व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा | हनोख

“तो देवाला संतोषवीत असे”

“तो देवाला संतोषवीत असे”

हनोख खूप काळ जगला. आपण कदाचित कल्पना करू शकणार नाही पण त्याचं आयुष्य ३६५ वर्षं होतं. म्हणजे आज आपण जगतो त्याच्या जवळजवळ चार पट जास्त! पण तो ज्या काळात जगला त्या काळात हे वय खूप जास्त नव्हतं. त्या काळी म्हणजे जवळजवळ ५० शतकांआधी लोक आजच्या काळापेक्षा जास्त जगायचे. जेव्हा हनोखचा जन्म झाला तेव्हा पहिला मानव आदाम जिवंत होता आणि त्याचं वय ६०० पेक्षा जास्त होतं. आणि त्यानंतरही तो आणखी तीन शतकं जगला! आदामचे काही वंशज त्याच्याहीपेक्षा जास्त काळ जगले. म्हणजे ३६५ वयातदेखील हनोखची तब्येत खूप चांगली असावी आणि तो आणखी काही काळ जगू शकला असता. पण तो फक्त ३६५ वर्षंच जगला.

हनोखच्या जिवाला धोका होता. आपण कल्पना करू शकतो, की त्याने लोकांना देवाचा संदेश सांगितल्यावर ते कसे रागावले असतील आणि त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी तो पळाला असेल, लपून बसला असेल. लोकांचे चेहरे रागाने अगदी लाल झाले असतील. ते लोक त्याचा द्वेष करायचे. त्याच्या देवाचा आणि जो संदेश हनोख देत होता त्याचा तिरस्कार करायचे. ते हनोखच्या देवाला, यहोवाला काही करू शकत नव्हते, पण ते त्याच्या सेवकाला नक्की मारू शकत होते! तो त्याच्या कुटुंबाला पुन्हा पाहू शकेल का? असा विचार कदाचित हनोखच्या मनात आला असेल. तो त्या वेळी आपल्या बायकोबद्दल, मुलींबद्दल किंवा आपल्या मुलाबद्दल म्हणजे मथुशलहबद्दल विचार करत असेल का? की आपला नातू लामेख याच्याबद्दल विचार करत असेल? (उत्पत्ति ५:२१-२३, २५) हे लोक त्याचा जीव घेणार होते का?

बायबलमध्ये हनोखबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. फक्त तीन छोट्या अहवालात त्याच्याबद्दल सांगितलं आहे. (उत्पत्ति ५:२१-२४; इब्री लोकांस ११:५; यहूदा १४, १५) पण ही थोडी वचनं, हनोखचं एक दृढ विश्वास असलेला पुरुष म्हणून चित्र रंगवतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागतो का? योग्य गोष्टीचा पक्ष घेणं तुम्हाला कठीण वाटलं आहे का? असं असेल तर तुम्ही हनोखच्या विश्वासापासून खूपकाही शिकू शकता.

हनोख देवाबरोबर चालला

हनोखच्या काळात लोक खूप वाईट होते. ती आदामची सातवी पिढी होती. आदाम आणि हव्वेकडे काही काळ परिपूर्णता होती पण नंतर त्यांनी ती गमावली. ही पिढी त्यांच्या जवळची होती म्हणूनच ती इतका काळ जगत होती. पण तरीही त्यांची नैतिक आणि आध्यात्मिक परिस्थिती खूप वाईट होती. हिंसा खूप वाढली होती. आणि ही वृत्ती आदामच्या दुसऱ्या पिढीपासून म्हणजे काईनपासून सुरू झाली होती, ज्याने आपल्या भावाचा, हाबेलचा खून केला. काईनच्या एका वंशजाला तर, जास्त सूड बुद्धी असल्याचा आणि तो जास्त हिंसक असल्याचा, स्वतःबद्दल गर्व होता. तिसऱ्या पिढीमध्ये आणखी एका वाईट गोष्टीला सुरुवात झाली. ती म्हणजे, लोक यहोवाच्या नावाचा वापर करू लागले, पण त्याच्या उपासनेसाठी नाही तर ते देवाच्या पवित्र नावाची निंदा आणि अनादर करू लागले.—उत्पत्ति ४:८, २३-२६.

