व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय वीस

“मी विश्वास धरला आहे”

“मी विश्वास धरला आहे”

१. मार्थेच्या दुःखाचं वर्णन करा.

मार्थेच्या मनातून काही केल्या तिच्या भावाच्या कबरेचं ते चित्र जात नव्हतं. त्याचा मृतदेह एका गुहेत ठेवण्यात आला होता आणि गुहेचं तोंड एका मोठ्या दगडानं झाकण्यात आलं होतं. दुःखामुळे मार्थेचं मनसुद्धा त्या दगडासारखंच जड आणि भावनाशून्य झालं होतं. आपला लाडका भाऊ, लाजर गेला आहे हे तिचं मन मान्य करायलाच तयार नव्हतं. लाजराला जाऊन चार दिवस झाले होते. त्याच्या मृत्यूचं असह्य दुःख, सांत्वन करायला आलेल्या नातेवाइकांची आणि पाहुण्यांची सतत ये-जा, या सगळ्यामुळे चार दिवस कसे निघून गेले हे तिलाच कळलं नव्हतं.

२, ३. (क) येशूला पाहून मार्थेला कसं वाटलं असावं? (ख) मार्थेच्या तोंडून निघालेल्या शब्दांवरून तिच्याबद्दल काय समजतं?

आणि आता, तिच्यासमोर लाजराचा जिवलग मित्र, येशू उभा होता. त्याला पाहून तिला आणखीनच भरून आलं असावं, कारण संपूर्ण जगात तो एकच असा होता जो तिच्या भावाला वाचवू शकला असता. डोंगराळ प्रदेशात वसलेल्या बेथानी गावापासून काही अंतरावर येशूची आणि तिची भेट झाली. येशूला भेटून तिचं दुःख नक्कीच काहीसं हलकं झालं असावं. त्या काही क्षणांत, त्याच्या डोळ्यांतून झळकणारी माया आणि सहानुभूती पाहून तिला किती आधार वाटला असेल! येशूनं तिच्याशी बोलताना तिला जे प्रश्न विचारले त्यांमुळे तिला आपल्या विश्वासावर आणि पुनरुत्थानाच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. येशूसोबत बोलताना मार्थेच्या तोंडून अतिशय महत्त्वाचे शब्द निघाले. ती म्हणाली: “जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.”—योहा. ११:२७.

या शब्दांवरून, मार्थेचा विश्वास किती मजबूत होता हे दिसून येतं. तिच्याबद्दल बायबलमध्ये जी थोडीफार माहिती दिली आहे त्यातून आपला विश्वास मजबूत करणारे अनेक महत्त्वाचे धडे आपण शिकू शकतो. त्यासाठी बायबलमध्ये मार्थेबद्दल दिलेला पहिला अहवाल आपण विचारात घेऊ या.

मार्थेची “काळजी व दगदग”

४. मार्थेच्या कुटुंबात कोणकोण होतं, आणि येशूसोबत त्यांचं नातं कसं होतं?

काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. त्या वेळी, लाजराची प्रकृती अगदी चांगली होती. बेथानीमधील त्याच्या घरी एक अतिशय खास पाहुणा, येशू ख्रिस्त येणार होता. लाजर, मार्था आणि मरीया यांचं कुटुंब चारचौघांपेक्षा थोडंसं वेगळं होतं. कारण वयानं प्रौढ असलेली ती तीन भावंडं एकाच घरात राहत होती. काही बायबल विद्वानांचं असं म्हणणं आहे, की त्या तिघांपैकी मार्था ही सगळ्यात मोठी असावी; कारण घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात तीच पुढाकार घेत असल्याचं दिसतं. तसंच, काही वेळा त्या तिघा भावंडांमध्ये तिचाच आधी उल्लेख करण्यात येतो. (योहा. ११:५) या तिघांचं पूर्वी लग्न झालं होतं की नाही हे सांगता येत नाही. पण, ते तिघं येशूचे जिवलग मित्र बनले हे मात्र खरं. येशू यहूदीयात सेवाकार्य करत असताना त्याला बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला होता; त्या वेळी तो सहसा त्यांच्याच घरी राहायचा. त्यांच्या या मदतीची त्यानं नक्कीच खूप कदर केली असेल.

