व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जेव्हा विवाह जोडीदार पोर्नोग्राफी पाहतो

जेव्हा विवाह जोडीदार पोर्नोग्राफी पाहतो
  • “माझ्या पतीने कितीतरी वेळा व्यभिचार केलाय असं मला वाटलं.”

  • “माझी काहीच इज्जत नाही असं मला वाटलं. मी दिसायला चांगली नाहीये, काहीच कामाची नाहीये असं मला वाटत होतं.”

  • “मला कोणाशीच याबद्दल बोलता येत नव्हतं. मी आतल्या आत घुसमटत चालले होते.”

  • “यहोवाला माझी काहीच पर्वा नाही असं मला वाटत होतं.”

वर दिलेल्या शब्दांवरून आपण समजू शकतो की जर एका स्त्रीचा पती पोर्नोग्राफी a पाहत असेल तर तिला कसं वाटत असेल. आणि हे जर तो गुप्तपणे कित्येक महिने किंवा वर्षं करत असेल, तर तिला कदाचित असं वाटेल की ती तिच्या पतीवर विश्‍वास ठेवू शकत नाही. एका पत्नीने म्हटलं, “‘माझ्या शेजारी असलेली ही व्यक्‍ती नेमकी आहे तरी कोण?’ असा प्रश्‍न माझ्या मनात यायचा आणि ‘या व्यक्‍तीने अशा आणखी किती गोष्टी माझ्यापासून लपवल्या असतील?’ अशी शंका मला वाटायची.”

हा लेख अशा स्त्रियांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांचे पती पोर्नोग्राफी पाहण्याच्या सवयीला बळी पडले आहेत. b या लेखात अशी काही बायबल तत्त्वं देण्यात आली आहेत ज्यांमुळे त्यांना सांत्वन मिळू शकेल. आणि यहोवा त्यांना मदत करेल या गोष्टीची त्यांना खातरी मिळेल. यासोबतच, भावनिक आणि आध्यात्मिकरीत्या सावरायलासुद्धा या लेखामुळे त्यांना मदत होईल. c

निर्दोष जोडीदार काय करू शकतो?

तुम्ही तुमच्या पतीच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवून त्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकत नाही. पण अशा काही गोष्टी नक्कीच आहेत ज्या करून तुम्ही तुमचा त्रास कमी करू शकता आणि तुमचं मन शांत ठेवू शकता. जसं की, पुढे दिलेल्या गोष्टींचा विचार करा.

स्वतःला दोष देऊ नका.  एका पत्नीला असं वाटू शकतं की तिचा पती पोर्नोग्राफी पाहतो यात कुठे न्‌ कुठे तिचीच चूक आहे. ॲलीस d नावाच्या एका बहिणीला वाटायचं की तीच कुठेतरी कमी पडत आहे. तिच्यातच काहीतरी दोष आहे. ती विचार करायची की, ‘माझ्यातच काहीतरी दोष असल्यामुळे माझा पती इतर स्त्रियांकडे आकर्षित होतोय.’ काही बहिणींना असं वाटतं, की त्यांच्यामुळेच वातावरण आणखी बिघडतं आणि म्हणून त्या स्वतःला दोष देतात. डॅनिएला नावाची बहीण म्हणते, “मला वाटायचं मीच खूप वाईट आहे. माझी सारखी चिडचिड होत असल्यामुळे आणि मला राग येत असल्यामुळेच माझा संसार उद्ध्‌वस्त होण्याच्या मार्गावर आहे.”

तुम्हालाही जर या बहिणींसारखं वाटत असेल, तर नेहमी लक्षात ठेवा की तुमचा पती काय करतो यासाठी यहोवा तुम्हाला जबाबदार ठरवत नाही. याकोब १:१४ मध्ये म्हटलंय: “प्रत्येक जण स्वतःच्याच  इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो.” (रोम. १४:१२; फिलिप्पै. २:१२) यहोवा तुम्हाला कधीच दोष देत नाही. उलट, तुमच्या एकनिष्ठेची त्याला कदर आहे.​—२ इति. १६:९.

हेही लक्षात घ्या की तुमचा पती पोर्नोग्राफी पाहतो याचा अर्थ तुमच्यातच काहीतरी कमी आहे असा होत नाही. या विषयावर तज्ञांचं असं म्हणणं आहे की पोर्नोग्राफी एका व्यक्‍तीच्या मनात लैंगिक इच्छांबद्दल अशी अनियंत्रित हाव निर्माण करते जी कोणतीही स्त्री पूर्ण करू शकत नाही.

