात चांगली काळजी कशी घेतली? (ख) आज सुज्ञ आईवडील योसेफ आणि मरीया यांचं अनुकरण कसं करू शकतात?

१३ पण, परिस्थितीपुढं त्यांचा नाइलाज होता. तरीसुद्धा, योसेफ व मरीया हताश झाले नाहीत. त्यांनी आहे त्या परिस्थितीत बाळाची सर्वात चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, मरीयेनं स्वतः आपल्या बाळाला कापडांनी घट्ट बांधून, अलगद गव्हाणीत ठेवलं. बाळ उबदार आणि सुरक्षित राहील आणि त्याला चांगली झोप लागेल याची तिनं खातरी केली. मनासारखी परिस्थिती नसल्यामुळं चिंतेत पडण्याऐवजी किंवा खचून जाण्याऐवजी मरीयेनं आपल्या बाळाची जमेल तितक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतली. तसंच, पुढं आपल्याला बाळाची काळजी घेण्यासोबतच त्याला यहोवावर प्रेम करायलाही शिकवावं लागेल, याची योसेफ व मरीया या दोघांनाही जाणीव होती. (अनुवाद ६:६-८ वाचा.) आजच्या जगात आध्यात्मिक गोष्टींकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं, पण सुज्ञ पालक आपल्या मुलांच्या शारीरिक गरजांपेक्षा त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देतात.

मेंढपाळांच्या भेटीमुळं प्रोत्साहन

१४, १५. (क) मेंढपाळ बाळाला पाहायला उत्सुक का होते? (ख) गोठ्यात येशूला पाहिल्यानंतर मेंढपाळांनी काय केलं?

१४ गोठ्यात सर्वकाही शांत होतं. पण तेवढ्यात काही मेंढपाळ घाईघाईनं तिथं आल्यामुळं एकच गोंधळ उडाला. ते सर्व जण योसेफ व मरीयेला आणि खासकरून त्यांच्या बाळाला पाहायला उत्सुक होते. त्यांचा उत्साह आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे मेंढपाळ खरंतर रानात राहून रात्रीच्या वेळी आपल्या कळपांची राखण करत होते. * पण त्यांना एक अतिशय आश्चर्यकारक अनुभव आल्यामुळं ते घाईघाईनं इथं आले होते. या अनुभवाबद्दल त्यांनी योसेफ व मरीयेला सांगितलं. डोंगरावर रात्रीच्या वेळी कळपांची राखण करत असताना अचानक एक देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला होता आणि यहोवाच्या तेजामुळं त्यांना आपल्या सभोवती प्रकाश दिसला. देवदूतानं त्यांना सांगितलं की ख्रिस्त म्हणजेच मसीहा नुकताच बेथलेहेममध्ये जन्मला आहे. तो एका गव्हाणीत, कापडांत गुंडाळलेला त्यांना आढळेल असंही देवदूतानं सांगितलं. मग आणखीनच आश्चर्यकारक असं काहीतरी घडलं. देवदूतांचा एक समुदाय त्या ठिकाणी प्रकट झाला आणि देवाची स्तुती करू लागला.—लूक २:८-१४.

१५ ते नम्र मेंढपाळ असे धावतपळत बेथलेहेमला का आले होते, हे आता आपण समजू शकतो. इथं आल्यावर, देवदूतानं सांगितल्याप्रमाणे त्यांना नुकतंच जन्मलेलं ते बाळ गव्हाणीत दिसलं तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल! त्यांनी ही चांगली बातमी आपल्याजवळच ठेवली नाही. “त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.” (लूक २:१७, १८) त्या काळातले धर्मपुढारी सहसा मेंढपाळांना तुच्छ लेखायचे. यहोवानं मात्र या नम्र, विश्वासू मेंढपाळांची कदर केली. पण, मेंढपाळांच्या या भेटीमुळं मरीयेवर काय परिणाम झाला?

यहोवानं नम्र, विश्वासू मेंढपाळांची कदर केली

१६. (क) मरीया खोलवर विचार करणारी स्त्री होती असं आपण का म्हणू शकतो? (ख) यावरून तिच्या मजबूत विश्वासाचं कोणतं महत्त्वाचं कारण आपल्याला दिसून येतं?

