व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लग्नाच्या पहिल्या वर्षी तग धरून राहणे

लग्नाच्या पहिल्या वर्षी तग धरून राहणे

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

लग्नाच्या पहिल्या वर्षी तग धरून राहणे

तो: “आमच्या दोघांचा स्वभाव इतका भिन्‍न असेल, असं मला वाटलं नव्हतं! जसं की, मला सकाळी लवकर उठायला आवडतं, पण तिला उशिरा. तिचा मूड सतत बदलत असतो, तिच्याबरोबर कसं वागायचं तेच मला कळत नाही. मी जेव्हा जेवण बनवतो तेव्हा तर, तिची सतत किटकिट चालू असते; आणि स्वयंपाकघरातल्या टॉवेलला हात पुसला की मग विचारूच नका.”

ती: “माझ्या नवऱ्‍याच्या तोंडून, तोलून-मापून शब्द बाहेर पडतात. पण मला तर बोलके लोक आवडतात; आमच्या घरात सगळे बोलके होते. आम्ही खूप बोलायचो, खासकरून जेवतेवेळी. माझा नवरा स्वयंपाक करत असतो तेव्हा तो भांडी पुसायला आणि हात पुसायला एकच कापड वापरतो. ते पाहून माझं डोकचं फिरतं. पुरुषांना समजून घेणं इतकं कठीण का असतं? काही लोकांचं लग्न इतकी वर्षं कसं काय टिकून राहतं बरं?”

तुम्ही नवविवाहित आहात का? मग तुम्हालाही वरील अनुभव आलेत का? लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकांना भेटायचा तेव्हा सगळे किती चांगले होते, आणि हे अचानक तुमच्या जोडीदारात इतके दुर्गुण, इतका वेडेपणा आता कोठून आला असावा, असा प्रश्‍न तुमच्या मनात येतो का? ‘जे विवाह करतात त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या अनेक समस्यांचा’ परिणाम तुम्ही कसा कमी करू शकाल?—१ करिंथकर ७:२८, सुबोध भाषांतर.

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही दोघांनी विवाहाच्या शपथा घेतल्या याचा अर्थ, तुम्ही दोघेही लगेच वैवाहिक जीवनात निपुण झालात, असा होत नाही. लग्नाआधी कदाचित तुमच्याकडे काही मौल्यवान कलाकौशल्ये असतील आणि तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटत होता तेव्हा ही कौशल्ये काही अंशी सुधारली असतील. पण, लग्नानंतर तुमच्या या कौशल्यांची नवनवीन मार्गांनी खरी परीक्षा होत असते. लग्नानंतर तुम्हाला कदाचित आणखी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. असे करत असताना तुमच्या हातून चुका होतील का? अर्थातच. तुम्हाला लागणारी कौशल्ये तुम्ही मिळवू शकाल का? निश्‍चित्तच!

कोणतेही कौशल्य सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, त्या विषयात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्‍तीला सल्ला विचारणे आणि मग तो सल्ला आपल्या जीवनात लागू करणे. वैवाहिक जीवनाविषयीचा सर्वोत्कृष्ट सल्ला केवळ यहोवा देव देऊ शकतो. कारण त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे, आणि त्यानेच आपल्यामध्ये लग्न करण्याची इच्छाही घातली आहे. (उत्पत्ति २:२२-२४) तेव्हा वैवाहिक जीवनात येणाऱ्‍या समस्यांवर तुम्ही मात कशी करू शकाल त्याबद्दलची मदत व लग्नाचे पहिले वर्ष सुखरूप पार करून लग्न टिकवून ठेवण्याकरता तुम्हाला लागणारी कौशल्ये किंवा मार्ग यहोवा देवाने त्याचे वचन बायबल यात दिले आहेत.

