व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय एक

तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतो

तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतो

१. आदाम आणि हव्वा एदेन बागेत का जाऊ शकत नव्हते, आणि हाबेलाची मनापासून काय इच्छा होती?

हाबेलानं डोंगर उतारावर निवांतपणे चरणाऱ्या आपल्या मेंढरांकडे पाहिलं. मग त्याची नजर फार दूरवर गेली असावी; तिथं त्याला काहीतरी चमकत असल्याचं दिसलं. ते काय आहे हे त्याला माहीत होतं. ती खरंतर गरगर फिरणारी ज्वालामय तलवार होती. एदेन बागेत कुणी जाऊ नये म्हणून बागेच्या प्रवेशाजवळ ती ठेवण्यात आली होती. एकेकाळी त्याचे आईवडील त्या बागेत राहायचे. पण आता ते किंवा त्यांची मुलंसुद्धा त्या बागेत जाऊ शकत नव्हती. कल्पना करा: दुपार सरत आली आहे. हाबेलाची नजर वर आकाशाकडे जाते. मंद वाऱ्यात त्याचे केस हलकेच उडू लागतात. तो आपल्या निर्माणकर्त्याबद्दल विचार करत आहे. देव आणि मानव यांच्यात निर्माण झालेला दुरावा कधी नाहीसा होईल का? असं घडावं अशी निदान हाबेलाची तरी मनापासून इच्छा होती.

२-४. आज कोणत्या अर्थानं हाबेल आपल्याशी बोलतो?

आज जरी हाबेल जिवंत नसला, तरी तो आपल्याशी बोलत आहे. पण, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण आदामाच्या या दुसऱ्या मुलाला जाऊन जवळजवळ ६,००० वर्षं झाली आहेत. आज त्याच्या अस्तित्वाच्या सर्व खुणा नाहीशा झाल्या आहेत. तसंच, मृत लोकांविषयी बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की ते ऐकू किंवा बोलू शकत नाहीत. खरंतर, ते काहीच करू शकत नाहीत. (उप. ९:५, १०) शिवाय, हाबेलाचा एकही शब्द बायबलमध्ये आढळत नाही. मग, तो आपल्याशी कसा काय बोलू शकतो?

प्रेषित पौलानं देवाच्या प्रेरणेनं हाबेलाविषयी म्हटलं: “तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.” (इब्री लोकांस ११:४ वाचा.) हाबेल आपल्याशी कसं बोलतो याकडे तुम्ही लक्ष दिलं का? तो त्याच्या विश्वासाच्या द्वारे आपल्याशी बोलत आहे. हा सुरेख गुण उत्पन्न करणारा हाबेल सगळ्यात पहिला मानव होता. त्यानं इतका जबरदस्त विश्वास दाखवला की आजही त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. आपण त्याच्या विश्वासावरून शिकलो आणि त्याचं अनुकरण केलं, तर आपण त्याचं ऐकत आहोत असं म्हणता येईल.

हाबेलाविषयी बायबलमध्ये फारसं काही सांगितलेलं नाही. मग, त्याच्याविषयी आणि त्याच्या विश्वासाविषयी आपल्याला कसं शिकता येईल? चला पाहू या.

हाबेलाचं बालपण आणि ‘जगाची स्थापना’

५. हाबेल ‘जगाच्या स्थापनेच्या’ वेळी जगत होता असं येशूनं कोणत्या अर्थानं म्हटलं? (तळटीपही पाहा.)

हाबेलाचा जन्म मानव इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाला होता. येशूनं हाबेलाविषयी म्हटलं, की तो ‘जगाच्या स्थापनेच्या’ वेळी जगत होता. (लूक ११:५०, ५१ वाचा.) इथं येशूनं ‘जग’ हा शब्द कोणत्या अर्थानं वापरला? तो पापापासून सुटका मिळण्यास योग्य असलेल्या मानवांच्या जगाविषयी बोलत होता. हाबेल हा सर्व मानवांमध्ये चौथा असला, तरी देवाच्या दृष्टीने तो पापापासून सुटका मिळवण्यास योग्य असलेला पहिलाच मानव होता. * साहजिकच, लहानाचा मोठा होत असताना हाबेलापुढं कोणाही मानवाचं चांगलं उदाहरण नव्हतं.

