व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बर्नेट, सिमोन, एस्टन आणि केलब

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—ओशनियामध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—ओशनियामध्ये

वयाच्या तिशीत असलेली रेन्नी नावाची एक बहीण ऑस्ट्रेलियाच्या एका आवेशी कुटुंबात लहानाची मोठी झाली. ती म्हणते: “प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन मदत करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केलं. या सेवेतली आमची आवड, त्यातला आनंद आणि त्यातली मजा टिकवून ठेवणं माझ्या आई-वडिलांमुळेच शक्य झालं. मलाही जेव्हा दोन मुलं झाली तेव्हा त्यांनीही अशा प्रकारचं जीवन जगावं, असं मला वाटायचं.”

चाळीसच्या आसपास असलेला, रेन्नीचा पती, शान याचीही अशीच आध्यात्मिक ध्येयं होती. याविषयी तो म्हणतो: “आमच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर, आम्ही एकदा एक टेहळणी बुरूज मासिक वाचत होतो. त्यात टाँगा बेटावरील लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आपल्या लहानशा बोटीतून नैऋत्य (दक्षिण-पश्‍चिम) पॅसिफिकला गेलेल्या एका साक्षीदार कुटुंबाविषयी सांगण्यात आलं होतं. * त्यांच्या त्या अनुभवातून प्रोत्साहन घेऊन आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथल्या शाखा कार्यालयाला पत्र लिहिलं आणि राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी विचारलं. * आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उत्तर म्हणून त्यांनी आम्हाला टाँगा इथंच प्रचारकार्य करण्याचं आमंत्रण दिलं!”

जेकब, रेन्नी, स्की आणि शान

हे आमंत्रण स्वीकारून रेन्नी, शान आणि त्यांची मुलं जेकब आणि स्की यांनी टाँगा इथं जवळपास एक वर्ष घालवलं. पण त्यानंतर, वाढत चाललेल्या दंगलींमुळे त्यांना आपल्या मायदेशी, आस्ट्रेलियाला परतावं लागलं. तरीदेखील, गरज असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचार करण्याचं त्यांचं ध्येय ते विसरले नाहीत. २०११ साली, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला जवळपास १,५०० किमी अंतरावर असणाऱ्या नॉरफोक आयलँड नावाच्या एका छोट्याशा पॅसिफिक बेटावर स्थलांतर केलं. तिथं गेल्याचा त्यांना काही फायदा झाला का? १४ वर्षांचा जेकब म्हणतो: “या सबंध काळात यहोवानं नुसती आमची काळजीच घेतली नाही, तर प्रचारकार्यातला आमचा आनंदही टिकवून ठेवला!”

एक कुटुंब या नात्यानं सेवा

शान, रेन्नी आणि त्यांच्या मुलांप्रमाणेच, कित्येक साक्षीदार कुटुंबांनीदेखील जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी स्वतःला या कार्यात स्वेच्छेनं वाहून घेतलं आहे. हे पाऊल उचलण्याकरता त्यांना कशामुळे प्रोत्साहन मिळालं?

“राज्याच्या सुवार्तेमध्ये अजूनही बऱ्याच जणांना आस्था आहे. या लोकांना नियमितपणे बायबल अभ्यास करण्याची संधी मिळावी असं आम्हाला वाटतं.”—बर्नेट

बर्नेट आणि सिमोन या तिशीत असलेल्या दांपत्याला, एस्टन आणि केलब ही १२ आणि ९ वर्षांची दोन मुलं आहेत. या कुटुंबानं ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्झलँड इथल्या बर्कटाउन या दुर्गम गावात स्थलांतर केलं. बर्नेट म्हणतो, की “या ठिकाणी साक्षीदार केवळ तीन-चार वर्षांतून एकदा प्रचारकार्य करायचे. पण इथं पुष्कळ लोकांना सत्याबद्दल आस्था होती. म्हणून इथल्या लोकांना नियमितपणे बायबल अभ्यास करण्याची संधी मिळावी असं आम्हाला वाटलं, आणि आम्ही इथं येण्याचा निर्णय घेतला.”

