व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अलिशा

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले-टर्की या देशात

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले-टर्की या देशात

“आनंदाचा संदेश” जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी खूप मेहनत घेतली. (मत्त. २४:१४) त्यासाठी काही जण तर दुसऱ्या देशांतही गेले. उदाहरणार्थ, आज ज्या ठिकाणी टर्की देश आहे त्या भागात प्रेषित पौल आपल्या मिशनरी दौऱ्यांदरम्यान गेला आणि त्याने तिथे मोठ्या प्रमाणात प्रचार कार्य केलं. * त्याच्या जवळपास २००० वर्षांनंतर, म्हणजे २०१४ मध्ये एका खास प्रचार मोहिमेच्या निमित्ताने टर्की देश पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ही खास मोहीम का राबवण्यात आली? आणि त्यात कोणी-कोणी सहभाग घेतला?

“नेमकं चाललंय काय?”

टर्कीमध्ये २,८०० पेक्षा जास्त प्रचारक आहेत आणि त्या देशाची लोकसंख्या सुमारे ८ कोटी आहे. याचा अर्थ, जवळजवळ २८,००० लोकांमागे १ प्रचारक आहे. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल, की त्या देशातल्या फक्त काही लोकांपर्यंतच प्रचारक आनंदाचा संदेश पोचू शकले आहेत. त्यामुळे, २०१४ मध्ये राबवण्यात आलेल्या खास मोहिमेचा उद्देश, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवणं हा होता. या मोहिमेसाठी, टर्कीश भाषा बोलणारे जवळपास ५५० बंधुभगिनी इतर देशांतून टर्की या देशात आले. आणि तिथल्या स्थानिक बांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचार कार्यात सहभाग घेतला. मग, याचा परिणाम काय झाला?

फार मोठ्या प्रमाणावर साक्ष देण्यात आली. इस्तंबुलमधल्या एका मंडळीने लिहिलं: “लोक आम्हाला पाहायचे, तेव्हा विचारायचे: ‘इथं तुमचं काही खास अधिवेशन आहे का? कारण सगळीकडेच आम्हाला यहोवाचे साक्षीदार दिसत आहेत.’” इझमीर या शहरातल्या एका मंडळीने लिहिलं: “टॅक्सी-स्टॅन्डवर काम करणाऱ्या एका व्यक्तीने मंडळीतल्या एका वडिलाला विचारलं: ‘तुमचं कार्य एकदम वाढलंय! नेमकं चाललंय काय?’” खरंच, ही खास मोहीम लोकांच्या नजरेत आल्याशिवाय राहिली नाही.

स्टिफन

या मोहिमेत भाग घेण्यासाठी परदेशातून आलेल्या बांधवांनी प्रचार कार्याचा मोठा आनंद घेतला. डेन्मार्कचा स्टिफन सांगतो: “यहोवाबद्दल कधीही न ऐकलेल्या लोकांना मी दररोज प्रचार करू शकलो. मी खऱ्या अर्थाने यहोवाचं नाव सर्वांपर्यंत पोचवत आहे असं मला वाटत होतं.” फ्रान्सचा झॅन-डेव्हिड म्हणतो: “आम्ही एकाच रस्त्यावर बरेच तास घरोघरचं प्रचार कार्य केलं. अनेकांना यहोवाचे साक्षीदार कोण आहेत हे माहीतच नव्हतं. जवळजवळ प्रत्येक घरात आम्ही साक्ष देऊ शकलो, घरमालकांना व्हिडिओ दाखवू शकलो आणि प्रकाशनंही देऊ शकलो. खरंच खूप मजा आली!”

झॅन-डेव्हिड (मधे)

या मोहिमेत भाग घेण्यासाठी परदेशातून आलेल्या ५५० प्रचारकांनी, फक्त दोन आठवड्यांमध्ये ६० हजार प्रकाशनांचं वाटप केलं! या मोहिमेमुळे खरंच फार मोठ्या प्रमाणावर साक्ष देण्यात आली.

सेवाकार्यासाठी आवेश वाढला. स्थानिक बांधवांसाठी ही खास मोहीम खूप प्रेरणा देणारी ठरली. अनेक जण पूर्णवेळेची सेवा करण्याचा विचार करू लागले. खरंतर, या मोहिमेनंतरच्या १२ महिन्यांत टर्कीमधल्या पायनियरांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली.

