व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय नऊ

ती समंजसपणे वागली

ती समंजसपणे वागली

१-३. (क) अबीगईलच्या घराण्यावर कोणतं संकट येऊन ठेपलं होतं? (ख) या असामान्य स्त्रीबद्दल आपण काय शिकणार आहोत?

अबीगईलनं त्या तरुण मेंढपाळाच्या डोळ्यांतलं भय, त्याचा भेदरलेला चेहरा पाहिला. त्याच्या काळजाचा थरकाप उडाला होता. आणि कारणही तसंच होतं. एक भयंकर संकट दाराशी येऊन ठेपलं होतं. जवळपास ४०० योद्धे, अबीगईलचा पती नाबाल याच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाची कत्तल करायला निघाले होते. पण का?

हे सगळं खरंतर नाबालामुळं घडलं होतं. नेहमीप्रमाणेच तो अगदी दुष्टपणे, उद्धटपणे वागला होता. आणि या वेळी तर त्यानं कहरच केला. त्यानं अशा एका मनुष्याचा अपमान केला, जो कसलेल्या आणि निष्ठावान योद्ध्यांचा नायक होता; ज्याच्या एका इशाऱ्यावर हे योद्धे आपला प्राणही पणास लावायला तयार होते. या भयंकर संकटापासून आपल्याला वाचवण्यासाठी आता अबीगईलच काहीतरी करू शकेल, या भरवशानं तो तरुण मेंढपाळ तिच्याकडे आला होता. पण, एकटी स्त्री एका मोठ्या सैन्यापुढं काय करू शकणार होती?

एकटी स्त्री एका मोठ्या सैन्यापुढं काय करू शकणार होती?

या घटनेबद्दल जाणून घेण्याआधी आपण त्या उल्लेखनीय स्त्रीबद्दल थोडी माहिती घेऊ या. कोण होती अबीगईल? तिच्या घराण्यावर ओढवलेल्या या संकटाची सुरुवात कशी झाली? आणि विश्वासाच्या बाबतीत अबीगईलच्या उदाहरणावरून आज आपण काय शिकतो?

बुद्धिमान व रूपवती

४. नाबाल कशा प्रकारचा मनुष्य होता?

नाबाल आणि अबीगईल, या दोघांची जोडी अगदीच विजोड होती. नाबालाच्या बाबतीत पाहता, त्याला अबीगईलपेक्षा चांगली बायको मिळाली नसती. पण, अबीगईलला मात्र नाबालाच्या रूपात अतिशय दुष्ट पती मिळाला होता. हे खरं आहे, की तो खूप श्रीमंत होता. आणि यामुळं तो स्वतःला इतरांपेक्षा अतिशय वरचढ समजायचा. पण, इतरांचं त्याच्याबद्दल काय मत होतं? बायबलमध्ये जितक्या तिरस्कारानं नाबालाचं वर्णन करण्यात आलं आहे, तितकं बहुधा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं वर्णन केलेलं नसेल. “अक्कलशून्य” किंवा “मूर्ख” असा त्याच्या नावाचा अर्थ होतो. नाबालाला हे नाव त्याच्या आईवडिलांनी त्याच्या जन्माच्या वेळी दिलं असावं का? की त्याचा एकंदर स्वभाव लक्षात घेऊन पुढं त्याला हे नाव पडलं असावं? ते काहीही असो; त्याची वागणूक अगदी त्याच्या नावासारखीच होती एवढं मात्र नक्की. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं की तो, “कठोर व वाईट चालीचा होता.” इतरांना धाकात ठेवणारा हा मद्यपी कुणालाही आवडत नसे; उलट, लोक त्याला बिचकूनच राहायचे.—१ शमु. २५:२, ३, १७, २१, २५.

५, ६. (क) अबीगईलचे कोणते गुण तुम्हाला विशेष आवडले? (ख) अबीगईलनं नाबालासारख्या वाईट माणसाशी लग्न का केलं असावं?