जिम, जॅक, मार्क आणि कॅरेन

मार्क आणि कॅरेन या दांपत्यानंही ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या आसपास असणाऱ्या कित्येक मंडळ्यांमध्ये सेवा केली आहे. सध्या त्यांचं वय ५० ते ५५ च्या दरम्यान असलं तरी त्यांनी आपली तीन मुलं जेसिका, जिम आणि जॅक यांच्यासोबत नॉर्दन टेरिटरीच्या दुर्गम खाणीत काम करणाऱ्या एका नुलून्बी वसाहतीत स्थलांतर केलं आहे. मार्क म्हणतात: “लोकांसोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. त्यामुळे जिथं मंडळीत आणि प्रचारकार्यातही पुष्कळ काही करण्यासारखं आहे, अशा ठिकाणी राहण्याचा मी जास्त प्रयत्न करायचो.” कॅरेन मात्र सुरवातीला मागंपुढं पाहत होती. पण नंतर ती म्हणते: “मार्क आणि इतरांनी मला थोडं प्रोत्साहन दिल्यानंतर, मी एकदा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. आणि आता मला याचं खूप समाधान वाटतं की मी तसं केलं!”

बेंजामिन, जेड, ब्रिया आणि कॅरोलिन

२०११ साली बेंजामिन, कॅरोलिन आणि प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या दोन मुली, जेड आणि ब्रिया हेदेखील ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्झलँड इथून तिमोर-लेस्टे इथं परतले. इंडोनेशियाच्या द्वीपसमूहातील तिमोर बेटावर असणारा हा एक छोटासा देश आहे. बेंजामिन म्हणतात, “तिमोर-लेस्टे इथं मी आणि कॅरोलिननं आधी खास पायनियर म्हणून सेवा केली होती. इथं प्रचारकार्य करण्याची एक वेगळीच मजा आहे, आणि इथले बांधवही खूप मदत करणारे आहेत. त्यामुळे हा देश सोडताना आम्हाला अगदी जीवावर आलं होतं. पण त्याच वेळी इथं पुन्हा परतण्याचं आम्ही पक्कं केलं होतं, पण मुलं झाल्यामुळे आम्हाला हा निर्णय पुढे ढकलावा लागला. असं असलं तरी आम्ही आमचा निर्णय बदलला नाही.” कॅरोलिन म्हणते: “आमच्या मुलींनी मिशनरी, बेथेलमध्ये काम करणारे बंधुभगिनी आणि खास पायनियर यांच्या सहवासात राहून नेहमी आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती.”

चांगली योजना करण्याची गरज

येशूनं त्याच्या शिष्यांना असं विचारलं: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) येशूनं जे म्हटलं त्याप्रमाणे, ज्यांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेवा करायची आहे, त्यांना एक चांगली योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या पाहिजेत?

आध्यात्मिक: बेंजामिन म्हणतात: “आपल्याला इतरांची सेवा करायची आहे, त्यांच्यावर भार बनायचं नाही. म्हणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याआधी, आम्ही स्वतःला आध्यात्मिकतेत आणखी मजबूत केलं. तसंच, मंडळीच्या आणि प्रचाराच्या कामात आम्ही आणखी जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न केला.”

आधी उल्लेख केलेला जेकब म्हणतो: “नॉरफोक आयलँड इथं जाण्याआधी, आम्ही टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांतून, गरज असलेल्या ठिकाणी सेवा करत असलेल्या पुष्कळ बंधुभगिनींच्या जीवन कथा वाचल्या. त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि यहोवानं त्यांची कशी काळजी घेतली याबद्दल आम्ही चर्चा करायचो.” त्याची ११ वर्षांची बहीण, स्की म्हणते: “मी मम्मी-पप्पांसोबत तर प्रार्थना करायचेच, पण स्वतःदेखील नेहमी प्रार्थना करायचे.”

भावनिक: रेन्नी सांगते: “आम्ही राहत होतो ते ठिकाण माझ्या आवडीचं होतं. शिवाय माझे नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणीही तिथं राहत होते. त्यामुळे तिथंच राहणं आमच्यासाठी नक्कीच सोईचं ठरलं असतं. पण या गोष्टी मला गमवाव्या लागतील असा विचार करत बसण्याऐवजी, गरज असलेल्या ठिकाणी गेल्यामुळे, माझ्या कुटुंबाला कसा फायदा होईल याचा मी जास्त विचार केला.”

सांस्कृतिक: नवीन ठिकाणी राहणीमानाला जुळवून घेण्यास स्वतःला तयार करण्यासाठी बरीच कुटुंबं त्या ठिकाणाची माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. मार्क सांगतो, की “नुलून्बीबद्दल आम्ही जितकं वाचता येईल तितकं वाचण्याचा प्रयत्न केला. तिथं राहणारे बांधव आम्हाला तिथला स्थानिक न्यूजपेपर पाठवायचे. त्यामुळे तिथल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल आम्हाला बरीच माहिती मिळाली.”