खूप जास्त चिंता करू नका.  कॅथरिन म्हणते, की तिचा पती पोर्नोग्राफी पाहतो हा विचार तिच्या मनात सतत घोळत राहायचा. ती त्यावरच विचार करत राहायची. फ्रांसीस्का नावाची आणखी एक बहीण म्हणते: “माझा पती कुठे आहे हे जर मला माहीत नसेल तर मी एकदम बेचैन होऊन जाते. माझा पूर्ण दिवस चिंतेत जातो.” आणखी काही बहिणींचं असं म्हणणं आहे, की त्यांच्या पतीच्या समस्येबद्दल ज्या भाऊबहिणींना माहीत आहे, त्यांच्यासमोर गेल्यामुळे त्यांना खूप लाजल्यासारखं वाटतं. तसंच काही बहिणींना खूप एकटं पडल्यासारखं वाटतं, कारण त्यांची समस्या कोणी समजू शकणार नाही असा विचार त्या करतात.

असं वाटणं साहजिक आहे. पण याच गोष्टीचा तुम्ही जर सतत विचार करत राहिलात तर तुम्ही चिंतेत बुडून जाल. त्याऐवजी यहोवासोबतच्या तुमच्या नात्यावर लक्ष केंद्रित करा. असं केल्यामुळे परिस्थितीचा सामना करण्याचं बळ तुम्हाला मिळेल.​—स्तो. ६२:२; इफिस. ६:१०.

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच स्त्रियांची उदाहरणं आहेत ज्या त्रासात होत्या, आणि त्यांनी प्रार्थनेत यहोवाकडे मदत मागितली आणि त्यांना सांत्वन मिळालं. ही उदाहरणं वाचून आणि त्यांवर मनन करून तुम्हालाही मदत होऊ शकते. यहोवाने त्यांची परिस्थिती नेहमीच बदलली नाही, पण त्यांना मनाची शांती दिली. हन्‍नाचाच विचार करा. तिचं “मन अतिशय कटू झालं होतं.” पण तरी तिने “बराच वेळ यहोवाला प्रार्थना” केली. तिची परिस्थिती बदलेल की नाही हे तिला माहीत नव्हतं. पण प्रार्थना केल्यामुळे तिचं मन शांत झालं.​—१ शमु. १:१०, १२, १८; २ करिंथ. १:३, ४.

पती-पत्नी दोघांनाही मंडळीतल्या वडिलांची मदत घ्यायची गरज पडू शकते

मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. ते तुमच्यासाठी “वाऱ्‍यापासून निवारा आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा” होतील. (यश. ३२:२, तळटीप) ते कदाचित एखाद्या बहिणीला तुमच्यासोबत बोलायला सांगतील. तिला तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगू शकता आणि त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल.​—नीति. १७:१७.

तुम्ही तुमच्या पतीला मदत करू शकता का?

पोर्नोग्राफी पाहण्याच्या सवयीवर मात करता यावी म्हणून तुम्ही तुमच्या पतीला मदत करू शकता का? कदाचित. बायबल म्हणतं की जर एखादी समस्या सोडवायची असेल किंवा एखाद्या शक्‍तिशाली शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर “एकापेक्षा दोघं चांगले.” (उप. ४:९-१२) तज्ञांना असं दिसून आलंय, की जेव्हा पोर्नोग्राफीच्या सवयीवर मात करण्यासाठी पती-पत्नी सोबत मिळून काम करतात तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. आणि त्यासोबतच त्यांचा एकमेकांवरचा विश्‍वाससुद्धा वाढतो.

हे खरंय, की तुमच्या जोडीदाराला पोर्नोग्राफी पाहण्याच्या सवयीवर मात करायची किती इच्छा आहे आणि त्यासाठी किती प्रयत्न करायला तो तयार आहे यावर हे अवलंबून आहे. त्यासाठी त्याने यहोवाकडे कळकळून प्रार्थना केली आहे का? आणि मंडळीतल्या वडिलांकडे मदत मागितली आहे का? (२ करिंथ. ४:७; याको. ५:१४, १५) या मोहापासून दूर राहण्यासाठी त्याने काही गोष्टी ठरवून ठेवल्या आहेत का? जसं की, त्याने असं ठरवलं आहे का, की तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मर्यादित वापर करेल आणि अशा परिस्थिती टाळेल ज्यांमुळे पोर्नोग्राफी पाहण्याचा त्याला मोह होऊ शकतो. (नीति. २७:१२) तो तुमची मदत घ्यायला आणि तुमच्यासोबत पूर्णपणे प्रामाणिक राहायला तयार आहे का? जर असेल तर तुम्ही कदाचित त्याला मदत करू शकता.