अबीगईल मात्र त्याच्या अगदी उलट होती. तिच्या नावाचा अर्थ, “माझ्यामुळं माझ्या पित्याला आनंद झाला,” असा होतो. अबीगईल अतिशय सुंदर होती. खरंतर, कोणत्याही सुंदर मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीचा अभिमानच वाटेल. पण, जे सुज्ञ वडील असतात त्यांना फक्त मुलीचं रूप पाहून नव्हे, तर तिचा चांगला स्वभाव, तिचे चांगले गुण पाहून जास्त आनंद होतो. सहसा असं पाहायला मिळतं, की जे दिसायला सुंदर असतात त्यांना समंजसपणा, सुज्ञता, धैर्य किंवा विश्वास यांसारखे गुण विकसित करण्याचं महत्त्व समजत नाही. पण, अबीगईल मात्र तशी नव्हती. म्हणूनच, बायबलमध्ये फक्त तिच्या सौंदर्याचीच नाही, तर समंजसपणाचीही स्तुती करण्यात आली आहे.—१ शमुवेल २५:३ वाचा.

पण काहींना कदाचित प्रश्न पडेल, की अशा बुद्धिमान व समंजस तरुणीनं नाबालासारख्या वाईट माणसाशी लग्न का केलं असावं? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की बायबलच्या काळातही सहसा आईवडीलच आपल्या मुलांची लग्नं ठरवायचे. निदान, लग्नाला त्यांची संमती असणं खूप महत्त्वाचं मानलं जायचं. अबीगईलच्या आईवडिलांनी नाबालाची श्रीमंती, त्याचा दबदबा पाहून या लग्नाला संमती दिली असावी का, की त्यांनी स्वतः आपल्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावून दिलं असावं? किंवा मग, त्यांच्या गरिबीनं त्यांना असं करण्यास भाग पाडलं असावं? कारण कोणतंही असो; नाबालाच्या श्रीमंतीनं त्याला एक चांगला पती बनवलं नाही, हे मात्र खरं.

७. (क) मुलांनी लग्नाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगावा असं वाटत असल्यास पालकांनी काय करण्याचं टाळलं पाहिजे? (ख) अबीगईल काय करण्याचा प्रयत्न करत होती?

आज सुज्ञ पालक आपल्या मुलांना लग्नाविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास मदत करतात. एखाद्याचा पैसा पाहून त्याच्याशी लग्न करण्याची ते आपल्या मुलांना गळ घालत नाहीत; तसंच लहान वयात म्हणजेच, लग्नासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यास मुलं तयार नसताना, ते त्यांच्यावर लग्नाचा दबाव आणत नाहीत. (१ करिंथ. ७:३६) अर्थात अबीगईलच्या बाबतीत पाहिल्यास, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आता काहीच अर्थ नव्हता. कारण तिचं नाबालाशी लग्न झालं होतं आणि आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा ती होताहोईल तितका प्रयत्न करत होती.

“तो त्यांच्या अंगावर ओरडला”

८. नाबालानं कुणाचा अपमान केला होता, आणि असं करणं अगदीच चुकीचं का होतं?

पण, आता तर नाबालानं असं काहीतरी केलं होतं ज्यामुळे अबीगईलसमोर एक फार मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. नाबालानं कोणा अशा-तशा माणसाचा नव्हे, तर दाविदाचा अपमान केला होता! दावीद हा देवाचा विश्वासू सेवक होता आणि शमुवेल संदेष्ट्यानं त्याचा अभिषेकसुद्धा केला होता; कारण शौलानंतर राजा बनण्यासाठी देवानं दाविदाला निवडलं होतं. (१ शमु. १६:१, २, ११-१३) पण, सध्या तो मत्सरानं पेटलेल्या आणि त्याच्या जिवावर उठलेल्या शौल राजापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, ६०० निष्ठावान योद्ध्यांसह अरण्यात राहत होता.

९, १०. (क) दावीद आणि त्याची माणसं कोणत्या परिस्थितीत राहत होते? (ख) नाबालानं दावीद आणि त्याच्या माणसांचे आभार का मानायला हवे होते? (परिच्छेद १० वरील तळटीप पाहा.)