१६ बाळंतीण मरीया नक्कीच खूप थकलेली असेल. तरीपण, तिनं त्या मेंढपाळांचा एकेक शब्द अगदी लक्ष देऊन ऐकला. इतकंच नाही, तर तिनं “या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.” (लूक २:१९) मरीया ही खरोखर खोलवर विचार करणारी स्त्री होती. देवदूतांचा हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे याची तिला जाणीव झाली. तिच्या पोटी जन्मलेला हा मुलगा कोण आहे आणि त्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे तिनं समजून घ्यावं अशी देवाचीच इच्छा असल्याचं तिनं ओळखलं. म्हणूनच तिनं फक्त ऐकलं नाही, तर येणाऱ्या महिन्यांत व वर्षांत त्या शब्दांवर वारंवार मनन करता यावं, म्हणून तिनं ते आपल्या अंतःकरणात साठवून ठेवले. मरीयेनं आपल्या सबंध आयुष्यात जो मजबूत विश्वास दाखवला त्याचं एक महत्त्वाचं कारण आपल्याला इथं दिसून येतं.—इब्री लोकांस ११:१ वाचा.

मरीयेनं मेंढपाळांचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं आणि त्यांचे शब्द तिनं अंतःकरणात साठवून ठेवले

१७. बायबलमधील सत्यांच्या बाबतीत आपण मरीयेचं अनुकरण कसं करू शकतो?

१७ तुम्ही मरीयेच्या उदाहरणाचं अनुकरण कराल का? यहोवानं त्याच्या वचनात अनेक महत्त्वाची सत्यं लिहून ठेवलेली आहेत. पण, त्यांकडे लक्ष न दिल्यास आपल्याला त्यांपासून काहीच फायदा होणार नाही. म्हणूनच, आपण बायबलचं नियमितपणे वाचन केलं पाहिजे. आणि फक्त माहिती घेण्यासाठी नव्हे, तर हे देवाचं प्रेरित वचन आहे, ही जाणीव बाळगून आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. (२ तीम. ३:१६) तसंच, मरीयेप्रमाणे आपणसुद्धा ही सत्यं आपल्या अंतःकरणात साठवून ठेवली पाहिजेत. बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींवर जर आपण मनन केलं, म्हणजेच, त्या माहितीचं आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे पालन कसं करता येईल यावर खोलवर विचार केला, तर आपला विश्वास दिवसेंदिवस मजबूत होत जाईल.

अंतःकरणात साठवण्यासाठी आणखी काही गोष्टी

१८. (क) येशूचा जन्म झाल्यानंतर मरीया व योसेफ यांनी कशा प्रकारे मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केलं? (ख) योसेफ आणि मरीया यांनी दिलेल्या यज्ञावरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आपल्याला काय कळतं?

१८ बाळाचा जन्म झाल्यावर आठव्या दिवशी मरीया व योसेफ यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्यानुसार त्याची सुंता केली. तसंच गब्रीएल देवदूतानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्याचं नाव येशू ठेवलं. (लूक १:३१) मग, चाळीसाव्या दिवशी ते त्याला बेथलेहेमहून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेरूसलेमच्या मंदिरात घेऊन गेले. तिथं त्यांनी शुद्धीकरणाचा यज्ञ सादर केला. नियमशास्त्रात केलेल्या खास तरतुदीनुसार एखाद्याची ऐपत नसल्यास तो दोन कबुतरं किंवा दोन पारवे यज्ञ म्हणून देऊ शकत होता. इतर लोकांप्रमाणे मेंढा व होला देऊ शकत नसल्यामुळं योसेफ व मरीयेला कदाचित लाज वाटली असेल का? त्यांना तसं वाटलं असेल तरीसुद्धा, त्यांनी या भावना बाजूला सारून आपल्या ऐपतीप्रमाणे यज्ञ दिला. मंदिरात आल्यामुळं त्यांना आणखीनच प्रोत्साहन मिळालं.—लूक २:२१-२४.

१९. (क) शिमोनाच्या शब्दांमुळं मरीयेला आणखी कोणत्या गोष्टी अंतःकरणात साठवता आल्या? (ख) येशूला पाहिल्यावर हन्नानं काय केलं?

१९ मंदिरात शिमोन नावाचा एक वृद्ध मनुष्य मरीया आणि योसेफ यांच्याजवळ आला. त्यानं जे सांगितलं त्यावरून मरीयेला आपल्या अंतःकरणात आणखी काही गोष्टी साठवता आल्या. या मनुष्यानं त्यांना सांगितलं की त्याचा मृत्यू होण्याआधी तो मसीहाला पाहील असं वचन त्याला देण्यात आलं होतं. आणि आता यहोवाच्या पवित्र आत्म्यानं बाळ येशूच तो प्रतिज्ञा केलेला मसीहा असल्याचं त्याच्या लक्षात आणून दिलं होतं. शिमोनानं मरीयेला असंही सांगितलं, की पुढं तिला एक अतिशय मोठं दुःख सहन करावं लागेल आणि तेव्हा जणू तिच्या काळजात तलवार भोसकल्यासारखं तिला वाटेल. (लूक २:२५-३५) हे शब्द ऐकून तिला नक्कीच दुःख झालं असेल, पण जवळजवळ तीस वर्षांनंतर ती घटना प्रत्यक्षात घडली, तेव्हा ते दुःख सहन करायला तिला याच शब्दांनी मदतदेखील केली असेल. शिमोनानंतर हन्ना नावाच्या एका संदेष्ट्रीनं येशूला पाहिलं आणि जेरूसलेमच्या मुक्ततेची वाट पाहणाऱ्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.—लूक २:३६-३८ वाचा.