५, ६. (क) येशू घरी आला तेव्हा मार्था इतकी व्यस्त का होती? (ख) येशू घरी आल्यानंतर मरीयेनं काय केलं?

मार्था खूप मेहनती होती. घरकाम आणि पाहुण्यांचं करण्यात ती सहसा खूप व्यस्त असायची. आता तर तिच्या घरी येशू येणार म्हटल्यावर ती स्वस्थ कशी बसू शकणार होती? ती लगेच तयारीला लागली. आपल्या या खास पाहुण्यासाठी आणि कदाचित त्याच्यासोबत येणाऱ्या लोकांसाठी ती अनेक पदार्थांची मेजवानी तयार करू लागली. त्या काळी, पाहुणचाराला खूप महत्त्व दिलं जायचं. घरी आलेल्या पाहुण्याचा मुका घेऊन त्याचं स्वागत केलं जायचं, त्याच्या पायातले जोडे काढून पाय धुतले जायचे आणि त्याला ताजंतवानं वाटावं म्हणून डोक्याला सुगंधी तेल लावलं जायचं. (लूक ७:४४-४७ वाचा.) तसंच, त्याच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली काळजी घेतली जायची.

येशू घरी येणार होता त्या दिवशी मार्था आणि मरीया या दोघी बहिणी अतिशय व्यस्त होत्या. त्या दोघींपैकी मरीया ही आध्यात्मिक गोष्टी शिकण्यास अधिक उत्सुक होती असं सहसा मानलं जात असलं, तरी घरातली कामं करण्यात तिनं आपल्या बहिणीला नक्कीच मदत केली असावी. पण, येशू आल्यानंतर काय झालं? येशूनं त्या संधीचा फायदा घेतला आणि तो शिकवू लागला. त्या काळातल्या धर्मगुरूंसारखा येशू नव्हता. तो स्त्रियांचा आदर करायचा आणि त्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्यास नेहमी तयार असायचा. येशूकडून शिकण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मरीयेला इतका आनंद झाला, की ती त्याच्या पायांजवळ बसून त्याचा शब्द न्‌ शब्द लक्षपूर्वक ऐकू लागली.

७, ८. मार्थेच्या मनाची घालमेल का होत होती, आणि शेवटी तिनं आपली अस्वस्थता कशी व्यक्त केली?

पण, इकडे मार्थेच्या मनाची काय घालमेल होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एवढे सगळे पदार्थ बनवण्याची आणि इतर कामं करण्याची जबाबदारी तिच्या एकटीवर पडल्यामुळे तिची नक्कीच खूप तारांबळ उडाली असेल. येता-जाता आपल्या बहिणीला काहीही न करता येशूच्या पायांजवळ बसलेलं पाहिल्यावर तिनं आपली अस्वस्थता आणि चिडचिड चेहऱ्यावरून दाखवली असेल का? कदाचित दाखवलीही असेल, शिवाय ते साहजिकच आहे. कारण सगळी कामं तिच्या एकटीवरच पडली होती.

शेवटी न राहवून मार्थेनं आपली अस्वस्थता व्यक्त केली. येशू शिकवत असताना त्याला मधेच थांबवून ती म्हणाली: “प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.” (लूक १०:४०) मार्था हे नक्कीच खूप कडक शब्दांत बोलली. येशूनं मरीयेची चूक तिच्या लक्षात आणून द्यावी आणि कामात मदत करायला सांगावं असं ती त्याला म्हणाली.