शेरीन

परदेशातून आलेले बांधव पुन्हा त्यांच्या मायदेशात परतले, तेव्हा खास मोहिमेचा त्यांच्या सेवाकार्यावर किती चांगला प्रभाव पडला ते त्यांनी सांगितलं. जर्मनीमध्ये राहणारी शेरीन सांगते: “टर्कीतले आपले बांधव फार सहजतेनं अनौपचारिक साक्षकार्य करतात. मला अनौपचारिक साक्षकार्य करताना खूप अवघडल्यासारखं वाटायचं. पण या मोहिमेमुळे, तसंच तिथल्या बांधवांच्या चांगल्या उदाहरणामुळे आणि खूप प्रार्थना केल्यामुळे, पूर्वी कधीही जमलं नाही ते मी करू शकले. मी अंडरग्राऊन्ड मेट्रोमध्येही प्रचार केला आणि बऱ्याच पत्रिकाही दिल्या. आता अनौपचारिक साक्षकार्य करायची मला मुळीच भीती वाटत नाही.”

जोहॅनेस

जर्मनीच्या जोहॅनेस याने म्हटलं: “तिथं केलेल्या प्रचार कार्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं.” तो पुढे म्हणतो: “टर्कीतल्या बांधवांची जास्तीत जास्त लोकांना साक्ष देण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ते प्रत्येक संधीचा फायदा घेतात. त्यामुळे मीही जर्मनीला परतल्यावर तेच करण्याचं ठरवलं. आता मी आधीपेक्षा जास्त लोकांना साक्ष देतो.”

झॅनेप

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना फ्रान्सची झॅनेप म्हणते: “या मोहिमेचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडला. त्यामुळे मला यहोवावर भरवसा ठेवायला आणि आणखी धैर्यानं साक्ष द्यायला मदत मिळाली.”

प्रचारक एकमेकांच्या आणखी जवळ आले. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या बांधवांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि ऐक्य पाहून अनेकांच्या मनावर मोठी छाप पडली. आधी उल्लेख केलेला झॅन-डेव्हिड म्हणतो की, “बांधवांनी केलेलं आदरातिथ्य आम्ही अनुभवलं. त्यांनी आम्हाला त्यांचे मित्र आणि कुटुंबातले सदस्यच मानलं. त्यांनी आमच्यासाठी त्यांचं घरही खुलं केलं.” पुढे हा बांधव म्हणतो: “संपूर्ण जगभरातले यहोवाचे साक्षीदार एकमेकांचे बंधुभगिनी आहेत हे मला माहीत होतं; मी तसं अनेक वेळा आपल्या प्रकाशनांमध्ये वाचलंही होतं. पण आता मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेत होतो. यहोवाच्या लोकांपैकी एक असण्याचा मला अभिमान वाटतो आणि यासाठी मी यहोवाचे खूप खूप आभारही मानतो.”

क्लॅर (मधे)

फ्रान्सची क्लॅर म्हणते: “आपण कोणत्याही देशाचे असोत, डेन्मार्कचे, फ्रान्सचे, जर्मनीचे किंवा टर्कीचे; आपण सर्व एक कुटुंब आहोत. देवाने जणू एक मोठा खोडरबर घेऊन देशांमधल्या सीमारेषाच खोडून टाकल्या आहेत.”

स्टेफनी (मधे)

फ्रान्सची स्टेफनी म्हणते: “या खास मोहिमेतून आम्हाला हे शिकायला मिळालं, की आपल्यातलं ऐक्य हे संस्कृतीमुळे किंवा भाषेमुळे नाही, तर यहोवावर असलेल्या आपल्या प्रेमामुळे आहे.”

दीर्घ काळासाठी झालेले चांगले परिणाम

या मोहिमेसाठी परदेशातून आलेले काही बंधुभगिनी, टर्कीत प्रचारकांची मोठी गरज असल्यामुळे तिथं स्थलांतर करण्याचा विचार करू लागले; काही जणांनी तर स्थलांतर केलंदेखील. या बंधुभगिनींबद्दल तिथल्या बांधवांना खूप कृतज्ञता वाटते.

याचं एक उदाहरण घ्या. टर्कीतल्या एका दुर्गम भागात २५ प्रचारकांचा एक छोटा गट आहे. त्या गटात अनेक वर्षांपासून एकच वडील जबाबदाऱ्या सांभाळत होते. पण २०१५ मध्ये जर्मनी आणि नेदरलँड्‌स इथून सहा प्रचारकांनी सेवा करण्यासाठी तिथे स्थलांतर केलं तेव्हा स्थानिक बांधवांना खरंच किती आनंद झाला असेल!

जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करताना

गरज असलेल्या क्षेत्रांत जाऊन सेवा करताना काही आव्हानांचा सामना करावा लागतो हे खरं आहे. पण त्याचे अनेक आशीर्वादही मिळतात. सेवेसाठी टर्कीमध्ये स्थलांतर केलेले बांधव त्यांच्या अनुभवाबद्दल काय म्हणतात? पुढे दिलेले काही अनुभव लक्षात घ्या.