नाबाल हा मावोन नगरात राहत होता; पण, जवळच असलेल्या कर्मेल या ठिकाणी तो आपला व्यवसाय चालवायचा. * त्याच्या मालकीची ३,००० मेंढरं होती आणि तिथं त्याची स्वतःची जमीनसुद्धा असावी. ही नगरं हिरव्यागार पठारांवर वसलेली असल्यामुळं मेंढरांचं पालन करण्यासाठी अगदी योग्य होती. पण, नगरांच्या चहूबाजूला ओसाड प्रदेश होता. दक्षिणेकडे पारानाचं दूरवर पसरलेलं मोठं अरण्य होतं; तर पूर्वेकडे, क्षार समुद्राच्या (मृत समुद्राच्या) आसपास ओसाड जमीन असून दऱ्याखोऱ्या व गुहा होत्या. अशा या खडतर परिस्थितीत दावीद आणि त्याची माणसं राहत होती; पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नक्कीच शिकार करावी लागत असेल आणि बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत असेल. श्रीमंत नाबालाच्या तरुण मेंढपाळांशी त्यांची अनेकदा गाठ पडायची.

१० मग, हे योद्धे नाबालाच्या मेढपाळांशी कसे वागायचे? खरंतर, जगण्यासाठी धडपड करणारे हे योद्धे अधूनमधून कळपातल्या एखाद्या मेंढरावर सहज हात मारू शकले असते. पण, या मेहनती योद्ध्यांनी कधीच असं केलं नाही. उलट, त्यांनी नाबालाच्या कळपाचं आणि त्याच्या चाकरांचं संरक्षण केलं. (१ शमुवेल २५:१५, १६ वाचा.) त्या काळी, मेंढरांच्या आणि मेंढपाळांच्या जिवाला खूप धोका असायचा. कारण त्या प्रदेशात भरपूर हिंस्र प्राणी होते; शिवाय, इस्राएलची दक्षिण सरहद्द अगदी जवळ असल्यामुळं बाहेरून येणाऱ्या लुटारूंच्या टोळ्यांकडून नेहमीच हल्ले व्हायचे. *

११, १२. (क) नाबालाला निरोप पाठवताना दाविदानं विचारशीलता आणि आदर कसा दाखवला? (ख) नाबालानं दाखवलेली प्रतिक्रिया चुकीची का होती?

११ अरण्यात इतक्या सगळ्या माणसांच्या खाण्यापिण्याची सोय करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे एकदा दाविदानं नाबालाकडे आपली दहा माणसं पाठवून त्याच्याकडून काही मदत मागितली. त्यासाठी दाविदानं जी वेळ निवडली ती अगदी विचारपूर्वक निवडली होती. कारण तो लोकर कातरण्याचा काळ होता. या काळात लोक सहसा उत्सव करायचे आणि नेहमीपेक्षा जास्त उदारता दाखवायचे. तसंच, दाविदानं आपल्या माणसांच्या हाती नाबालाला जो निरोप पाठवला त्यातले शब्दही त्यानं विचारपूर्वक निवडले होते. त्यानं प्रेमळ आणि आदरयुक्त शब्द वापरले. कदाचित नाबालाच्या वयाबद्दल आदर दाखवण्यासाठीच त्यानं स्वतःचा उल्लेख, “आपला पुत्र दावीद” असा केला असावा. मग, दाविदाचा निरोप ऐकल्यावर नाबालाची काय प्रतिक्रिया होती?—१ शमु. २५:५-८.

१२ तो रागानं पेटून उठला! सुरुवातीला जो तरुण मनुष्य अबीगईलकडे वाईट बातमी घेऊन आला होता त्याच्या शब्दांत सांगायचं झालं तर नाबाल, “त्यांच्या अंगावर ओरडला.” नाबाल हा अतिशय कंजूष होता; आणि मी “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस” देणार नाही, असं तो मोठमोठ्यानं ओरडून म्हणाला. तसंच, त्यानं दाविदाला तुच्छ लेखलं आणि पळपुटा दास म्हणून त्याची थट्टा केली. दाविदाचा द्वेष करणाऱ्या शौलासारखाच नाबालाचाही दृष्टिकोन असावा. नाबाल आणि शौल या दोघांचा दृष्टिकोन यहोवासारखा नव्हता. कारण यहोवाच्या दृष्टीनं दावीद हा पळून जाणारा दास नव्हे, तर त्याचा विश्वासू सेवक आणि इस्राएलचा भावी राजा होता.—१ शमु. २५:१०, ११, १४.