मार्ग १. एकमेकांची मते विचारात घेण्यास शिका

समस्या केजी * जपानमध्ये राहतो. आपण घेतलेल्या निर्णयांचा आपल्या बायकोला त्रास होतो, हे तो कधीकधी विसरून जायचा. “बायकोला न विचारता मी परस्परच, लोकांनी दिलेली आमंत्रणे स्वीकारायचो. नंतर मला समजायचं, की तिला या आमंत्रणांना यायला जमायचं नाही,” असे तो म्हणतो. ऑस्ट्रेलियाचा ॲलन म्हणतो: “मला वाटायचं, की मी पुरुष आहे तर निर्णय घेताना बायकोला काय विचारायचं.” त्याचे असे विचार होते, कारण त्याच्या घरात असेच चालायचे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्‍या डायानची देखील काहीशी हीच समस्या होती. ती म्हणते: “माझ्या माहेरी आम्ही एकमेकांना विचारूनच कामं करायचो. त्यामुळे लग्न झाल्यावरही, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मी माझ्या नवऱ्‍याऐवजी माझ्या घरच्यांना विचारायचे.”

तोडगा यहोवा देवाच्या नजरेत लग्न झालेले पती-पत्नी “एकदेह” आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. (मत्तय १९:३-६) त्याच्या मते, नवरा-बायकोचा संबंध इतर कोणत्याही नातेसंबंधांपेक्षा, मग तो तुमच्या कुटुंबासोबतचा असो वा तुमच्या निकट मित्रांसोबतचा असो, जास्त महत्त्वाचा आहे. हा नातेसंबंध मजबूत राहावा म्हणून त्यांच्यात सुसंवाद हा हवाच!

यहोवा देवाने त्याचा सेवक अब्राहाम याच्याबरोबर संवाद कसा केला त्याचे परीक्षण करून पती व पत्नी पुष्कळ गोष्टी शिकू शकतात. जसे की, त्यांच्यात झालेल्या या चर्चेचा अहवाल तुम्ही बायबलमधील उत्पत्ति १८:१७-३३ येथे वाचू शकता. यहोवाने अब्राहामाला तीन मार्गांनी सन्मानित केले. (१) यहोवाने त्याला आपला मनसुबा कळवला. (२) अब्राहाम जेव्हा आपले मत व्यक्‍त करत होता तेव्हा यहोवाने त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकले. (३) अब्राहामाची मागणी पूर्ण करण्याकरता यहोवा होता होईल तितके आपल्या मार्गात फेरफार करण्यास तयार झाला. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराशी विचारविनिमय करताना यहोवा देवाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकाल?

हे करून पाहा: तुमच्या जोडीदारावर परिणाम होऊ शकणाऱ्‍या गोष्टींची चर्चा करताना, (१) अमूक परिस्थिती तुम्ही कशी हाताळू इच्छिता ते समजावून सांगा, पण तुमचे विचार निर्वाणीच्या भाषेत किंवा अंतिम निर्णय असल्याप्रमाणे नव्हे तर, तुम्ही काहीतरी सुचवत आहात अशा आविर्भावात मांडा; (२) आपल्या जोडीदाराचे मत विचारा, त्याचा/तिचा दृष्टिकोन वेगळा असेल, हे मान्य करा; आणि (३) शक्य असते तेव्हा तेव्हा तुमच्या जोडीदाराचे मत मान्य करून त्याला/तिला तुमचा ‘समजूतदारपणा दिसू द्या.’—फिलिप्पैकर ४:५, सुबोध भाषांतर.

मार्ग २. व्यवहारकुशल बनण्यास शिका

समस्या तुम्ही लहानाचे मोठे झालात त्या कौटुंबिक वातावरणामुळे किंवा तुमच्या संस्कृतीमुळे तुम्हाला तुमची मते अगदी ठामपणे व इतरांच्या मनाचा विचार न करता व्यक्‍त करण्याची कदाचित सवय असेल. जसे की, युरोपमध्ये राहणारा लिआम म्हणतो: “मी ज्या ठिकाणचा आहे तेथील लोक अगदी तोंडावर बोलतात. मलाही तशीच सवय होती. यामुळे माझ्या बायकोला पुष्कळदा वाईट वाटायचं. मला नरमाईने बोलायला शिकावं लागलं.”

तोडगा लग्नाआधी तुम्हाला जशी बोलायची सवय होती, तशीच लग्नानंतरही चालू ठेवलेली तुमच्या जोडीदाराला आवडेल, असा ग्रह करून घेऊ नका. (फिलिप्पैकर २:३, ४) प्रेषित पौलाने पूर्ण-वेळ देवाची सेवा करणाऱ्‍या एका सेवकाला जो सल्ला दिला होता तो सल्ला नवविवाहितांनाही उपयुक्‍त आहे. त्याने म्हटले होते: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे. “सौम्य” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या मूळ ग्रीक शब्दाचा अनुवाद, “व्यवहारकुशल” असाही करता येतो. (२ तीमथ्य २:२४) व्यवहारकुशलता या शब्दाचा अर्थ, परिस्थितीचा नाजूकपणा ओळखून, कोणाचेही मन न दुखावता दयेने वागण्याची कुवत, असा होतो.

