व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—म्यानमारमध्ये

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—म्यानमारमध्ये

दोन हजार वर्षांपूर्वी येशूने म्हटलं: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करण्यासाठी कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.” (लूक १०:२) हे शब्द म्यानमार या देशाची सध्याची स्थिती अगदी योग्य प्रकारे वर्णन करतात. असं आपण का म्हणू शकतो? कारण म्यानमारमध्ये ५ कोटी ५० लाख लोकांना प्रचार करण्यासाठी फक्‍त ४,२०० प्रचारक आहेत.

पण “पिकाच्या मालकाने” या दक्षिण-पूर्व आशियातील देशात येऊन सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील शेकडो बंधुभगिनींना प्रेरित केलं आहे. हे सर्वजण आध्यात्मिक कापणीत सहभागी होण्यासाठी म्यानमारमध्ये आले आहेत. पण आपला मायदेश सोडून ते इथे का आले? हा निर्णय घेण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली? सध्या त्यांना कोणते आशीर्वाद मिळत आहेत? चला आपण पाहूयात.

“या, आम्हाला आणखी पायनियर हवे आहेत!”

काही वर्षांआधी जपानमधल्या काजूहिरो नावाच्या पायनियर बांधवाला फेफऱ्‍याचा रोग झाला आणि चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला दोन वर्षं कोणतंच वाहन न चालवण्याचा सल्ला दिला. हे ऐकून काजूहिरोला धक्काच बसला. त्याला प्रश्‍न पडला: ‘आता माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे पायनियरिंग मी कशी करणार?’ त्याने याबद्दल यहोवाला खूप कळकळून प्रार्थना केली. आपल्याला पायनियरिंग करता यावी म्हणून यहोवाने मार्ग दाखवावा, अशी विनंती तो करत राहिला.

काजूहिरो आणि मारी

काजूहिरो सांगतो: “एक महिन्यानंतर म्यानमारमध्ये सेवा करणाऱ्‍या माझ्या एका मित्राने माझ्या दुःखद परिस्थितीबद्दल ऐकलं. त्याने मला फोन केला आणि म्हटलं: ‘इथे म्यानमारमध्ये सगळे बसने प्रवास करतात. तू इथे आलास तर तुला तुझे प्रचारकार्य चालू ठेवता येईल आणि प्रवासासाठी तुला कारची गरजही लागणार नाही.’ मी माझ्या डॉक्टरांना विचारलं, की हा आजार असताना मी म्यानमारला जाऊ शकतो का? आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मला उत्तर दिलं: ‘म्यानमारमधला एक ब्रेन स्पेशलिस्ट सध्या जपानला आला आहे. त्याच्याशी मी तुझी ओळख करून देतो. तुला जर परत चक्कर आली तर तो तुला मदत करू शकतो.’ डॉक्टरांचे हे उत्तर, जणू यहोवाने माझ्या प्रार्थनेचं दिलेलं उत्तरच आहे, असं मला वाटलं.”

लगेचच काजूहिरोने म्यानमारच्या शाखा कार्यालयाला इ-मेल पाठवला आणि कळवलं की तो व त्याची पत्नी म्यानमारमध्ये पायनियरिंग करू इच्छितात. फक्‍त पाच दिवसांतच शाखा कार्यालयाने त्यांना उत्तर पाठवलं: “या, आम्हाला आणखी पायनियर हवे आहेत!” काजूहिरो आणि त्याची पत्नी मारी यांनी लगेच त्यांच्या कार विकल्या, व्हिसा बनवला आणि विमानाची तिकिटं काढली. आज ती दोघं मांडले शहरात संकेत भाषा गटासोबत आनंदाने सेवा करत आहेत. काजूहिरो म्हणतो: “या अनुभवावरून आम्हाला असं वाटतं, की स्तोत्र ३७:५ मध्ये देवाने जे वचन दिलं आहे त्यावरचा आमचा भरवसा आणखी वाढला आहे. त्यात म्हटलंय, ‘आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दे त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.’”

यहोवा मार्ग मोकळा करतो

२०१४ ला म्यानमारमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचं एक खास अधिवेशन भरवण्यात आलं. त्यात अनेक देशातून आलेले साक्षीदार सहभागी झाले होते. अमेरिकेतली ३४ वर्षांची मॉनेक ही बहीणही तिथे गेली होती. ती म्हणते: “अधिवेशनातून परतल्यावर मी यहोवाला प्रार्थनेत विचारलं, आता माझ्या जीवनात पुढे मी काय करू? मी आई-बाबांसोबतही माझ्या आध्यात्मिक ध्येयांबद्दल बोलले. आम्हाला वाटलं, की मी म्यानमारला सेवा करण्यासाठी जायला हवं. पण हा निर्णय पक्का करण्यासाठी मी खूप वेळ घेतला आणि प्रार्थना केल्या.” का बरं?

