व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा | मरीया

तिने काळजावरील घाव सोसला

तिने काळजावरील घाव सोसला

मरीयेवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिचे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. तिच्या मुलाने अनंत यातना सोसून नुकताच जीव सोडला होता. पण, मरण्याआधी त्याने जिवाच्या आकांताने मारलेली शेवटची आरोळी अजूनही तिच्या कानांत घुमत होती. दिवसाढवळ्या सर्वत्र अंधार पसरला होता. मग, एक मोठा भूकंप झाला. (मत्तय २७:४५, ५१) हे पाहून मरियेला वाटले असावे, जणू यहोवा अख्ख्या जगाला हे सांगत होता की येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे दुसऱ्या कोणाही पेक्षा त्याला सर्वात जास्त वेदना होत आहेत.

गुलगुथा किंवा कवटीचे स्थान या ठिकाणी पसरलेला अंधार हळूहळू दुपारच्या उन्हामुळे दूर होत असताना मरीया तेथेच आपल्या मुलासाठी शोक करत होती. (योहान १९:१७, २५) त्या क्षणी, तिच्या मनात नक्कीच असंख्य आठवणी दाटून आल्या असतील. त्यांपैकी एक आठवण सुमारे ३३ वर्षांपूर्वीची असावी. त्या वेळी, ती आणि योसेफ विधीनुसार आपल्या बाळाला जेरूसलेमच्या मंदिरात घेऊन आले होते; आणि शिमोन नावाच्या एका वृद्ध माणसाने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने एक भविष्यवाणी केली होती. येशूबद्दल त्याने म्हटले होते की पुढे तो मोठमोठी कृत्ये करेल. पण त्याच वेळी त्याने असेही म्हटले, की एक दिवस असा येईल जेव्हा मरीयेला जणू तिच्या काळजातून तलवार भोसकली गेली आहे असे वाटेल. (लूक २:२५-३५) शिमोनाच्या त्या शब्दांचा नेमका अर्थ आज, या भयंकर दुःखाच्या क्षणी तिला समजला.

मरीयेच्या काळजावर गहिरा घाव करण्यात आला होता

असे म्हटले जाते की पोटच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सोसण्याइतके दुसरे दुःख नसते. मृत्यू हा माणसाचा सगळ्यात क्रूर शत्रू आहे; कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आपल्या प्रत्येकाला घाव देऊन जातो. (रोमकर ५:१२; १ करिंथकर १५:२६) मनावर झालेले हे घाव सोसणे शक्य आहे का? मरीयेच्या मनावर झालेला असाच घाव तिने आपल्या अढळ विश्वासाच्या बळावर यशस्वीपणे सोसला. तिच्या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकू शकतो. त्यासाठी, येशूच्या सेवाकार्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्या मरीयेच्या जीवनाचा आपण विचार करू या.

“हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा”

आपण साडेतीन वर्षे मागे जाऊ या. एक मोठा बदल होण्याची मरीयेला चाहूल लागली होती. नासरेथसारख्या छोट्याशा गावातसुद्धा लोक बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाची आणि पश्‍चात्ताप करण्याबद्दलच्या त्याच्या जोरदार संदेशाची भरभरून चर्चा करत होते. या बातमीकडे तिचा मोठा मुलगा एका इशाऱ्याप्रमाणे पाहत असल्याचे तिला जाणवले. आपले सेवाकार्य सुरू करण्यासाठी येशू आता घराबाहेर पडणार होता. (मत्तय ३:१, १३) त्याच्या जाण्यामुळे मरीयेला आणि तिच्या कुटुंबाला बराच फरक पडणार होता. तो कसा?

