व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय दहा

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

१, २. (क) एलीयाच्या लोकांची काय अवस्था झाली होती? (ख) कर्मेल डोंगरावर एलीयाचे कोणते विरोधक आले होते?

एलीया कर्मेल डोंगरावर उभा होता. जड पावलांनी डोंगर चढून येणाऱ्या लोकांकडे त्यानं पाहिलं. दारिद्र्यानं व उपासमारीनं झालेली त्यांची अवस्था पहाटेच्या अंधूक प्रकाशातसुद्धा लपत नव्हती. साडेतीन वर्षांच्या भीषण दुष्काळानं त्यांचे अगदी हालहाल केले होते.

त्या लोकांमध्ये, ताठ मानेनं चालणारे बआलाचे ४५० मगरूर संदेषटेसुद्धा होते. यहोवाचा संदेष्टा एलीया याच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष ठासून भरला होता. आतापर्यंत ईजबेल राणीनं बआल उपासनेचा विरोध करणाऱ्या, यहोवाच्या अनेक सेवकांचा वध केला होता; एलीया मात्र अजूनही या खोट्या उपासनेच्या विरोधात ठामपणे उभा होता. हो, पण किती दिवस? या एकट्या माणसाचा आपल्या सर्वांसमोर कुठवर टिकाव लागणार आहे? असा तर्क कदाचित त्या पुजाऱ्यांनी केला असावा. (१ राजे १८:४, १९, २०) खुद्द अहाब राजासुद्धा आपल्या रथातून तिथं आला होता. एलीयाबद्दल त्याच्याही मनात काही कमी द्वेष नव्हता!

३, ४. (क) एक महत्त्वाचा दिवस उजाडला तशी एलीयाला भीती का वाटली असावी? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवाच्या बाजूनं एकटा उभा असलेल्या या संदेष्ट्याच्या जीवनातला हा एक अविस्मरणीय दिवस ठरणार होता. कारण काही वेळातच, तिथं असं काहीतरी घडणार होतं, ज्यामुळं लोकांना खरी उपासना आणि खोटी उपासना यांतला फरक अगदी स्पष्टपणे दिसून येणार होता. मग, दिवस उजाडला तेव्हा एलीयाला कसं वाटलं असावं बरं? त्याला थोडी भीती वाटली असावी का? कारण शेवटी, तोही “आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकोब ५:१७ वाचा.) निदान एक गोष्ट तरी आपण खातरीनं म्हणू शकतो; ती म्हणजे, देवावर विश्वास न ठेवणारे लोक, त्यांचा धर्मत्यागी राजा आणि एलीयाच्या जिवावर उठलेले पुजारी, अशा सर्व लोकांमध्ये त्याला अगदीच एकटं वाटलं असेल.—१ राजे १८:२२.

पण, इस्राएली लोकांसमोर ही बिकट परिस्थिती का आली होती? आणि बायबलमधल्या या अहवालाचा आपल्याशी काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी एलीयानं विश्वासाच्या बाबतीत मांडलेलं उत्तम उदाहरण आज कशा प्रकारे उपयुक्त आहे, हे आपण विचारात घेऊ.

एका दीर्घ संघर्षाचा शेवट

५, ६. (क) इस्राएलमध्ये कोणता संघर्ष चालला होता? (ख) अहाब राजानं यहोवाचं मन कसं दुखावलं होतं?

इस्राएल राष्ट्र हे शुद्ध उपासनेचं केंद्रस्थान होतं; ही एक अभिमानाची गोष्ट होती. पण, इस्राएली लोकांनी वेळोवेळी शुद्ध उपासनेकडे दुर्लक्ष केल्याचं, ती पायदळी तुडवल्याचं एलीयानं पाहिलं होतं. आणि त्याबद्दल तो काहीच करू शकला नव्हता. खरंतर, इस्राएलमध्ये बऱ्याच काळापासून एक संघर्ष चालला होता. यहोवा देवाची खरी उपासना आणि सभोवतालच्या राष्ट्रांत केली जाणारी मूर्तिपूजक उपासना, यांतला तो संघर्ष होता. आणि एलीयाच्या काळात तर हा संघर्ष अगदी टोकाला गेला होता.