६. हाबेलाच्या आईवडिलांबद्दल काय म्हणता येईल?

मानवी कुटुंबाची नुकतीच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्यावर दुःखाचं सावट पसरलं होतं. हाबेलाचे आईवडील आदाम आणि हव्वा खूप देखणे व प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे असावेत. एकेकाळी ते परिपूर्ण होते आणि त्यांना अनंतकाळ जगण्याची आशा होती. पण, आता ते सगळं त्यांच्या हातून गेलं होतं. आणि याची त्यांना पूर्ण जाणीव होती. यहोवा देवाविरुद्ध बंड केल्यामुळं त्यांना एदेन बागेतून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या स्वार्थी इच्छांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आणि देवाविरुद्ध बंड करताना आपल्या होणाऱ्या मुलांचाही विचार केला नाही. अशा रीतीनं, आपल्या स्वार्थापायी ते परिपूर्ण जीवन आणि अनंतकाळ जगण्याची आशा कायमची गमावून बसले.—उत्प. २:१५–३:२४.

७, ८. काइनाचा जन्म झाल्यावर हव्वेनं काय म्हटलं, आणि तिच्या मनात कदाचित काय असावं?

एदेन बागेतून हाकलून दिल्यानंतर आदाम आणि हव्वेचं जीवन खूप कठीण बनलं. असं असलं, तरी त्यांना पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव काइन ठेवलं. त्याचा अर्थ, “उत्पन्न केलेला” असा होतो. काइनाचा जन्म झाल्यावर हव्वेनं म्हटलं: “परमेश्वराच्या सहाय्याने मी पुरुषसंतान उत्पन्न केले आहे.” तिच्या या शब्दांवरून असं वाटतं, की यहोवानं एदेन बागेत दिलेलं अभिवचन कदाचित तिच्या मनात असावं. यहोवानं असं अभिवचन दिलं होतं, की एका स्त्रीच्या पोटी “संतती” उत्पन्न होईल; आणि पुढं ही संतती, आदाम आणि हव्वेला यहोवाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दुष्टाचा नाश करेल. (उत्प. ३:१५; ४:१, NW) त्या अभिवचनात उल्लेख केलेली स्त्री आपणच आहोत आणि प्रतिज्ञा केलेली “संतती” काइन आहे असं हव्वेला वाटलं असावं का?

तसं जर तिला वाटलं असेल, तर हा तिचा फार मोठा गैरसमज होता. शिवाय, जर आदाम आणि हव्वेनं काइनाच्या मनात अशा प्रकारचे विचार घातले असतील, तर त्याच्या गर्विष्ठ प्रवृत्तीला आणखीनच खतपाणी मिळालं असेल. काही काळानंतर, हव्वेला दुसरा मुलगा झाला. पण, आदाम आणि हव्वेनं त्याच्याबद्दल विशेष असं काहीच म्हटल्याचं आढळत नाही. उलट, त्यांनी त्याचं नाव हाबेल ठेवलं, ज्याचा अर्थ “उसासा” किंवा “व्यर्थता” असा होऊ शकतो. (उत्प. ४:२) यावरून, हाबेलाकडून आपल्याला फारशा काही अपेक्षा नाहीत असं आदाम आणि हव्वेला सुचवायचं होतं का? शक्यता नाकारता येत नाही.

९. आजचे पालक आपल्या पहिल्या पालकांकडून काय शिकू शकतात?

त्या पहिल्या पालकांकडून आजचे पालक बरंच काही शिकू शकतात. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांच्या गर्विष्ठ, स्वार्थी व महत्त्वाकांक्षी वृत्तीला तुमच्या वागण्या-बोलण्यातून खतपाणी घालत आहात का? की, त्याऐवजी त्यांना यहोवा देवावर प्रेम करायला व त्याच्याशी मैत्री करायला शिकवत आहात? दुःखाची गोष्ट म्हणजे, ते पहिले पालक आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. पण, त्यांच्या मुलांसाठी काहीच आशा उरली नव्हती असं नाही.