हे करून पाहा: समजा तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा राग आला आहे. अशा वेळी तुम्ही त्याच्याबरोबर कसे बोलाल? तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राबरोबर किंवा तुमच्या कंपनीच्या मालकाबरोबर बोलताना तुमचा जसा आवाज असतो, किंवा तुम्ही जे शब्द वापरता त्याच आवाजात किंवा तेच शब्द तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बोलताना वापराल का? आणि आता, तुमच्या मित्रापेक्षा किंवा मालकापेक्षा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आणखी आदराने व व्यवहारकुशलतेने का बोलले पाहिजे त्या कारणांवर विचार करा.—कलस्सैकर ४:६.

मार्ग ३. नव्या भूमिकेनुसार स्वतःला जुळवून घ्या

समस्या सुरुवातीला पती कदाचित कुटुंबातील त्याची प्रमुख जबाबदारी, बेजबाबदारपणे हाताळेल किंवा पत्नीला जर काही सुचवायचे असेल तर ते बेधडकपणे बोलून दाखवण्याची तिला सवय असेल. इटलीत राहणारा ॲन्टोनियो म्हणतो: “कुटुंबात निर्णय घेताना माझ्या वडिलांनी कधीच माझ्या आईला काही विचारून केले नाही. त्यामुळे मीही माझ्या घरात एखाद्या हुकूमशहासारखाच वागायचो.” कॅनडात राहणारी डेबी म्हणते: “माझ्या नवऱ्‍यानं टाप-टीप असलं पाहिजे, यावर मी खूप जोर द्यायचे. पण माझ्या या शिरजोरीपणामुळं तो आणखीनच निगरगट्ट बनत चालल्याचं मला जाणवू लागलं.”

पतीसाठी तोडगा बायबलमध्ये पत्नीने पतीच्या अधीन राहिले पाहिजे असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ काही पती, जसे एक मूल आपल्या आईवडिलांच्या अधीन असते त्याप्रमाणे पत्नीने अधीनता दाखवली पाहिजे, असे समजतात. (कलस्सैकर ३:२०; १ पेत्र ३:१) पण बायबलमध्ये तर पतींना असे सांगितले आहे, की त्यांनी ‘आपल्या बायकोशी जडून राहिले पाहिजे व ते दोघे एकदेह होतील.’ पालक आणि मुलांच्याबाबतीत ते असे म्हणत नाही. (मत्तय १९:५) पत्नी ही तिच्या पतीची साहाय्यक किंवा मदतनीस आहे असे यहोवा म्हणतो. (उत्पत्ति २:१८) मुलांचा उल्लेख त्याने कधीही, पालकाचा साहाय्यक किंवा मदतनीस म्हणून केला नाही. तुम्हाला काय वाटते, पती जर त्याच्या पत्नीला एखाद्या मुलाप्रमाणे वागवत असेल तर तो वैवाहिक व्यवस्थेचा आदर करतो का?

उलट, येशू जसे ख्रिस्ती मंडळीला वागवतो तसेच तुम्ही तुमच्या पत्नींना वागवले पाहिजे, असा देवाच्या वचनात पतींना आग्रह करण्यात आला आहे. पत्नीने तुम्हाला आनंदाने कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकारावे म्हणून तुम्ही, (१) लग्न झाल्याबरोबर लगेचच व अगदी उत्तमरीत्या अधीनता दाखवण्याची अपेक्षा तिच्याकडून करणार नाही आणि (२) समस्या येतात तेव्हाही तिच्यावर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रेम कराल.—इफिसकर ५:२५-२९.