हनोखच्या काळात अशा प्रकारचा भ्रष्ट धर्म खूप वाढला होता. जेव्हा हनोख मोठा झाला, तेव्हा त्याला निर्णय घ्यायचा होता. तो त्याच्या काळातल्या लोकांमध्ये सामील होणार होता का? की स्वर्ग आणि पृथ्वी घडवणाऱ्या, खऱ्या देवाचा, म्हणजे यहोवाचा शोध घेणार होता? त्याला हाबेलबद्दल ऐकून खूप प्रोत्साहन मिळालं असावं. हाबेलने यहोवाच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना केली. पण त्यासाठी त्याला आपला प्राण गमवावा लागला. हनोखने देखील यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेतला. आपण उत्पत्ति ५:२२ इथं वाचतो, “हनोख . . . देवाबरोबर चालला.” हे वचन दाखवतं, की देवावर विश्वास न करणाऱ्या जगात हनोख देवाचा विश्वासू होता. अशा प्रकारे वर्णन करण्यात आलेला, तो बायबलमधला पहिला मानव आहे.

त्याच वचनात म्हटलं आहे, की हनोखच्या मुलाचा, मथुशलहचा जन्म झाल्यानंतरही हनोख यहोवाबरोबर चालत राहिला. हनोख जवळजवळ ६५ वर्षांचा असताना, त्याचं एक कुटुंब होतं. त्याच्या पत्नीचं नाव बायबलमध्ये दिलेलं नाही आणि त्याला इतर मुलं होती ज्यांची संख्याही दिलेली नाही. जर एका पित्याला देवासोबत चालायचं असेल आणि आपल्या कुटुंबाचा चांगला सांभाळ करायचा असेल, तर त्याला ते देवाच्या इच्छेप्रमाणेच करावं लागेल. हनोखला माहीत होतं की त्याने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं, अशी यहोवाची अपेक्षा होती. (उत्पत्ति २:२४) आणि त्याने आपल्या मुलांनादेखील यहोवा देवाबद्दल शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असेल. याचा काय परिणाम झाला?

नेमकं काय घडलं असेल याबद्दल बायबलमध्ये जास्त सांगितलेलं नाही. हनोखचा पुत्र मथुशलह याच्या विश्वासाबद्दल बायबलमध्ये काहीच माहिती दिलेली नाही. बायबलच्या अहवालात फक्त इतकीच माहिती आहे की तो सर्वात जास्त वर्षं जगला आणि ज्या वर्षी जलप्रलय आला त्यावर्षी तो मरण पावला. मथुशलहच्या मुलाचं नाव लामेख होतं. लामेख १०० वर्षांचा होईपर्यंत, हनोख जिवंत होता. लामेख खूप विश्वासू होता. यहोवाने लामेखला त्याच्या मुलाबद्दल, नोहाबद्दल भविष्यवाणी करायला प्रेरीत केलं. आणि ही भविष्यवाणी जलप्रलयानंतर पूर्ण झाली. नोहा, त्याचे पणजोबा हनोख यांच्यासारखाच देवासोबत चालत राहिला. नोहा कधीच त्यांना भेटला नव्हता. पण त्याच्यापुढे त्यांचं चांगल उदाहरणं होतं. नोहाने त्यांच्याबद्दल, त्याचा पिता लामेख किंवा आजोबा मथुशलह यांच्याकडून शिकलं असावं. किंवा असंही असू शकतं, की त्याने हनोखचे वडील, यारेद यांच्याकडून त्याच्याबद्दल शिकलं असावं. नोहा ३६६ वर्षांचा होईपर्यंत यारेद जिवंत होता.—उत्पत्ति ५:२५-२९; ६:९; ९:१.