१३. (क) नाबालानं केलेल्या अपमानाप्रती दाविदाची काय प्रतिक्रिया होती? (ख) याकोब १:२० मध्ये कोणतं तत्त्व दिलं आहे, आणि त्यावरून दाविदाच्या प्रतिक्रियेबद्दल आपण काय म्हणू शकतो?

१३ नाबाल आपल्याशी कसा वागला हे दाविदाच्या माणसांनी त्याला येऊन सांगितलं, तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. “आपल्या तलवारी आपल्या कंबरांना बांधा!” असा हुकूम त्यानं दिला. स्वतः दाविदानंही कंबरेला तलवार बांधली आणि ४०० माणसांना घेऊन तो हल्ला करायला निघाला. नाबालाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाची कत्तल करण्याची त्यानं शपथ घेतली होती. (१ शमु. २५:१२, १३, २१, २२) दाविदाचा राग समजण्यासारखा होता; पण, तो व्यक्त करण्याचा त्याचा मार्ग मात्र चुकीचा होता. बायबलमध्ये म्हटलं आहे: “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.” (याको. १:२०) मग, या भयंकर संकटातून अबीगईलनं आपल्या घराण्याला कसं वाचवलं?

अबीगईलच्या समंजसपणाची स्तुती

१४. (क) नाबालामुळं निर्माण झालेला भयंकर प्रसंग निस्तरण्यासाठी अबीगईलनं पहिलं पाऊल कशा प्रकारे उचललं? (ख) नाबाल आणि अबीगईल यांच्या भिन्न स्वभावांवरून आपण काय शिकू शकतो? (तळटीपही पाहा.)

१४ त्या तरुण मेंढपाळानं अबीगईलला येणाऱ्या संकटाची कल्पना दिली, तेव्हा तिनं त्याचं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. नाबालाच्या चुकीमुळं निर्माण झालेला भयंकर प्रसंग निस्तरण्यासाठी हे खरंतर अबीगईलनं उचललेलं पहिलं पाऊल होतं. याबाबतीत अबीगईल आपल्या पतीपेक्षा किती वेगळी होती! त्या तरुण माणसानं ही गोष्ट नाबालाच्या कानावर घालण्याचा विचारही केला नसावा; उलट, त्याच्याबद्दल त्यानं जे म्हटलं ते लक्षात घेण्यासारखं आहे: “धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.” * (१ शमु. २५:१७) दुःखाची गोष्ट म्हणजे, नाबाल स्वतःला इतका वरचढ समजत होता, की तो कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नव्हता. असा उर्मटपणा हल्ली सर्रासपणे पाहायला मिळतो. पण, अबीगईल मात्र आपल्या मालकासारखी नाही हे त्या तरुण माणसाला माहीत होतं, आणि म्हणूनच तो ही समस्या घेऊन तिच्याकडे आला होता.

अबीगईलनं ऐकून घेण्याची मनोवृत्ती दाखवली

१५, १६. (क) अबीगईल कोणत्या अर्थानं नीतिसूत्रे पुस्तकात सांगितलेल्या सद्गुणी स्त्रीसारखी होती? (ख) अबीगईलनं आपल्या पतीच्या मस्तकपदाचा अनादर केला नाही, असं का म्हणता येईल?

१५ अबीगईलनं लगेच विचार केला आणि पावलं उचलली. तिनं “त्वरेने” अन्नसामग्री गोळा करून गाढवांवर लादली, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. या अहवालात, “त्वरेने” या अर्थाचे शब्द चार वेळा वापरण्यात आले आहेत. अबीगईलनं दावीद आणि त्याच्या माणसांना देण्यासाठी भरपूर अन्नसामग्रीची व्यवस्था केली. त्यात, “भाकरी, द्राक्षारस, मेंढरांचे रांधलेले मांस, हुरडा, खिसमिस आणि अंजिरांच्या ढेपा” अशा बऱ्याच वस्तू होत्या. यावरून हे दिसून येतं, की आपल्या घरात कायकाय आहे हे अबीगईलला चांगलं माहीत होतं; तसंच, नीतिसूत्रे पुस्तकात सांगितलेल्या सद्गुणी स्त्रीप्रमाणे ती आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या चोखपणे हाताळत होती. (नीति. ३१:१०-३१) अबीगईलनं ही सगळी अन्नसामग्री आपल्या माणसांच्या हाती पुढं पाठवून दिली आणि मागून तीही गेली. पण, “याविषयी तिने आपला नवरा नाबाल यास काही सांगितले नाही,” असं अहवालात म्हटलं आहे.—१ शमु. २५:१८, १९.