तुम्ही हे कसं करू शकता? एका उदाहरणाचा विचार करा. फेलिशीयाचं इथनसोबत लग्न झालं होतं आणि इथनला लहानपणापासून पोर्नोग्राफी पाहायची सवय होती. फेलिशीया नेहमी अशा प्रकारचं वातावरण ठेवायचा प्रयत्न करते ज्यामुळे इथनला तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता येईल. त्यामुळे जेव्हा-जेव्हा इथनला पोर्नोग्राफी पाहायची इच्छा होते, तेव्हा त्याबद्दल बोलून दाखवायला त्याला सोपं जातं. इथन म्हणतो: “मी प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने माझ्या पत्नीशी बोलतो. या मोहापासून दूर राहायला ती मला प्रेमळपणे मदत करते. आणि या बाबतीत ती नेहमी माझी विचारपूस करते. इंटरनेटचा मर्यादित वापर करायलाही ती मला मदत करते.” इथनच्या पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीबद्दल साहजिकच फेलिशीयाला खूप वाईट वाटतं. पण ती म्हणते: “मला होणाऱ्‍या वेदना आणि माझ्या मनात असलेला राग इथनला ही वाईट सवय सोडायला मदत करू शकत नाही. म्हणून मग त्याला या सवयीवर मात कशी करता येईल, याबद्दल मी त्याच्याशी बोलते. आणि मग तोही मला माझ्या दुःखातून आणि त्रासातून सावरायला मदत करतो.”

अशा प्रकारे सोबत मिळून चर्चा केल्यामुळे पतीला पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीपासून दूर राहायला मदत तर होतेच, पण त्यासोबत पत्नीलासुद्धा पुन्हा त्याच्यावर विश्‍वास ठेवायला सोपं जातं. शिवाय जेव्हा पती स्पष्टपणे आपल्या इच्छांबद्दल, तो दिवसभरात कुठे जातो, काय करतो याबद्दल पत्नीसोबत बोलायला तयार असतो, तेव्हा पत्नीलाही त्याच्यावर विश्‍वास ठेवायला सोपं जातं. कारण तो तिच्यापासून काही लपवायचा प्रयत्न करत नसतो.

तुम्ही तुमच्या पतीला अशा प्रकारे मदत करू शकता का? करू शकत असाल तर हा लेख त्याच्यासोबत बसून वाचायला आणि त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत आहे? पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीवर मात करणं आणि तुमचा विश्‍वास पुन्हा जिंकणं, हे तुमच्या पतीचं ध्येय असलं पाहिजे. त्याने तुमच्यावर चिडण्यापेक्षा, तुम्हाला किती त्रास होतोय, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्हीसुद्धा तो जे काही प्रयत्न करत आहे, त्याला साथ दिली पाहिजे आणि तुमचा विश्‍वास पुन्हा जिंकायची त्याला संधी दिली पाहिजे. लोक या सवयीला का बळी पडतात आणि त्यावर कशी मात करता येईल, हे तुम्हा दोघांनाही समजून घ्यावं लागेल. e

याबद्दल बोलत असताना जर तुमच्यात वादावाद होईल अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही दोघेही मंडळीतल्या अशा वडिलांची मदत घेऊ शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला मनमोकळेपणाने बोलता येईल. ते थोडा वेळ तुमच्यासोबत बसून तुम्हाला ही चर्चा करायला मदत करतील. शिवाय, हेही लक्षात घ्या, की तुमच्या जोडीदाराने पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीवर मात केल्यानंतरसुद्धा त्याच्यावर भरवसा ठेवायला तुम्हाला बराच वेळ लागू शकतो. पण धीर सोडू नका. छोट्या-छोट्या गोष्टींनीसुद्धा तुमच्या दोघांमधलं नातं कसं सुधारत आहे, याकडे लक्ष द्या. तुम्ही जर धीर धरला आणि वेळ दिला, तर तुमचं नातं पुन्हा एकदा मजबूत होऊ शकेल.​—उप. ७:८; १ करिंथ. १३:४.

सवय सुटतच नसेल तर?

