व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्त्रियांची सुरक्षा​—याबद्दल देवाला काय वाटतं?

स्त्रियांची सुरक्षा​—याबद्दल देवाला काय वाटतं?

 जगभरात लाखो स्त्रियांचं आणि मुलींचं शोषण केलं जातं आणि त्यांना वाईट वागणूक दिली जाते. तुम्हालाही कधी याचा सामना करावा लागलाय का? तुम्हाला हे जाणून खूप बरं वाटेल, की तुम्ही सुरक्षित राहावं असं देवाला वाटतं. पण त्याला तसं का वाटतं? आणि स्त्रियांना वाईट वागणूक दिली जाते त्याबद्दल तो काय करेल हे जाणून घ्या.

 “मी लहान होते तेव्हा माझा भाऊ मला रोज मारायचा आणि शिव्या द्यायचा. मग लग्न झाल्यानंतर माझी सासूसुद्धा माझा छळ करायची. त्या आणि माझे सासरे मला नोकरासारखे वागवायचे. मला आत्महत्या करावीशी वाटायची.”—मधू, a भारत.

 “जगात सगळीकडेच स्त्रियांवर अत्याचार होतोय,” असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं. या संघटनेनुसार जगातल्या तीनपैकी एका स्त्रीला आपल्या आयुष्यात कधी ना कधी शारीरिक छळाचा किंवा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो.

 जर तुमच्यासोबतही असं झालं असेल तर कदाचित तुम्हाला सुरक्षित वाटणार नाही. फक्‍त स्त्री आहोत म्हणून आपण कुठेही गेलो तरी आपल्याला शिवीगाळ, शारीरिक छळ किंवा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागेल अशी भीती कदाचित तुमच्या मनात राहील. यामुळे तुम्हाला कदाचित वाटेल की बऱ्‍याच लोकांच्या नजरेत ‘स्त्रियांची काहीच किंमत नाही.’ पण देव स्त्रियांबद्दल काय विचार करतो? त्याला तुमची काळजी आहे का?

बायबलमधून समजतं की देवाला स्त्रियांच्या सुरक्षेची काळजीये

स्त्रियांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?

 शास्त्रवचन: “पुरुष आणि स्त्री असं [देवाने] त्यांना निर्माण केलं.”—उत्पत्ती १:२७.

 अर्थ: देवाने पुरुष आणि स्त्री दोघांना बनवलं. म्हणून त्या दोघांनाही आदर मिळायला हवा असं त्याला वाटतं. त्यासोबतच, तो प्रत्येक पतीकडून अपेक्षा करतो, की तो “जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.” त्याने तिच्यावर अधिकार गाजवायचा प्रयत्न करू नये. तसंच, तिच्याशी कठोरपणे बोलू नये किंवा तिचा छळ करू नये. (इफिसकर ५:३३; कलस्सैकर ३:१९) यावरून समजतं की स्त्रियांनी सुरक्षित राहावं असं देवाला वाटतं.

 “लहान असताना माझ्या नातेवाइकांनी माझं लैंगिक शोषण केलं. मग १७ वर्षांची असताना माझ्या बॉसने मला धमकी दिली, की मी जर त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर तो मला नोकरीवरून काढून टाकेल. तसंच, माझा नवरा, आईवडील आणि शेजारी मला तुच्छ लेखायचे. पण नंतर मी आपल्या निर्माणकर्त्याबद्दल, यहोवाबद्दल b शिकले. मला कळलं की यहोवाच्या नजरेत स्त्रियांनाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे मला खातरी पटली, की त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो मला मौल्यवान समजतो.”—मारिया, अर्जेंटिना.

यातून तुम्ही कसं सावरू शकता?

 शास्त्रवचन: “असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.”—नीतिवचनं १८:२४.

 अर्थ: तुम्हाला जवळची वाटणारी व्यक्‍ती तुम्हाला समजून घेईल आणि मदत करेल. तेव्हा तिला आपल्या मनातलं सांगितल्यामुळे जर तुमचं मन हलकं होणार असेल तर तिच्याशी नक्की बोला.

 “माझं लैंगिक शोषण झालंय हे मी २० वर्षांपर्यंत कोणालाच सांगितलं नाही. यामुळे मी दुःखी, निराश आणि चिंतेत असायचे. पण माझं ऐकून घ्यायला तयार असलेल्या एका व्यक्‍तीसोबत मी जेव्हा बोलले, तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं.”—एलीफ, टर्की.

 शास्त्रवचन: “आपल्या सगळ्या चिंता [देवावर] टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.

 अर्थ: जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा तो खरंच ऐकतो. (स्तोत्र ५५:२२; ६५:२) त्याला तुमची काळजी असल्यामुळे तुम्ही किती मौल्यवान आहात हे तो तुम्हाला समजायला मदत करेल.

 “यहोवाबद्दल शिकल्यामुळे माझ्या मनावर झालेल्या खोल जखमा बऱ्‍या व्हायला मदत झाली. आता मी प्रार्थनेत यहोवाला मनातलं सगळंकाही सांगू शकते. तो माझ्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेणाऱ्‍या मित्रासारखा आहे.”—ॲना, बेलीझ.

स्त्रियांविरुद्ध होणारा अत्याचार देव कधी नाहीसा करेल का?

 शास्त्रवचन: “हे यहोवा तू . . . अनाथांना आणि चिरडलेल्यांना न्याय देशील, म्हणजे यापुढे पृथ्वीवरचा तुच्छ मानव त्यांना घाबरवू शकणार नाही.”स्तोत्र १०:१७, १८.

 अर्थ: देव सगळ्या अन्यायाचा, तसंच स्त्रियांवर होणाऱ्‍या अत्याचारांचा आणि हिंसेचा लवकरच अंत करेल.

 “यहोवा लवकरच स्त्रियांविरुद्ध आणि मुलींविरुद्ध होणारा अत्याचार थांबवेल हे मला समजलं, तेव्हा मला वाटलं की त्याने जणू माझ्या जखमांवर फुंकर घातलीये. यामुळे मला खरंच मनाची शांती मिळाली आहे.”—रॉबर्टा, मेक्सिको.

 बायबलमध्ये कोणती आशा दिली आहे? त्यात दिलेल्या अभिवचनांवर तुम्ही का भरवसा ठेवू शकता? आणि यहोवाचे साक्षीदार आज बायबलमधून सांत्वन कसं देत आहेत? या प्रश्‍नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील, तर ज्यांनी तुम्हाला ही माहिती दाखवली त्यांनी तुमच्यासोबत मोफत चर्चा करावी यासाठी विनंती करा.

 हा लेख डाऊनलोड करा.

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा दिलं आहे. (स्तोत्र ८३:१८) “देव कोण आहे?” हा कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला धडा ०४ पाहा