व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय एकवीस

त्यानं भीती व शंका यांवर मात केली

त्यानं भीती व शंका यांवर मात केली

१-३. पेत्रानं कोणता चमत्कार पाहिला होता, आणि रात्रीच्या वेळी त्यानं काय अनुभवलं?

रात्रीच्या वेळी पेत्र अगदी जोर लावून नाव वल्हवत होता. पूर्वेकडील क्षितिजावर त्याला एक अंधूक प्रकाश दिसला. दिवस उजाडण्याचं तर ते चिन्ह नसावं? रात्रभर नाव वल्हवल्यामुळं पेत्राची पाठ आणि खांदे पार दुखू लागले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं गालील समुद्र भयंकर खवळला होता. एकापाठोपाठ एक लाटा नावेवर आदळत होत्या. उसळणाऱ्या त्या लाटांमुळं पेत्र पूर्ण भिजून गेला होता. पण, तरीसुद्धा तो नाव वल्हवत राहिला.

येशूला किनाऱ्यावर सोडून पेत्र आणि त्याचे सोबती मासेमारी करायला आले होते. त्या दिवशी त्यांनी एक मोठा चमत्कार पाहिला होता. येशूनं केवळ काही भाकरी आणि मासे यांवर आशीर्वाद मागून हजारो लोकांना जेवू घातलं होतं. ते पाहून लोक इतके भारावून गेले, की ते येशूला आपला राजा बनवू इच्छित होते. पण, त्याला राजकारणाशी काहीएक घेणंदेणं नव्हतं. आणि आपल्या शिष्यांनीही त्यात पडू नये अशी त्याची इच्छा होती. त्यामुळं येशूनं आपल्या शिष्यांना नाव पलीकडच्या किनाऱ्याला घेऊन जायला सांगितली आणि प्रार्थना करण्यासाठी तो डोंगरावर गेला.—मार्क ६:३५-४५; योहान ६:१४-१७ वाचा.

शिष्य मासेमारी करायला निघाले तेव्हा चंद्र चांगलाच वर आला होता; आणि आता तो हळूहळू पश्‍चिमेच्या क्षितिजामागे बुडू लागला होता. पण, तरीसुद्धा शिष्य फार दूर गेले नव्हते. नाव वल्हवत असल्यामुळं, तसंच घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळं आणि उसळणाऱ्या लाटांमुळं ते एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्यामुळं पेत्रही बहुधा विचारात गढून गेला असावा.

पेत्र येशूकडून खूप काही शिकला होता. पण, त्याला अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या

४. पेत्र आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण का आहे?

पेत्राच्या मनात या वेळी बरेच विचार घोळत असावेत. तो पहिल्यांदा नासरेथच्या येशूला भेटला होता त्या गोष्टीला आता दोन वर्षं झाली होती. त्या दोन वर्षांत बरंच काही घडलं होतं. येशूकडून तो खूप काही शिकला होता. पण, त्याला अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या. त्यानं आपल्या भीतीवर आणि शंकांवर कशा प्रकारे मात केली, त्यातून त्याला काय शिकायला मिळालं आणि त्यानं आपल्या सर्वांसाठी कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडलं हे आता आपण पाहू या.

“मसीहा आम्हाला सापडला आहे”

५, ६. पेत्राचं जीवन कसं होतं?

पेत्र पहिल्यांदा येशूला भेटला तो दिवस तो कधीच विसरला नसेल. त्याचा भाऊ अंद्रिया यानं त्याला ही अतिशय आनंदाची बातमी येऊन सांगितली होती: “मसीहा आम्हाला सापडला आहे.” ते शब्द ऐकल्यानंतर पेत्राच्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं.—योहा. १:४१.

पेत्र हा कफर्णहूमात राहत होता. हे शहर, गालील समुद्र म्हटल्या जाणाऱ्या गोड्या पाण्याच्या तलावाच्या उत्तरेकडे वसलेलं होतं. पेत्र आणि अंद्रिया आणि जब्दीची दोन मुलं याकोब आणि योहान या चौघांचा मासेमारीचा व्यवसाय होता. पेत्राच्या घरी त्याची बायको, सासू आणि भाऊ अंद्रिया हे होते. मासेमारी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणं सोपं नव्हतं. हे काम अतिशय कष्टाचं होतं आणि त्यासाठी विशिष्ट कौशल्यांची गरज होती. रात्रभर त्यांना किती मेहनत करावी लागत असेल याची आपण कल्पना करू शकतो. दोन नावांच्या मधे माशांचं जाळं पाण्यात सोडणं, ते ओढून काढणं; आणि दिवसा, मासे वेगळे करून विकणं, जाळं दुरुस्त करून स्वच्छ करणं अशी कितीतरी कष्टाची कामं त्यांना करावी लागत.