अहाब राजानं यहोवाच्या आज्ञांचं उल्लंघन करून त्याचं मन खूप दुखावलं होतं. त्यानं सिदोनच्या राजाची कन्या, ईजबेल हिच्याशी लग्न केलं होतं. तिनं संपूर्ण देशात बआल उपासना पसरवण्याचा आणि यहोवाच्या उपासनेचं नामोनिशाण मिटवण्याचा जणू निश्चयच केला होता. पाहता पाहता, अहाब राजाही तिच्या इशाऱ्यांवर नाचू लागला. त्यानं बआलासाठी एक मंदिर व वेदी बांधली आणि या खोट्या देवाची पूजा करण्यात त्यानं पुढाकार घेतला.—१ राजे १६:३०-३३.

७. (क) बआल उपासना इतकी घृणास्पद का होती? (ख) एलीयाच्या दिवसांत पडलेला दुष्काळ खरोखरच साडेतीन वर्षांचा होता असं का म्हणता येईल? (चौकट पाहा.)

बआल उपासना इतकी घृणास्पद का होती? कारण या उपासनेच्या आहारी जाऊन अनेक जण खऱ्या देवापासून बहकले होते. या उपासनेत अतिशय घाणेरड्या व क्रूर प्रथा पाळल्या जायच्या. जसं की, मंदिरातील स्त्री व पुरुष वेश्यांची प्रथा, लैंगिक उत्सव आणि लहान मुलांचा बळी. त्यामुळं यहोवानं एलीयाला अहाब राजाकडे पाठवलं. देशात भीषण दुष्काळ पडेल आणि देवानं त्याच्या संदेष्ट्याकडून घोषणा केल्यानंतरच तो संपेल, असं यहोवानं सांगितलं. (१ राजे १७:१) शेवटी काही वर्षांनंतर ती वेळ आली. एलीया अहाबाकडे गेला आणि त्यानं देशातील लोकांना व बआलाच्या संदेष्ट्यांना कर्मेल पर्वतावर एकत्र करावं असं सांगितलं. *

एका अर्थानं, बआल उपासना आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते

८. बआल उपासनेबद्दलच्या अहवालातून आज आपण काय शिकू शकतो?

पण, त्या संघर्षाचा आज आपल्याशी काय संबंध आहे? काहींना असं वाटेल, की आज आपल्याला बआलाची मंदिरं किंवा वेद्या पाहायला मिळत नाहीत; त्यामुळं या अहवालाचा आज आपल्यासाठी काहीच अर्थ नाही. पण, बायबलमध्ये दिलेला बआल उपासनेविषयीचा हा अहवाल केवळ एक इतिहास नाही. (रोम. १५:४) मूळ भाषेत, “बआल” या शब्दाचा अर्थ “मालक” किंवा “धनी” असा होतो. खुद्द यहोवा देवानं त्याच्या लोकांना असं सांगितलं होतं, की त्यांनी त्याला आपला “बआल” म्हणजेच “पती” किंवा “मालक” म्हणून स्वीकारावं. (यश. ५४:५) जरा विचार करा, आजसुद्धा लोक सर्वसमर्थ देवाला सोडून इतर असंख्य ‘मालकांची’ सेवा करताना दिसत नाहीत का? पैसा, करिअर, लैंगिक सुख मिळवण्यासाठी किंवा यहोवाशिवाय इतर कोणत्याही देवाची उपासना करण्यासाठी लोक आपलं जीवन खर्च करतात, तेव्हा खरंतर ते या गोष्टींनाच आपला ‘मालक’ म्हणून निवडत असतात. (मत्त. ६:२४; रोमकर ६:१६ वाचा.) त्यामुळं एका अर्थानं, बआल उपासना आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तेव्हा, यहोवाची खरी उपासना आणि बआलाची उपासना यांच्यात प्राचीन काळी झालेला तो आमनासामना विचारात घेतल्यानं, कोणाची उपासना करायची याबद्दल योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

दोन मतांमध्ये लटपटणं—कोणत्या अर्थानं?

९. (क) बआल उपासना खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी कर्मेल डोंगर हे सगळ्यात उचित ठिकाण का होतं? (तळटीपही पाहा.) (ख) एलीया लोकांना काय म्हणाला?