जेरूसलेममध्ये यहोवाच्या मंदिरात आल्यामुळं योसेफ व मरीया यांना खूप प्रोत्साहन मिळालं

२०. येशूला जेरूसलेमच्या मंदिरात आणणं हा एक चांगला निर्णय का होता?

२० आपल्या बाळाला जेरूसलेममध्ये यहोवाच्या मंदिरात आणण्याचा योसेफ व मरीया यांनी घेतलेला निर्णय खरोखरच किती चांगला होता! पण, ही केवळ एक सुरुवात होती. कारण, पुढं येशू त्याच्या सबंध जीवनकाळात यहोवाची उपासना करण्यासाठी नियमितपणे मंदिरात येत राहिला. मंदिरात येऊन योसेफ आणि मरीया यांनी आपल्याजवळ जे सर्वात उत्तम होतं ते यहोवाला दिलं. आणि त्यांनासुद्धा बरंच मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालं. त्या दिवशी मंदिरातून जाताना नक्कीच मरीयेचा विश्वास पूर्वीपेक्षा आणखी दृढ झाला असेल. तसंच, तिचं हृदय मनन करण्यासारख्या आणि इतरांनाही सांगता येतील अशा देवाकडील महत्त्वाच्या सत्यांनी भरून गेलं असेल.

२१. मरीयेप्रमाणे आपलाही विश्वास आणखी मजबूत व्हावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?

२१ आजसुद्धा, बरेच आईवडील योसेफ व मरीया यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतात हे पाहून आपल्याला किती आनंद होतो! ते विश्वासूपणे आपल्या चिमुकल्यांना ख्रिस्ती सभांना घेऊन येतात. हे आईवडील आपल्या परीनं जे सर्वात उत्तम ते यहोवाच्या उपासनेसाठी देतात. सभांना येऊन ते आपल्या प्रोत्साहनदायक शब्दांनी बांधवांचा विश्वास मजबूत करतात. आणि त्यांचा स्वतःचाही विश्वास व आनंद वाढतो. तसंच, इतरांना सांगता येतील अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. खरोखर, ख्रिस्ती सभांमध्ये त्यांच्यासोबत मिळून यहोवाची उपासना करायला आपल्याला किती आनंद होतो! अशा सभांमध्ये नियमित रीत्या हजर राहिल्यास मरीयेप्रमाणे आपलाही विश्वास नक्कीच दिवसेंदिवस आणखी मजबूत होईल!

^ परि. 7 मरीया अलीशिबेला भेटायला गेली होती, तेव्हाच्या घटनेशी या अहवालाची तुलना करून पाहा. तिथं नुसतंच असं म्हटलं होतं, की ‘मरीया यहुदातील एका गावास गेली.’ (लूक १:३९) त्या वेळी तिची मागणी झाली होती, पण अजून लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळं मरीयेनं कदाचित योसेफाची संमती न घेताच अलीशिबेला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला असावा. पण लग्न झाल्यानंतर मात्र, बेथलेहेमला जाण्याचा निर्णय योसेफानं घेतला असल्याचं अहवालावरून दिसून येतं.

^ परि. 10 त्या काळी, प्रवाशांसाठी आणि गावातून जाणाऱ्या काफिल्यांसाठी सहसा धर्मशाळा असायची.

^ परि. 14 येशूला पाहायला आलेले हे मेंढपाळ रात्रीच्या वेळी बाहेर डोंगरांवर कळपांची राखण करत होते, ही गोष्ट बायबलमधील माहितीला दुजोरा देते. बायबलमधील माहितीनुसार येशूचा जन्म डिसेंबरमध्ये नाही, तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला झाला असावा असं दिसतं. येशूचा जन्म जर डिसेंबरमध्ये झाला असता, तर हे मेंढपाळ बाहेर रानात नाही, तर गावातच कुठंतरी राहिले असते.