७. पेत्रानं येशूबद्दल काय ऐकलं, आणि ती बातमी इतकी रोमांचक का होती?

बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की अंद्रिया हा बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा शिष्य होता. त्याच्याकडून शिकलेल्या गोष्टी त्यानं पेत्राला सांगितल्या, तेव्हा त्यानं नक्कीच त्या खूप उत्सुकतेनं ऐकल्या असतील. एकदा योहानानं नासरेथच्या येशूकडे बोट दाखवून म्हटलं: “हा पाहा, देवाचा कोकरा!” ते ऐकून अंद्रिया लगेच येशूचा अनुयायी बनला, आणि मसीहा सापडल्याची रोमांचक बातमी त्यानं पेत्राला जाऊन सांगितली. (योहा. १:३५-४१) सुमारे ४,००० वर्षांपूर्वी एदेन बागेत झालेल्या बंडाळीनंतर यहोवा देवानं दिलेल्या अभिवचनाबद्दल पेत्राला माहीत होतं; ते म्हणजे, मानवजातीला खरी आशा देण्यासाठी एक खास व्यक्ती भविष्यात येईल. (उत्प. ३:१५) आणि त्याच व्यक्तीला अर्थात मसीहाला अंद्रिया भेटला होता! अंद्रियानं पेत्राला मसीहाबद्दल सांगितलं तेव्हा तो धावतच त्याला भेटायला गेला.

८. येशूनं पेत्राला जे नाव दिलं त्याचा काय अर्थ होतो, आणि आजही काहींना ते नाव योग्य का वाटत नाही?

तोपर्यंत, पेत्राला शिमोन या नावानं ओळखलं जायचं. पण, येशूनं पेत्राकडे पाहिलं आणि म्हटलं: “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.” (योहा. १:४२) ‘केफा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ, “दगड” किंवा “खडक” असा होतो. येशूच्या या शब्दांना नक्कीच भविष्यसूचक अर्थ होता. पेत्र पुढं खडकासारखा स्थिर, कणखर आणि विश्वसनीय ठरेल आणि त्याच्या या गुणांचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल याची त्याला कल्पना होती. पण, पेत्रालाही स्वतःबद्दल असंच वाटत होतं का? कदाचित नाही. आणि बायबलचं वाचन करणाऱ्या अनेकांनासुद्धा पेत्राबद्दल तसं वाटत नाही. उलट बायबलच्या अहवालात त्याच्याबद्दल जे काही सांगितलं आहे त्यावरून तो अस्थिर, चंचल आणि लहरी असावा असं काहींना वाटतं.

९. यहोवा आणि येशू आपल्यात काय शोधण्याचा नेहमी प्रयत्न करतात, आणि आपण त्यांच्यावर भरवसा ठेवला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं?

हे खरं आहे, की पेत्राच्या स्वभावात काही कमतरता होत्या. आणि येशूलासुद्धा त्या माहीत होत्या. पण, आपल्या पित्याप्रमाणेच येशूनंदेखील नेहमी लोकांमध्ये चांगलं काय ते शोधण्याचा प्रयत्न केला. येशूनं पेत्रामध्ये अनेक चांगले गुण पाहिले आणि हे गुण मोठ्या प्रमाणात दाखवण्यास तो पेत्राला मदत करू इच्छित होता. यहोवा आणि येशू आपल्यामध्येसुद्धा चांगले गुण शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतात. पण आपल्याला कदाचित असं वाटेल, की ‘यहोवाला आणि येशूला माझ्यात एकही चांगला गुण सापडणार नाही.’ असं असलं तरी, ज्याअर्थी त्यांना आपल्यात काहीतरी चांगलं आहे असं वाटतं, त्याअर्थी आपण त्यावर भरवसा ठेवला पाहिजे. आणि पेत्राप्रमाणे त्यांच्याकडून शिकून घेण्यास, आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यास तयार असलं पाहिजे.—१ योहान ३:१९, २० वाचा.