१६ मग याचा अर्थ, अबीगईलनं आपल्या पतीच्या मस्तकपदाचा अनादर केला असा होतो का? मुळीच नाही. नाबाल यहोवाच्या एका अभिषिक्त सेवकाशी अतिशय दुष्टपणे वागला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाबालाच्या या कृत्यामुळे त्याच्या घराण्यातल्या कित्येक निरपराध लोकांचा मृत्यू झाला असता. अबीगईलनं वेळीच पावलं उचलली नसती, तर आपल्या पतीच्या अपराधात तीही सामील आहे असाच याचा अर्थ झाला नसता का? पण या विशिष्ट प्रसंगी, आपल्या पतीपेक्षा देवाला अधीनता दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे, हे तिनं ओळखलं.

१७, १८. (क) दाविदाला पाहिल्यावर अबीगईलनं काय केलं आणि तिनं त्याला काय म्हटलं? (ख) अबीगईलचे शब्द प्रभावी होते असं का म्हणता येईल?

१७ मग अबीगईल दाविदाला आणि त्याच्या माणसांना भेटली. दाविदाला पाहून ती झटकन गाढवावरून उतरली आणि तिनं त्याला दंडवत घातला. (१ शमु. २५:२०, २३) मग, आपल्या मनातल्या सगळ्या चिंता आणि भावना तिनं मोकळेपणानं दाविदाला सांगितल्या. आपल्या पतीच्या आणि आपल्या घराण्यातल्या माणसांच्या जिवाची तिनं त्याच्याजवळ कळकळून भीक मागितली. तिचे शब्द कशामुळं प्रभावी ठरले?

“आपल्या दासीचे बोलणे ऐका”

१८ आपल्या पतीमुळं निर्माण झालेल्या समस्येची पूर्ण जबाबदारी तिनं स्वतःवर घेतली आणि त्यानं केलेल्या चुकीबद्दल क्षमासुद्धा मागितली. नाबाल त्याच्या नावाप्रमाणेच अक्कलशून्य आहे ही गोष्ट तिनं मान्य केली. याद्वारे तिला कदाचित हे सुचवायचं असेल, की नाबालाची कसलीच लायकी नसल्यामुळे त्याला धडा शिकवण्यात दाविदानं आपला वेळ वाया घालवू नये. तसंच, दावीद हा यहोवाचा प्रतिनिधी असून तो “परमेश्वराच्या लढाया” लढत आहे, या गोष्टीवर तिनं आपला भरवसा व्यक्त केला. याशिवाय, यहोवा दाविदाला “इस्राएलाचा अधिपती” म्हणून नेमेल असंही तिनं म्हटलं. यावरून दावीद आणि त्याचं राज्यशासन यासंबंधी यहोवानं दिलेल्या अभिवचनाची तिला कल्पना असल्याचंही तिनं दाखवून दिलं. पुढं तिनं दाविदाला आर्जवलं की त्यानं असं कोणतंही कृत्य करू नये ज्यामुळे त्याच्यावर विनाकारण रक्तपात केल्याचा दोष लागेल किंवा कुणाचा सूड उगवल्याचा त्याला “पस्तावा” होईल. (१ शमुवेल २५:२४-३१ वाचा.) खरंच, किती प्रेमळ आणि हृदयस्पर्शी शब्द होते ते!

१९. अबीगईलनं जे म्हटलं त्यावर दाविदाची प्रतिक्रिया काय होती, आणि त्यानं तिची प्रशंसा का केली?

१९ अबीगईलनं जे म्हटलं त्यावर दाविदाची प्रतिक्रिया काय होती? अबीगईलनं आणलेल्या भेटवस्तू त्यानं स्वीकारल्या आणि तिला म्हणाला: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठवले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहे.” अबीगईल मोठं धाडस करून तातडीनं आपल्याला भेटायला आली याबद्दल दाविदानं तिची प्रशंसा केली; तसंच, तिच्यामुळेच आपल्या हातून मोठा रक्तपात टळला हेसुद्धा त्यानं मान्य केलं. त्यानं तिला म्हटलं: “आपल्या घरी सुखाने जा.” तसंच, तिची विनंती मान्य केल्याचंही त्यानं नम्रपणे तिला सांगितलं.—१ शमु. २५:३२-३५.

