व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय म्हणतं?

चिंता

चिंता

चिंतेचे दोन परिणाम होऊ शकतात. चांगले किंवा वाईट. बायबल आपल्याला दोन्ही परिणाम ओळखायला मदत करतं.

चिंता करणं योग्य आहे का?

वस्तुस्थिती:

चिंता म्हणजे बेचैनी, भीती आणि काळजीची भावना. आजच्या बदलत्या जगात, आपल्याला वेळोवेळी चिंतेमुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो.

बायबल काय म्हणतं?

राजा दाविदाने म्हटलं, “मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दु:ख वागवावे?” (स्तोत्र १३:२) दाविदाला चिंतेचा सामना करायला कशामुळे मदत मिळाली? त्याने देवासमोर प्रार्थनेत, आपलं मन मोकळं केलं आणि त्याच्या निरंतर प्रीतीवर पूर्ण भरवसा ठेवला. (स्तोत्र १३:५; ६२:८) इतकंच काय तर, १ पेत्र ५:७ मध्ये देव असं म्हणतो: माझ्यावर “तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण [मी] तुमची काळजी घेतो.”

आपल्या प्रिय व्यक्तींना मदत केल्यानं त्यांच्याबद्दल असलेल्या चिंता कमी होऊ शकतात

आपण जर व्यावहारिकपणे विचार केला, तर आपल्याला निराश न होता अनेक वेळा यशस्वीपणे चिंतांचा सामना करता येतो. उदाहरणार्थ, बायबलमधील पौल या लेखकाला, “सर्व मंडळ्यांविषयीची चिंता” वाटली. त्याला ज्यांची चिंता होती, त्यांना सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याने खूप मेहनत केली. (२ करिंथकर ११:२८) त्याची ही चिंता चांगल्या प्रकारची होती कारण त्यामुळे त्याला दुसऱ्यांना मदत करण्यासाठी उत्तेजन मिळालं. आपणदेखील अशीच मनोवृत्ती दाखवली पाहिजे. पण याच्या उलट जर आपण इतरांबद्दल सहानुभूती दाखवली नाही, तर त्यावरून हेच दिसून येईल की आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम नाही.—नीतिसूत्रे १७:१७.

“तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पाहा.”फिलिप्पैकर २:४.

तुम्ही अवाजवी चिंता करण्याचं कसं टाळू शकता?

वस्तुस्थिती:

लोक सहसा भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल, भविष्याबद्दल किंवा पैशांबद्दल चिंता करतात. *

बायबल काय म्हणतं?

भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल चिंता: पहिल्या शतकात, ख्रिस्ती बनण्यापूर्वी काही लोक दारूडे, फसवणारे, व्यभिचारी आणि दरोडेखोर होते. (१ करिंथकर ६:९-११) भूतकाळातील चुकांवर विचार करत बसण्यापेक्षा, त्यांनी स्वतःच्या वागण्यामध्ये बदल केला आणि देव नेहमी जी अमर्याद दया दाखवतो त्यावर विश्वास ठेवला. स्तोत्र १३०:४ मध्ये असं म्हटलं आहे: “लोकांनी तुझे [देवाचे] भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.”

भविष्याबद्दल चिंता: येशू म्हणाला, “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:२५, ३४) त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? तुमच्यासमोर आज ज्या चिंता आहेत, फक्त त्यांचाच विचार करा. उद्याचा विचार करून आजच्या चिंतांमध्ये आणखी भर घालू नका. नाहीतर, तुम्ही अविचारीपणे किंवा घाईगडबडीत निर्णय घ्याल. किंवा असंही होऊ शकतं की, तुम्ही विनाकारणच उद्याची चिंता करत होता, असं तुम्हाला नंतर वाटेल.

पैशांबद्दल चिंता: एका बुद्धिमान व्यक्तीने अशी प्रार्थना केली: “दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको.” (नीतिसूत्रे ३०:८) त्याने आहे त्यात समाधानी राहण्यासाठी प्रार्थना केली आणि ही वृत्ती देवालादेखील आवडते. इब्री १३:५ या वचनात आपण वाचतो: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण [देवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” पैशावर आपण भरवसा ठेवू शकत नाही. पण जे देवावर विश्वास ठेवतात आणि आपलं राहणीमान साधं ठेवतात त्यांना तो नेहमी सांभाळतो.

“नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.”स्तोत्र ३७:२५.

आपण कधी चिंतामुक्त होऊ का?

लोक काय म्हणतात?

पत्रकार हॅरियेट ग्रीन यांनी, २००८ मध्ये द गार्डियन या वृत्तपत्रातील आपल्या लेखात असं म्हटलं: “आपण चिंतेच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहोत.” तर २०१४ मध्ये, द वॉल स्ट्रिट जर्नल या वृत्तपत्रात पॅट्रिक ओकॉनर यांनी लिहिलं “अमेरिकेतील लोकांमध्ये चिंतेची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची नोंद केली जात आहे.”

बायबल काय म्हणतं?

“मनुष्याच्या हृदयातील दुःख त्याला वाकवते, परंतु प्रीतीचा एक चांगला शब्द त्याला आनंदित करतो.” (नीतिसूत्रे १२:२५, सुबोध भाषांतर) हा “चांगला शब्द,” आपल्याला खासकरून देवाच्या राज्याच्या सुवार्तेत मिळतो. (मत्तय २४:१४) आपण जे एकट्याने करू शकत नाही ते देवाचे राज्य, म्हणजे त्याचे सरकार लवकरच करणार आहे. आपल्याला ज्यामुळे चिंता वाटते अशा सर्व गोष्टी, म्हणजे अगदी रोगराई आणि मृत्यूसुद्धा ते मुळासकट नष्ट करणार आहे. “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.▪ (g16-E No. 2)

“आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.”रोमकर १५:१३.

^ परि. 10 ज्या लोकांना तीव्र चिंतेमुळे मानसिक त्रास होतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. सावध राहा! नियतकालिक कोणत्याही प्रकारची औषधं किंवा उपचार पद्धती सुचवत नाही.