बराच काळ पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीपासून दूर राहिल्यानंतर जर पुन्हा तुमच्या पतीने पोर्नोग्राफी पाहिली तर काय? याचा अर्थ त्याला पश्‍चात्ताप झालेला नाही आणि आता पुढे काहीच होऊ शकत नाही, असा होतो का? असं म्हणता येणार नाही. जेव्हा अशा सवयींचं व्यसन लागतं, तेव्हा कदाचित त्याला आयुष्यभर या सवयीशी झुंज द्यावी लागू शकते. कित्येक वर्षं या सवयीपासून दूर राहिल्यावरसुद्धा ही सवय पुन्हा डोकावू शकते. पुढे असं होऊ नये म्हणून कदाचित त्याला स्वतःला आणखी जास्त मर्यादा घालाव्या लागतील. आपण या सवयीवर मात केली आहे, असं जरी त्याला वाटत असलं, तरी त्याला स्वतःसोबत सक्‍तीने वागावं लागेल. (नीति. २८:१४; मत्त. ५:२९; १ करिंथ. १०:१२) म्हणजे त्याला नवीन ‘मनोवृत्ती’ विकसित करावी लागेल आणि आपल्या विचारांवर नियंत्रण करायला शिकावं लागेल. तसंच त्याला ‘वाईट गोष्टींचा द्वेष  करायला’ शिकण्याची गरज आहे. म्हणजेच पोर्नोग्राफी आणि त्याच्याशी संबंधित इतर अशुद्ध सवयींवर, म्हणजे हस्तमैथूनसारख्या सवयींवर मात करण्याची गरज आहे. (इफिस. ४:२३; स्तो. ९७:१०; रोम. १२:९) तो हे सगळं करायला तयार आहे का? जर असेल तर तो एक न्‌ एक दिवस या सवयीपासून कायमची सुटका मिळवू शकतो. f

यहोवासोबत असलेल्या तुमच्या नात्यावर लक्ष द्या

पण तुमचा पती ही सवय सोडण्यासाठी प्रयत्नच करायला तयार होत नसेल तर काय? अशा वेळी तुम्हाला सारखं निराश झाल्यासारखं वाटत असेल, राग येत असेल, किंवा आपला विश्‍वासघात झालाय असं वाटत असेल, तर हे समजण्यासारखं आहे. पण तरीही तुम्ही सगळं काही यहोवाच्या हातात सोपवून दिलं तर तुम्हाला मनाची शांती मिळेल. (१ पेत्र ५:७) तुम्ही जर वैयक्‍तिक अभ्यास, प्रार्थना आणि मनन करून यहोवाच्या जवळ जायचा प्रयत्न केला, तर तोही तुमच्या जवळ येईल या गोष्टीची तुम्ही खातरी बाळगू शकता. यशया ५७:१५ मध्ये म्हटलंय: ‘दुःखी आणि खचून गेलेल्यांना’ नवी उमेद देण्यासाठी तो त्यांच्यासोबत असतो.  म्हणून आध्यात्मिक गोष्टींमध्ये व्यस्त राहायचा पुरेपूर प्रयत्न करा. आणि मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. तसंच, एक न्‌ एक दिवस आपला पती स्वतःमध्ये प्रामाणिकपणे बदल करेल अशी आशा सोडू नका.​—रोम. २:४; २ पेत्र ३:९.

a पोर्नोग्राफी हा शब्द एखाद्या व्यक्‍तीच्या लैंगिक भावना चेतवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अश्‍लील व्हिडिओ, चित्रं, लिखाणं आणि ऑडिओ यांना सूचित करतो.

b या लेखात पोर्नोग्राफी पाहणारी व्यक्‍ती पती आहे असं गृहीत धरण्यात आलंय. तरी, या लेखात अशा बऱ्‍याच तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे जी अशा पतींनाही मदत करतील ज्यांच्या पत्नींना पोर्नोग्राफी पाहण्याची सवय आहे.

c पोर्नोग्राफी पाहणं हे शास्त्रवचनानुसार घटस्फोट घेण्याचं कारण ठरू शकत नाही.​—मत्त. १९:९.

d नावं बदलण्यात आली आहेत.

e jw.org वर आणि आपल्या प्रकाशनांमध्ये तुम्ही याबद्दल बरीच माहिती घेऊ शकता. जसं की, jw.org वर तुम्ही, “पोर्नोग्राफी से तबाह हो सकती है शादीशुदा ज़िंदगी” आणि “क्या गंदी तसवीरें या वीडियो देखने में कोई बुराई है?” हे हिंदीमधले लेख पाहू शकता. तसंच, १ जुलै २००७ च्या टेहळणी बुरूज अंकातला, पान १०-१२ वर असलेला “तुम्ही प्रलोभनाचा प्रतिकार करू शकता!” हा लेखसुद्धा पाहू शकता.

f पोर्नोग्राफी पाहायच्या सवयीचं हळूहळू व्यसन लागू शकतं. म्हणून काही जोडप्यांनी मंडळीतल्या वडिलांची मदत घेण्यासोबतच तज्ञांचीसुद्धा मदत घेतली आहे.