व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—पश्‍चिम आफ्रिकेमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—पश्‍चिम आफ्रिकेमध्ये

कोट दि वार या देशात एका गरीब वस्तीत राहणाऱ्या पास्कालला चांगले जीवन जगण्याची खूप इच्छा होती. बॉक्सिंग करणे त्याचा छंद होता. तो नेहमी विचार करायचा, की ‘मला नामवंत खेळाडू बनण्याची आणि भरपूर पैसा कमवण्याची संधी कोठे मिळू शकेल?’ पंचवीसेक वर्षांचा असताना त्याला जाणवले की युरोपला गेल्यास त्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. पण, प्रवासासाठी जी कागदपत्रे हवी असतात ती नसल्यामुळे त्याला बेकायदेशीरपणे युरोपमध्ये जावे लागणार होते.

१९९८ मध्ये २७ वर्षांचा असताना पास्काल युरोपला जाण्यासाठी निघाला. त्याने घानाची सीमा पार केली, टोगो आणि बेनिनमधून जाऊन तो शेवटी नाइजरमधील बीरनी नकॉनी या शहरात पोचला. खरेतर येथून पुढचा प्रवास धोकादायक असणार होता. उत्तरेकडे जाण्यासाठी त्याला ट्रकच्या साहाय्याने सहारा वाळवंट पार करावे लागणार होते. त्यानंतर भूमध्य समुद्रापर्यंत पोचल्यावर तो जहाजातून युरोपपर्यंतचा प्रवास करणार होता. ही त्याची योजना होती, पण दोन गोष्टींमुळे त्याचा प्रवास नाइजरमध्येच थांबला.

पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याजवळचे पैसे संपले. आणि दुसरी ही की त्याला नोए नावाचा पायनियर बांधव भेटला ज्याने त्याच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. पास्काल जे काही शिकला त्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यामुळे जीवनाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन बदलला. श्रीमंत बनण्याची त्याची इच्छा आता नाहीशी झाली होती. तो आता आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देऊ लागला. १९९९ साली डिसेंबर महिन्यात पास्कालने बाप्तिस्मा घेतला. यहोवाला तो किती कृतज्ञ आहे हे दाखवण्यासाठी २००१ मध्ये तो पायनियरिंग करू लागला. त्याने नाइजरमधील बीरनी नकॉनी येथे पायनियरिंग सुरू केली; त्याच शहरात जेथे तो सत्य शिकला होता. त्याच्या सेवेबद्दल त्याला काय वाटते? तो म्हणतो: “मी आता जीवनाचा पुरेपूर उपभोग घेत आहे.”

त्यांना आफ्रिकेत सेवा करताना खरा आनंद मिळाला

आना-राकल

पास्कालप्रमाणे अनेकांच्या लक्षात आले आहे की आध्यात्मिक ध्येये ठेवून ती मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे जीवनात खरा आनंद मिळतो. अशाच प्रकारची आध्यात्मिक ध्येये प्राप्त करण्यासाठी अनेक जण युरोप सोडून आफ्रिकेत, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी आले आहेत. खरेतर १७ ते ७० या वयोगटातील जवळजवळ ६५ जण युरोप सोडून बेनिन, बुर्किना फासो, नाइजर आणि टोगो या पश्‍चिम आफ्रिकेतील देशांत राहायला आले आहेत. * एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना प्रेरणा मिळाली? नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कोणते अनुभव आले?

डेन्मार्कची आना-राकल म्हणते: “माझे आईबाबा सेनिगॉलमध्ये मिशनरी सेवा करायचे. मिशनरी सेवेबद्दल ते नेहमी खूप आनंदानं बोलायचे आणि त्यामुळे माझ्या मनातही त्यांच्याप्रमाणे सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली.” जवळजवळ १५ वर्षांपूर्वी जेव्हा आना-राकल वीसबावीस वर्षांची होती तेव्हा ती टोगो या देशात गेली आणि तेथे  संकेत भाषिक मंडळीत सेवा करू लागली. तिच्या या निर्णयामुळे दुसऱ्यांना कसे प्रोत्साहन मिळाले? ती म्हणते: “माझी लहान बहीण आणि भाऊही नंतर टोगोत सेवा करण्यासाठी आले.”

