व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले ब्राझीलमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले ब्राझीलमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले ब्राझीलमध्ये

तीस वर्षांची रूबीया (१) काही वर्षांपूर्वी दक्षिण ब्राझीलच्या एका लहानशा मंडळीत पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍या सँड्राला (२) भेटायला गेली. त्या भेटीदरम्यान असे काहीतरी घडले ज्याचा रूबीयाच्या मनावर इतका खोल ठसा उमटला की तिच्या जीवनाची दिशाच बदलून गेली. असे काय घडले होते? रूबीयाच याचे उत्तर देते.

“मी जे ऐकलं त्यावर माझा विश्‍वासच बसेना”

“सँड्रा मला एका स्त्रीच्या घरी घेऊन गेली जिच्यासोबत ती बायबल अभ्यास करत होती. अभ्यासादरम्यान ती स्त्री सहज म्हणाली: ‘सँड्रा, माझ्यासोबत काम करणाऱ्‍या तीन मुलींना बायबलचा अभ्यास करायचा आहे, पण मी त्यांना सांगितलं की त्यांना थांबावं लागेल. मला माहीत आहे, तू आधीच इतक्या लोकांना बायबल शिकवत आहेस की या वर्षी तुला जमणारच नाही.’ मी जे ऐकलं त्यावर माझा विश्‍वासच बसेना. ज्या लोकांना यहोवाविषयी शिकायचं होतं त्यांना चक्क वाट पाहावी लागणार होती! माझ्या मंडळीत तर एक बायबल अभ्यास मिळवणंसुद्धा खूप कठीण होतं. त्याच क्षणी, त्या स्त्रीच्या घरी, माझ्या मनात या लहानशा शहरातील लोकांना मदत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यानंतर लवकरच मी आपलं मोठं शहर सोडून, सँड्रा ज्या शहरात पायनियर सेवा करत होती तिथं राहायला आले.”

तेथे गेल्यानंतर रूबीयाला कोणता अनुभव आला? ती म्हणते: “इथं आल्याच्या दोन महिन्यांच्या आत मी १५ बायबल अभ्यास चालवत होते आणि कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही, पण काही काळातच सँड्रासारखीच माझ्याकडेही बायबल अभ्यास करू इच्छिणाऱ्‍यांची वेटिंग लिस्ट होती.”

आपल्या सेवेचे पुन्हा परीक्षण करण्यास प्रवृत्त

विशीत असलेला दिएगो (३) याने दक्षिण ब्राझीलच्या प्रूदेन्तॉपूलीस या लहानशा शहरात पायनियर म्हणून सेवा करत असलेल्या दोन जणांना भेट दिली. या भेटीचा त्याच्यावर इतका गहिरा प्रभाव पडला की तो त्याच्या सेवाकार्याचे पुन्हा परीक्षण करण्यास प्रवृत्त झाला. तो म्हणतो: “मी माझ्या मंडळीत नावापुरता सभांना जायचो, दर महिन्याला कशीतरी दोन-चार तास क्षेत्रसेवा करायचो. पण त्या पायनियरांना भेटल्यानंतर आणि त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर सेवेप्रती असलेल्या त्यांच्या आनंदी मनोवृत्तीची तुलना मी माझ्या बेफिकीर मनोवृत्तीशी केली. ते किती आनंदी व उत्सुक आहेत हे पाहिल्यावर, माझं जीवनसुद्धा त्यांच्याप्रमाणेच अर्थपूर्ण बनावं असं मला मनापासून वाटू लागलं.” त्या भेटीनंतर दिएगोने पायनियर सेवा सुरू केली.

दिएगोप्रमाणे, तुम्हीही एक तरुण साक्षीदार आहात का? तुम्ही प्रचार कार्यात भाग घेत असाल आणि सभांनाही उपस्थित राहत असाल; पण त्याच वेळी तुमची सेवा थोडी रटाळ झाली आहे व तुम्हाला सेवेत पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही असे तुम्हाला वाटते का? तर मग, तुम्ही असे काही फेरबदल करू शकता का, की ज्यामुळे तुम्हाला राज्य प्रचारकांची जेथे जास्त गरज आहे तेथे जाऊन सेवा करण्याचा आनंद अनुभवता येईल? हे मान्य आहे की जीवनातील सुखसोयींचा त्याग करणे तुम्हाला कदाचित भीतिदायक वाटत असेल. तरीही, बऱ्‍याच तरुणांनी असे करण्याची निवड केली आहे. यहोवाची सेवा पूर्णार्थाने करता यावी म्हणून त्यांनी त्यांची वैयक्‍तिक ध्येये व इच्छा बदलण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासंदर्भात दुसरे उदाहरण आहे ब्रूनोचे.

संगीतकार की सुवार्तिक?