फेडरीको

स्पेनमध्ये राहणारा आणि वयाच्या चाळिशीत असलेला एक विवाहित बांधव, फेडरीको म्हणतो: “भौतिक गोष्टी जास्त नसल्यामुळे मला मोकळं वाटतं. आणि त्यामुळे मी जीवनातल्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींवरही लक्ष देऊ शकतो.” ‘तुम्ही अशा प्रकारची सेवा करण्याचं प्रोत्साहन इतरांनाही द्याल का?’ असं विचारल्यावर हा बांधव म्हणतो: “हो, नक्कीच!” पुढे तो म्हणतो: “लोकांना यहोवाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता, तेव्हा खरंतर तुम्ही स्वतःला यहोवाच्या हातातच सोपवून देता. यहोवा तुमची कशी काळजी घेतो हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवता.”

रूडी

नेदरलँड्‌स इथला रूडी हा पंचावन्नपेक्षा जास्त वय असलेला एक विवाहित बांधव आहे. तो म्हणतो: “जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा केल्याने आणि राज्याचा संदेश पूर्वी कधीही न ऐकलेल्या लोकांना प्रचार केल्याने खूप समाधान मिळतं. लोकांनी सत्य स्वीकारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, आपल्यालाही खूप आनंद होतो.”

साशा

वयाच्या चाळिशीत असलेला जर्मनीमधला साशा हा विवाहित बांधव म्हणतो: “जेव्हा जेव्हा मी प्रचार कार्याला जातो, तेव्हा तेव्हा मला असे लोक भेटतात, ज्यांनी पूर्वी कधीही सत्याबद्दल ऐकलं नव्हतं. अशा लोकांना यहोवाची ओळख करून घ्यायला मदत केल्यामुळे मला खूप समाधान मिळतं.”

आत्सुको

पस्तीसच्या आसपास वय असलेली आत्सुको ही जपानमधली एक विवाहित बहीण म्हणते: “आधी मला वाटायचं की हर्मगिदोन लवकरात लवकर यायला हवं. पण आता सेवेसाठी टर्कीला स्थलांतर केल्यानंतर तसं वाटत नाही. यहोवा अजूनही धीर दाखवत आहे याबद्दल मी त्याची आभारी आहे. जगभरात चाललेल्या प्रचाराच्या कार्याचं यहोवा कसं मार्गदर्शन करत आहे, यावर जेवढा मी विचार करते तेवढंच मी यहोवाच्या आणखी जवळ जाते.”

रशियातली अलिशा ही तीसेक वर्षांची आहे. ती म्हणते: “यहोवाची अशा प्रकारे सेवा केल्यामुळे तो किती चांगला आहे याचा अनुभव मला घेता आला. (स्तो. ३४:८) यहोवा हा माझा स्वर्गीय पिताच नाही, तर तो माझा जवळचा मित्रदेखील आहे. आणि वेगवेगळ्या परिस्थितींत मला त्याची आणखी चांगल्या प्रकारे ओळख होते. माझं जीवन आनंदाच्या क्षणांनी भरून गेलं आहे. मला अनेक चांगले अनुभव आले आहेत आणि भरपूर आशीर्वादही मिळाले आहेत.”

“आपले डोळे वर करून शेतं पाहा”

टर्कीमध्ये राबवण्यात आलेल्या खास प्रचार मोहिमेमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आनंदाचा संदेश पोचला आहे. पण अजूनही तिथे अशी कितीतरी क्षेत्रं आहेत जिथं प्रचाराचं काम झालेलं नाही. प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्या बांधवांना टर्कीमध्ये दररोज असे लोक भेटतात ज्यांनी यहोवाबद्दल पूर्वी कधीही ऐकलेलं नाही. तुम्हालाही गरज असलेल्या क्षेत्रांमध्ये जाऊन प्रचार करायला आवडेल का? तर मग, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो, की “आपले डोळे वर करून शेतं पाहा, ती पांढरी झाली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत.” (योहा. ४:३५) जगभरात जिथं ‘शेतं कापणीसाठी तयार आहेत,’ म्हणजेच जिथं राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे, तिथं तुम्हीही जाऊन मदत करू शकता का? असं करणं जर तुम्हाला शक्य असेल, तर त्यासाठी आतापासूनच व्यावहारिक पावलं उचलण्यास सुरवात करा. कारण, एक गोष्ट पक्की आहे: “पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत” आनंदाचा संदेश पोचवण्याच्या कार्यात सहभाग घेतल्यामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील.—प्रे. कार्ये १:८.

^ परि. 2 ‘उत्तम देश को देख’ या माहितीपत्रकातील पृष्ठे ३२-३३ पाहा.