हाबेलानं विश्वास कसा उत्पन्न केला?

१०, ११. काइन आणि हाबेल कोणतं काम करायचे, आणि हाबेलानं कोणता गुण उत्पन्न केला?

१० हळूहळू काइन आणि हाबेल मोठे होऊ लागले. साहजिकच, आदामानं त्यांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी कामं शिकवली असतील. काइन पुढं शेतकरी बनला; तर हाबेल मेंढरं पाळू लागला.

११ पण, हाबेलानं यापेक्षाही एक फार महत्त्वाची गोष्ट केली. त्यानं देवावर विश्वास उत्पन्न केला. पण, जरा विचार करा! विश्वासाच्या बाबतीत हाबेलासमोर एकाही मानवाचं चांगलं उदाहरण नव्हतं. मग, पौलानं ज्याचा नंतर उल्लेख केला तसा विश्वास हाबेलानं कसा काय उत्पन्न केला असावा? त्याच्या विश्वासाला ज्या तीन गोष्टींनी भक्कम आधार दिला त्या आता आपण पाहू या.

१२, १३. यहोवानं निर्माण केलेल्या गोष्टी पाहून हाबेलाचा विश्वास कशा प्रकारे वाढला असेल?

१२ यहोवानं बनवलेली सृष्टी. हे खरं आहे, की यहोवानं जमिनीला शाप दिला होता. त्यामुळं जमीन काटे-कुसळे उगवू लागली. शेती करणं खूप कठीण होतं. पण तरीसुद्धा, हाबेलाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागत होत्या कारण जमीन भरपूर पीक देत होती. शिवाय प्राणी, पक्षी, मासे, डोंगरदऱ्या, नदी-नाले, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे, आकाश यांवर शाप नव्हता. त्यामुळं हाबेलाची नजर जाईल तिथं त्याला यहोवा देवाच्या अपार प्रेमाचा व बुद्धीचा, तसंच त्याच्या चांगुलपणाचा भरपूर पुरावा दिसला असावा. (रोमकर १:२० वाचा.) देवानं निर्माण केलेल्या या सर्व गोष्टींबद्दल मनन केल्यामुळं हाबेलाचा देवावरील विश्वास दृढ झाला असेल यात शंका नाही.

यहोवानं निर्माण केलेल्या गोष्टी पाहून हाबेलाचा आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्यावरील विश्वास वाढला

१३ सृष्टीतील या सर्व गोष्टी पाहताना हाबेल नक्कीच थोडं थांबून, देवाविषयी विचार करत असेल. हाबेल आपल्या मेंढरांची राखण करत आहे अशी कल्पना करा. मेंढपाळ असल्यामुळं त्याला खूप चालावं लागायचं. हिरवंगार गवत, भरपूर पाणी आणि दाट सावली असलेल्या ठिकाणांच्या शोधात त्याला आपल्या मेंढरांना घेऊन कधी डोंगर-दऱ्यांतून, तर कधी नदी-नाले ओलांडून जावं लागायचं. देवानं निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये मेंढरं सगळ्यात गरीब, असाहाय्य असतात; आणि त्यांना नेहमी माणसाच्या मार्गदर्शनाची आणि संरक्षणाची गरज भासेल अशा रीतीनं निर्माण करण्यात आलं आहे हेही त्याच्या लक्षात आलं असेल. मेंढरांप्रमाणेच आपल्यालाही जीवनात योग्य दिशा दाखवण्यासाठी, आपलं रक्षण आणि सांभाळ करण्यासाठी देवाची गरज आहे हे हाबेलानं ओळखलं असावं का? मनुष्यांपेक्षा कितीतरी पटीनं बुद्धिमान आणि शक्तिशाली असलेला देवच आपला असा मार्गदर्शक होऊ शकतो याची जाणीव त्याला झाली असेल का? त्याच्या मनात आलेले असे अनेक विचार त्यानं प्रार्थनेत नक्कीच व्यक्त केले असतील आणि त्यामुळे देवावरील त्याचा विश्वास वाढत गेला असेल.

