व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलाखत | यान-डर त्सूव्ह

भ्रूणविज्ञानाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल सांगतो

भ्रूणविज्ञानाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल सांगतो

प्राध्यापक यान-डर त्सूव्ह हे, तायवानच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय पिंगटुंग विद्यापीठात, भ्रूण संशोधनाचे डायरेक्टर आहेत. ते पूर्वी उत्क्रांतीवर विश्वास करायचे पण संशोधक वैज्ञानिक बनल्यावर त्यांचं मत बदललं. का बदललं त्याची कारणं त्यांनी सावध राहा! च्या प्रतिनिधीला सांगितली.

तुमच्याबद्दलची माहिती सांगाल?

सन १९६६ साली माझा जन्म झाला आणि मी तायवानमध्ये लहानाचा मोठा झालो. माझे आईवडील ताओ व बौद्ध हे दोन्ही धर्म मानायचे. आम्ही पूर्वजांची उपासना करायचो व मूर्तींपुढे प्रार्थना करायचो. पण हे संपूर्ण विश्व बनवणारा एक निर्माणकर्ता आहे, हे कधी आम्ही मानलं नाही.

तुम्ही जीवशास्त्राचा अभ्यास का सुरू केला?

मला लहानपणापासूनच प्राणी आवडायचे. त्यांचं आणि लोकांचं दुखणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. मला त्यांचे आजार बरे करायचे होते. काही काळासाठी मी पशुवैद्यकीय औषधांचा आणि नंतर भ्रूणविज्ञानाचा अभ्यास केला. जीवनाची सुरुवात कशी झाली त्याबद्दलची माहिती मला यांतून मिळेल, असं मला वाटायचं.

तेव्हा तुम्ही उत्क्रांतीवर विश्वास का करत होतात?

कारण, विद्यापीठातील प्राध्यापक उत्क्रांतीची शिकवण द्यायचे. सर्व पुरावे उत्क्रांती सिद्ध करतात, असा त्यांचा दावा होता. म्हणून मी उत्क्रांतीवर विश्वास ठेवू लागलो.

तुम्ही बायबल वाचायला सुरू का केलं?

यामागे दोन हेतू होते. माझं म्हणणं होतं, की लोक उपासना करत असलेल्या अनेक देवतांपैकी फक्त एक देव सर्वश्रेष्ठ असायला हवा. पण कोणता देव, हे मला जाणून घ्यायचं होतं आणि दुसरी गोष्ट, बायबलचा पुष्कळ लोक आदर करायचे. म्हणून मीसुद्धा बायबल वर्ग लावले.

सन १९९२ मध्ये मी जेव्हा बेल्जियमच्या कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ लुव्हन येथे शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा मी एका कॅथलिक चर्चमध्ये गेलो आणि तिथल्या पाळकांना, मला बायबल समजायला मदत करा अशी विनंती केली. पण त्यांनी माझी विनंती साफ नाकारली.

मग तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुठं मिळाली?

दोन वर्षांनंतर, मी बेल्जियममध्ये वैज्ञानिक संशोधन करत असताना पोलंड देशातील रूथ नावाच्या एका स्त्रीला भेटलो. ती यहोवाची साक्षीदार होती. देवाविषयी आणखी शिकू इच्छिणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ती चीनी भाषा शिकली होती. रूथशी ओळख झाल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण, माझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मी देवाला तशी प्रार्थना केली होती.

रूथनं मला सांगितलं, की बायबल हे विज्ञानाचं पुस्तक नसलं तरी, ते विज्ञानाशी सुसंगत आहे. जसं की, बायबलचा एक लेखक दावीद यानं देवाला प्रार्थना करताना असं म्हटलं: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.” (स्तोत्र १३९:१६) दाविदाने इथं जे काही म्हटलं ते कवितेच्या रुपात असलं तरी, ते शंभर टक्के बरोबर होतं. शरीराचे अवयव तयार होण्याआधीच त्यांच्या वाढीबद्दलच्या सूचना लिहिलेल्या असतात. बायबल किती अचूक आहे हे पाहून माझी खातरी पटली, की ते देवाचंच वचन आहे. हळूहळू मला माझ्या आणखी एका प्रश्‍नाचं उत्तर मिळालं. ते म्हणजे, एकच खरा देव आहे आणि त्याचं नाव यहोवा आहे! 1

जीवनाची सुरुवात देवानं केली याची खातरी तुम्हाला केव्हा पटली?