“पाहा, तुझी दासी”

२०, २१. (क) अबीगईल आपल्या नवऱ्याकडे परतली यावरून काय दिसतं? (ख) नाबालाशी बोलण्यासाठी अबीगईलनं जी वेळ निवडली, त्यावरून तिचं धाडस आणि समंजसपणा कसा दिसून येतो?

२० तिथून निघाल्यानंतर अबीगईलनं दाविदाशी झालेल्या त्या भेटीचा नक्कीच विचार केला असेल. तो विश्वासू, प्रेमळ माणूस आपल्या दुष्ट नवऱ्यापेक्षा किती वेगळा आहे, हे तिला जाणवल्याशिवाय राहिलं नसेल. पण म्हणून काही ती यावरच विचार करत बसली नाही. कारण अहवालात म्हटलं आहे: “मग अबीगईल नाबालाकडे गेली.” एक पत्नी या नात्यानं आपली भूमिका पार पाडण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करण्याच्या निश्चयानं ती आपल्या पतीकडे परतली. आपण दावीद आणि त्याच्या माणसांसाठी नेलेल्या भेटवसतूंबद्दल तिला नाबालाला सांगणं गरजेचं होतं. कारण शेवटी, पती या नात्यानं त्याला हे जाणून घेण्याचा अधिकार होता. तसंच, त्यांच्यावर आलेलं किती मोठं संकट टळलं होतं, हेही त्याला सांगणं गरजेचं होतं; कारण ही गोष्ट जर दुसऱ्या कोणाकडून त्याला कळली असती तर त्याच्यासाठी ते आणखीनच लज्जास्पद ठरलं असतं. पण, या सगळ्या गोष्टी अबीगईल लगेच त्याला सांगू शकत नव्हती; कारण त्या वेळी नाबाल आपल्या घरी राजासारखी मेजवानी करत, झिंगलेल्या अवस्थेत होता.—१ शमु. २५:३६.

नाबालाचा जीव वाचवण्यासाठी आपण जे काही केलं ते अबीगईलनं धैर्यानं त्याला सांगितलं

२१ दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे नाबालाची नशा उतरेपर्यंत अबीगईल थांबून राहिली. अर्थात, नशा उतरल्यानंतर तो तिचं बोलणं समजू शकला असता; पण, या स्थितीत त्याचा पारा चढण्याचीही जास्त शक्यता होती. हे माहीत असूनही अबीगईलनं जाऊन त्याला सगळं काही सांगितलं. अशा रीतीनं पुन्हा एकदा अबीगईलनं धाडस आणि समंजसपणा दाखवला. रागाच्या भरात तो आरडाओरडा करेल, आपल्यावर हात उगारेल अशी भीती कदाचित तिला वाटली असावी. पण, तिचं बोलणं ऐकल्यावर मात्र तो सुन्न झाला.—१ शमु. २५:३७.

२२. नाबालाला नेमकं काय झालं होतं, आणि कुटुंबात होणाऱ्या जाचजुलमांबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

२२ नेमकं काय झालं होतं नाबालाला? बायबल म्हणतं: “त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला.” कदाचित त्याला एक प्रकारचा पक्षाघात झाला असावा. पुढं सुमारे दहा दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. पण, हे वैद्यकीय कारणामुळंच झालं असं नाही. कारण अहवालात म्हटलं आहे: “परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला.” (१ शमु. २५:३८) अशा प्रकारे, नाबालाला देवाकडून मिळालेल्या मृत्युदंडामुळे, अबीगईलची तिच्या दुःखी वैवाहिक जीवनातून कायमची सुटका झाली. अर्थात, कुणाची सुटका करण्यासाठी आज यहोवा अशा प्रकारे मृत्युदंड देत नाही. पण, या अहवालावरून एक गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे, कुटुंबात होणारे जाचजुलूम कधीच यहोवाच्या नजरेतून सुटत नाहीत. योग्य वेळी तो न्याय करतोच.—लूक ८:१७ वाचा.