पत्नीसाठी तोडगा तुमचा पती आता, कुटुंब प्रमुख आहे व ही जबाबदारी त्याला देवाकडून मिळाली आहे, हे मान्य करा. (१ करिंथकर ११:३) तुम्ही जर तुमच्या पतीचा आदर केला तर तुम्ही देवाचाही आदर कराल. तुम्ही जर त्याला कुटुंब प्रमुख म्हणून नाकारले तर तुमच्या वागण्यावरून तुम्हाला तुमच्या पतीविषयीच नव्हे तर देव व त्याच्या आज्ञा यांबद्दल काय वाटते हे दिसून येईल.—कलस्सैकर ३:१८.

कोणत्याही समस्येची चर्चा करत असताना, नवऱ्‍यावर नव्हे तर समस्येवर लक्ष केंद्रित करा. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या एस्तेर राणीची, आपला पती राजा अहश्‍वेरोश याने होणारा अन्याय दूर करावा अशी इच्छा होती. त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी तिने व्यवहारकुशलतेने तिचे मत व्यक्‍त केले. तिने सुचवलेल्या गोष्टी तिच्या पतीने मान्य केल्या आणि योग्य तेच केले. (एस्तेर ७:१-४; ८:३-८) तुम्ही जर (१) तुमच्या पतीला, कुटुंब प्रमुख यानात्याने त्याची नवीन भूमिका कौशल्याने निभावण्याची संधी दिली आणि (२) तो चुका करतो तेव्हाही त्याच्याशी आदराने वागला तर तुमचा पती तुमच्यावर नक्कीच जिवापाड प्रेम करेल.—इफिसकर ५:३३.

हे करून पाहा: तुमच्या जोडीदाराने कोणकोणत्या बाबतीत बदल केले पाहिजेत हे सर्व लक्षात ठेवण्याऐवजी, मी स्वतःत कोणते बदल केले पाहिजेत याची एक यादी बनवा. पतींनो: कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडण्यास काही अडचण येत असेल तर, तुम्ही कोणत्या बाबतीत सुधारणा करू शकता ते तुम्ही तिला विचारू शकता आणि मग तिने सुचवलेल्या गोष्टी एका कागदावर लिहून ठेवू शकता. पत्नींनो: तुम्ही तुमच्या पतीचा आदर करत नाही, असे जर त्याला वाटत असेल तर तुम्ही याबाबतीत सुधारणा कशी करू शकता हे त्याला विचारा आणि त्याने सुचवलेल्या गोष्टी अंमलात आणा.

वाजवी अपेक्षा बाळगा

आनंदी, संतुलित वैवाहिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यास शिकणे, हे सायकल चालवण्यास शिकण्यासारखे आहे. सायकल अगदी चांगल्या प्रकारे चालवायला येण्याआधी, तुम्ही खाली पडण्याची अपेक्षा करू शकता. तसेच, वैवाहिक जीवनात अनुभव प्राप्त करत असताना, तुमच्या हातून लाज वाटेल अशा चुका होण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता.

विनोद भावना टिकवून ठेवा. तुमच्या जोडीदाराला ज्या गोष्टींची चिंता वाटते, त्याची टर उडवू नका, तर तुम्हीही ती गांभीर्याने घ्या, पण तुम्ही जेव्हा काही चुका करता तेव्हा स्वतःवर हसण्यास शिका. लग्नाच्या पहिल्या वर्षात आपल्या जोडीदाराला आनंदी बनवण्याच्या संधींचा फायदा घ्या. (अनुवाद २४:५) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार तुमचा नातेसंबंध जोपासा. असे केल्यास, तुमचा विवाह वर्षानुवर्षे अधिक मजबूत होत राहील. (w१०-E ०८/०१)

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

स्वतःला विचारा . . .

▪ मी माझ्या जोडीदाराला माझा सर्वात निकटचा मित्र समजतो की मी इतरांना विचारून निर्णय घेतो?

▪ गेल्या २४ तासांच्या अवधीत मी अशी कोणती गोष्ट केली ज्यावरून, मला माझ्या जोडीदारावर खूप प्रेम असल्याचे, त्याच्याबद्दल मला आदर असल्याचे दिसून आले?

[३० पानांवरील चौकट/चित्रे]

बायबलमुळं आमचं लग्न वाचलं

जपानमध्ये राहणारे तोरू व अकिको लग्न झाल्यावर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण आठच महिन्यात या जोडप्यानं घटस्फोट घ्यायचं ठरवलं. असं काय झालं होतं? ते सांगतात:

तोरू: “मला पूर्वी वाटायचं की आमच्या आवडीनिवडी एकच आहेत. पण तसं नव्हतं. जसं की, मला टीव्हीवर खेळ बघायला आवडायचं पण तिला नाटकं बघायला आवडायची. मला बाहेर फिरायला आवडायचं पण तिला घरात राहायला आवडायचं.”