मॉनेक आणि ली

मॉनेक याचं उत्तर देते: “येशूने त्याच्या शिष्यांना ‘आधी खर्चाचा हिशोब’ लावण्याचा सल्ला दिला होता. म्हणून मग मी स्वतःला विचारलं: ‘तिथे जाणं मला परवडणार आहे का? कमी वेळेची नोकरी करून मी त्या देशात स्वतःचा खर्च भागवू शकते का?’” पुढे ती म्हणते, “मला लगेच हे जाणवलं की माझ्याकडे जगाच्या दुसऱ्‍या टोकावर जाऊन राहण्याइतके पैसे नाहीत.” मग म्यानमारला जाणं तिच्यासाठी कसं शक्य झालं?—लूक १४:२८.

मॉनेक सांगते: “एकदा माझ्या बॉसने मला बोलावलं. मी खूप घाबरले, ती मला नोकरी सोडायला सांगणार असं मला वाटलं. पण असं काहीच झालं नाही. उलट तिने माझ्या चांगल्या कामासाठी मला शाबासकी दिली आणि मला बोनस देत आहे असं सांगितलं. माझी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मला जितक्या पैशांची गरज होती तितकेच पैसे तिने मला बोनस म्हणून दिले होते.”

डिसेंबर २०१४ पासून मॉनेक म्यानमारमध्ये सेवा करत आहे. जास्त गरज असलेल्या क्षेत्रात प्रचार करणं तिला कसं वाटतं? ती सांगते: “इथे येऊन मी खूप आनंदी आहे. मी तीन बायबल अभ्यास चालवते. माझी एक विद्यार्थी ६७ वर्षांची आहे. मी अभ्यासाला जाते तेव्हा ती गोड हसून आणि मिठी मारून माझं स्वागत करते. देवाचं नाव यहोवा आहे हे जेव्हा ती शिकली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणीच आलं. ती म्हणाली: ‘माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच देवाचं नाव यहोवा आहे हे ऐकलं. तू माझ्यापेक्षा खूप तरुण आहेस पण तरीही तू मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे, जी मी कधी शिकू शकले नसते.’ हे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. अशा अनुभवांमुळे जास्त गरज असलेल्या क्षेत्रात प्रचार करताना खूप समाधान मिळतं.” मॉनेकला नुकतीच सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.

२०१३ इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसेस पुस्तकातल्या म्यानमारच्या अहवालानेही या देशात येण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित केलं. ली नावाची एक तिशीतली बहीण दक्षिणपूर्व आशियामध्ये राहणारी होती. ती पूर्ण वेळेची नोकरी करत होती. ती वार्षिक पुस्तकातल्या म्यानमारच्या अहवालामुळे इथे येऊन सेवा करण्याचा विचार करू लागली. ती म्हणते: “२०१४ मध्ये मी यांगोन इथे खास अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. तिथे मी जास्त गरज असणाऱ्‍या क्षेत्रात सेवा करणारे म्हणून कार्य करणाऱ्‍या एका जोडप्याला भेटले. ते म्यानमारमध्ये चीनी भाषेच्या क्षेत्रात सेवा करत होते. मला चीनी भाषा येत असल्यामुळे मीही म्यानमारच्या त्या चीनी भाषेच्या क्षेत्रात जाऊन त्यांना मदत करण्याचं ठरवलं. तिथे मी मॉनेकला भेटले. मग आम्ही मांडले इथे राहायला गेलो. यहोवाच्या आशीर्वादाने आम्हाला एकाच शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम मिळालं आणि जवळच घरही मिळालं. उष्ण वातावरण आणि सुखसोयींचा थोडा अभाव असतानाही इथे प्रचार करायला मला खूप आवडतं. म्यानमारमधले लोक खूप साधं जीवन जगतात आणि ते इतरांशी आदराने वागतात. त्यांना देवाबद्दल आनंदाची बातमी ऐकायला आवडतं. यहोवाचं कार्य इतक्या वेगाने होताना पाहणं खूप उत्साहवर्धक आहे. मला या गोष्टीची पक्की खात्री आहे, की मी मांडले या शहरात राहावं ही यहोवाचीच इच्छा आहे.”