“भिऊ नको”

१०. पेत्रानं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या असतील, आणि तरीसुद्धा त्यानं काय केलं?

१० त्यानंतर, येशू प्रचाराच्या दौऱ्यावर निघाला तेव्हा काही काळापर्यंत पेत्रही त्याच्यासोबत होता. त्यामुळं काना इथं येशूनं पाण्यापासून द्राक्षारस तयार करण्याचा जो पहिला चमत्कार केला, तो पेत्रानं पाहिला असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, येशू देवाच्या राज्याविषयी जो अद्‌भुत आणि आशादायक संदेश सांगत होता तो त्यानं ऐकला होता. पण, इतकं असूनही तो येशूसोबत न जाता आपला मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी परत गेला. पुढं काही महिन्यांनंतर पेत्राची पुन्हा येशूसोबत गाठ पडली. या वेळी मात्र येशूनं त्याला पूर्णवेळ आपल्यासोबत प्रचार कार्य करण्यास बोलावलं.

११, १२. (क) रात्रभर मासेमारी करूनसुद्धा पेत्रानं काय अनुभवलं होतं? (ख) येशूचं बोलणं ऐकत असताना पेत्राच्या मनात कोणते प्रश्न आले असतील?

११ पेत्रानं नुकतीच एक संपूर्ण रात्र मासे धरण्यात घालवली होती. पण, इतकं राबूनही हाती काहीच लागलं नव्हतं. त्यानं आणि त्याच्या सोबत्यांनी कितीतरी वेळा पाण्यात जाळं टाकलं होतं. पण, एकही मासा जाळ्यात अडकला नाही. मासे धरण्यासाठी पेत्रानं आपला अनुभव, आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं होतं. मासे सहसा अन्नाच्या शोधात येतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यानं प्रयत्न करून पाहिला होता. बरेच कोळी करतात त्याप्रमाणे आपणही त्या गढूळ पाण्यात उडी मारून माशांचे थवे हुडकून काढावेत किंवा माशांना हुसकावत हुसकावत जाळ्यात आणावं, असंही त्याला वाटलं असावं. अर्थात, त्यानं जितका जास्त त्यावर विचार केला असेल तितका जास्त तो निराश झाला असेल. कारण पेत्र काही मौज म्हणून मासेमारी करत नव्हता; तर त्यावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण होत होती. शेवटी, रिकाम्या हाती तो किनाऱ्यावर आला. येशू तिथं आला तेव्हा पेत्र जाळं स्वच्छ करण्यात मग्न होता.

येशू आपल्या प्रचाराचा मुख्य विषय अर्थात देवाचं राज्य याविषयी शिकवायचा तेव्हा पेत्र नेहमीच आवडीनं ऐकायचा

१२ येशूकडून शिकण्यासाठी, त्याचा शब्द न्‌ शब्द ऐकण्यासाठी लोक त्याच्या अवतीभोवती गर्दी करत होते. त्यामुळं, येशू पेत्राच्या नावेत बसला आणि त्यानं त्याला नाव किनाऱ्यापासून जरा आत न्यायला सांगितली. पाण्याच्या संथ प्रवाहामुळं लोकांना त्याचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता. इतरांप्रमाणेच पेत्रसुद्धा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. खरंतर, येशूच्या प्रचाराचा मुख्य विषय अर्थात देवाचं राज्य याविषयी जेव्हा तो शिकवायचा तेव्हा पेत्र नेहमीच आवडीनं ऐकायचा. त्यानं विचार केला असेल, येशूसोबत देशभर फिरून राज्याचा हा आशादायक संदेश लोकांना सांगणं यापेक्षा मोठा बहुमान कोणता असू शकेल! पण, आपल्याला ते खरंच जमेल का? आपल्या कुटुंबाचं कसं भागेल? रात्रभर प्रयत्न करूनही आपल्याला कसं रिकाम्या हाती यावं लागलं, हा विचार कदाचित पुन्हा त्याच्या मनात आला असावा.—लूक ५:१-३.

१३, १४. येशूनं पेत्रासाठी कोणता चमत्कार केला होता, आणि तो पाहून पेत्राला कसं वाटलं?