अठ्ठावीस वर्षांचा ब्रूनो (४) काही वर्षांपूर्वी एका नामवंत संगीत महाविद्यालयात शिकत होता आणि ऑर्केस्ट्रा संचालक बनायचे त्याचे ध्येय होते. खरे पाहता त्याने त्याच्या अभ्यासात इतकी उत्तम प्रगती केली की बऱ्‍याच प्रसंगी त्याला अनेक वाद्यांचा समावेश असलेल्या ऑर्केस्ट्राचे संचालन करण्यास बोलावण्यात आले. संगीतक्षेत्रात त्याचे भविष्य उज्ज्वल होते. ब्रूनो म्हणतो: “तरीही, मला जीवनात काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. मी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं होतं, पण माझ्याकडून होता होईल तितकं मी त्याला देत नव्हतो, आणि हीच गोष्ट मला बोचत राहिली. मी प्रार्थनेत यहोवाजवळ माझ्या भावना व्यक्‍त केल्या आणि मंडळीतल्या अनुभवी बांधवांसोबतसुद्धा बोललो. याविषयी गांभीर्यानं विचार केल्यानंतर, मी संगीताऐवजी माझ्या सेवेला प्रथम ठेवण्याचा निर्णय घेतला. मी संगीत महाविद्यालय सोडलं आणि राज्य प्रचारकांची जेथे खरोखर जास्त गरज आहे त्या भागात जाऊन सेवा करण्याचं आव्हान स्वीकारलं.” त्याने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला का?

ब्रूनो, साऊं पाउलू या शहराच्या सुमारे २६० किमी अंतरावर असलेल्या ग्वापीआरा या गावात (लोकसंख्या सुमारे ७,०००) राहायला गेला. त्याच्यासाठी हा एक फार मोठा बदल होता. तो म्हणतो: “मी एका लहानशा घरात राहायला गेलो जिथं फ्रिज, टीव्ही किंवा इंटरनेट कनेक्शन नव्हतं. तरीही, त्या घरासोबत मला अशा काही गोष्टी मिळाल्या ज्या आधी माझ्याकडे नव्हत्या. जसं की, भाजीपाल्याची आणि फळांची बाग!” त्या लहानशा मंडळीत सेवा करत असताना, ब्रूनो आठवड्यातून एकदा जेवण, पाणी आणि प्रकाशने एका बॅगेत घालून त्याच्या मोटरसायकलवरून खेड्यापाड्यांत प्रचार करण्यास जायचा. त्या खेड्यांतील बऱ्‍याच लोकांनी याआधी कधीच सुवार्ता ऐकली नव्हती. तो पुढे म्हणतो: “मी १८ बायबल अभ्यास चालवत होतो. विद्यार्थ्यांना जीवनात बदल करताना पाहून मला खूप आनंद व्हायचा. आता मला जाणीव झाली की माझ्या जीवनात ज्या गोष्टीची कमी होती—राज्यासंबंधित कार्यांना जीवनात प्रथम स्थान दिल्यानं मिळणारं मनस्वी समाधान—ती गोष्ट आता मला मिळाली होती. जर मी भौतिक गोष्टींच्या मागं लागलो असतो, तर मी हा आनंद कधीच अनुभवला नसता.” ग्वापीआरामध्ये असताना ब्रूनोने त्याची आर्थिक गरज कशी भागवली? तो हसून म्हणतो: “गिटार शिकवण्याद्वारे.” एका अर्थाने तो अद्यापही संगीतकार होता.

“मला राहणं भाग होतं”

विशीत असलेली मारीयाना (५) हिची परिस्थिती ब्रूनोसारखीच होती. तिचा वकिलीचा व्यवसाय होता. पण, इतका फायद्याचा व्यवसाय असूनही ती खऱ्‍या अर्थाने समाधानी नव्हती. ती म्हणते: “मला असं वाटायचं की मी जे काही करत आहे ते ‘वायफळ’ आहे.” (उप. १:१७) बऱ्‍याच बंधुभगिनींनी तिला पायनियर सेवेचा विचार करण्याचे प्रोत्साहन दिले. त्याबद्दल विचार केल्यानंतर, मारीयानाने तिच्या मैत्रिणी बीयांका (६), कॅरोलीन (७) व जूलीयाना (८) यांच्यासोबत दुर्गम क्षेत्रातील बारा दू बूग्रेस या गावात जाऊन तेथील मंडळीला साहाय्य करण्याचे ठरवले. बोलिव्हियाजवळ असलेले हे गाव त्यांच्या घरापासून हजारो मैल दूर होते. तेथे गेल्यानंतर पुढे काय झाले?