असे दिसते की मरीयेचा पती योसेफ याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख काय असते ते मरीयेला चांगले ठाऊक होते. * येशूला आता फक्त “सुताराचा पुत्र” नव्हे, तर “सुतार” असेही म्हटले जाऊ लागले होते. येशूने कदाचित आपल्या वडिलांचा व्यवसाय आणि कुटुंबातील कर्त्या पुरुषाची जबाबदारी हाती घेतली असावी. त्याच्या कुटुंबात, त्याच्या पाठी जन्मलेली बहुधा सहा मुले होती. (मत्तय १३:५५, ५६; मार्क ६:३) येशूनंतर कुटुंबातील मोठा मुलगा कदाचित याकोब असावा; त्यामुळे कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवण्यासाठी येशूने त्याला प्रशिक्षण दिले असावे. असे असले तरी कुटुंबातील सगळ्यात मोठ्या मुलाच्या अर्थात येशूच्या जाण्यामुळे कुटुंबाला बराच फरक पडणार होता. मरीयेवर आधीच खूप मोठा भार होता; अशात येशू आपले सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी जाणार म्हटल्यावर तिच्या पोटात गोळा आला असावा का? कदाचित. पण  मग एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: नासरेथचा येशू, फार पूर्वी प्रतिज्ञा केलेला मशिहा अर्थात येशू ख्रिस्त बनला तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असणार होती? बायबलचा एक वृत्तान्त यावर काही प्रकाश टाकतो.—योहान २:१-१२.

येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला; बाप्तिस्म्यानंतर तो देवाने अभिषिक्त केलेला, किंवा मशिहा बनला. (लूक ३:२१, २२) मग तो शिष्यांची निवड करू लागला. त्याचे काम अत्यंत निकडीचे असले तरी कुटुंबाच्या व मित्रांच्या सहवासात त्याने आनंदाचे क्षण घालवले. एकदा तो आपली आई, शिष्य आणि आपल्या भावांसोबत काना या गावात एका लग्नाच्या मेजवानीला गेला होता. नासरेथपासून १३ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव बहुधा डोंगरावर वसलेले होते. मेजवानीदरम्यान निर्माण झालेली एक समस्या मरीयेच्या लक्षात आली. लग्न-घरातील काही सदस्य एकमेकांना इशारे करून काहीतरी कुजबूज करत असल्याचे कदाचित तिने पाहिले असावे. समस्या ही होती की त्या वेळी द्राक्षरस संपला होता. त्यांच्या संस्कृतीत पाहुणचारात काही कमी पडले तर कुटुंबाची बदनामी होत असे आणि आनंदी प्रसंगावर विरजण पडत असे. मरीयेला त्या कुटुंबाविषयी सहानुभूती वाटली आणि ती येशूकडे गेली.

तिने आपल्या मुलाला म्हटले: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” त्याने काय करावे अशी तिची अपेक्षा होती? नेमके काय ते आपण सांगू शकत नाही; पण आपला मुलगा एक मोठा माणूस आहे आणि तो मोठमोठी कृत्ये करेल हे तिला माहीत होते. आणि ती कृत्ये करण्याची वेळ आली आहे असे कदाचित तिला वाटले असावे. दुसऱ्या शब्दांत, ती त्याला असे म्हणत होती, “मुला, काहीतरी कर!” पण येशूने तिला जे उत्तर दिले ते ऐकून ती कदाचित अवाक झाली असेल. त्याने तिला म्हटले: “बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध?” येशूच्या शब्दांवरून काहींना असे वाटते की तो आपल्या आईशी अनादराने बोलला. पण तसे मुळीच नाही. त्याच्या या शब्दांतून त्याने एक गोष्ट सौम्यपणे तिच्या लक्षात आणून दिली. ती म्हणजे, त्याने त्याचे सेवाकार्य कसे करावे याबद्दल सूचना देण्याचा अधिकार तिला नव्हता; तो अधिकार फक्त त्याचा पिता यहोवा यालाच होता.

