व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकजुटीने काम करणं हे जणू एकाच विमानात वैमानिक आणि सहवैमानिक म्हणून काम करणं

विवाहित जोडप्यांसाठी

२: एकजूट

२: एकजूट

याचा काय अर्थ होतो?

विवाहात एकजुटीने काम करणारे पती-पत्नी जणू एकाच विमानात वैमानिक आणि सहवैमानिक म्हणून काम करणाऱ्‍यांसारखे असतात. समस्या आल्यावर ते फक्‍त “स्वतःचा” नाही, तर “एकमेकांचा” विचार करतात.

बायबल तत्त्व: “आता ती दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत.”—मत्तय १९:६.

“विवाह यशस्वी बनवण्यासाठी पती-पत्नीने सोबत मिळून काम करणं गरजेचं आहे.”—क्रिस्टफर.

हे का महत्त्वाचं?

समस्या आल्यावर जे पती-पत्नी मिळून काम करत नाहीत ते समस्या सोडवण्याचा विचार न करता एकमेकांवर दोष लावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींचं रूपांतर मोठ्या समस्येत होऊ शकतं.

“सोबत मिळून काम करणं महत्त्वाचं आहे. मी आणि माझ्या पतीने एकजुटीने काम केलं नाही, तर आम्ही जणू फक्‍त रूम पार्टनरसारखे असू. कारण रूम पार्टनर तसं एकत्र तर असतात, पण महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्यात एकमत नसतं.”—सँड्रा.

तुम्ही काय करू शकता?

स्वतःचं परीक्षण करा

  • मी कमवत असलेला पैसा “फक्‍त माझा आहे” असं मी समजतो का?

  • आराम, मौजमजा करण्यासाठी मी माझ्या जोडीदाराला टाळतो का?

  • माझ्या जोडीदाराला प्रिय असणाऱ्‍या नातेवाइकांपासून मी दूर राहतो का?

तुमच्या जोडीदाराशी खालील प्रश्‍नांवर चर्चा करा

  • वैवाहिक जीवनाच्या कोण-कोणत्या पैलूत आपण चांगल्या प्रकारे एकजुटीने काम करतो?

  • वैवाहिक जीवनाच्या कोणत्या पैलूत आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे?

  • एकजुटीने कार्य करण्याबाबतीत सुधारणा करण्यासाठी आपण कोणती पावलं उचलू शकतो?

सल्ले

  • तुम्ही तुमच्या जोडीदाराला विरोधात खेळणाऱ्‍या टेनीस खेळाडूसारखं समजू नका. तर तुम्ही दोघंही एकाच टीममध्ये आहात अशा प्रकारे खेळा आणि समस्यांना तुमच्या विरोधात म्हणजे नेटच्या दुसऱ्‍या बाजूला ठेवा.

  • ‘मी कसं जिंकू शकतो?’ असा विचार करण्याऐवजी ‘आपण कसं जिंकू शकतो?’ याचा विचार करा.

“कोण बरोबर व कोण चूक याचा विचार करू नका. यापेक्षा विवाहात शांती आणि एकता असणं महत्त्वाचं आहे.”—इथन.

बायबल तत्त्व: “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पैकर २:३, ४.