कर्मेल डोंगराच्या शिखरावरून, दूरवर पसरलेल्या प्रदेशाचं दृश्य दिसायचं. खाली किशोनच्या ओहोळापासून ते जवळच्या महासागरापर्यंत (भूमध्य सागर), आणि उत्तरेकडील क्षितिजावर लबानोनचे डोंगरसुद्धा दिसायचे. * पण, त्या महत्त्वाच्या दिवशी सूर्य वर आला तेव्हा तो प्रदेश किती रूक्ष आणि पडीक झाला होता हे दिसून आलं. एकेकाळी, यहोवानं अब्राहामाच्या वंशजांना दिलेला तो सुपीक देश आता अगदी ओसाड पडला होता. रणरणत्या उन्हामुळं जमीन जणू होरपळून निघाली होती. आणि हे सगळं त्या लोकांच्या अविश्वासूपणामुळं घडलं होतं! म्हणूनच, लोक कर्मेल डोंगरावर जमा झाले तेव्हा एलीया त्यांना म्हणाला: “तुम्ही कोठपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल? यहोवा जर देव असेल तर त्याच्यामागे चाला, अथवा जर बाल असेल तर त्याच्यामागे चाला.”—१ राजे १८:२१, पं.र.भा.

१०. एलीयाचे लोक कोणत्या अर्थानं दोन मतांमध्ये लटपटत होते, आणि कोणती अत्यंत महत्त्वाची गोष्ट ते विसरून गेले होते?

१० “तुम्ही कोठपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल,” असं जे एलीयानं म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? आपण एकतर यहोवाची उपासना करू शकतो किंवा बआलाची, ही गोष्टच मुळात त्या लोकांना समजत नव्हती. त्यांना असं वाटलं, की आपण एकाच वेळी दोघांचीही उपासना करू शकतो. घृणास्पद प्रथा पाळून आपण बआलाला खूश करू शकतो आणि त्याच वेळी यहोवा देवाकडूनही आशीर्वाद मिळवू शकतो, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी कदाचित असा विचार केला असेल, की बआल आपल्या पिकांवर आणि गुराढोरांवर आशीर्वाद देईल, तर ‘सैन्यांचा देव’ यहोवा युद्धात आपलं संरक्षण करेल. (१ शमु. १७:४५) पण, असं करत असताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ते विसरून गेले होते, जी आजदेखील बहुतेक लोक विसरतात. ती म्हणजे, आपल्या सेवकांनी फक्त आणि फक्त आपलीच उपासना करावी अशी यहोवा देवाची अपेक्षा आहे. आणि अशा उपासनेची तो केवळ अपेक्षाच करत नाही, तर ती मिळवण्यास तो योग्यसुद्धा आहे. त्याच्या उपासनेसोबत केलेली इतर कोणत्याही स्वरूपाची उपासना त्याला केवळ अमान्यच नाही, तर घृणास्पदही वाटते!—निर्गम २०:५ वाचा.

११. एलीयानं केलेल्या आर्जवावरून आपल्याला काय करण्याची मदत मिळते?

११ इस्राएली लोक, एकाच वेळी दोन पायवाटांवरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाप्रमाणे लटपटत होते. आजसुद्धा अनेक जण तीच चूक करतात. ते नकळतपणे देवाच्या उपासनेऐवजी इतर “बआलांना” जीवनात जास्त महत्त्व देऊ लागतात. पण, एलीयानं लोकांना केलेल्या कळकळीच्या आर्जवाकडे आपण लक्ष दिलं, तर जीवनात आपण कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देत आहोत आणि आपण कशा प्रकारे देवाची उपासना करत आहोत, याचं परीक्षण करण्यास आपल्याला मदत मिळेल.

खरा देव कोण?

१२, १३. (क) एलीयानं लोकांना कोणती परीक्षा सुचवली? (ख) आपणसुद्धा एलीयाप्रमाणे देवावर भरवसा ठेवतो हे कसं दाखवू शकतो?

१२ पुढं एलीयानं लोकांसमोर एक प्रस्ताव मांडला. त्यानं एक अगदी साधीशी परीक्षा सुचवली. बआलाच्या पुजाऱ्यांनी एक वेदी तयार करावी आणि त्यावर बलिदान ठेवावं; मग, त्यांच्या देवानं अग्नीनं उत्तर द्यावं म्हणून त्यांनी त्याला प्रार्थना करावी असं त्यानं सुचवलं. नंतर एलीया स्वतःसुद्धा असंच करणार होता. त्यानं म्हटलं: “जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” खरा देव कोण याबद्दल एलीयाच्या मनात जराही शंका नव्हती. त्याचा विश्वास इतका पक्का होता, की त्यानं आपल्या विरोधकांना यशस्वी होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू दिली. बलिदान अर्पण करण्याची पहिली संधी त्यानं बआलाच्या संदेष्ट्यांना दिली. त्यांनी बलिदानासाठी गोऱ्हा निवडला आणि मग ते बआलाचा धावा करू लागले. *१ राजे १८:२४, २५.