नॉरफोक आयलँडमध्ये गेलेले शान म्हणतात: “सर्वात आधी मी ख्रिस्ती गुण दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण मी जर कष्टाळू, प्रामाणिक आणि नम्र असलो, तर मी जगात कुठंही राहू शकतो, असं मला वाटतं.”

समस्यांना तोंड देणं

अनपेक्षित समस्या येतात तेव्हा त्यांना तोंड देताना, आहे त्या परिस्थितीला जुळवून घेणं आणि सकारात्मक राहणं खूप महत्त्वाचं आहे. गरज असलेल्या ठिकाणी जाऊन यशस्वीपणे सेवा करणारे बंधुभगिनी याबद्दल आवर्जून सांगतात. काही उदाहरणांचाच विचार करा:

रेन्नी म्हणते, की “एखादी गोष्ट करण्यासाठी मी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्यास शिकले आहे. उदाहरणार्थ, नॉरफोकमध्ये जेव्हा समुद्र खवळतो, तेव्हा जहाजं किनाऱ्याला लागत नाहीत. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या गोष्टींची टंचाई होते आणि त्यांच्या किमतीही वाढतात. अशा वेळी कमीतकमी गोष्टींचा वापर करून जेवण बनवण्याची कला मी शिकून घेतली.” तिचा पती शानदेखील म्हणतो, की “आम्ही आमचा सर्व खर्च आठवड्याच्या बजेटमध्येच बसवण्याचा प्रयत्न करतो.”

त्यांचा मुलगा, जेकब आणखी एका समस्येबद्दल सांगतो. तो म्हणतो, “नवीन मंडळीत आमच्यासोबत केवळ सात सदस्य आहेत, आणि ते आमच्याहून वयानं खूपच मोठे आहेत. त्यामुळे मला माझ्या वयाचे असे कोणीच मित्र नाहीत. पण प्रचारकार्यात या मोठ्या लोकांसोबत काम केल्यानंतर, त्यांच्याशीच माझी चांगली मैत्री झाली.”

२१ वर्षांच्या जिमचीसुद्धा हीच समस्या होती. “नुलून्बीपासून सर्वात जवळची मंडळी जवळपास ७२५ किमी लांब होती. त्यामुळे जास्तीतजास्त संमेलनांना आणि अधिवेशनांना जाण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. आम्ही थोडं आधी जाऊन बंधुभगिनींच्या सहवासाचा आनंद घ्यायचो. हे सर्व प्रसंग आमच्यासाठी जणू वर्षातले सर्वात खास दिवस असायचे.”

“आम्ही इथं आलो, ते किती बरं झालं!”

बायबल म्हणतं: “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो.” (नीति. १०:२२) जगभरात गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांनी या वचनाची सत्यता व्यक्तिगतपणे अनुभवली आहे.

मार्क म्हणतात, “गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याच्या निर्णयाचा, आमच्या मुलांवर जो चांगला परिणाम झाला आहे, तोच आमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद ठरला आहे. राज्याच्या कार्याला पहिलं स्थान दिल्यामुळे, यहोवा आमची काळजी घेईल याची पक्की खात्री आमच्या मुलांना आहे. आणि हा विश्वास तुम्हाला कुठंच विकत घेता येत नाही.”

शान म्हणतात: “माझं माझ्या पत्नीसोबतचं आणि मुलांसोबतचं नातं आणखी घट्ट बनलं आहे. यहोवाबद्दल असणाऱ्या त्यांच्या भावना मी त्यांच्या तोंडून ऐकतो, तेव्हा मला याचं खूप समाधान वाटतं.” त्यांचा मुलगा जेकब म्हणतो: “माझ्यासाठी हा सर्वात आनंदी काळ होता. आम्ही इथं आलो, ते किती बरं झालं!”

^ परि. 3 टेहळणी बुरूज, १५ डिसेंबर २००४ च्या अंकातील, पृष्ठ ८-११ वरील “‘फ्रेंडली आयलंड्स’ म्हटल्या जाणाऱ्या टाँगा बेटांवर देवाचे मित्र” हा लेख पाहा.

^ परि. 3 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या शाखा कार्यालयांना एकत्र करून २०१२ मध्ये ऑस्ट्रेलेशिया शाखा कार्यालयाची स्थापना करण्यात आली.