२३. अबीगईलला आणखी कोणता आशीर्वाद मिळाला, आणि पुढंही तिची मनोवृत्ती बदलली नाही हे कशावरून म्हणता येईल?

२३ दुःखी वैवाहिक जीवनातून सुटका होण्यासोबतच अबीगईलला आणखी एक आशीर्वाद मिळाला. दाविदाला नाबालाच्या मृत्यूबद्दल कळलं तेव्हा त्यानं माणसं पाठवून अबीगईलला लग्नाची मागणी घातली. त्यावर अबीगईल म्हणाली: “पाहा, तुझी दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण असावी.” (पं.र.भा.) आता आपण दाविदाची बायको बनणार या विचारानं तिच्यात गर्विष्ठपणा आला नाही; उलट, तिनं त्याच्या दासांची सेवा करण्याचीही तयारी दाखवली! मग पुन्हा एकदा, ती “तातडीने” दाविदाकडे जाण्याची तयारी करू लागली, असं अहवालात म्हटलं आहे.—१ शमु. २५:३९-४२

२४. नव्यानं आयुष्य सुरू करताना अबीगईलला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, पण तिच्या पतीचा, दाविदाचा आणि देवाचा तिच्याबद्दल काय दृष्टिकोन होता?

२४ अर्थात, हा एका रोमांचक कथेचा सुखद शेवट नव्हता. दाविदासोबतचं तिचं जीवन नेहमीच सोपं होतं असं नाही. अबीगईलशी लग्न करण्याआधी दाविदाचं अहीनवाम हिच्याशी लग्न झालं होतं; त्या काळी, एकापेक्षा जास्त पत्नी असण्याच्या प्रथेला देवानं अनुमती दिली असली, तरी विश्वासू स्त्रियांना मात्र यामुळं बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागायचं. शिवाय, दावीद अजून राजा झाला नव्हता; त्यामुळं राजा म्हणून यहोवाची सेवा सुरू करण्याआधी त्याला बऱ्याच अडथळ्यांना आणि संकटांना तोंड द्यावं लागलं. पण, जीवनाच्या वाटेवर अबीगईलनं नेहमीच त्याला साथ दिली. पुढं तिला दाविदापासून एक मुलगा झाला. दाविदानं कायम तिची कदर केली आणि तिचं संरक्षण केलं. एकदा तर त्यानं अपहरण करणाऱ्यांपासून तिला सोडवलं! (१ शमु. ३०:१-१९) अशा रीतीनं, दाविदानं यहोवाचं अनुकरण केलं जो अबीगईलसारख्या समंजस, धाडसी व विश्वासू स्त्रियांवर प्रेम करतो आणि त्यांची मनापासून कदर करतो.

^ परि. 9 उत्तरेकडे असलेल्या ज्या सुप्रसिद्ध कर्मेल डोंगरावर एलीयाचा आणि बआलाच्या संदेष्ट्यांचा आमनासामना झाला होता, ते हे कर्मेल नाही. (अध्याय १० पाहा.) तर, हे कर्मेल दक्षिणेकडील अरण्याच्या सरहद्दीवर वसलेलं एक नगर होतं.

^ परि. 10 तिथल्या जमीनदारांचं आणि त्यांच्या कळपांचं संरक्षण करणं ही यहोवाप्रती आपली सेवा आहे, असा कदाचित दाविदानं विचार केला असावा. कारण अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या वंशजांनी त्या देशात राहावं असा त्या काळी यहोवाचा उद्देश होता. त्यामुळं विदेशी सैन्यांपासून आणि हल्लेखोरांपासून देशाचं संरक्षण करणं ही एक प्रकारे पवित्र सेवाच होती.

^ परि. 14 नाबालाबद्दल बोलताना त्या तरुण माणसानं “अधम” असं जे म्हटलं त्याचा शब्दशः अर्थ, “कोणत्याच लायकीचा नसलेला पुत्र” असा होतो. बायबलच्या इतर भाषांतरांमध्ये या वाक्याचा अनुवाद, “त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण तो कुणाचंही ऐकून घेत नाही” असा करण्यात आला आहे.