हनोख आणि आदाम यांच्यात किती फरक होता ते पाहा. आदाम परिपूर्ण होता तरी त्याने यहोवाविरुद्ध पाप केलं आणि आपल्या वंशजांना वारसात बंड आणि दुःख दिलं. या उलट हनोख अपरिपूर्ण होता तरी तो देवाबरोबर चालला आणि त्याने आपल्या वंशजांना विश्वासाचा वारसा दिला. हनोक ३०८ वर्षांचा असताना आदामचा मृत्यू झाला. आदामच्या कुटुंबाला या स्वार्थी पूर्वजासाठी दुःख झालं असेल का? आपल्याला कदाचित हे सांगता येणार नाही. काहीही असो, पण हनोख मात्र “देवाबरोबर चालला.”—उत्पत्ति ५:२४.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करत असाल, तर तुम्ही हनोखच्या विश्वासापासून काय शिकू शकता. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करणं तर गरजेचं आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्यांचं आध्यात्मिक पोषण करणं. (१ तीमथ्य ५:८) आणि हे तुम्ही फक्त तुमच्या बोलण्यातूनच नाही, तर वागण्यातूनही दाखवून दिलं पाहिजे. जर तुम्ही हनोखप्रमाणे देवाबरोबर चालत राहिलात, जीवनात देवाच्या प्रेरीत वचनाचं मार्गदर्शन स्वीकारलंत, तर तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी चांगला वारसा ठेवू शकता. एक असं उत्तम उदाहरण, ज्याचं ते अनुकरण करू शकतील.

हनोखने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली

देवावर विश्वास नसलेल्या जगात विश्वासू हनोखला एकटं पडल्यासारखं वाटलं असेल. पण त्याच्या देवाने, यहोवाने त्याला सोडलं का? नक्कीच नाही. एके दिवशी यहोवा आपल्या विश्वासू सेवकासोबत बोलला. देवाने त्याला त्या काळातल्या लोकांना संदेश देण्याचं काम दिलं. म्हणजेच देवाने हनोखला संदेष्टा म्हणून नेमलं आणि तो पहिला संदेष्टा होता ज्याचा संदेश बायबलमध्ये दिला आहे. आपण असं का म्हणू शकतो? कारण अनेक शतकांनंतर येशूच्या भावाला, हनोखचा संदेश लिहिण्याची प्रेरणा मिळाली. *

हनोखने काय भविष्यवाणी केली? त्यात असं म्हटलं आहे: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) हनोखचा विश्वास दृढ होता. या गोष्टी नक्की होतील अशी त्याची खातरी होती. त्याच्यासाठी या भविष्यवाणीत सांगितलेल्या गोष्टी देवाने जणू आधीच केल्या होत्या. एखादी गोष्टी भूतकाळात आधीच घडली आहे, अशाप्रकारे भविष्यवाणी करण्याचा हा नमुना नंतर झालेल्या अनेक भविष्यवाण्यांमध्ये आपण बघतो. थोडक्यात सांगायचं तर, संदेष्टा ज्या गोष्टीबद्दल बोलत असतो ती नक्की पूर्ण होणार, याची इतकी खात्री असते, की ती जणू झाली आहे असंच तिच्याबद्दल म्हटलं जाऊ शकतं!—यशया ४६:१०.

एका क्रूर जगात हनोखने देवाचा संदेश धैऱ्याने सांगितला

हा संदेश सर्वांना सांगताना हनोखला कसं वाटलं असेल? या संदेशात किती जबरदस्त ताकीद दिली आहे ते पाहा. त्या लोकांचा, त्यांच्या कार्यांचा आणि ते ज्या प्रकारे ही कार्यं करत होते त्याचा धिक्कार करण्यासाठी, या संदेशात तीन वेळा “भक्तिहीन” आणि एकदा “अभक्तीने” असं म्हणण्यात आलं होतं. म्हणजे एदेन बागेतून बाहेर काढल्यानंतर लोकांनी जे जग निर्माण केलं ते पूर्णपणे भ्रष्ट झालं होतं. तसंच यहोवा “आपल्या लाखो पवित्र जनांसहित” म्हणजे देवदूतांच्या सेनेसोबत येईल, तेव्हा या जगाचा नाश केला जाईल असं या भविष्यवाणीत सांगितलं होतं. हनोखने न घाबरता आणि एकट्याने हा संदेश सर्वांना सांगितला. छोट्या लामेखने जर आपल्या आजोबांना हे काम करताना पाहिलं असेल, तर त्यांचं धैर्य पाहून तो नक्कीच थक्क झाला असेल.

