व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६

बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो?

बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो?

“संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे.”—स्तोत्र १२७:३

बाळाचा जन्म हा एका जोडप्यासाठी अत्यंत आनंदाचा प्रसंग असतो. पण, त्यासोबत त्यांच्यावर एक मोठी जबाबदारीही येते. नव्यानेच आई-वडील झाल्यामुळे बाळाची काळजी घेण्यात तुमचा किती वेळ खर्च होतो आणि किती श्रम घ्यावे लागतात हे पाहून तुम्ही स्वतःच चकित व्हाल. अपुरी झोप आणि त्यासोबत होणाऱ्या भावनात्मक बदलांमुळे तुमच्या नातेसंबंधात ताण निर्माण होऊ शकतो. तेव्हा, बाळाची काळजी घेण्यासाठी आणि आपले वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी तुम्हा दोघांनाही तडजोडी कराव्या लागतील. असे करण्यासाठी बायबलचा सल्ला तुम्हाला कसा मदत करू शकतो?

१ बाळाच्या येण्यामुळे होणारे बदल समजून घ्या

बायबल काय म्हणते: “प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे.” तसेच, “ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५, ईझी-टू-रीड व्हर्शन) नव्यानेच आई झाल्यामुळे साहजिकच तुमचे सगळे लक्ष तुमच्या बाळावरच असेल. पण, यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असे पतीला वाटू शकते. तेव्हा, त्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे हे विसरू नका. तुम्हाला त्याची गरज आहे आणि तोसुद्धा बाळाची काळजी घेऊ शकतो हे समजण्यास तुम्ही सहनशीलतेने व दयाळूपणे त्याला मदत करू शकता.

बायबल म्हणते: “पतींनो, . . . आपल्या पत्नींना समजून घेण्याचा प्रयत्न करा.” (१ पेत्र ३:७, सुबोधभाषांतर) तुमच्या पत्नीची बरीच शक्ती बाळाची काळजी घेण्यात खर्च होईल हे समजून घ्या. तिच्यावर आलेल्या नवीन जबाबदाऱ्यांमुळे कदाचित तिला ताण येत असेल, तिची दमछाक होत असेल किंवा ती खचून जात असेल. काही वेळा कदाचित ती तुमच्यावर चिडेलही. पण, अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण बायबल असे म्हणते की, “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय.” (नीतिसूत्रे १६:३२) तेव्हा, तिच्या भावना समजून घ्या व तिला आवश्यक तो आधार द्या.—नीतिसूत्रे १४:२९.

तुम्ही काय करू शकता:

  • वडील: बाळाची काळजी घेण्यास पत्नीला मदत करा, अगदी रात्रीच्या वेळीसुद्धा. तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत व बाळासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून इतर कामांतून वेळ काढा

  • आई: पती बाळाची काळजी घेण्याची इच्छा दाखवतो तेव्हा त्याची मदत स्वीकारा. बाळाची काळजी घेताना एखादे काम त्याला नीट करता येत नसेल तर त्याची टीका करू नका. ते काम कसे करावे हे प्रेमळपणे त्याला समजावून सांगा

२ तुमचे नाते मजबूत करा

बायबल काय म्हणते: “ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ति २:२४) कुटुंबात नवीन सदस्याची भर पडली तरी तुम्ही आणि तुमचा सोबती “एकदेह” आहात हे विसरू नका. त्यामुळे, आपले नाते मजबूत करण्यासाठी होईल तितका प्रयत्न करा.

पत्नींनो, तुमचा पती तुम्हाला जी काही मदत करतो, जो आधार देतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या शब्दांतून त्याला प्रोत्साहन देत राहा. (नीतिसूत्रे १२:१८) पतींनो, तुमचे तुमच्या पत्नीवर किती प्रेम आहे आणि तुम्ही तिची किती कदर करता हे शब्दांतून व्यक्त करा. कुटुंबासाठी ती जे काही करते त्याबद्दल तिची प्रशंसा करा.—नीतिसूत्रे ३१:१०, २८.

बायबल म्हणते: “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे.” (१ करिंथकर १०:२४) आपल्या सोबत्यासाठी नेहमी चांगल्या गोष्टी करा. पती-पत्नी या नात्याने एकमेकांशी बोलण्यासाठी, एकमेकांची प्रशंसा करण्यासाठी आणि एकमेकांचे ऐकण्यासाठी वेळ द्या. लैंगिक संबंधाचा प्रश्न येतो तेव्हा निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवा. तुमच्या सोबत्याच्या गरजा लक्षात घ्या. बायबलमध्ये म्हटले आहे, की पती-पत्नीने शरीरसुखाच्या बाबतीत “परस्पर” संमतीशिवाय एकमेकांकडे दुर्लक्ष करू नये. (१ करिंथकर ७:३-५) तेव्हा, याविषयी आपसात मनमोकळेपणाने बोला. धीर व समंजसपणा दाखवल्याने तुमचे नाते आणखी घट्ट होईल.

तुम्ही काय करू शकता:

  • एकमेकांसाठी वेळ काढण्याचे विसरू नका

  • तुमचे तुमच्या सोबत्यावर प्रेम आहे हे छोट्या-छोट्या गोष्टींमधून दाखवा; जसे की, एकमेकांसाठी प्रेमाचे दोन शब्द लिहिणे किंवा एकमेकांना छोटीशी भेटवस्तू देणे

३ बाळाला देवाविषयी शिकवा

बायबल काय म्हणते: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते . . . तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१५) बाळाला शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल ते ठरवा. जन्माआधीच बाळात शिकण्याची विलक्षण क्षमता असते. आईच्या उदरात असते तेव्हापासूनच ते तुमचा आवाज ओळखू शकते व तुमच्या भावनांना प्रतिसाद देऊ शकते. तेव्हा, बालपणापासूनच त्याच्यासाठी वाचा. तुम्ही जे काही वाचून दाखवाल ते त्याला समजत नसले तरी यामुळे पुढे त्याला वाचनाची गोडी लागू शकते.

तसेच, देवाबद्दल बोलत राहा. ‘देवाविषयी बोललेलं बाळाला काय कळणार?’ असा विचार करू नका. (अनुवाद ११:१९) देवाने सगळे काही कसे बनवले हे त्याच्याशी खेळता-खेळता त्याला सांगा. (स्तोत्र ७८:३, ४) याशिवाय, मोठ्याने प्रार्थना करा जेणेकरून ते ऐकू शकेल. बाळ जसजसे मोठे होत जाईल तसतसे त्याच्या लक्षात येईल की यहोवावर तुमचे खूप प्रेम आहे आणि त्यामुळे तेही यहोवावर प्रेम करायला शिकेल.

तुम्ही काय करू शकता:

  • बाळाला चांगले शिक्षण देता यावे म्हणून बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करा

  • बाळाने ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे तुम्हाला वाटते त्या वारंवार बोला; यामुळे कोवळ्या वयापासूनच तो शिकू शकेल