व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २

एकमेकांना विश्वासू राहा

एकमेकांना विश्वासू राहा

“देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.”—मार्क १०:९

“विश्वासघाताने वागू नका,” अशी आज्ञा यहोवा आपल्याला देतो. (मलाखी २:१६) पती-पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण जेथे विश्वासूपणा नाही, तेथे भरवसा नाही. प्रेमाची वीण अधिकाधिक घट्ट होण्यासाठी भरवसा असणे खूप महत्त्वाचे आहे.

आज वैवाहिक जीवनातील विश्वासाला तडा जात आहे. तुमच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून तुम्ही ठामपणे दोन गोष्टी केल्या पाहिजेत.

१ तुमच्या विवाहाला महत्त्व द्या

बायबल काय म्हणते: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे.” (फिलिप्पैकर १:१०) तुमचा विवाह, तुमच्या जीवनातील “श्रेष्ठ” किंवा महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. तेव्हा, त्यास तुम्ही महत्त्व दिलेच पाहिजे.

तुम्ही तुमच्या सोबत्याला महत्त्व द्यावे आणि दोघांनी “सुखाने” आयुष्य जगावे अशी यहोवाची इच्छा आहे. (उपदेशक ९:९) तो स्पष्टपणे सांगतो, की तुम्ही तुमच्या सोबत्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये, तर एकमेकांना आनंदी कसे ठेवता येईल याचा दोघांनीही नेहमी विचार करावा. (१ करिंथकर १०:२४) आपल्या सोबत्याला आपली गरज आहे व तो आपली कदर करतो हे त्याला जाणवले पाहिजे.

तुम्ही काय करू शकता:

  • नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा; यामुळे तुम्ही खास तुमच्या सोबत्यासाठी वेळ काढता हे त्याला जाणवेल

  • “तुझं-माझं” करू नका, तर “आपण, आपलं” असा विचार करा

२ आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा

बायबल काय म्हणते: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) एक व्यक्ती सतत अनैतिक गोष्टींचा विचार करत असेल, तर एका अर्थी ती आपल्या विवाहसोबत्याला धोका देत असते.

यहोवा म्हणतो की आपण आपल्या “अंतःकरणाचे विशेष रक्षण” केले पाहिजे. (नीतिसूत्रे ४:२३; यिर्मया १७:९) तुम्हाला हे कसे करता येईल? तुम्ही काय पाहता त्याकडे लक्ष द्या. (मत्तय ५:२९, ३०) या बाबतीत कुलप्रमुख ईयोबाने जे उदाहरण मांडले त्याचे अनुकरण करा. ईयोबाने आपल्या डोळ्यांशी करार केला होता, की तो कधीच कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही. (ईयोब ३१:१) तेव्हा, कधीही पोर्नोग्राफी अर्थात अश्‍लील चित्रे न पाहण्याचा निर्धार करा. तसेच, तुमच्या सोबत्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रेमसंबंध न जोडण्याचा निश्चय करा.

तुम्ही काय करू शकता:

  • इतरांना जाणीव करून द्या, की तुम्ही विवाहित आहात आणि तुमच्या सोबत्यावर तुमचे जिवापाड प्रेम आहे

  • तुमच्या सोबत्याच्या भावना समजून घ्या आणि एखाद्या संबंधामुळे त्याला असुरक्षित वाटत असेल तर तो संबंध लगेच तोडून टाका