मरीया एक समंजस व नम्र स्त्री होती. त्यामुळे तिच्या मुलाने तिच्या लक्षात आणून दिलेली गोष्ट तिने स्वीकारली. लग्नाच्या मेजवानीत सेवा करणाऱ्यांना ती म्हणाली: “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” मरीयेने हे समजून घेतले की आपल्या मुलाला सूचना देण्याचा अधिकार आता तिला नव्हता; उलट, आता तिला आणि इतरांना त्याच्याकडून सूचना घ्यायच्या होत्या. येशूने दाखवून दिले की त्याच्या आईप्रमाणेच त्यालाही त्या नवविवाहित जोडप्याविषयी सहानुभूती आहे. त्याने आपला सगळ्यात पहिला चमत्कार केला; त्याने पाण्याचे रूपांतर उच्च प्रतीच्या द्राक्षरसात केले. याचा काय परिणाम झाला? “त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.” मरीयेनेसुद्धा येशूवर विश्वास ठेवला. आता ती त्याच्याकडे केवळ तिचा पुत्र म्हणून नव्हे, तर तिचा प्रभू व उद्धारकर्ता म्हणूनही पाहू लागली.

मरीयेने दाखवलेल्या विश्वासावरून आज पालक बरेच काही शिकू शकतात. हे कबूल आहे, की कोणत्याही पालकाने येशूसारख्या मुलाला वाढवलेले नाही. पण, मूल प्रौढावस्थेत पदार्पण करते तो काळ पालकांसाठी खूप कठीण असू शकतो. मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यानंतरसुद्धा पालक कदाचित त्यांना लहान मुलाची वागणूक देत असतील; पण, मोठ्या झालेल्या मुलांशी पालकांनी अशा प्रकारे वागण्याची गरज नसेल. (१ करिंथकर १३:११) तर मग, प्रौढावस्थेत पदार्पण केलेल्या मुलांना पालक कशा प्रकारे मदत करू शकतात? एक मार्ग म्हणजे विश्वासात असलेला आपला मुलगा किंवा मुलगी नेहमी बायबलच्या शिकवणींचे पालन करेल आणि त्यामुळे मिळणारे यहोवाचे आशीर्वाद अनुभवेल असा भरवसा मनापासून व्यक्त करणे. पालकांनी जर आपल्या मुलांबद्दल असा विश्वास व भरवसा व्यक्त केला तर मुलांना याचा खूप फायदा होईल. येशूच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात मरीयेने त्याला जो पाठिंबा दिला त्याची त्याने नक्कीच कदर केली असेल.

“त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते”

शुभवर्तमानांच्या अहवालांत, येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान मरीयेबद्दल फारसे काही सांगण्यात आले नाही. पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेऊ शकतो, की त्या वेळी ती बहुधा विधवा होती आणि तिच्या एकटीवरच तिच्या इतर मुलांची जबाबदारी होती. त्यामुळे येशू जेथे-जेथे प्रचार करत होता तेथे-तेथे जाणे कदाचित तिला शक्य झाले नसेल. (१ तीमथ्य ५:८) पण, तरीसुद्धा मशिहाबद्दल ती ज्या काही गोष्टी शिकली होती त्यांवर ती मनन करत असे आणि  आपल्या कुटुंबाच्या सवयीनुसार जवळच्या सभास्थानात उपासनेसाठी जात असे.—लूक २:१९, ५१; ४:१६.

असे जर असेल तर येशू नासरेथच्या सभास्थानात शिकवत असताना श्रोत्यांमध्ये मरीयासुद्धा बसलेली असावी. मशिहाबद्दल अनेक शतकांपूर्वी सांगितलेली भविष्यवाणी आपल्यात पूर्ण झाल्याची घोषणा तिच्या पुत्राने केली तेव्हा ती किती रोमांचित झाली असेल! पण, नासरेथमधील लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही तेव्हा तिला खूप दुःख झाले असेल. त्यांनी तर तिच्या पुत्राला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला होता.—लूक ४:१७-३०.