९, १०. (क) येशूनं मार्थेला काय उत्तर दिलं? (ख) मार्थेचं मेहनत करणं चुकीचं आहे असं येशूला म्हणायचं नव्हतं हे कशावरून दिसून येतं?

त्यावर येशूनं जे उत्तर दिलं ते ऐकून मार्था कदाचित अवाक झाली असेल. बायबलच्या अनेक वाचकांनासुद्धा येशूच्या उत्तराचं आश्चर्य वाटतं. येशूनं अगदी सौम्यपणे तिला म्हटलं: “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” (लूक १०:४१, ४२) येशूला नेमकं काय म्हणायचं होतं? मार्थेचं देवापेक्षा भौतिक गोष्टींवर जास्त प्रेम आहे, असं त्याला म्हणायचं होतं का? किंवा, खास जेवण बनवण्यासाठी ती जी काही मेहनत घेत होती ते चुकीचं आहे असं त्याला म्हणायचं होतं का?

मार्था “पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग” करायची, पण तिनं येशूचा सल्ला नम्रपणे स्वीकारला

१० नाही. मार्थेचे हेतू चांगले आहेत हे येशूनं ओळखलं. तिनं जे काही केलं होतं ते प्रेमापोटीच केलं होतं. शिवाय, मोठ्या मेजवानीचा जो बेत तिनं केला तो चुकीचा होता असंही त्याला वाटलं नाही. कारण, काही काळाआधीच मत्तय यानं आयोजित केलेल्या ‘मोठ्या मेजवानीला’ येशू आनंदानं गेला होता. (लूक ५:२९) तेव्हा, खरा प्रश्न जेवणाचा नव्हता, तर मार्था कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देते याचा होता. मोठ्या मेजवानीची तयारी करण्यात ती इतकी गुंतली होती की सगळ्यात महत्त्वाचं काय याकडे तिचं दुर्लक्ष झालं. मग, तिनं खरं कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायला हवं होतं?

मार्थेनं दाखवलेल्या पाहुणचाराची येशूनं कदर केली; तिचे हेतू प्रेमळ आणि चांगले आहेत हे त्यानं ओळखलं

११, १२. येशूनं मार्थेची चूक तिच्या लक्षात कशी आणून दिली?

११ यहोवा देवाचा एकुलता एक पुत्र, येशू मार्थेच्या घरी देवाबद्दलचं सत्य शिकवत होता! त्यापुढं कोणतीही गोष्ट, अगदी मार्थेनं बनवलेलं चमचमीत जेवणसुद्धा महत्त्वाचं नव्हतं. मार्थेला आपला विश्वास दृढ करण्याची एक चांगली संधी मिळाली होती. पण, ती ही बहुमोल संधी घालवत असल्याचं पाहून येशूला खूप वाईट वाटलं असेल. तरी त्यानं निर्णय तिच्यावर सोडला. * पण, ती संधी घालवण्यास येशूनं मरीयेला भाग पाडावं ही मार्थेची अपेक्षा मात्र चुकीची होती.

१२ त्यामुळे येशूनं तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली, पण अतिशय प्रेमळपणे. तिचा राग शांत करण्यासाठी त्यानं दोन वेळा सौम्यपणे तिचं नाव घेतलं. तसंच, “पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग” करण्याची गरज नाही असंही त्यानं तिला सांगितलं. खासकरून, आध्यात्मिक मेजवानी असताना पंचपक्वान्नांची आवश्यकता नाही; केवळ एकदोन पदार्थसुद्धा पुरेसे आहेत असं येशूनं म्हटलं. आणि म्हणूनच, मरीयेनं जो “चांगला वाटा” निवडला होता तो आपण तिच्याकडून काढून घेणार नाही असं त्यानं मार्थेला सांगितलं.