१४, १५. यहोवानं दिलेल्या अभिवचनांमुळे हाबेलाला कोणकोणत्या गोष्टींवर मनन करण्यास मदत मिळाली?

१४ यहोवानं दिलेली अभिवचनं. एदेन बागेत कोणत्या घटना घडल्या आणि शेवटी आपल्याला त्या बागेतून का काढून टाकण्यात आलं हे आदाम आणि हव्वेनं आपल्या मुलांना सांगितलंच असेल. त्यामुळं हाबेलाजवळ मनन करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत्या.

१५ यहोवानं सांगितलं होतं, की जमीन शापित होईल. हाबेलानं जमिनीतून काटे-कुसळे उगवताना पाहिली तेव्हा देवाचे ते शब्द किती खरे आहेत हे त्याच्या लक्षात आलं असेल. तसंच, हव्वेला गरोदरपणात आणि मुलांना जन्म देताना वेदना होतील हेसुद्धा यहोवानं भाकीत केलं होतं. हाबेलाच्या बहीणभावांचा जन्म झाला तेव्हा यहोवानं जे सांगितलं होतं ते खरं असल्याचं त्याला नक्कीच समजलं असेल. यहोवानं असंही भाकीत केलं होतं, की आदाम हव्वेवर अधिकार गाजवेल आणि तरीसुद्धा तिचा आपल्या नवऱ्याकडे ओढा असेल. नेमकं हेच आपल्या आईवडिलांच्या बाबतीत घडताना हाबेलानं आपल्या डोळ्यांनी पाहिलं. या प्रत्येक बाबतीत यहोवाचा शब्द किती खरा आहे याची त्याला जाणीव झाली. त्यामुळं संततीविषयी देवानं दिलेलं अभिवचन नक्कीच पूर्ण होईल आणि ही “संतती” एदेन बागेत घडलेलं नुकसान भरून काढेल यावर विश्वास ठेवण्यासाठी हाबेलाजवळ ठोस कारणं होती.—उत्प. ३:१५-१९.

१६, १७. करूबांच्या उदाहरणावरून हाबेलाला काय शिकायला मिळालं?

१६ यहोवाचे सेवक. मानवी कुटुंबात अनुकरण करण्यासारखं एकही चांगलं उदाहरण हाबेलासमोर नव्हतं. पण, त्या वेळी पृथ्वीवर मानवांशिवाय असेही काही जण होते ज्यांचं तो अनुकरण करू शकत होता. आदाम आणि हव्वेला एदेन बागेतून बाहेर घालवल्यानंतर पृथ्वीवरील त्या नंदनवनात त्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी प्रवेश करू नये म्हणून यहोवानं एक व्यवस्था केली. त्यानं बागेच्या प्रवेशाजवळ दोन करूब म्हणजेच अतिशय उच्च पदावरील देवदूत उभे केले; याशिवाय, गरगर फिरणारी ज्वालारूपी तलवारही त्यानं तिथं ठेवली.उत्पत्ति ३:२४ वाचा.

१७ लहानपणी, त्या करूबांना पाहून हाबेलाला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. शरीर धारण केलेले ते देवदूत नक्कीच अतिशय शक्तिशाली दिसत असावेत. तसंच, गरगर फिरणाऱ्या ज्वालारूपी तलवारीचं दृश्य पाहून त्याला किती विलक्षण वाटलं असेल! पण, लहानाचा मोठा होत असताना हाबेलानं कधीही ते करूब आपल्या जबाबदारीला कंटाळून निघून गेले आहेत असं पाहिलं का? कधीच नाही. दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षं गेली; पण, ते बुद्धिमान, शक्तिशाली देवदूत आपल्या नेमलेल्या ठिकाणाहून हलले नाहीत. त्यावरून हाबेलाला हे शिकायला मिळालं, की देवाचे असेही सेवक आहेत जे नीतिमान आणि विश्वासू आहेत. त्या करूबांमध्ये त्यानं असं काहीतरी पाहिलं जे त्याला स्वतःच्या कुटुंबात कधीच पाहायला मिळालं नाही. ते म्हणजे, यहोवाप्रती त्यांची निष्ठा आणि आज्ञाधारकता. त्या देवदूतांना पाहून हाबेलाचा विश्वास मजबूत झाला असेल यात काहीच शंका नाही.