१३ अर्थात, असे चमत्कार आज आपल्या काळात होत नाहीत. पण, यहोवा आजही बदललेला नाही. त्यामुळं एलीयाप्रमाणेच आपणही देवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. उदाहरणार्थ, बायबल जे शिकवते त्याच्याशी लोक सहमत नसतात, तेव्हा आपण त्यांना त्यांची मतं व्यक्त करण्याची संधी देतो. तसंच, सत्य काय आहे हे त्यांना ओळखता यावं म्हणून एलीयाप्रमाणेच आपण खऱ्या देवावर अवलंबून राहतो. दुसऱ्या शब्दांत, आपण स्वतःच्या बुद्धीचा नव्हे, तर “सुधारणूक” करण्यासाठी उपयुक्त असलेल्या देवाच्या प्रेरित वचनाचा उपयोग करतो.—२ तीम. ३:१६.

बआल उपासना पूर्णपणे बनावट आहे, हे एलीयानं ओळखलं आणि देवाच्या लोकांनीही ते ओळखावं अशी त्याची इच्छा होती

१४. एलीयानं कशा प्रकारे बआलाच्या संदेष्ट्यांची थट्टा केली, आणि का?

१४ मग, बआलाच्या संदेष्ट्यांनी बलिदानाचा पशू वेदीवर ठेवला आणि “हे बआला, आमचे ऐक,” असं वारंवार म्हणत ते त्याचा धावा करू लागले. तासांमागून तास उलटले, “पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही,” असं अहवाल म्हणतो. बआल हा काही खराखुरा, जिवंत देव नाही आणि ही उपासना पूर्णपणे बनावट आहे, हे एलीयाला माहीत होतं. हीच गोष्ट देवाच्या लोकांनीही ओळखावी अशी त्याची इच्छा होती. मग दुपार झाली तेव्हा एलीया बआलाच्या संदेष्ट्यांची थट्टा करू लागला. तो टोमणे मारत त्यांना म्हणाला, की बआल कदाचित खूप व्यस्त असेल, त्याला त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी वेळ नसेल; तो कदाचित निसर्गविधीसाठी एकांतात गेला असेल किंवा झोपला असेल, त्याला कुणीतरी जागं केलं पाहिजे. “मोठ्याने पुकारा,” असं एलीया त्या ढोंगी संदेष्ट्यांना म्हणू लागला.—१ राजे १८:२६, २७.

१५. यहोवाला सोडून दुसऱ्या कोणत्याही ‘बआलाची’ सेवा करणं व्यर्थ का आहे?

१५ आता तर ते आणखीनच वेडेपिसे होऊन बआलाचा धावा करू लागले: “ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी व भाल्यांनी आपणांस घात करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले.” पण, सगळं व्यर्थ! कारण “काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.” (१ राजे १८:२८, २९) मुळात बआल अस्तित्वातच नव्हता! लोकांना यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतानानं शोधून काढलेली ही केवळ एक चलाख युक्ती होती. खरोखर, यहोवाला सोडून दुसऱ्या कोणत्याही ‘बआलाची’ किंवा मालकाची सेवा करायचं आपण निवडलं, तर आपली निराशा आणि फजितीच होईल.—स्तोत्र २५:३; ११५:४-८ वाचा.

खरा देव कोण हे सिद्ध झालं!

१६. (क) एलीयानं यहोवाची वेदी दुरुस्त केली त्यावरून लोकांना कशाची आठवण झाली असेल? (ख) एलीयानं पुढंही देवावर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?

१६ दुपार टळून गेल्यानंतर, बलिदान अर्पण करण्याची एलीयाची वेळ आली. तेव्हा सगळ्यात आधी त्यानं यहोवाची वेदी दुरुस्त केली, जी कदाचित खऱ्या उपासनेचा विरोध करणाऱ्यांनी पाडली असावी. त्यासाठी त्यानं १२ धोंडे वापरले. त्याला कदाचित त्या दहा-वंशीय राष्ट्रातील अनेकांना याची आठवण करून द्यायची असेल, की देवानं आपलं नियमशास्त्र संपूर्ण इस्राएल राष्ट्राला म्हणजे सर्व १२ वंशांना दिलं होतं. आणि त्यामुळं नियमशास्त्राचं पालन करणं त्यांचंही कर्तव्य होतं. मग त्यानं वेदीवर बलिदान ठेवलं आणि त्यावर पाणी ओतायला सांगितलं; हे पाणी कदाचित जवळच्या भूमध्य सागरातून आणण्यात आलं असावं. त्यानं वेदीच्या सभोवती एक खळगी खोदली आणि ती पाण्यानं भरली. तुम्हाला आठवत असेल, याआधी बआलाच्या संदेष्ट्यांनी बलिदान अर्पण केलं तेव्हा एलीयानं त्यांच्यासाठी परिस्थिती होईल तितकी सोपी केली होती; पण आता, बलिदान अर्पण करायची त्याची वेळ आली तेव्हा त्यानं यहोवासाठी मुद्दामहून परिस्थिती होताहोईल तितकी कठीण केली. खरोखर, एलीयाचा देवावर किती भरवसा होता!—१ राजे १८:३०-३५.