यहोवा प्रार्थना ऐकतो

प्रार्थनेत किती ताकद आहे हे जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणाऱ्‍या अनेकांनी अनुभवलं आहे. जुंपा आणि नाओ या तिशीतल्या जोडप्याचं उदाहरण हेच दाखवतं. ही दोघं जपानमध्ये आधीच संकेत भाषेच्या मंडळीत सेवा करत होती. मग म्यानमारला यायला त्यांना कशामुळे प्रेरणा मिळाली? जुंपा सांगतात: “माझं व माझ्या पत्नीचं दुसऱ्‍या देशात जाऊन जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्याचं ध्येय होतं. आमच्या संकेत भाषेतील मंडळीतला एक बांधव म्यानमारला सेवा करायला गेला. आमच्याकडे खूप कमी पैसे होते, तरी आम्हीसुद्धा मे २०१० ला म्यानमारला जायचं ठरवलं. तिथल्या बंधुभगिनींनी आमचं मनापासून स्वागत केलं.” त्याला तिथल्या संकेत भाषेच्या क्षेत्राबद्दल काय वाटतं? तो म्हणतो: “इथे लोक खूप आवड दाखवतात. संकेत भाषेतले व्हिडिओ पाहून मुकबधिर घरमालकांना खूप आश्‍चर्य वाटतं. खरंच, इथे येऊन यहोवाची सेवा करण्याच्या आमच्या निर्णयाबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो!”

नाओ आणि जुंपा

जुंपा आणि नाओ यांना पैशाची समस्या जाणवली का? जुंपा सांगतो: “तीन वर्षांनंतर आमच्याकडे असलेले पैसे संपले आणि पुढच्या वर्षाचं भाडं भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही दोघांनी खूप कळकळीने प्रार्थना केली आणि अचानक शाखा कार्यालयातून आम्हाला एक पत्र आलं. त्यात आम्हाला तात्पुरते खास पायनियर बनण्याची नेमणूक मिळाली असल्याचं सांगण्यात आलं होतं! आम्ही यहोवावर विसंबून राहिलो आणि त्याने आम्हाला एकटं सोडलं नाही. त्याने प्रत्येक गोष्टीत आमची काळजी घेतली.” जुंपा आणि नाओ यांना नुकतीच सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली.

यहोवा अनेकांना प्रेरणा देतो

४३ वर्षाचा सिमोना मुळचा इटलीत राहणारा आहे आणि ३७ वर्षांची अॅना मुळची न्यूझीलंडची आहे. सिमोना आणि अॅना या जोडप्याला म्यानमारला जायला कशामुळे प्रेरणा मिळाली? अॅना सांगते: “२०१३ च्या इयरबुकच्या म्यानमारच्या अहवालामुळे!” सिमोना म्हणतात: “म्यानमारमध्ये सेवा करणं एक विशेषाधिकार आहे. इथलं जीवन खूप साधं आहे आणि इथे मला यहोवाच्या सेवेसाठी जास्त वेळ देता येतो. जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करताना यहोवा कशी आपली काळजी घेतो याचा अनुभव घेणं खरंच खूप रोमांचक आहे.” (स्तो. १२१:५) अॅना सांगते: “मी इतकी आनंदी आधी कधीच नव्हते. आमचं राहणीमान खूप साधं आहे. मी माझ्या पतीसोबत जास्त वेळ असते आणि त्यामुळे आमचं नातं आणखी मजबूत झालंय. इथे आम्ही नवीन मित्रही बनवले आहेत जे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. साक्षीदारांबद्दल इथले लोक भेदभाव करत नाहीत आणि आम्हाला क्षेत्रात आवड दाखवणारे अनेकजण भेटतात.”

सिमोना आणि अॅना

अॅना सांगते: “एकदा मी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्‍या एका मुलीला बाजारात साक्ष दिली आणि तिला पुन्हा भेटण्याची व्यवस्था केली. मी जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा तिने तिच्या एका मैत्रिणीलाही बोलवलं. पुढच्या वेळी तिने आणखी काहींना बोलवलं आणि त्यानंतर पुन्हा आणखी मैत्रिणींना बोलवलं. आता मी त्यांपैकी पाच जणींसोबत बायबल अभ्यास करत आहे.” सिमोना सांगतो: “इथल्या क्षेत्रात लोक मैत्रीपूर्ण आणि नवीन माहिती जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत. अनेक जण आवड दाखवतात, पण वेळेच्या अभावामुळे आवड दाखवणाऱ्‍या सर्वांसोबत बायबल अभ्यास करणं आम्हाला जमत नाही.”