करूब यहोवाला किती विश्वासू आणि आज्ञाधारक आहेत हे हाबेलानं लहानपणापासून पाहिलं

१८. आज आपल्या विश्वासाला भक्कम आधार देणाऱ्या गोष्टी कोणत्या?

१८ तर अशा प्रकारे, यहोवानं सृष्टी, त्याची अभिवचनं आणि देवदूतांचं उदाहरण या सगळ्यांतून स्वतःबद्दल जे काही प्रकट केलं होतं त्यावर हाबेलानं मनन केलं. आणि त्यामुळं देवावरील त्याचा विश्वास दिवसेंदिवस मजबूत होत गेला. तेव्हा, हाबेल आज जिवंत नसला, तरी त्याच्या उदाहरणातून तो आपल्याशी बोलत आहे असं म्हणता येणार नाही का? खासकरून तरुणांना हे जाणून दिलासा मिळेल, की विश्वासाच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबात कोणाचंही चांगलं उदाहरण नसलं, तरीसुद्धा हाबेलाप्रमाणे ते खरा विश्वास उत्पन्न करू शकतात. देवानं निर्माण केलेल्या असंख्य आश्चर्यकारक गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत; तसंच, आपल्याजवळ संपूर्ण बायबल आहे; याशिवाय, देवाला विश्वासू राहिलेल्या अनेक मानवांची उदाहरणंही आहेत. खरोखर, देवावरील आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपल्याजवळ भरपूर आधार आहे.

हाबेलानं दिलेलं अर्पण अधिक चांगलं का होतं?

१९. काही काळानंतर हाबेलाला कोणतं महत्त्वाचं सत्य उमगलं?

१९ हाबेलाचा यहोवावरील विश्वास वाढत गेला, तसा तो विश्वास कार्यातून व्यक्त करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होऊ लागली. पण, संपूर्ण विश्व उभं करणाऱ्या निर्माणकर्त्याला एक साधासुधा मानव काय देणार? खरंतर, निर्माणकर्ता असल्यामुळं त्याला मानवांकडून कोणत्याही गोष्टीची किंवा त्यांच्या मदतीची काहीच गरज नाही. पण काही काळानंतर, हाबेलाला एक अतिशय महत्त्वाचं सत्य उमगलं. ते म्हणजे, आपल्याजवळ जे काही असेल त्यातलं सगळ्यात उत्तम जर आपण योग्य हेतूनं आपल्या प्रेमळ पित्याला, यहोवाला दिलं तर तो नक्कीच आनंदित होईल.

हाबेलानं विश्वासानं देवाला अर्पण दिलं; पण काइनानं तसं केलं नाही

२०, २१. काइनानं आणि हाबेलानं यहोवाला काय अर्पण केलं, आणि यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

२० हाबेलानं आपल्या कळपातल्या काही मेंढरांचं अर्पण देण्याचं ठरवलं. त्यानं कळपातले सगळ्यात चांगले म्हणजे प्रथम जन्मलेले प्राणी आणि त्यांचे जे भाग त्याला सगळ्यात चांगले वाटले ते निवडले. दुसरीकडे पाहता, काइनानंसुद्धा देवाचा आशीर्वाद आणि मर्जी प्राप्त करण्यासाठी आपल्या शेतातला उपज अर्पण करण्याचं ठरवलं. पण, त्याचे हेतू हाबेलासारखे नव्हते. त्या दोघा भावांनी ज्या वेळी ती अर्पणं यहोवाला दिली त्या वेळी हा फरक स्पष्टपणे दिसून आला.

