व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

एकमेकांना दिलेल्या वचनाची नेहमी आठवण ठेवा

एकमेकांना दिलेल्या वचनाची नेहमी आठवण ठेवा

इतकं कठीण का?

‘मी तुझी साथ कधीच सोडणार नाही,’ ‘येईल त्या परिस्थितीवर आपण दोघंही मात करू’ असं वचन तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी एकमेकांना दिलं होतं. याच निश्चयानं तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास सुरू केला होता.

पण अनेक वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या प्रवासादरम्यान तुमच्यातील वादांमुळं, एकमेकांना दिलेल्या वचनाचा विसर पडत चालल्याचं तुम्हाला जाणवतंय. नवीनच लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही हे वचन जसं पाळत होता तसं आताही पाळण्यासाठी काय करता येईल?

वचन देण्याबद्दल काय माहीत असलं पाहिजे?

वचन देणं हे तुमच्या विवाहाची नौका स्थिर ठेवणारा नांगर आहे

वचन दिल्यानं समस्या वाढत नाहीत तर त्या सोडवता येतात. पुष्कळ लोक आज वचन द्यायला कचरतात. त्यांच्या मते, वचन देणं म्हणजे पायात बेड्या घालणं. वचन देऊन आपण जीवनातला सर्वात चुकीचा निर्णय घेतोय, असं त्यांना वाटतं. पण असा विचार करणं योग्य नाही. त्याऐवजी तुम्ही असा विचार करू शकता, की किनाऱ्यावर नांगर टाकल्यामुळं जशी एक नौका स्थिर राहते तसंच वचन दिल्यामुळं तुमचा विवाह कोणत्याही प्रकारच्या वादळात स्थिर राहू शकतो. मेघा * नावाची एक पत्नी म्हणते: “आमच्यात कितीही कडाक्याचे वाद झाले तरी, आम्ही एकमेकांची साथ सोडणार नाही, हा भरवसा आम्हा दोघांना असतो.” * तुमच्या दोघांत काही विषयांवर एकमत होत नसलं तरी, तुमच्या विवाहाला मात्र काही धोका नाही, या भरवशानं तुम्ही येणाऱ्या समस्यांवर मात कराल.—“ वचनाची आठवण आणि एकनिष्ठा” हा चौकोन पाहा.

महत्त्वाची गोष्ट: तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर, लग्नाच्या वेळी तुम्ही एकमेकांना दिलेल्या वचनाबद्दल पस्तावा करण्याऐवजी त्याची आठवण करण्याची हीच वेळ आहे, असे समजा. हे तुम्ही कसं करू शकता?

तुम्ही काय करू शकता?

तुमच्या दृष्टिकोनाचं परीक्षण करा. “लग्नाच्या बंधनात अडकणं” हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. यावरून तुमच्या मनात लगेच, पायांत बेड्या पडल्याचं चित्र येतं की सुरक्षिततेची भावना येते? लग्नात समस्या येतात तेव्हा सोडून जाण्याचा पर्याय तुम्हाला योग्य व सोपा वाटतो का? लग्नाच्या वेळी तुम्ही एकमेकांना दिलेल्या वचनाची सतत आठवण ठेवली तर, लग्न हे कायमचं मीलन आहे, असा तुम्ही विचार कराल.—बायबलचं तत्त्व: मत्तय १९:६.

तुमच्या पार्श्वभूमीचं परीक्षण करा. लग्नाच्या वेळी घेतलेल्या वचनाबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनावर कदाचित तुमच्या पालकांमध्ये तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या होत्या त्यांचा प्रभाव पडला असेल. लिना नावाची एक पत्नी म्हणते: “मी लहानाची मोठी होत असताना माझ्या आईबाबांचा घटस्फोट होऊन ते वेगळे झाले. त्यामुळं माझ्या मनावर कदाचित त्यांच्या या उदाहरणाचा नकारात्मक परिणाम झाला असावा.” पण, तुमच्या आईवडिलांच्या बाबतीत जे झालं ते तुमच्याही बाबतीत होईलंच असं नाही. त्यांच्या हातून झालेल्या चुकांतून तुम्ही धडा शिकू शकता.—बायबल तत्त्व: गलतीकर ६:४, ५.

तुम्ही जे बोलता त्याचं परीक्षण करा. तुमच्या दोघांत कडाक्याचं भांडण चालतं तेव्हा, असं काही बोलू नका ज्याचा तुम्हाला नंतर पस्तावा होईल. “मी सोडून चाललो!/मी सोडून चालले!” किंवा “तुला माझी मुळीच किंमत नाही,” असं बोलायचं टाळा. कारण असं बोलल्यामुळं, एकमेकांना दिलेल्या वचनाची तुम्हाला आठवण तर होणार नाहीच उलट तुम्ही एकमेकांच्या मनावर अनेक घाव कराल. एकमेकांच्या मनावर हल्ला करण्याऐवजी समस्येवर हल्ला करा. तुम्ही म्हणू शकता: “आपण दोघंही आता जाम चिडलेलो आहोत. तेव्हा ही समस्या सोडवण्यासाठी आपण दोघं काही करू शकतो का ते पाहूयात.”—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १२:१८.

दिलेल्या वचनाची तुम्हाला आठवण आहे याचे स्पष्ट ‘संकेत’ द्या. कामाच्या ठिकाणी टेबलावर आपल्या सोबत्याचा फोटो ठेवा. इतरांशी बोलताना आपल्या लग्नाच्या चांगल्या गोष्टी बोला. तुम्ही जर दूर कुठं गेला असाल तर तुमच्या सोबत्याच्या सतत संपर्कात राहा. बोलताना, “आम्ही दोघं असं करू” “आम्ही दोघं तसं करू” असं बोला. तुमच्या बोलण्यावरून इतरांना आणि तुम्हालादेखील जाणवेल, की लग्नाच्या वेळी दिलेल्या वचनाची तुम्हाला अजूनही आठवण आहे.

अनेक वर्षांपासून एकमेकांशी विश्वासू राहिलेल्या विवाह जोडीदारांकडून शिका. चार पावसाळे बघितलेल्या जोडप्यांकडून शिका. त्यांना विचारा: “वचनाची आठवण ठेवता म्हणजे नेमकं काय करता आणि यामुळं तुम्हाला काय फायदा झाला आहे?” बायबलमध्ये म्हटलं आहे: “जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, तसे एक माणूस दुसऱ्याच्या बुद्धीला उत्तेजन देतो.” (नीतिसूत्रे २७:१७, सुबोधभाषांतर) या वचनातील तत्त्वानुसार, या अनुभवी जोडप्यानं दिलेल्या सल्ल्याचं पालन करून तुम्ही लाभ मिळवू शकता. ▪ (g15-E 06)

^ परि. 7 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 7 बायबलनुसार, विवाह सोबत्यापैकी एकानं लैंगिक अनैतिक कृत्य केलं असेल तर निरपराध सोबती त्यांचं वैवाहिक बंधन संपुष्टात आणू शकतो. देवाच्या प्रेमात टिकून राहा पुस्तकाच्या पृष्ठे २५१-२५३ वरील “घटस्फोट आणि विभक्ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन” परिशिष्ट पाहा.