१३ येशूचं बोलणं संपल्यानंतर तो पेत्राला म्हणाला: “खोल पाण्यात होडी ने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” (ईझी-टू-रीड व्हर्शन) येशूनं जे सांगितलं त्याविषयी पेत्राला शंका वाटली. तो म्हणाला: “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” खरंतर, असं करण्याची पेत्राची मुळीच इच्छा नव्हती, कारण त्यानं नुकतंच जाळं धुवून स्वच्छ केलं होतं. आणि खासकरून, दिवसाच्या या वेळी मासे अन्नाच्या शोधात येत नाहीत हे पेत्राला चांगलं ठाऊक होतं. पण, तरीसुद्धा तो तयार झाला. कदाचित त्यानं दुसऱ्या नावेत असलेल्या आपल्या सोबत्यांनाही आपल्या मागे येण्याचा इशारा केला असावा.—लूक ५:४, ५.

१४ पेत्र पाण्यातून जाळं वर ओढू लागला तेव्हा त्याला एकाएकी ते खूप जड वाटू लागलं. त्यामुळं त्यानं आणखी जोर लावला आणि काय आश्चर्य, जाळ्यात मासेच मासे! पेत्राचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यानं घाईघाईनं दुसऱ्या नावेतल्या लोकांना बोलावून घेतलं. लवकरच त्यांच्या लक्षात आलं, की इतके सगळे मासे एका नावेत मावणं शक्य नाही. दोन्ही नावा माशांनी गच्च भरल्या आणि त्यांच्या भारामुळं बुडू लागल्या. पेत्र अतिशय भारावून गेला. याआधी त्यानं येशूला कितीतरी चमत्कार करताना पाहिलं होतं. पण, हा चमत्कार येशूनं खास त्याच्यासाठी केला होता. खरंच, पेत्रासमोर एक असा माणूस होता जो माशांनासुद्धा जाळ्यात आणू शकत होता! तो चमत्कार पाहून पेत्र खूप घाबरला. ज्याला खुद्द देवाकडून इतकं सामर्थ्य मिळालं आहे त्याच्या सहवासात राहण्याची आपली मुळीच लायकी नाही असं त्याला वाटलं. आणि म्हणून तो येशूसमोर गुडघे टेकून म्हणाला: “प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”—लूक ५:६-९ वाचा.

“प्रभुजी, . . . मी पापी मनुष्य आहे”

१५. येशूनं पेत्राला काय म्हटलं, आणि यामुळे पेत्राला कशाची जाणीव झाली?

१५ त्यावर येशू अगदी प्रेमळपणे त्याला म्हणाला: “भिऊ नको; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” (लूक ५:१०) ही वेळ, मनात शंका किंवा भीती बाळगण्याची नक्कीच नव्हती. आपण स्वतःला प्रचाराच्या कार्यात झोकून दिलं तर आपल्या कुटुंबाचं कसं भागेल, अशी जी शंका पेत्राच्या मनात होती ती अगदीच निराधार होती; तसंच, स्वतःच्या कमतरतेविषयी आणि पात्रतेविषयी त्याला वाटणारी भीतीसुद्धा तितकीच निराधार होती. येशूनं हाती घेतलेलं कार्य खूप मोठं होतं; एक असं कार्य ज्यामुळं इतिहासाला कलाटणी मिळणार होती. शिवाय, “भरपूर क्षमा” करणारा देव पेत्राच्या पाठीशी होता. (यश. ५५:७) साहजिकच, तो पेत्राच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा भागवणार होता.—मत्त. ६:३३.

१६. पेत्र, याकोब आणि योहान यांनी येशूला कसा प्रतिसाद दिला, आणि त्यांनी घेतलेला निर्णय सगळ्यात चांगला होता असं का म्हणता येईल?

१६ येशूनं जे म्हटलं त्यावर पेत्राची काय प्रतिक्रिया होती? याकोब आणि योहान यांच्याप्रमाणेच तोसुद्धा येशूसोबत सेवा करण्यास लगेच तयार झाला. अहवाल म्हणतो की, “मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.” (लूक ५:११) अशा प्रकारे पेत्रानं येशूवर आणि देवावर विश्वास असल्याचं दाखवलं. त्यानं आपल्या आयुष्यात घेतलेला तो सगळ्यात चांगला निर्णय होता. आज जे लोक देवाची सेवा करण्यासाठी आपल्या मनातील शंकांवर व भीतीवर मात करतात ते पेत्रासारखाच विश्वास दाखवतात. देवावर भरवसा ठेवणाऱ्या अशा लोकांची कधीच निराशा होणार नाही.—स्तो. २२:४, ५.