२१ आदामाच्या दोन्ही पुत्रांनी अर्पणं देण्यासाठी वेद्यांचा आणि अग्नीचा उपयोग केला असावा. तसंच, त्यांनी कदाचित करूबांच्या आसपास, त्यांना दिसेल अशा ठिकाणी ही अर्पणं दिली असावीत. कारण यहोवाच्या अधिकाराला सूचित करणारं त्या करूबांशिवाय दुसरं कुणीही त्या वेळी पृथ्वीवर नव्हतं. मग, त्या दोघांच्या अर्पणांबद्दल यहोवाची काय प्रतिक्रिया होती? बायबल म्हणतं: “देवाने हाबेलाचे अर्पण स्वीकारले.” (उत्प. ४:४, सुबोधभाषांतर) यहोवानं हे कसं दाखवलं ते मात्र बायबल सांगत नाही.

२२, २३. यहोवानं हाबेलाचं अर्पण का स्वीकारलं?

२२ देवानं हाबेलाचं अर्पण का स्वीकारलं? त्यानं दिलेल्या अर्पणामुळं, की आणखी कशामुळं? हे खरं आहे, की हाबेलानं एक जिवंत प्राणी अर्पण करून त्याचं अनमोल रक्त वाहिलं होतं. अशा प्रकारचं अर्पण किती मोलाचं असेल याची हाबेलाला जाणीव होती का? या घटनेच्या अनेक शतकांनंतर, देवानं एका निर्दोष कोकऱ्याच्या बलिदानाचा उपयोग करून, भविष्यात आपल्या परिपूर्ण पुत्राचं अर्थात ‘देवाच्या कोकऱ्याचं’ बलिदान दिलं जाईल आणि त्याचं निर्दोष रक्त वाहिलं जाईल हे सूचित केलं. (योहा. १:२९; निर्ग. १२:५-७) अर्थात, या सगळ्या गोष्टी हाबेलाला माहीत असणं किंवा समजणं शक्य नव्हतं.

२३ पण एक गोष्ट मात्र आपण खातरीनं सांगू शकतो. ती म्हणजे, हाबेलाजवळ जे काही होतं त्यातलं सगळ्यात उत्तम त्यानं देवाला अर्पण केलं. शिवाय, त्यानं यहोवावर असलेल्या खऱ्या प्रेमामुळं आणि विश्वासामुळं हे अर्पण दिलं होतं. म्हणून, यहोवानं हाबेलाचं फक्त अर्पण पाहून नाही, तर त्याचं मन पाहून ते अर्पण स्वीकारलं.

२४. (क) काइनानं दिलेल्या अर्पणात चुकीचं असं काहीच नव्हतं असं का म्हणता येईल? (ख) काइनाची वृत्ती आजच्या अनेक लोकांसारखी कशी होती?

२४ पण, काइनाच्या बाबतीत तसं घडलं नाही. बायबल म्हणतं, की यहोवानं “काइनाचे अर्पण स्वीकारले नाही.” (उत्प. ४:५, सुबोधभाषांतर) खरंतर, काइनानं जे अर्पण दिलं त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं; कारण पुढं नियमशास्त्रात स्वतः देवानं असं सांगितलं की अर्पण म्हणून शेतीचा उपजदेखील दिला जाऊ शकतो. (लेवी. ६:१४, १५) मग, काइनाचं अर्पण का स्वीकारण्यात आलं नाही? काइनाबद्दल बायबल असं म्हणतं, की त्याची “कृत्ये दुष्ट होती.” (१ योहान ३:१२ वाचा.) हल्लीच्या अनेक लोकांप्रमाणे काइनालासुद्धा असं वाटलं असेल, की देवाची उपासना करण्याचा फक्त दिखावा करणं पुरेसं आहे. यहोवावर त्याचा खरा विश्वास आणि प्रेम नव्हतं आणि ही गोष्ट त्याच्या कार्यांतून लगेच दिसून आली.