१३. येशूनं ज्या प्रकारे मार्थेची चूक तिच्या लक्षात आणून दिली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१३ मार्था आणि मरीया यांच्यात घडलेल्या या छोट्याशा प्रसंगातून आज आपण बरंच काही शिकू शकतो. आपली आध्यात्मिक ‘भूक’ तृप्त करण्याला आपण सर्वाधिक महत्त्व दिलं पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीला आपण त्याच्याआड येऊ देऊ नये. (मत्त. ५:६) मार्था उदार मनाची आणि खूप मेहनती होती. आणि तिच्या या गुणांची आपण नक्कीच कदर केली पाहिजे. पण, पाहुणचार करण्याच्या नादात आपण इतकीही “काळजी व दगदग” करू नये, की अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होईल. आपण आपल्या बंधुभगिनींसोबत केवळ खाण्यापिण्यासाठी नव्हे, तर खासकरून एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आध्यात्मिक गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र येतो. (रोमकर १:११, १२ वाचा.) त्यामुळे, जेवण अगदी साधंसं असलं, तरी तो प्रसंग खूप प्रोत्साहनदायक असू शकतो.

प्रिय भावाचा मृत्यू आणि पुनरुत्थान

१४. येशूनं दिलेला सल्ला मार्थेनं स्वीकारला असं आपण कशावरून म्हणू शकतो?

१४ येशूनं मार्थेची चूक तिच्या लक्षात आणून दिली तेव्हा तिनं ती स्वीकारली का? आणि त्यापासून ती काही शिकली का? नक्कीच. कारण, पुढं काही काळानंतर मार्थेच्या भावाबद्दलचा रोमांचक अहवाल लिहिताना प्रेषित योहान म्हणतो: “मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती.” (योहा. ११:५) योहानानं हा अहवाल लिहिला तेव्हा वरील प्रसंग घडून बरेच महिने झाले होते. त्यावरून दिसून येतं, की येशूनं प्रेमळपणे मार्थेची चूक तिच्या लक्षात आणून दिल्यामुळे ती नाराज झाली नव्हती; किंवा त्याच्याबद्दल तिच्या मनात रागही नव्हता. तिनं नक्कीच त्याचा सल्ला मनापासून स्वीकारला होता. या बाबतीतसुद्धा मार्थेनं आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगलं उदाहरण मांडलं. कारण आपल्यापैकी असा कोण आहे ज्याला अधूनमधून अशा सल्ल्याची गरज पडत नाही?

१५, १६. (क) लाजर आजारी पडला तेव्हा मार्थेनं नक्कीच काय केलं असेल? (ख) मार्था आणि मरीया यांच्या सर्व आशांचा चुराडा का झाला?

१५ मार्थेचा भाऊ, लाजर आजारी पडला तेव्हा तिनं नक्कीच त्याची खूप काळजी घेतली असेल. त्याचं दुखणं दूर व्हावं, त्याला बरं वाटावं म्हणून तिनं जमेल ते केलं असेल. पण, दिवसेंदिवस त्याचा आजार बळावतच गेला. त्या काळात त्याच्या बहिणींनी रात्रंदिवस त्याची काळजी घेतली असेल. आजारामुळे निस्तेज झालेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना त्यांच्या जीवनातल्या सुखदुःखाच्या कितीतरी आठवणी मार्थेच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या असतील.

१६ लाजराची स्थिती गंभीर झाली तेव्हा मार्था आणि मरीया यांनी येशूला निरोप पाठवला. त्या वेळी येशू बेथानीपासून दोन दिवसांच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी प्रचार करत होता. लाजराच्या बहिणींनी त्याला फक्त इतकाच निरोप पाठवला: “प्रभुजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” (योहा. ११:१, ३) येशूचं आपल्या भावावर जिवापाड प्रेम आहे हे त्या बहिणींना माहीत होतं. आणि आपल्या मित्राला मदत करण्यासाठी येशू वाटेल ते करायला तयार असेल हेही त्यांना माहीत होतं. त्याचं काही बरंवाईट होण्याआधी येशू येईल अशी आशा त्यांनी बाळगली असावी का? तसं असेल, तर त्यांची घोर निराशा झाली असेल. कारण येशू तिथं येण्याआधीच लाजराचा मृत्यू झाला होता.