अॅल्बर-फेएट आणि ऑरेल

फ्रान्सचे ऑरेल जे ७० वर्षांचे विवाहित बांधव आहेत ते असे म्हणतात: “पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी सेवानिवृत्त झालो तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते; मी फ्रान्समध्येच राहून नंदनवनाची वाट पाहत एक आरामदायक जीवन जगू शकत होतो किंवा मग सेवा वाढवण्यासाठी काही पावलं उचलू शकत होतो.” ऑरेल यांनी दुसरा पर्याय निवडला. सुमारे तीन वर्षांपूर्वी ते आणि अॅल्बर-फेएट ही त्यांची पत्नी बेनिनमध्ये राहायला आले. ऑरेल म्हणतात: “यहोवाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येणं हा आमच्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता.” ते आनंदाने पुढे असे म्हणतात, “समुद्रकिनाऱ्यावरील आमच्या प्रचाराच्या क्षेत्रातील काही भाग इतके सुंदर आहेत की त्यांना पाहिल्यावर मला नंदनवनाची आठवण होते.”

क्लोडोमीर आणि त्यांची पत्नी लीस्यान १६ वर्षांपूर्वी फ्रान्समधून बेनिन या ठिकाणी राहायला आले. सुरुवातीला त्यांना फ्रान्समधील त्यांच्या कुटुंबीयांची आणि मित्रपरिवाराची खूप आठवण यायची. त्यांना येथील नवीन जीवनशैलीशी जुळवून घेणे शक्य होईल की नाही याचीही त्यांना काळजी होती. पण, त्यांना येथे इतका आनंद मिळाला की त्यांची काळजी नाहीशी झाली. क्लोडोमीर म्हणतात: “या १६ वर्षांच्या सेवेत आम्ही दरवर्षी कमीतकमी एका व्यक्तीला सत्य स्वीकारण्यास मदत करू शकलो. हा आमच्यासाठी खूप मोठा बहुमान आहे.”

लीस्यान आणि क्लोडोमीर व त्यांनी सत्य शिकून घेण्यास ज्यांना मदत केली असे काही जण

झोआना आणि सेबास्टियान

फ्रान्समधील सेबास्टियान आणि झोआना हे विवाहित जोडपे २०१० साली बेनिनमध्ये राहायला आले. सेबास्टियान म्हणतो: “इथल्या मंडळीतील बांधवांना खूप मदतीची गरज आहे. त्यांना मदत करताना, ईश्वरशासित जबाबदाऱ्यांसंबंधी आम्हाला कमी वेळात बरंच काही शिकायला मिळालं.” येथे क्षेत्रातून कसा प्रतिसाद मिळतो? झोआना म्हणते: “इथले लोक सत्य शिकून घेण्यास तहानलेले आहेत. कधीकधी तर आम्ही प्रचार करत नसतो तेव्हाही लोक बायबलवर आधारित प्रश्न विचारण्यासाठी आणि प्रकाशनं मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर थांबवतात.” बेनिनला येण्याच्या निर्णयाचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर कसा परिणाम झाला? सेबास्टियान म्हणतो: “यामुळं आमचं वैवाहिक बंधन मजबूत झालं आहे. पत्नीसोबत पूर्ण दिवस क्षेत्रात घालवल्यानं मला आनंद होतो.”

एरिक आणि त्यांची पत्नी कॅटी बेनिनमध्ये, कमी लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील भागात पायनियरिंग करतात. जवळजवळ दहा वर्षांपूर्वी फ्रांसमध्ये राहताना त्यांनी, जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यावर आधारित लेख वाचण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच पूर्ण वेळेच्या सेवकांशीही ते याविषयी बोलू लागले. यामुळे त्यांना दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आणि २००५ मध्ये ते बेनिनमध्ये राहायला आले. ते सेवा करत असलेल्या क्षेत्रात त्यांना खूप उल्लेखनीय प्रगती पाहायला मिळाली आहे. एरिक म्हणतात: “दोन वर्षांपूर्वी टॉनगीएटा या शहरातील आमच्या गटात फक्त ९ प्रचारक होते; पण आता मात्र ३० आहेत. रविवारी तर जवळजवळ  ५० ते ८० लोक सभेला येतात. अशा प्रकारे होत असलेली प्रगती पाहण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही.”