अकिको: “तोरू, त्याच्या घरचे जे म्हणतील ते करायचा, पण मला कधीच काही विचारायचा नाही. मी तर त्याला एकदा असंही विचारलं: ‘तुला कोण जास्त प्रिय आहे, तुझी आई की मी?’ आणि खरं बोलताना तर तोरू किती आढेवेढे घ्यायचा म्हणून सांगू! मी त्याला सांगितलं, की एक लबाडी लपवण्यासाठी तो दुसरी लबाडी करतोय. हे वेळीच थांबवलं नाही तर मी तुझ्याबरोबर संसार करू शकणार नाही.”

तोरू: “मला आला राग. माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या एका ज्येष्ठ सहकाऱ्‍याकडे मी गेलो आणि बायकोशी कसं वागायचं याबद्दल मला काहीतरी सल्ला द्या, असं त्यांना विचारलं. तर ते मला म्हणाले: ‘तू फक्‍त तिला, तोंड बंद कर, असं सांग. तिनं कुरकुर केली की दे तिला लगवून.’ आणि एकदा मी खरंच तिला थोबाडीत मारलं व टेबल उलटवला. आमचं कडाक्याचं भांडण झालं आणि ती घरातून निघून, टोकियोतील एका हॉटेलमध्ये जाऊन राहिली. मग मी तिला पुन्हा घरी आणलं. शेवटी आम्ही घटस्फोट घ्यायचं ठरवलं. त्या दिवशी सकाळी मी कामाला निघालो तेव्हा अकिको तिचं सामान भरू लागली.”

अकिको: “मी माझं सामान घेऊन निघालेच होते इतक्यात दाराची बेल वाजली. दार उघडल्यावर पाहिलं तर एक स्त्री उभी होती. ती यहोवाची साक्षीदार होती. मी तिला आत बोलवलं.”

तोरू: “ऑफिसात पोहचल्यावर, घटस्फोट खरंच घ्यायचा का, याबद्दलचे विचार माझ्या मनात घोळू लागले आणि मी तडक घरी निघालो. घरी आल्यावर पाहतो तर, अकिको एका स्त्रीबरोबर बोलत बसली आहे. ती स्त्री मला म्हणाली: ‘तुम्हाला असं काहीतरी हवं आहे जे तुम्ही दोघांनी एकत्र मिळून केलं पाहिजे. तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला आवडेल का?’ मी तिला म्हणालो: ‘हो, आमचं लग्न वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.’”

अकिको: “त्या स्त्रीनं आमच्याबरोबर बायबल अभ्यासाचा दिवस व वेळ ठरवली. वैवाहिक व्यवस्थेविषयी बायबलमध्ये दिलेले वर्णन जेव्हा आम्ही दोघांनी वाचलं तेव्हा आमचे डोळे उघडले. त्यात म्हटलं आहे: ‘पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.’”—उत्पत्ति २:२४.

तोरू: “माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं, ‘इथून पुढं, कोणताही निर्णय घेण्याआधी मी माझ्या बायकोशी सल्लामसलत करणार आहे.’ मी खूप दारू प्यायचंही सोडून दिलं. देवाला खोटं बोललेलं आवडत नाही हे जेव्हा मी शिकलो तेव्हा मी नेहमी खरं बोलायचा निश्‍चय केला.”

अकिको: “मी पण माझ्या स्वभावात बदल केले. जसं की, मी नेहमी तोरूशी आडव्यात बोलायचे. पण तो बायबल तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब करायचा प्रयत्न करतोय हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मीही त्याला साथ देऊ लागले. (इफिसकर ५:२२-२४) आता आमच्या लग्नाला २८ वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही सुखी आहोत. आम्ही एकमेकांना समजून घेऊ लागलो आणि बायबलमध्ये दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचे आमच्या वैवाहिक जीवनात पालन करू लागलो म्हणूनच तुटण्याच्या बेतात असलेलं आमचं लग्न वाचलं.”