हनोखचा विश्वास पाहून आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो, की देव ज्या दृष्टीने या जगाला पाहतो तसाच मीही पाहतो का? हनोखने जो संदेश दिला तो जसा त्या काळात लागू होत होता तसाच आजही लागू होतो. हनोखच्या भविष्यवाणी प्रमाणे, यहोवाने त्या काळातल्या अविश्वासू जगावर, नोहाच्या दिवसात जलप्रलय आणला. पण तो विनाश भविष्यात येणाऱ्या मोठ्या विनाशाचा फक्त नमुना होता. (मत्तय २४:३८, ३९; २ पेत्र २:४-६) आज देव या अविश्वासू जगाचा योग्य न्याय करण्यासाठीदेखील त्याच्या देवदूतांसोबत तयार आहे. आपण सर्वांनी हनोखच्या सूचनेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती सर्वांना सांगितली पाहिजे. कदाचित आपलं कुटुंब आणि आपले मित्र आपली साथ देणार नाहीत. कधीकधी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटेलं. पण जसं यहोवाने हनोखला कधीच एकटं पडू दिलं नाही, तसं तो आपल्या विश्वासू सेवकांना आजदेखील एकटं पडू देणार नाही!

“मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला”

हनोखला मरण कसं आलं? त्याच्या जीवनापेक्षा त्याचं मरण जास्त गूढ आणि विलक्षण आहे. बायबलच्या उत्पत्ती पुस्तकात फक्त इतकंच म्हटलं आहे, “हनोख देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४) देवाने कोणत्या प्रकारे हनोखला नेलं? प्रेषित पौलाने नंतर समजावलं: “विश्वासाने हनोख, त्याने मरण पाहू नये म्हणून, लोकांतरी नेला गेला, आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले, कारण त्याचे लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की, तो देवाला संतोषवीत असे.” (इब्री लोकांस ११:५, पं.र.भा.) “मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला,” या पौलाच्या शब्दांचा काय अर्थ होता? काही बायबल भाषांतरात असं म्हटलं आहे की देवाने हनोखला स्वर्गात नेलं. पण ते शक्य नाही. कारण बायबलमध्ये म्हटलं आहे की येशूचं पुनरुत्थान झाल्यावर, सर्वात आधी तो स्वर्गात गेला.—योहान ३:१३.

मग कोणत्या प्रकारे हनोखने “मरण पाहू नये” म्हणून त्याला “लोकांतरी” नेलं गेलं? यहोवाने कदाचित त्याला विरोधकांच्या हातून मरणाच्या यातना होऊ नये म्हणून, त्याचं जीवनापासून मृत्यूमध्ये लोकांतर केलं. पण त्याआधी हनोखला “साक्ष देण्यात आली होती की, तो देवाला संतोषवीत असे.” म्हणजे नक्की कशी? कदाचित त्याच्या मरणाच्या आधी, देवाने हनोखला या पृथ्वीचं नंदनवन झाल्याचा दृष्टांत दाखवला असेल. हे सुंदर दृश्य पाहिल्यावर, यहोवाची स्वीकृती मिळाल्याची खातरी त्याला झाली आणि हनोख मृत्यूच्या गाढ निद्रेत गेला. पौलाने त्याच्याबद्दल आणि इतर विश्वासू स्त्री-पुरुषांबद्दल असं लिहिलं: “हे सर्व जण विश्वासात टिकून मेले.” (इब्री लोकांस ११:१३) हनोखच्या मृत्यूनंतर त्याच्या शत्रूंनी त्याचं शरीर शोधण्याचा प्रयत्न केला असेल. पण ते सापडलं नाही कारण देवाने ते नाहीसं केलं, नाहीतर लोकांनी त्याची अवहेलना केली असती किंवा खोट्या उपासनेसाठी त्याचा वापर केला असता. *

हनोखच्या जीवनाचा अंत कसा झाला असेल, याची कल्पना आपण शास्त्रवचनांच्या आधारावर करू या. काय घडलं असेल याची कल्पना करा, कारण कदाचित हीच एक शक्यता असू शकते. हनोख आपला जीव वाचवून पळत असेल, खूप दमला असेल. त्याने दिलेला न्यायाचा संदेश ऐकल्यावर रागाने त्याचे शत्रू त्याचा पाठलाग करत असतील. हानोखला लपण्यासाठी जागा सापडली असेल, पण त्याला माहीत होतं की त्याचे शत्रू त्याला लवकरच शोधून काढतील. मरण त्याला अगदी डोळ्यांपुढे दिसलं असेल. थोडा वेळ विश्रांती घेत असताना त्याने डोळे मिटले आणि देवाकडे प्रार्थना केली. मग त्याला शांत वाटायला लागलं. त्यानंतर त्याला एक दृष्टांत झाला, जो इतकं जिवंत की जणू हनोखला वाटलं तो स्वतः त्या दृष्टांतात आहे.

