व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा . . .

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा . . .

“तुम्ही उल्हास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले.”—१ पेत्र १:६

बायबल म्हणते की, “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) त्यामुळे तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी राहावे म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करत असला, तरी एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे जीवनातील आनंद टिकवून ठेवणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. अशा वेळी देव प्रेमळपणे आपली मदत करतो. पुढील बायबल तत्त्वांचे पालन केल्यास, तुम्ही व तुमचे कुटुंब कोणत्याही, अगदी मोठ्यांतल्या मोठ्या समस्यांचाही सामना करू शकेल.

१ यहोवावर विसंबून राहा

बायबल काय म्हणते: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्यावर ज्या परीक्षा येतात त्यांसाठी देव जबाबदार नाही. (याकोब १:१३) देवासोबतचा तुमचा नातेसंबंध जितका मजबूत होईल तितकी अधिक तो तुम्हाला मदत करेल. (यशया ४१:१०) तेव्हा, “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा.”—स्तोत्र ६२:८.

तसेच, बायबलचे दररोज वाचन करा व त्याचा अभ्यास करा. असे केल्याने यहोवा “सर्व संकटांत” कसे “सांत्वन करतो” याचा अनुभव तुम्हाला येईल. (२ करिंथकर १:३, ४; रोमकर १५:४) शिवाय, त्याने असेही अभिवचन दिले आहे, की तो तुम्हाला “बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली . . . शांती” देईल.—फिलिप्पैकर ४:६, ७, १३.

तुम्ही काय करू शकता:

  • शांत राहण्यास व सरळ विचार करण्यास यहोवाकडे मदत मागा

  • तुमच्याजवळ जे काही पर्याय आहेत ते पुन्हा एकदा विचारात घ्या; आणि त्यांपैकी सगळ्यात उत्तम पर्याय निवडा

२ स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

बायबल काय म्हणते: “सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.” (नीतिसूत्रे १८:१५) तेव्हा आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक सदस्याच्या गरजा काय आहेत ते विचारात घ्या. त्यांच्याशी बोला व त्यांचे बोलणेही ऐकून घ्या.—नीतिसूत्रे २०:५.

तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही काय करू शकता? तुमच्या भावना व्यक्त करण्यास कचरू नका. लक्षात असू द्या, की येशूदेखील “रडला.” (योहान ११:३५; उपदेशक ३:४) शिवाय, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप व विश्रांती घेणे. (मार्क ६:३१) या सर्व गोष्टींमुळे तुम्ही दुःखदायक परिस्थितीचा सहजपणे सामना करू शकाल.

तुम्ही काय करू शकता:

  • कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधण्याची सवय लावा. यामुळे, पुढे एखादी समस्या उद्भवली तर ते त्याविषयी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील

  • ज्यांनी तुमच्यासारख्याच समस्यांचा सामना केला आहे अशांशी बोला

३ हवी असलेली मदत मिळवा

बायबल काय म्हणते: खरा “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला मदत करायची इच्छा असेल, पण कशी करावी हे कदाचित त्यांना कळत नसेल. तेव्हा, नेमकी कशाची गरज आहे हे सांगण्यास कचरू नका. (नीतिसूत्रे १२:२५) शिवाय, जे बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगतात अशांकडून आध्यात्मिक मदत घ्या. ते बायबलमधून जे काही मार्गदर्शन देतील त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.—याकोब ५:१४.

मनापासून देवावर विश्वास ठेवणाऱ्या व त्याच्या अभिवचनांवर भरवसा बाळगणाऱ्या लोकांसोबत नियमितपणे सहवास राखला, तर तुम्हाला आवश्यक तो आधार मिळेल. तसेच, ज्यांना उत्तेजनाची गरज आहे अशांना मदत केल्यानेही तुम्हाला खूप सांत्वन मिळेल. तेव्हा, यहोवावर व त्याच्या अभिवचनांवर असलेल्या तुमच्या विश्वासाबद्दल त्यांना सांगा. इतरांना मदत करण्यात व्यस्त राहा आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व तुमची काळजी करणाऱ्या लोकांपासून दूर राहू नका.—नीतिसूत्रे १८:१; १ करिंथकर १५:५८.

तुम्ही काय करू शकता:

  • तुमच्या जवळच्या एका मित्राशी बोला आणि त्याची मदत स्वीकारा

  • तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे ते स्पष्टपणे व प्रामाणिकपणे सांगा