यहोवा आपल्या लोकांची अंतःकरणे पुन्हा त्याच्याकडे वळवेल अशी आशा प्रार्थनेत व्यक्त करण्याद्वारे, एलीयानं आपल्या लोकांबद्दल काळजी असल्याचं दाखवलं

१७. एलीयासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या हे त्याच्या प्रार्थनेवरून कसं दिसून येतं, आणि आपण त्याच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

१७ सगळी तयारी झाल्यानंतर एलीयानं देवाला प्रार्थना केली. त्यानं केलेली प्रार्थना साधीच, पण खूप अर्थपूर्ण होती. त्याच्या जीवनात कोणत्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या, हे त्या प्रार्थनेतून दिसून आलं. सगळ्यात आधी त्यानं अशी इच्छा व्यक्त केली, की बआल नव्हे, तर यहोवा हाच ‘इस्राएलचा देव’ आहे हे सगळ्यांना कळावं. तसंच, आपण यहोवाचे केवळ एक सेवक असल्यामुळं सर्व गौरव आणि श्रेय यहोवालाच मिळालं पाहिजे असं त्यानं म्हटलं. शेवटी त्यानं म्हटलं: “तू त्यांची अंतःकरणे तुझ्याकडे पुन्हा वळवीत आहेस, हेही त्यांनी समजून घ्यावे, म्हणून मला उत्तर दे.” एलीयाच्या या शब्दांवरून, त्याला आपल्या लोकांची अजूनही काळजी असल्याचं दिसून आलं. (१ राजे १८:३६, ३७, सुबोधभाषांतर) खरंतर, त्यांच्या अविश्वासूपणामुळे अतिशय दुःखद परिस्थिती निर्माण झाली होती; पण तरीसुद्धा एलीयाचं त्यांच्यावर प्रेम होतं. आपण देवाला प्रार्थना करतो तेव्हा एलीयाप्रमाणेच आपणसुद्धा नम्रता दाखवतो का आणि देवाच्या नावाला महत्त्व देतो का? तसंच, ज्यांना मदतीची गरज आहे अशांबद्दल आपल्याला काळजी असल्याचं आपल्या प्रार्थनेवरून दिसून येतं का?

१८, १९. (क) यहोवानं एलीयाच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं? (ख) एलीयानं लोकांना काय करण्याची आज्ञा दिली, आणि बआलाचे पुजारी दयेस पात्र नव्हते असं का म्हणता येईल?

१८ एलीयानं प्रार्थना करण्यापूर्वी, तिथं जमा असलेल्या लोकांना कदाचित असं वाटलं असावं का, की बआलाप्रमाणेच यहोवासुद्धा खोटा ठरेल? पण, एलीयानं प्रार्थना केल्यानंतर मात्र त्यांना जास्त विचार करावा लागला नाही. कारण अहवाल म्हणतो: “तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.” (१ राजे १८:३८) खरंच, यहोवानं किती अद्‌भुत रीतीनं उत्तर दिलं होतं! मग, ते पाहून लोकांची काय प्रतिक्रिया होती?

“तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला”