१७. कोणत्या गोष्टीमुळे मार्था अधिकच गोंधळून गेली असेल, आणि येशू बेथानीजवळ आला आहे हे कळताच तिनं काय केलं?

१७ मार्था आणि मरीया या दोघींनी आपल्या भावासाठी खूप शोक केला. मनात दुःखाचं ओझं घेऊनच त्या त्याच्या अंत्यविधीची तयारी करू लागल्या. तसंच, बेथानी व जवळपासच्या गावांतून सांत्वन करायला येणाऱ्या पाहुण्यांचं करण्यात त्या व्यस्त झाल्या. पण, अजूनही येशू आला नव्हता. एकेक दिवस सरत गेला तसे मार्थेला अनेक प्रश्न पडले असतील. शेवटी, लाजराला जाऊन चार दिवस झाल्यानंतर तिला कळलं की येशू बेथानीजवळ आला आहे. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणारी मार्था या वेळीसुद्धा वेगळी कशी वागणार होती? त्या दुःखाच्या प्रसंगीदेखील ती मरीयेला काही न सांगता धावतच येशूला भेटायला गेली.—योहान ११:१८-२० वाचा.

१८, १९. मार्थेला कोणत्या गोष्टीची आशा होती, आणि तिचा विश्वास इतका उल्लेखनीय का होता?

१८ येशूला पाहिल्यावर मार्थेला राहावलं नाही. ज्या विचारानं त्या दोघी बहिणी इतक्या दिवसांपासून अस्वस्थ होत्या तो तिनं शब्दांत व्यक्त केला. ती म्हणाली: “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” पण, येशू काहीतरी करेल अशी अजूनही मार्थेला आशा होती. त्यामुळे ती पुढं म्हणाली: “तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” त्यावर येशूनं जे म्हटलं त्यामुळे तिचा विश्वास नक्कीच दृढ झाला असेल. त्यानं तिला म्हटलं: “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”—योहा. ११:२१-२३.

१९ येशू कदाचित भविष्यात होणार असलेल्या पुनरुत्थानाविषयी बोलत आहे असं मार्थेला वाटलं. त्यामुळे ती म्हणाली: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहा. ११:२४) खरंतर, शास्त्रवचनांत पुनरुत्थानाच्या शिकवणीबद्दल अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. तरीसुद्धा, सदुकी लोकांसारखे काही यहुदी धर्मगुरू त्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे, मार्थेचा पुनरुत्थानाच्या शिकवणीवर असलेला विश्वास नक्कीच उल्लेखनीय होता असं म्हणता येईल. (दानी. १२:१३; मार्क १२:१८) येशूनं पुनरुत्थानाच्या आशेविषयी शिकवलं होतं आणि अनेकांचं पुनरुत्थान केलं होतं हे मार्थेला माहीत होतं. अर्थात, याआधी ज्यांचं पुनरुत्थान करण्यात आलं होतं त्यांना लाजराप्रमाणे जाऊन इतके दिवस झाले नव्हते. त्यामुळे, पुनरुत्थानावर जरी मार्थेचा विश्वास असला, तरी येशू आता नेमकं काय करणार आहे हे तिला माहीत नव्हतं.

२०. योहान ११:२५-२७ यात येशूनं केलेल्या अविस्मरणीय विधानाचा आणि मार्थेनं दिलेल्या उत्तराचा काय अर्थ होतो ते सांगा.