“तू संशय का धरलास?”

१७. पेत्राच्या मनात कोणकोणत्या आठवणी आल्या असतील?

१७ येशूला पहिल्यांदा भेटल्यावर सुमारे दोन वर्षांनंतर, पेत्र गालील समुद्रात रात्रीच्या वेळी नाव वल्हवत असल्याचं आपण सुरुवातीला पाहिलं होतं. अर्थात, त्या वेळी त्याच्या मनात कोणकोणत्या आठवणी आल्या असतील ते निश्‍चितपणे सांगता येत नाही. कारण त्या दोन वर्षांत बरंच काही घडून गेलं होतं. येशूनं पेत्राच्या सासूला बरं केलं होतं, डोंगरावरील प्रवचन दिलं होतं. शिवाय, त्याच्या शिकवणींतून आणि चमत्कारांतून त्यानं वारंवार हे दाखवून दिलं होतं, की तोच यहोवाचा निवडलेला, मसीहा आहे. दिवस सरत गेले तसे पेत्राच्या व्यक्तिमत्त्वातले दोष, म्हणजे मनात लगेच शंका व भीती येऊ देण्याची त्याची वृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. इतकंच काय, येशूनं आपल्या १२ प्रेषितांमध्ये त्याचीही निवड केली होती! पण तरीसुद्धा, पेत्रानं शंका आणि भीती बाळगण्याच्या वृत्तीवर पूर्णपणे मात केली नव्हती. लवकरच त्याला याचा अनुभव आला.

१८, १९. (क) पेत्रानं गालील समुद्रावर काय पाहिलं त्याचं वर्णन करा. (ख) येशूनं पेत्राची विनंती कशी मान्य केली?

१८ रात्रीच्या चौथ्या प्रहरी म्हणजे पहाटे तीन ते सूर्योदय होण्याच्या मधल्या काळात पेत्राला समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पलीकडे काहीतरी हलताना दिसलं! नाव वल्हवण्याचं थांबून तो एकाएकी स्तब्ध झाला. लाटांवर पडणाऱ्या चंद्रप्रकाशाचं प्रतिबिंब असावं का ते? नाही, ही तर एक उभट, ताठ आकृती होती. एका माणसाची आकृती! तो माणूस चक्क पाण्यावर चालत होता! आणि तो आपल्याच दिशेनं येत असल्याचं शिष्यांच्या लक्षात आलं. ते कदाचित भूत असावं असं वाटून शिष्य भयंकर घाबरले. पण, तेवढ्यात त्या माणसानं त्यांना म्हटलं: “धीर धरा मी आहे; भिऊ नका.” तो खुद्द येशू होता!—मत्त. १४:२५-२७.

१९ यावर पेत्राची पहिली प्रतिक्रिया काय होती? त्यानं लगेच अतिशय धैर्यानं म्हटलं: “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” (मत्त. १४:२८) येशूला पाण्यावरून चालताना पाहून तो इतका उत्साहित झाला, की आपला विश्वास मजबूत करण्यासाठी त्यालासुद्धा पाण्यावर चालण्याचा हा असाधारण अनुभव घ्यायचा होता. त्याच्या भावना समजून घेत येशूनं त्याला पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास सांगितलं. पेत्रानं धडपडतच नावेतून उतरून त्या तरंगत्या पाण्यावर पाय ठेवला. पाण्यावर पाऊल ठेवताच पाणी स्थिर असल्याचं त्याला जाणवलं, तेव्हा पेत्राला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. आपण चक्क पाण्यावर चालत आहोत हे पाहून तो अचंबित झाला असेल. पण, दुसऱ्याच क्षणी त्याची प्रतिक्रिया बदलली.—मत्तय १४:२९ वाचा.

“वारा पाहून तो भ्याला”

२०. (क) पेत्राचं लक्ष कशामुळं विचलित झालं? (ख) पेत्राला एक महत्त्वाची गोष्ट शिकवण्यासाठी येशूनं काय म्हटलं?