सॅचीओ आणि मेजूहो

पण म्यानमारला येऊन सेवा करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणती व्यावहारिक पावलं उचलण्याची गरज होती? जपानची मेजूहो नावाची बहीण सांगते: “जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची मला आणि माझे पती सॅचीओ यांना इच्छा होती. पण प्रश्‍न होता, जायचं कुठे? २०१३ च्या इयरबुकच्या म्यानमारच्या अहवालातील हृदयस्पर्शी अनुभव वाचून आम्ही विचार करू लागलो, की म्यानमारला जाऊन सेवा करणं आपल्याला जमेल का?” सॅचीओ सांगतो: “आम्ही म्यानमारचं मुख्य शहर यांगोनला एका आठवड्यासाठी राहून तिथे थोडी पाहणी करायचं ठरवलं. या आमच्या छोट्याशा सहलीमुळे आम्ही म्यानमारला येऊन सेवा करू शकतो याबद्दल आम्हाला खात्री पटली.”

तुम्हीही निमंत्रण स्वीकारणार का?

जेन, डॅनिका, रॉडनी आणि जॉर्डन

मुळचे ऑस्ट्रेलियात राहणारे पन्‍नाशीतले रॉडनी आणि त्यांची पत्नी जेन, आपला मुलगा जॉर्डन आणि मुलगी डॅनिका यांच्यासोबत २०१० पासून म्यानमारमध्ये जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणारे म्हणून कार्य करत आहेत. रॉडनी म्हणतात “इथल्या लोकांना अध्यात्मिक गोष्टी शिकून घेण्याची जी भूक आहे ती पाहून आम्ही खूप हेलावून गेलो. मी इतर कुटुंबांना हे सांगू इच्छितो की त्यांनी म्यानमारसारख्या देशात येऊन सेवा करावी. कारण यामुळे आमचं कुटुंब यहोवाच्या आणखी जवळ आलं आहे. आज अनेक तरुण मोबाईल, कार, नोकरी आणि अशा इतर गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत पण आमची मुलं मात्र सेवेसाठी नवीन शब्द शिकण्यात व्यस्त आहेत. तसंच, बायबलबद्दल माहीत नसणाऱ्‍या लोकांसोबत कसा तर्क करावा आणि स्थानिक भाषेतील सभेत उत्तर कसं द्यावं हे शिकण्यात आणि अशा इतर आध्यात्मिक कार्यांत अगदी गढून गेली आहेत.”

ऑलिवर आणि अॅना

अमेरिकेतला ३७ वर्षांचा ऑलिवर नावाचा बांधव अशा प्रकारचं सेवाकार्य का निवडावं हे सांगताना म्हणतो: “सुखसोई असलेलं ठिकाण सोडून नवीन अनोळखी क्षेत्रात जाऊन यहोवाची सेवा करण्याचे खूप फायदे आहेत. घरापासून दूर असणाऱ्‍या क्षेत्रात सेवा केल्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी यहोवावर भरवसा ठेवायला मी शिकलो. मी ज्यांच्यासोबत काम केलं त्यांना मी आधी ओळखत नव्हतो. पण एकच विश्‍वास असल्यामुळे आमच्यात एकता होती आणि हे फक्‍त यहोवाच्याच संघटनेमध्ये होऊ शकतं हे मला जाणवलं.” सध्या ऑलिवर आपली पत्नी अॅना हिच्यासोबत चीनी भाषेच्या क्षेत्रात आवेशाने सेवा करत आहे.

ट्रॉजल

ट्रॉजल नावाची ५२ वर्षांची ऑस्ट्रेलियामधली बहीण म्यानमारमध्ये २००४ पासून सेवा करत आहे. ती सांगते: “ज्यांना शक्य असेल त्यांनी जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन प्रचार करण्याचा विचार करावा असं मी सांगेन. मला या गोष्टीचा अनुभव आला आहे की जर तुम्हाला यहोवाची सेवा करण्याची इच्छा असेल तर यहोवा तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देतो. मी म्यानमारमध्ये येऊन राहीन असा विचार मी कधीच केला नव्हता. मी कल्पनाही केली नव्हती की माझं जीवन एवढं सुखी आणि समाधानी असेल!”

म्यानमारमध्ये जास्त गरज असणाऱ्‍या क्षेत्रात कार्य करणाऱ्‍या बंधुभगिनींचे हृदयस्पर्शी अनुभव ऐकून तुम्हालाही प्रचार न झालेल्या क्षेत्रात राहणाऱ्‍या नम्र मनाच्या लोकांना साक्ष देण्याचे प्रोत्साहन मिळो. म्यानमारमधले जास्त गरज असणाऱ्‍या क्षेत्रातील कार्य करणाऱ्‍यांकडून हा संदेश आहे: “प्लीज, म्यानमारला या आणि आम्हाला मदत करा.”