याशिवाय, तिची इतर मुले येशूकडे ज्या दृष्टिकोनातून पाहायची त्यामुळेसुद्धा तिला खूप वाईट वाटायचे. योहान ७:५ वरून लक्षात येते की त्यांनी त्यांच्या आईसारखा विश्वास दाखवला नाही. त्यांच्याबद्दल आपण असे वाचतो: “त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.” येशूला कदाचित दोन बहिणी होत्या. * पण, येशूबद्दल त्यांना काय वाटत होते याबद्दल बायबल काहीच सांगत नाही. पण एक मात्र खरे; वेगवेगळी धार्मिक मते असलेल्या कुटुंबात राहणे किती दुःखदायक असते हे मरीयेने अनुभवले होते. सत्य उपासनेला जडून राहत असतानाच कुटुंबातील बाकीच्या सदस्यांची मने न दुखवता त्यांचा विश्वास वाढवण्याचा तिने प्रयत्न केला.

एकदा येशूचे काही नातेवाईक त्याला “धरावयाला” निघाले; त्यांच्यात बहुधा येशूचे भाऊदेखील होते. ते चक्क असे म्हणत होते: “त्याला वेड लागले आहे.” (मार्क ३:२१, ३१) अर्थात, असा कोणताच विचार मरीयेच्या मनात नसला, तरी तीसुद्धा आपल्या मुलांसोबत गेली. ते काहीतरी शिकतील आणि त्यांचा विश्वास वाढेल या आशेने कदाचित ती त्यांच्याबरोबर गेली असावी. मग वाढला का त्यांचा विश्वास? येशूने त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक चमत्कार केले आणि देवाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या तरी मरीयेच्या इतर पुत्रांनी विश्वास दाखवला नाही. शेवटी वैतागून तिने असा विचार केला का, की ‘मी काय करू जेणेकरून यांच्या मनाला पाझर फुटेल?’

तुम्ही अशा कुटुंबात राहता का ज्यातील सदस्यांचे धार्मिक विश्वास वेगवेगळे आहेत? असल्यास, मरीयेच्या विश्वासावरून तुम्हाला खूप काही शिकता येईल. आपल्या कुटुंबातील सदस्य कधीच आपल्यासारखा विश्वास बाळगणार नाहीत असा विचार करून मरीयेने त्यांना मदत करण्याचे सोडून दिले नाही. उलट, आपल्या विश्वासामुळे आपण किती आनंदी आहोत आणि आपल्याला किती मनःशांती मिळते हे तिने तिच्या उदाहरणावरून दाखवले. त्याच वेळी, तिने आपल्या विश्वासू मुलाला नेहमी पाठिंबा दिला. येशू आपले सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा मरीयेला त्याची आठवण आली असावी का? तो आपल्याबरोबरच राहिला असता तर बरे झाले असते असे कधीकधी तिला वाटले असावे का? असल्यास, तिने तिच्या भावना काबूत ठेवल्या. कारण येशूला पाठिंबा व प्रोत्साहन देणे हा एक सुहक्क असल्याचे तिने मानले. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना त्यांच्या जीवनात देवाला पहिले स्थान देण्यास मदत करू शकता का?

“तुझ्या स्वतःच्याही जिवातून तरवार भोसकून जाईल”

मरीयेला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले का? यहोवा कधीच विश्वासाचे प्रतिफळ देण्यास विसरत नाही. त्यामुळे त्याने मरीयेलाही तिच्या विश्वासाचे प्रतिफळ दिले. (इब्री लोकांस ११:६) मरीयेने आपल्या मुलाला प्रवचने देत असल्याचे पाहिले किंवा इतरांच्या तोंडून त्याच्या प्रवचनांबद्दल ऐकले, तेव्हा तिला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!