वैज्ञानिक संशोधनाचा एक हेतू, आधीपासून असलेल्या कल्पनांना दुजोरा देणं नव्हे तर सत्य शोधणं असतं. भ्रूणविज्ञानाचा मी जसजसा अभ्यास करत गेलो तसतसं माझं मत बदलू लागलं. माझी खातरी पटू लागली, की जीवनाची सुरुवात देवानं केली होती. उदाहरणार्थ, इंजिनियर्स असेंब्ली लाईन्स तयार करतात जेणेकरून एखाद्या मशीनचे भाग क्रमाक्रमाने व योग्य ठिकाणी जोडले जातील. भ्रूण विकाससुद्धा काहीसा असाच पण यापेक्षा आणखी जटील आहे.

भ्रूणाची सुरुवात एका कोशिकेपासून होते, नाही का?

हो अगदी बरोबर. या सूक्ष्म कोशिकेचे विभाजन होत राहते; म्हणजे, एका कोशिकेच्या दोन कोशिका, दोनांच्या चार; चारांच्या आठ असे विभाजन होत राहते. अशा प्रकारे दर १२ ते २४ तासाला कोशिकांची संख्या दुप्पट होत राहते. याच वेळेला स्टेम सेल्स म्हटल्या जाणाऱ्या कोशिका तयार होतात. 2 हे स्टेम सेल्स म्हणजे मूळ कोशिका. हे स्टेम सेल्स, पूर्ण वाढ झालेल्या बाळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही २०० किंवा त्याहूनही अधिक वेगवेगळ्या कोशिका तयार करतात. जसं की, रक्त कोशिका, हाडांच्या कोशिका, शिरांच्या कोशिका वगैरे.

भ्रूण विकासाचा अभ्यास केल्यानंतर माझी खातरी पटली की जीवनाची सुरुवात देवाने केली आहे

योग्य कोशिका, योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीत तयार व्हायला पाहिजेत. सर्वातआधी या कोशिकांच्या पेशी तयार होतात आणि या पेशींचे अवयव व हात-पाय तयार होतात. एका भ्रूणाच्या विकासाच्या सूचना डीएनएमध्ये अगदी अचूक रीत्या लिहिलेल्या असतात. कुठल्याही मानवी इंजिनियरला अशा प्रक्रियेच्या लेखी सूचना तयार करणं अशक्य आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर माझी आणखी खातरी पटते, की जीवनाची सुरुवात देवानेच केली आहे.

तुम्ही यहोवाचे साक्षीदार बनायचा निर्णय का घेतला?

प्रेमामुळं. यहोवाच्या साक्षीदारांत असलेलं प्रेम पाहून मी त्यांच्यातला एक होण्याचा निर्णय घेतला. येशू ख्रिस्ताने म्हटलं: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) यहोवाचे साक्षीदार कुणाबरोबरही पक्षपात करत नाहीत. एखादी व्यक्ती कोणत्या राष्ट्राची, संस्कृतीची आहे, तिचा कोणता रंग आहे, या गोष्टींना ते महत्त्व देत नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना मी जायला लागलो तेव्हा मी त्यांच्यात असलेलं प्रेम खरं आहे, हे पाहू शकलो आणि अनुभवू शकलो.▪ (g16-E No. 2)

^ २. आपल्या ख्रिस्ती विश्वासामुळे प्राध्यापक यान-डर त्सूव्ह संशोधन करताना, आईच्या गर्भात असलेल्या भ्रूणाच्या कोशिकांचा उपयोग करत नाहीत. ते फक्त प्राण्यांच्या गर्भातील पिल्लांच्या कोशिकांचा उपयोग करतात.