कॅटी आणि एरिक

समस्या ओळखून त्यांवर मात करा

बेन्यामीन

जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करणाऱ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आहे? ३३ वर्षांचा बेन्यामीन हा आना-राकलचा भाऊ आहे. २००० साली डेन्मार्कमध्ये तो एका बांधवांना भेटला जे टोगोमध्ये मिशनरी सेवा करत होते. बेन्यामीन आठवून सांगतो: “जेव्हा मी त्या बांधवांना सांगितलं की मला पायनियरिंग करण्याची इच्छा आहे तेव्हा ते मला म्हणाले: ‘अरे, मग तू टोगोमध्ये पायनियरिंग का करत नाहीस?’” बेन्यामीनने त्याबद्दल विचार केला. तो पुढे म्हणतो: “तेव्हा मी २० वर्षांचाही नव्हतो, पण माझ्या दोन बहिणी आधीच टोगोत सेवा करत असल्यामुळं तिथं जाऊन राहणं मला सोपं गेलं.” बेन्यामीन टोगोला आला खरा, पण त्याच्यासमोर काही आव्हाने होती. तो म्हणतो: “मला फ्रेंच भाषेचा एकही शब्द येत नव्हता. पहिले सहा महिने मला खूप कठीण गेले कारण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो.” पण काही काळात त्याने प्रगती केली. आता तो बेनिन येथील बेथेलमध्ये सेवा करत आहे. तेथे तो साहित्य पोचवण्याच्या कामात आणि कंप्यूटर डिपार्टमेंटमध्ये साहाय्य करतो.

मारी-आन्येस आणि मीशेल

वर उल्लेख करण्यात आलेले एरिक आणि कॅटी बेनिनला येण्यापूर्वी फ्रान्समध्ये विदेशी भाषा बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रात सेवा करायचे. पश्‍चिम आफ्रिकेत आल्यानंतर त्यांचे जीवन कशा प्रकारे बदलले? कॅटी सांगतात: “राहण्यालायक घर शोधणं खूप कठीण होतं. कित्येक महिने आम्ही अशा घरात राहिलो जिथं वीज आणि नळाची सोय नव्हती.” एरिक म्हणतात: “इथले शेजारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावतात. अशा वेळी धीर दाखवण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असते.” दोघांचेही म्हणणे आहे: “जिथं पूर्वी कधीच कोणी प्रचार केलेला नाही अशा क्षेत्रात प्रचार करण्यात जो आनंद मिळतो त्यापुढं या समस्या काहीच वाटत नाहीत.”

पन्नाशीत असलेले मीशेल आणि मारी-आन्येस हे विवाहित जोडपे पाच वर्षांपूर्वी फ्रान्सहून बेनिनमध्ये राहायला आले. सुरुवातीला त्यांना खूप काळजी होती. मीशेल म्हणतात: “काहींनी आम्हाला असं सुचवलं की आम्ही एक अतिशय कठीण नेमणूक स्वीकारली आहे. अर्थात जर आम्हाला यहोवाच्या मदतीशिवाय हे कार्य करावं लागलं असतं तर ते निश्‍चितच कठीण होतं. पण आम्हाला यहोवाच्या मदतीची खात्री असल्यामुळेच आम्ही बेनिनला येऊन आपली सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला.”

पूर्वतयारी कशी कराल?

ज्यांनी गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा केली आहे ते पुढील काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर देतात: आगाऊ तयारी करा. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. कशासाठी किती खर्च करायचा हे आधीच ठरवा आणि त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करू नका. यहोवावर विसंबून राहा.—लूक १४:२८-३०.

वर उल्लेख करण्यात आलेले सेबास्टियान म्हणतात: “बेनिनला येण्याच्या दोन वर्षांपूर्वी मी आणि झोआना पैशांची बचत करू लागलो. याकरता आम्ही करमणुकीसाठी आणि अनावश्यक वसतूंच्या खरेदीसाठी जो खर्च करायचो तो कमी केला.” पुढेही बेनिनमध्ये सेवा करत राहण्यासाठी ते वर्षातील काही महिने युरोपमध्ये जाऊन नोकरी  करतात आणि मग उरलेल्या महिन्यांत बेनिनला येऊन पायनियरिंग करतात.