येशूच्या दृष्टान्तांतून योसेफ आणि मरीयेच्या संस्कारांची झलक दिसून येते

मरीयेच्या पुत्राने जे दृष्टान्त व दाखले दिले त्यांत तिला त्याच्या बालपणाचे काही पडसाद ऐकू आले का? येशूने आपल्या प्रवचनांत, नाणे शोधण्यासाठी घर झाडणाऱ्या, जात्यावर दळणाऱ्या किंवा दिवा लावून तो दिवठणीवर ठेवणाऱ्या स्त्रीचा उल्लेख केला, तेव्हा तिचे मन येशूच्या बालपणात गेले असेल का? कदाचित. अशी रोजची कामे करताना लहान येशू आपल्या अवतीभोवतीच असायचा याची तिला आठवण झाली असेल. (लूक ११:३३; १५:८, ९; १७:३५) येशूने जेव्हा म्हटले, की त्याचे जू सोयीचे व ओझे हलके आहे, तेव्हा मरीयेच्या डोळ्यांपुढे तो सोनेरी दिवस आला असेल का, जेव्हा योसेफ लहान येशूला जू बनवण्यास शिकवत होता? कदाचित. भार वाहून नेणाऱ्या प्राण्याला त्रास होऊ नये म्हणून जू कसे बनवावे, त्यास योग्य आकार कसा द्यावा या सर्व गोष्टी योसेफ काळजीपूर्वक येशूला शिकवत असल्याचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे आले असेल. (मत्तय ११:३०)  देवाचा पुत्र, जो पुढे मशिहा बनणार होता त्याचे संगोपन करण्याचा आणि त्याच्यावर चांगले संस्कार करण्याचा विशेषाधिकार यहोवाने मरीयेला दिला होता; याचा नुसता विचार करूनसुद्धा तिला मनस्वी समाधान मिळत असेल यात काही शंका नाही. दररोजच्या जीवनातील वसतूंचा व दृश्यांचा उपयोग करून अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवणाऱ्या व सर्व मानवी गुरूंपेक्षा थोर असलेल्या गुरूकडून शिकण्याची सुसंधी मिळाल्याबद्दल मरीयेला नक्कीच खूप आनंद झाला असेल.

असे असले तरी मरीया अत्यंत नम्र होती. लोकांनी मरीयेची उपासना करावी किंवा तिची वाजवीपेक्षा जास्त प्रशंसा करावी अशी तिच्या पुत्राची मुळीच इच्छा नव्हती. एकदा येशू लोकसमुदायाला शिकवत होता तेव्हा एक स्त्री मोठ्याने असे म्हणाली, की ज्या आईने येशूला जन्म दिला ती जगातली सगळ्यात धन्य आई आहे. तेव्हा येशूने म्हटले: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.” (लूक ११:२७, २८) आणखी एका प्रसंगी, लोकसमुदायातील काहींनी येशूला सांगितले की त्याची आई आणि भाऊ त्याला भेटायला आले आहेत; तेव्हा त्याने म्हटले की त्याची खरी आई व भाऊ ते आहेत जे विश्वास करतात. पण, मरीयेने येशूचे बोलणे मनाला लावून घेतले नाही. कारण त्याला काय म्हणायचे हे तिला समजले होते. ते म्हणजे, रक्ताच्या नात्यांपेक्षा आध्यात्मिक नाती जास्त महत्त्वाची असतात.—मार्क ३:३२-३५.