२० अर्थात, पेत्रानं आपलं लक्ष पूर्णपणे येशूवर केंद्रित करणं गरजेचं होतं. कारण येशूनंच यहोवाकडून मिळालेल्या शक्तीमुळं पेत्राला पाण्यावर चालण्यास सांगितलं होतं. शिवाय, पेत्रानं येशूवर दाखवलेल्या विश्वासामुळंच त्यानं त्याच्यासाठी हा चमत्कार केला होता. पण, पाण्यावरून चालता चालता पेत्राचं लक्ष मधेच विचलित झालं. अहवाल म्हणतो: “वारा पाहून तो भ्याला.” त्यानं हवेत उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटा नावेवर आदळताना पाहिल्या तेव्हा त्याच्या पायातलं बळंच निघून गेलं. आता आपण नक्कीच बुडणार असं कदाचित त्याला वाटलं असेल. त्याच्या मनात उठलेल्या भीतीच्या लाटांमध्ये त्याचा विश्वास गटांगळ्या खाऊ लागला. खरंतर, त्याच्यात स्थिरता दाखवण्याची क्षमता आहे हे ओळखून येशूनं त्याला ‘खडक’ या अर्थाचं नाव दिलं होतं. पण, तोच पेत्र आता विश्वास डळमळल्यामुळं दगडासारखा पाण्यात बुडू लागला होता. खरंतर, पेत्र हा पट्टीचा पोहणारा होता. पण, त्या क्षणी आपल्याला पोहता येतं हेसुद्धा तो विसरून गेला. त्यामुळं तो ओरडून म्हणाला: “प्रभुजी, मला वाचवा.” येशूनं लगेच त्याचा हात धरला आणि त्याला पाण्यातून वर काढलं. मग, तो सावरून पुन्हा चालू लागल्यावर येशूनं त्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवण्यासाठी म्हटलं: “अरे अल्पविश्वासी तू संशय का धरलास?”—मत्त. १४:३०, ३१.

२१. शंका धरणं घातक का आहे, आणि आपण त्यावर कशी मात करू शकतो?

२१ खरंच, येशूनं जे म्हटलं ते किती योग्य होतं! संशय धरणं म्हणजेच मनात शंका बाळगणं खूप घातक ठरू शकतं. त्यामुळं आपण स्वतःचेच नुकसान करून घेतो. आपण शंकेला मनात घर करू दिलं तर हळूहळू आपला विश्वास कमकुवत होऊन शेवटी नष्ट होऊ शकतो. तेव्हा, मनातून शंका काढून टाकण्यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हे कसं करता येईल? योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याद्वारे. आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते, ज्या गोष्टींमुळं आपण निराश होतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला यहोवा आणि येशू यांच्यापासून दूर नेऊ शकतात अशा गोष्टींना जर आपण मनात थारा दिला तर आपल्या शंका आणखीनच बळावतील. याउलट, यहोवा आणि येशू यांच्यावर, तसंच त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे, करत आहेत आणि भविष्यातही करतील त्यावर आपण लक्ष केंद्रित केलं, तर घातक शंकांपासून आपण दूर राहू.

२२. पेत्राचं उदाहरण आपल्याला काय करण्यास मदत करू शकतं?

२२ येशूच्या मागे चालत पेत्र नावेत गेला तोपर्यंत वादळ शमलं होतं. गालील समुद्र अगदी शांत झाला होता. मग, इतर शिष्यांप्रमाणेच पेत्रानं म्हटलं: “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा.” (मत्त. १४:३३) काही वेळानंतर गालील समुद्रावर तांबडं फुटलं. आदल्या रात्री आलेल्या अनुभवामुळं पेत्राचं मन नक्कीच कृतज्ञतेनं दाटून आलं असेल. त्यानं आपल्या मनातल्या शंका आणि भीती दूर सारली. अर्थात, येशूनं म्हटल्याप्रमाणे खडकासारखा स्थिर ख्रिस्ती बनण्यासाठी त्याला स्वतःमध्ये आणखी बरेच बदल करावे लागणार होते. पण, पेत्रानं स्वतःत बदल करत राहण्याचा आणि प्रगती करत राहण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न केला. तुम्हालासुद्धा असं करण्याची इच्छा आहे का? मग, पेत्राचं उदाहरण तुम्हाला नक्कीच मदत करेल.