२० त्यानंतर, येशूनं एक अविस्मरणीय असं विधान केलं. त्यानं म्हटलं: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” खरोखर, यहोवा देवानं, भविष्यात जगभरातील लोकांचं पुनरुत्थान करण्याचा अधिकार आपल्या पुत्राला दिला आहे. पुढं येशूनं मार्थेला विचारलं: “हे तू खरे मानतेस काय?” त्यावर मार्थेनं म्हटलं: “मी विश्वास धरला आहे.” येशू हाच ख्रिस्त किंवा मसीहा आहे; तसंच, तो यहोवा देवाचा पुत्र आहे आणि भविष्यात जो येणार असल्याचं संदेष्ट्यांनी सांगितलं होतं तो हाच आहे यावर तिचा पक्का विश्वास होता.—योहा. ५:२८, २९; योहान ११:२५-२७ वाचा.

२१, २२. (क) मृत्यूमुळे होणारं दुःख येशू समजू शकतो हे त्यानं कसं दाखवलं? (ख) लाजराच्या पुनरुत्थानाचं वर्णन करा.

२१ आज जे लोक मार्थेसारखा विश्वास दाखवतात अशांची यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त कदर करतात का? पुढं मार्थेनं ज्या घटना घडत असल्याचं पाहिलं त्यांवरून या प्रश्‍नाचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतं. अहवाल म्हणतो, की ती घाईघाईनं आपल्या बहिणीला बोलवायला गेली. त्यानंतर, मरीयेशी आणि शोक करणाऱ्या लोकांशी बोलत असताना येशू अतिशय दुःखी झाल्याचं आणि त्याचे डोळे भरून आल्याचं तिनं पाहिलं. मृत्यूमुळे किती दुःख होतं हे येशूनं उघडपणे दाखवलं होतं. मग, लाजराला जिथं ठेवण्यात आलं होतं त्या गुहेच्या तोंडापाशी असलेला मोठा दगड बाजूला काढण्यास येशूनं सांगितल्याचं मार्थेनं ऐकलं.—योहा. ११:२८-३९.

२२ पण, व्यावहारिक दृष्टीनं विचार करणाऱ्या मार्थेनं म्हटलं, की लाजराला जाऊन चार दिवस झाले आहेत; त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येत असेल. तेव्हा, येशूनं तिला पुन्हा एकदा आठवण करून दिली: “तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” मार्थेनं विश्वास ठेवला आणि त्यामुळे ती यहोवा देवाचे गौरव पाहू शकली. तिथल्या तिथं, यहोवा देवानं येशूला लाजराचं पुनरुत्थान करण्याची शक्ती दिली. त्या क्षणी मार्थेनं जे काही पाहिलं ते ती मरेपर्यंत विसरली नसेल! “लाजरा, बाहेर ये” अशी येशूनं मोठ्यानं हाक मारल्यानंतर एक मंद आवाज मार्थेनं ऐकला. अंगभर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत लाजर उठून हळूहळू गुहेच्या दारापर्यंत चालत आला होता. यानंतर येशूनं लोकांना, “याला मोकळे करून जाऊ द्या,” असं म्हटलं. मार्थेनं व मरीयेनं अत्यानंदानं आपल्या भावाला मिठी मारली. या सर्व घटना मार्थेच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या असतील. (योहान ११:४०-४४ वाचा.) मार्थेचं मन आता हलकं झालं होतं.

येशूनं लाजराचं पुनरुत्थान करून मार्थेला तिच्या विश्वासाचं प्रतिफळ दिलं

२३. यहोवा आणि येशू तुमच्यासाठी काय करू इच्छितात, आणि त्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे?

२३ बायबलमधला हा अहवाल दाखवून देतो, की मृतांचं पुनरुत्थान ही फक्त एक सुंदर कल्पना नाही; तर, ती बायबलची एक सांत्वनदायक शिकवण आहे, आणि इतिहासात पुनरुत्थान घडल्याची खरीखुरी उदाहरणंसुद्धा आहेत. (ईयो. १४:१४, १५) जे विश्वास दाखवतात अशांना प्रतिफळ द्यायला यहोवा आणि येशू कधीच विसरत नाहीत. ही गोष्ट मार्था, मरीया आणि लाजराच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखा दृढ विश्वास उत्पन्न केला तर यहोवा आणि येशू तुम्हालाही नक्कीच प्रतिफळ देतील.