मारी-टेरेझ

पश्‍चिम आफ्रिकेत जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी इतर देशांतून आलेल्या जवळजवळ २० अविवाहित बहिणींपैकी एक आहे मारी-टेरेझ. ती फ्रान्समध्ये बस चालवण्याचे काम करायची. २००६ साली नाइजरमध्ये पायनियरिंग करण्यासाठी तिने एक वर्षाची रजा घेतली. लवकरच तिला जाणवले की तिला याच प्रकारचे जीवन जगण्याची इच्छा होती. मारी-टेरेझ म्हणते: “फ्रान्सला परतल्यावर मी माझ्या मालकाला माझ्या कामाच्या वेळेत काही बदल करण्याची विनंती केली आणि तसं करण्यास ते तयार झाले. आता मे ते ऑगस्ट दरम्यान मी फ्रान्समध्ये बस चालवण्याचं काम करते आणि मग सप्टेंबर ते एप्रिल या महिन्यांत नाइजरमध्ये पायनियरिंग करते.”

साफीरा

जे राज्याच्या कामाला प्रथम स्थान देतात ते याची खात्री बाळगू शकतात की यहोवा त्यांच्या सर्व गरजा पुरवेल. (मत्त. ६:३३) उदाहरणार्थ: फ्रान्सची सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची साफीरा ही बेनिनमध्ये पायनियरिंग करते. आफ्रिकेत आणखी एक वर्ष (हे तिचे सहावे वर्ष असणार होते) पायनियरिंग करता यावी म्हणून ती २०११ मध्ये फ्रान्सला काम करण्यासाठी परत आली. साफीरा म्हणते: “त्या दिवशी शुक्रवार होता, कामावरचा माझा शेवटचा दिवस. पण, पुढे वर्षभर सेवा करण्यासाठी पुरेसे पैसे मिळवण्याकरता मला आणखी दहा दिवस काम करण्याची गरज होती. मी आणखी दोनच आठवडे फ्रान्समध्ये राहणार होते. मी यहोवाजवळ प्रार्थना केली आणि माझ्या समस्येबद्दल त्याला सांगितलं. त्यानंतर लवकरच मला एमप्लॉयमेंट एजेन्सीतून (रोजगार पुरवणाऱ्या कार्यालयातून) फोन आला आणि त्यांनी मला दोन आठवड्यांसाठी एका दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जागेवर काम करण्याची ऑफर दिली.” साफीरा सोमवारी त्या कामाच्या ठिकाणी गेली. ती ज्या व्यक्तीच्या जागेवर काम करणार होती ती तिला आवश्यक ट्रेनिंग देणार होती. साफीरा सांगते: “मला हे जाणून खूप आश्चर्य वाटलं की ती कर्मचारी आपली ख्रिस्ती बहीण होती आणि तिला पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी नेमक्या दहा दिवसांची सुट्टी हवी होती. तिच्या मालकानं तिला सांगितलं होतं की जर कोणी तिच्या जागेवर काम करण्यासाठी तयार असेल तरच तिला सुट्टी मिळू शकेल. माझ्याप्रमाणेच तिनंही यहोवाकडे मदतीची याचना केली होती.”

जीवनात खरे समाधान मिळवण्याचे रहस्य

काही बंधुभगिनींनी पश्‍चिम आफ्रिकेत बरीच वर्षे सेवा केली आहे आणि आता ते येथेच स्थायिक झाले आहेत. इतर जण, काही वर्षे पश्‍चिम आफ्रिकेत सेवा करून स्वतःच्या देशात परतले आहेत. पण, जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा केल्यामुळे या बांधवांना जे शिकायला मिळाले त्याचा आजही त्यांना फायदा होत आहे. त्यांना याची खात्री पटली आहे, की यहोवाची सेवा केल्यानेच जीवनात खरे समाधान मिळते.

^ परि. 6 फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या या चारही देशांतील कार्यावर बेनिनमधील शाखा कार्यालय देखरेख करते.