व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३ चांगल्या लोकांना दुःख का सहन करावं लागतं?

३ चांगल्या लोकांना दुःख का सहन करावं लागतं?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

चांगल्या लोकांना जेव्हा आपण दुःख सहन करताना पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्यांच्यावर अन्याय होत आहे. मग यामुळे असंही वाटू शकतं की चांगलं वागण्यात काहीच अर्थ नाही.

विचार करा

काही लोक असं मानतात की मृत्यू आणि पुनर्जन्माचं चक्र चालूच राहतं. त्यांचं असं म्हणणं आहे, की जे लोक चांगली कामं करतात त्यांना पुढच्या जन्मात चांगलं जीवन मिळतं आणि जे लोक वाईट कामं करतात त्यांना पुढच्या जन्मात दुःख भोगावं लागतं. या शिकवणीनुसार एखाद्या व्यक्‍तीने या जन्मात कितीही चांगली कामं केली, तरी तिला मागच्या जन्मात केलेल्या वाईट कामांची फळं भोगावीच लागतात. पण मग . . .

  • त्या व्यक्‍तीला मागच्या जन्मातलं काहीच आठवत नसेल, तर या जन्मात तिला शिक्षा देऊन काय फायदा?

  • आणि जर मागच्या जन्मात केलेल्या कामांमुळे आपल्याला दुःख भोगावं लागणार असेल, तर मग आज आपल्या तब्येतीची काळजी घेण्यात आणि अपघात टाळण्यात काय अर्थ आहे?

    आणखी जाणून घ्या

    देवाने दुःख का राहू दिलं?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

देव शिक्षा करण्यासाठी दुःख देत नाही.

याउलट, लोक चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यावर समस्या येतात.

“वेगवंतांस धाव व बलवानांस युद्ध साधत नाही, आणि ज्ञान्यांस अन्‍न व बुद्धिमंतांस धन आणि निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.”उपदेशक ९:११, पं.र.भा.

पाप करण्याच्या वृत्तीमुळे आपल्यावर समस्या येतात.

एखाद्या व्यक्‍तीने केलेल्या वाईट कामाला लोक “पाप” समजतात. पण बायबलप्रमाणे पाप हे फक्‍त वाईट कामच नाही, तर ती मानवांमध्ये असलेली एक वृत्ती आहे. आणि आपल्याला वारशाने मिळालेली ही वृत्ती सर्व मानवांमध्ये जन्मापासूनच असते, मग ते चांगले असो किंवा वाईट.

“पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.”स्तोत्र ५१:५.

मानवांवर पापाचे घातक परिणाम झाले आहेत.

वारशाने मिळालेल्या पापामुळे आपण निर्माणकर्त्यापासून दूर गेलो आहोत. त्यासोबतच मानव आणि निसर्ग यांमधला समतोलही बिघडला आहे. आणि म्हणूनच संपूर्ण मानवजातीवर दुःख ओढवलं आहे.

“मला माझ्या बाबतीत हा नियम दिसून येतो: योग्य ते करण्याची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच आढळते.”रोमकर ७:२१.

“सर्व सृष्टी आजपर्यंत कण्हत व दुःख सोसत आहे हे आपल्याला माहीत आहे.”रोमकर ८:२२.