मार्था पाहुण्यांना “वाढत होती”

२४. बायबलमध्ये मार्थेचा शेवटचा उल्लेख केव्हा आढळतो?

२४ यानंतर, बायबलमध्ये मार्थेचा आणखी एकदाच उल्लेख आढळतो. तो म्हणजे, पृथ्वीवरील येशूच्या शेवटल्या आठवड्याच्या सुरुवातीला. आपल्याला पुढं अनेक दुःखं, संकटं सोसावी लागणार आहेत याची कल्पना असल्यामुळे येशूनं पुन्हा बेथानीमध्ये आपला मित्र लाजर याच्या घरी राहण्याचं निवडलं. तो तीन किलोमीटरचं अंतर चालून शेवटच्या वेळी जेरूसलेमला जाणार होता, ते लाजराच्याच घरून. बेथानीत येशू आणि लाजर शिमोन नावाच्या कुष्ठरोग्याच्या घरी जेवत असताना मार्था पाहुण्यांना “वाढत होती” असं आपण वाचतो. बायबलमध्ये मार्थेबद्दलचा हा शेवटचा उल्लेख आहे.—योहा. १२:२.

२५. ख्रिस्ती मंडळीतील स्त्रिया कशा प्रकारे मार्थेसारखी मनोवृत्ती दाखवतात?

२५ मेहनती असलेल्या मार्थेकडून आपण हीच तर अपेक्षा करू शकतो! बायबलमध्ये पहिल्यांदा तिचा उल्लेख येतो तेव्हा ती कामात गुंतलेली असल्याचं आपण वाचतो; आणि शेवटीसुद्धा, ती इतरांसाठी झटत असल्याचं आपण वाचतो. ख्रिस्ती मंडळीत मार्थेसारख्या खंबीर व उदार मनाच्या; आणि नेहमी इतरांसाठी झटणाऱ्या स्त्रिया आहेत ही किती चांगली गोष्ट आहे! मग, मार्थेनं शेवटपर्यंत पक्का विश्वास असल्याचं दाखवलं का? नक्कीच. खरंतर, अशा विश्वासाची तिला खूप गरज होती, कारण पुढेही तिला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागणार होतं.

२६. मार्थेच्या विश्वासानं तिला कशी मदत केली?

२६ याच्या काही दिवसांनंतरच मार्थेला आपल्या प्रिय प्रभूच्या, येशूच्या भयंकर मृत्यूचं दुःख सोसावं लागणार होतं. शिवाय, ज्या खुनशी, ढोंगी लोकांनी येशूला ठार मारलं होतं ते आता लाजराच्याही जिवावर उठले होते. कारण लाजराच्या पुनरुत्थानामुळे अनेक जण येशूवर विश्वास ठेवू लागले होते. (योहान १२:९-११ वाचा.) शेवटी, मृत्यूमुळे त्या तिघा भावंडांची एकमेकांपासून ताटातूट झाली असेल. हे नेमकं कधी आणि कसं झालं असेल हे सांगता येत नसलं, तरी एक गोष्ट आपण खातरीनं सांगू शकतो. ती म्हणजे: मार्थेच्या मजबूत विश्वासानंच तिला शेवटपर्यंत टिकून राहण्यास मदत केली. आणि म्हणूनच आज सर्व ख्रिश्चनांनी तिच्या या विश्वासाचं अनुकरण केलं पाहिजे.

^ परि. 11 पहिल्या शतकातील यहुदी समाजात सहसा स्त्रियांना जास्त शिकवलं जात नव्हतं. त्यांना घरातली कामं शिकवली जायची. त्यामुळे येशूसारख्या महान व्यक्तीच्या पायाशी बसून मरीया ज्ञानाच्या गोष्टी ऐकत आहे हे कदाचित मार्थेला खटकलं असावं.