मारीयाना म्हणते: “मी तिथं केवळ तीन महिने राहण्याच्या उद्देशानं गेले होते. पण या तीन महिन्यांच्या शेवटी मी १५ बायबल अभ्यास चालवत होते! साहजिकच, सत्यात प्रगती करण्यासाठी या विद्यार्थ्यांना आणखी बरीच मदत देण्याची गरज होती. त्यामुळं, आता मला जायचं आहे हे सांगण्याचं धैर्यच मला झालं नाही. मला राहणं भाग होतं.” आणि त्या चौघींनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. या नव्या करियरमुळे मारीयानाचे जीवन आणखी अर्थपूर्ण बनले का? ती म्हणते: “लोकांना त्यांचं जीवन सुधारण्यास यहोवा माझा उपयोग करत आहे हे जाणून मला खूप चांगलं वाटतं. आता मी माझा वेळ व शक्‍ती काहीतरी अर्थपूर्ण करण्यात घालवत आहे ही जाणीव खरोखर खूप आनंददायक आहे.” त्या चौघींच्या भावना व्यक्‍त करत कॅरोलीन म्हणते: “रोज रात्री झोपण्याआधी मला याचा विचार करून खूप समाधान वाटतं की मी राज्याशी संबंधित कार्यासाठी आपली शक्‍ती खर्च केली आहे. बायबल विद्यार्थ्यांना मदत करण्यावर माझं जीवन केंद्रित आहे. त्यांना प्रगती करताना पाहून मला खूप आनंद होतो. ‘परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा,’ हे शब्द किती खरे आहेत ते मी अनुभवत आहे.”—स्तो. ३४:८.

दुर्गम भागात जाऊन सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी “संतोषाने पुढे” येणाऱ्‍या जगभरातील तरुण बंधुभगिनींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या तरुणांना पाहून यहोवाला किती आनंद होत असेल! (स्तो. ११०:३; नीति. २७:११) स्वेच्छेने काम करणारे असे सर्व जण यहोवाचे अनेक आशीर्वाद अनुभवतात.—नीति. १०:२२.

[५ पानांवरील चौकट/चित्र]

“आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही”

झ्वाऊं पाउलू आणि त्याची पत्नी नोएमी यांनी जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची इच्छा व्यक्‍त केली तेव्हा त्यांना धैर्य खचवणाऱ्‍या काही टिप्पण्या ऐकायला मिळाल्या. मंडळीतील काहींनी म्हटले: “छोट्या शहरात जाऊन तुम्ही आर्थिक रीत्या जोखीम घेत आहात.” “दुसरीकडे कशाला जायचं? आपल्या मंडळीच्या बऱ्‍याच भागांत अजूनही पुष्कळ काही करायचं आहे.” झ्वाऊं पाउलू म्हणतो: “चांगल्या हेतूनं दिलेल्या, पण मन खच्ची करणाऱ्‍या अशा सल्ल्याचा आमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू नये म्हणून आम्हाला खूप प्रयत्न करावा लागला.” पण, आज कित्येक वर्षे जास्त प्रचारकांची गरज असलेल्या ठिकाणी सेवा केल्यानंतर, झ्वाऊं पाउलू आणि नोएमी यांना आपली सेवा वाढवण्याच्या निर्णयाला चिकटून राहिल्याचा खूप आनंद होतो. झ्वाऊं पाउलू म्हणतो: “आम्ही जेव्हापासून इथं आलो आहोत तेव्हापासून आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. आणि ज्या गोष्टी खरोखर गरजेच्या आहेत, त्या तर आम्हाला पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात मिळाल्या आहेत.” नोएमी म्हणते: “आमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं आहे.”

लहान शहरांत गुजराण करणे खूप आव्हानात्मक असते. तर मग, जे दुर्गम भागात जातात ते स्वतःचा खर्च कसा चालवतात? कल्पनाशक्‍तीचा वापर करण्याद्वारे. काही जण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकवतात, लहान मुलांच्या शिकवणी घेतात, काही शिवणकाम करतात, तर काही घरे रंगवण्याची कामे करतात किंवा अर्धवेळेचे मिळेल ते काम करतात. गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्‍या बहुतेकांचे काय मत आहे? आव्हाने असली, तरी या कार्यातून मिळणारे आशीर्वाद त्यांपेक्षा कितीतरी जास्त आहेत!

[६ पानांवरील चौकट/चित्र]

घरची आठवण सतावते तेव्हा . . .

टीयागू: “या नवीन मंडळीत आल्याच्या काही काळातच, मला उदास वाटू लागलं. या शहरात खूप कमी प्रचारक होते आणि करमणुकीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. मला घरची आठवण सतावू लागली. मन रमवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार होतं. म्हणून मी मंडळीतल्या बंधुभगिनींची चांगल्या प्रकारे ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि त्याचा मला फायदा झाला! मी नवे मित्र बनवले आणि लवकरच मला आनंदी वाटू लागलं आणि मी या नवीन ठिकाणाला रूळलो.”

[३ पानांवरील चित्र]

नोएमी आणि झ्वाऊं पाउलू, ऑस्कूरा, सान्ता कातारीना