२५, २६. यहोवानं काइनाला कोणता इशारा दिला, पण काइनानं काय केलं?

२५ यहोवानं आपलं अर्पण स्वीकारलं नाही हे काइनाच्या लक्षात आलं तेव्हा हाबेलाच्या उदाहरणावरून त्यानं काही शिकण्याचा प्रयत्न केला का? नाही. उलट, आपल्या भावाबद्दल त्याच्या मनात द्वेष खदखदू लागला. काइनाच्या मनात काय चाललं आहे हे यहोवानं पाहिलं आणि त्याला धीरानं समजावण्याचा प्रयत्न केला. देवानं त्याला बजावलं, की जर तू चुकीचा मार्ग सोडला नाहीस, तर तुझ्या हातून गंभीर चूक होण्याची शक्यता आहे. याउलट, तू आपला वाईट मार्ग सोडला तर आनंदी होशील असं आश्वासनही यहोवानं त्याला दिलं.—उत्प. ४:६, ७.

२६ पण काइनानं देवाच्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष केलं. आपल्या धाकट्या भावाला विश्वासात घेऊन काइन त्याला शेतात घेऊन गेला. तिथं त्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारलं. (उत्प. ४:८) एका अर्थी, हाबेल हा धार्मिक छळाला बळी पडलेला पहिला मनुष्य ठरला. तो मरण पावला, पण त्याची गोष्ट इथंच संपत नाही.

२७. (क) हाबेलाचं पुनरुत्थान केलं जाईल असं आपण खातरीनं का म्हणू शकतो? (ख) नंदनवनात हाबेलाला भेटायचं असल्यास आज आपण काय केलं पाहिजे?

२७ लाक्षणिक अर्थानं, हाबेलाचं रक्त सूड घेण्यासाठी किंवा न्यायासाठी यहोवाकडे ओरड करत होतं. आणि यहोवानं त्याला न्याय दिला; काइनानं जो गुन्हा केला होता त्याबद्दल यहोवानं त्याला शिक्षा दिली. (उत्प. ४:९-१२) त्याहून महत्त्वाचं म्हणजे, विश्वासू हाबेलाचा अहवाल आजही आपल्याशी बोलत आहे. हाबेल शंभरएक वर्षं जगला असेल. जरी त्याच्या काळातल्या लोकांच्या तुलनेत तो कमी जगला, तरी त्यानं आपल्या आयुष्याचं सार्थक केलं. तो मरण पावला तेव्हा त्याला याचं समाधान असेल, की आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण त्याचं मन आनंदित करू शकलो. (इब्री ११:४) त्यामुळं आपण खातरीनं म्हणू शकतो, की यहोवा त्याला कधीच विसरणार नाही आणि पृथ्वीवरील नंदनवनात त्याचं पुनरुत्थान केलं जाईल. (योहा. ५:२८, २९) तो पुन्हा जिवंत होईल तेव्हा तुम्ही तिथं असाल का? हाबेल त्याच्या विश्वासू उदाहरणातून आपल्याला जे सांगत आहे त्याकडे लक्ष देऊन त्याचं अनुकरण करण्याचा निश्चय केल्यास आपण नक्कीच त्याला भेटू!

^ परि. 5 मूळ भाषेत, ‘जगाची स्थापना’ या शब्दांचा संबंध संतती उत्पन्न करण्याशी आहे. त्यामुळे हे शब्द सगळ्यात पहिल्या मानवी संततीला सूचित करतात. पण, आदाम आणि हव्वेचा पहिला मुलगा तर काइन होता. मग, येशूनं ‘जगाच्या स्थापनेचा’ संबंध हाबेलाशी का जोडला? कारण काइनानं त्याच्या निर्णयांद्वारे व कार्यांद्वारे यहोवा देवाविरुद्ध जाणूनबुजून बंड केलं. त्यामुळे त्याच्या आईवडिलांप्रमाणेच तोसुद्धा पापापासून सुटका मिळण्यास किंवा पुनरुत्थान होण्यास योग्य नाही असं म्हणता येईल.