मरीयेने आपल्या मुलाला वधस्तंभावरील यातनामय मरण सोसताना पाहिले तेव्हा तिच्या मनाला ज्या वेदना झाल्या असतील त्या शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्या प्रसंगी प्रेषित योहानदेखील तेथे उपस्थित होता. त्याबद्दल सांगताना तो आपल्या वृत्तान्तात एक अत्यंत महत्त्वाचा तपशील देतो: त्या दुःखाच्या प्रसंगी मरीया, “येशूच्या वधस्तंभाजवळ” उभी होती. आपल्या मुलाच्या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ती विश्वासू, प्रेमळ आई त्याच्याजवळ होती. येशूने तिच्याकडे पाहिले; एकेक श्वास घेताना, एकेक शब्द उच्चारताना त्याला भयंकर वेदना होत होत्या तरीसुद्धा तो बोलला. आपल्यानंतर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी त्याने तिला आपल्या प्रिय प्रेषिताकडे, योहानाकडे सुपूर्त केले. येशूच्या भावांचा अजूनही त्याच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे येशूने तिला त्यांच्या नव्हे, तर त्याच्या एका विश्वासू अनुयायाच्या हवाली सोपवले. असे करण्याद्वारे येशूने हे दाखवले, की विश्वासात असलेल्या व्यक्तीने आपल्या घरच्या लोकांची काळजी घेणे, त्यातल्या त्यात आध्यात्मिक रीत्या त्यांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे!—योहान १९:२५-२७.

शेवटी येशूने जीव सोडला तेव्हा तिच्या मनात दुःखाची कळ उठली. अनेक वर्षांपूर्वी भाकीत केल्याप्रमाणे तिच्या काळजातून तलवार भोसकली गेली. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे तिला नक्कीच खूप वेदना झाल्या होत्या. पण तीन दिवसांनंतर एक सगळ्यात मोठा चमत्कार झाला—येशू पुन्हा जिवंत झाला. यामुळे मरीयेला किती आनंद झाला असेल त्याची आपण कल्पना करू शकत नाही. पुढे येशू त्याच्या भावाला अर्थात याकोबाला खासगीत भेटला तेव्हा तिचा आनंद आणखीनच वाढला. (१ करिंथकर १५:७) त्या भेटीचा याकोबावर आणि येशूच्या इतर भावांवर नक्कीच गहिरा प्रभाव पडला. कारण पुढे आपण असे वाचतो की येशू हा ख्रिस्त असल्याचे ते विश्वास करू लागले. त्यानंतर लगेच, ते आपल्या आईसह ख्रिस्ती सभांमध्ये “प्रार्थना करण्यात तत्पर” असल्याचे आपण वाचतो. (प्रेषितांची कृत्ये १:१४) पुढे त्यांच्यापैकी दोघांनी, म्हणजे याकोब व यहूदा यांनी बायबलची पुस्तके लिहिली.

मरीयेची इतर मुले विश्वासू ख्रिस्ती बनली याचा तिला मनस्वी आनंद झाला

मरीया आपल्या मुलांसह सभांमध्ये प्रार्थना करत असल्याचे जे आपण वाचतो तो तिचा शेवटचा उल्लेख आहे. तिच्याबद्दलच्या अहवालाचा यापेक्षा चांगला शेवट आणखी काय असू शकतो? मरीयेने आपल्या सगळ्यांसाठी किती उत्तम उदाहरण मांडले! तिच्या विश्वासामुळे तिने काळजावरील घाव सोसला आणि त्याच्या बदल्यात शेवटी तिला वैभवशाली प्रतिफळ मिळाले. आपण तिच्या विश्वासाचे अनुकरण केले, तर हे जग आपल्यावर करत असलेले घाव आपणही सोसू शकतो आणि कल्पनाही करवणार नाहीत इतके आशीर्वाद अनुभवू शकतो.▪ (w14-E 05/01)

^ परि. 8 बायबलमध्ये योसेफाचा शेवटचा उल्लेख आढळतो तो येशू १२ वर्षांचा असताना घडलेल्या एका घटनेत. त्या घटनेनंतर, येशूची आई आणि तिच्या बाकीच्या मुलांचा उल्लेख करण्यात आला आहे, पण योसेफाचा नाही. किंबहुना, एके ठिकाणी येशूला “मरीयेचा मुलगा” असे म्हटले आहे; तेथे योसेफाचा उल्लेख आढळत नाही.—मार्क ६:३.

^ परि. 16 योसेफ हा येशूचा जन्मदाता पिता नसल्यामुळे हे त्याचे सावत्र बहीण-भाऊ होते.—मत्तय १:२०.