हनोखला कदाचित भयानक मृत्यूचा सामना करावा लागला असता म्हणून यहोवाने त्याला नेलं

कल्पना करा त्याला कसला दृष्टांतात दिसला असेल. कदाचित एक असं जग, जे त्याला माहीत असलेल्या जगापेक्षा फार वेगळं होतं. ते त्याला एदेनच्या बागेसारखंच वाटलं असेल. फरक इतकाच की तिथं माणसांना अडवण्यासाठी बाहेर करुब नव्हते. त्यात असे लोक होते जे तरुण आणि निरोगी होते. त्यांच्यात शांती नांदत होती. हनोखने अनुभवलेला द्वेष आणि धार्मिक छळ त्याला तिथं जराही दिसत नव्हता. हा दृष्टांत पाहिल्यावर हनोखला जाणवलं, की यहोवाचं प्रेम आणि मर्जी त्याच्यावर आहे व तो त्याला सुरक्षित ठेवेल. अशाच जगात त्याला राहायचं होतं याची त्याला खातरी पटली. हेच त्याचं घर होतं. हळूहळू त्याला शांत वाटू लागलं आणि हनोखचे डोळे बंद होऊ लागले आणि तो गाढ झोपेत गेला म्हणजे मरण पावला.

आजही तो त्याच अवस्थेत आहे. म्हणजे तो मरण पावला असला तरी, यहोवाच्या अमर्याद स्मृतीत झोपलेल्या अवस्थेत आहे! येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे, एक असा दिवस येईल जेव्हा देवाच्या स्मृतीत असलेले सर्व ख्रिस्ताची वाणी ऐकून कबरेतून बाहेर येतील. त्यांच्यासमोर एक सुंदर आणि शांतीपूर्ण नवीन जग असेल.—योहान ५:२८, २९.

तुम्हाला या नवीन जगात जायला आवडेल का? तिथं हनोखला भेटणं किती रोमांचक असेल, आपण त्याच्याकडून किती गोष्टी शिकू यावर विचार करा! त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणांबद्दल आपण जी कल्पना करत आहोत ती किती खरी आहे हे तो आपल्याला सांगू शकेल. पण आपण आजच त्याच्याकडून एक गोष्ट शिकण्याची गरज आहे. हनोखच्या बाबतीत चर्चा केल्यावर पौल पुढे म्हणाला: “विश्वासावाचून त्याला [देवाला] ‘संतोषविणे’ अशक्य आहे.” (इब्री लोकांस ११:६) हनोखने धैऱ्याने जो विश्वास दाखवला त्याचं अनुकरण करण्यासाठी आपल्याकडे किती जबरदस्त कारण आहे!

^ परि. 14 काही बायबलचे विद्वान म्हणतात की यहूदाने ही वचनं, ‘हनोखचे पुस्तक’ या शंकास्पद पुस्तकातून घेतली आहेत. पण त्या पुस्तकात अशा काही कथा आहेत ज्यांना कोणताच शास्त्रीय आधार नाही. ते पुस्तक हनोखने लिहिलं असा चुकीचा समज आहे. त्यात हनोखच्या भविष्यवाणीचा जो अचूक उल्लेख आहे, तो कुठल्यातरी जुन्या लेखातून किंवा एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेल्या माहितीमुळे लिहिला गेला असेल. पण तो कसा लिहिला गेला, हे जाणणं आता आपल्याला शक्य नाही. यहूदाने देखील त्या जुन्या लेखातून किंवा मिळालेल्या माहितीतूनच ही वचनं लिहिली असावी. किंवा त्याने हनोखबद्दल येशूकडून ऐकलं असेल, ज्याने हनोखचं जीवन स्वर्गातून पाहिलं.

^ परि. 20 देवाने मोशे आणि येशू यांच्या शरीराची अवहेलना होऊ नये म्हणून अशाच प्रकारे त्यांची शरीरं नाहीशी केली.—अनुवाद ३४:५, ६; लूक २४:३-६; यहूदा ९.