१९ “यहोवा हाच देव, यहोवा हाच देव,” असं ते मोठ्यानं म्हणू लागले. (१ राजे १८:३९, पं.र.भा.) शेवटी खरा देव कोण, हे त्यांना समजून आलं होतं. पण, देवावर अद्याप त्यांनी विश्वास दाखवला नव्हता. केवळ स्वर्गातून उतरलेला अग्नी पाहून यहोवा हाच खरा देव आहे हे कबूल करणं, म्हणजे देवावर विश्वास असल्याचा पुरावा नाही. त्यामुळं एलीयानं त्यांना याहून अधिक काहीतरी करायला सांगितलं; असं काहीतरी जे खरंतर फार पूर्वीच त्यांनी करायला हवं होतं. देवाच्या नियमशास्त्रात असं सांगण्यात आलं होतं, की खोट्या संदेष्ट्यांना व मूर्तिपूजा करणाऱ्यांना जिवे मारलं जावं. (अनु. १३:५-९) बआलाचे पुजारी खरंतर यहोवा देवाचे कट्टर शत्रू होते; ते जाणूनबुजून यहोवाच्या उद्देशांविरुद्ध कार्य करत होते. ते दया दाखवण्यास पात्र होते का? बआलाला असंख्य निष्पाप मुलांचा बळी देताना त्यांनी तरी कुठं दया दाखवली होती? (नीतिसूत्रे २१:१३ वाचा; यिर्म. १९:५) तेव्हा, ते मुळीच दयेस पात्र नव्हते! त्यामुळं एलीयानं त्यांचा वध करण्याची आज्ञा दिली.—१ राजे १८:४०.

२०. काही विद्वानांना काय वाटतं, आणि त्यांची भीती निराधार का आहे?

२० कर्मेल डोंगरावरील परीक्षेचा ज्या पद्धतीनं शेवट झाला, त्याची आधुनिक काळातले काही विद्वान तीव्र टीका करतात. त्यांना अशी भीती वाटते, की काही धर्मवेडे लोक इतर धर्मीयांविरुद्ध केलेल्या हिंसाचाराचं समर्थन करण्यासाठी या अहवालाचा आधार घेतील. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे जगात आज अनेक हिंसक धर्मवेडे आहेत. पण, एलीया हा काही धर्मवेडा नव्हता. तो यहोवाच्या वतीनं कार्य करत होतो; आणि त्यानं जो न्यायदंड बजावला तो एका योग्य कारणासाठीच होता. शिवाय, खऱ्या ख्रिश्चनांना याची जाणीव आहे, की एलीयानं केलं त्याप्रमाणे दुष्ट लोकांवर हल्ला करण्यासाठी ते कोणत्याही शस्त्राचा उपयोग करू शकत नाही. याउलट, येशूनं पेत्राला जे म्हटलं त्याचं ते पालन करतात: “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.” (मत्त. २६:५२) दुष्ट लोकांवर न्यायदंड बजावण्याचं काम यहोवा भविष्यात आपल्या पुत्राद्वारे करेल.

२१. एलीया हा खऱ्या ख्रिश्चनांसाठी एक उत्तम उदाहरण आहे, असं का म्हणता येईल?

२१ देवावरील विश्वास आपल्या जीवनातून दाखवून देणं हे प्रत्येक खऱ्या ख्रिश्चनाचं कर्तव्य आहे. (योहा. ३:१६) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे एलीयासारखा विश्वास दाखवणाऱ्यांचं अनुकरण करणं. एलीयानं फक्त आणि फक्त यहोवाची उपासना केली आणि इतरांनाही तेच करण्याचं प्रोत्साहन दिलं. लोकांना यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतान ज्या खोट्या धर्माचा उपयोग करत होता, त्याचा त्यानं मोठ्या धैर्यानं पर्दाफाश केला. सत्य उघडकीस आणण्यासाठी एलीया स्वतःच्या क्षमतांवर व इच्छांवर नव्हे, तर यहोवावर विसंबून राहिला. खऱ्या उपासनेसाठी त्यानं ठाम भूमिका घेतली. तुम्हीही त्याच्या विश्वासाचं अनुकरण करण्याचा दृढनिश्चय कराल का?

^ परि. 9 जवळच्या महासागरावरून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे कर्मेल डोंगरावर सहसा पाऊस आणि भरपूर धुकं पडतं. त्यामुळं, डोंगरावर सहसा दाट झाडी व भरपूर हिरवळ पाहायला मिळते. बआलाला पावसाचा देव मानलं जात असल्यामुळं त्याच्या उपासनेसाठी हे एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण होतं. आणि म्हणूनच, बआलाच्या खोट्या उपासनेचा पर्दाफाश करण्यासाठी आता शुष्क, ओसाड पडलेला कर्मेल डोंगर अगदी योग्य ठिकाण होतं.

^ परि. 12 एलीयानं सांगितलेली एक गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. त्यानं बआलाच्या संदेष्ट्यांना म्हटलं: “अग्नी मात्र लावू नका.” काही विद्वानांचं असं म्हणणं आहे, की अग्नी अलौकिक शक्तीनं लागला आहे असं भासवण्यासाठी काही वेळा हे मूर्तिपूजक लोक वेद्यांच्या खाली मुद्दामहून एक लहानशी पोकळी ठेवायचे.