व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती

देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती

मानव अनेक देवांची उपासना करतात, पण खरा देव एकच आहे. (योहान १७:३) तो सर्वश्रेष्ठ आहे. त्यानेच सर्व गोष्टींची रचना केली आहे आणि त्यानेच सर्वांना जीवन दिलं आहे. त्यामुळे आपली उपासना मिळवण्यासाठी तोच योग्य आहे.—दानीएल ७:१८; प्रकटीकरण ४:११.

देव कोण आहे?

मूळ लिखाणात देवाचं नाव ७,००० पेक्षा जास्त वेळा येतं

यहोवा हे देवाचं नाव आहे

प्रभू, देव, पिता—या यहोवाच्या काही पदव्या आहेत

देवाचं नाव काय आहे? देव स्वतःबद्दल म्हणतो: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.” (यशया ४२:८, पं.र.भा.) देवाचं नाव बायबलमध्ये ७,००० पेक्षा जास्त वेळा येतं. पण अनेक बायबल भाषांतरांत यहोवा या नावाच्या जागी ‘प्रभू’ असं लिहिण्यात आलं आहे. पण असं करणं योग्य नव्हतं. देवाची इच्छा आहे की आपण त्याला ओळखावं आणि त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातं जोडावं म्हणून तो आपल्याला “त्याच्या नावाचा धावा” करायला आर्जवतो.—स्तोत्र १०५:१.

यहोवासाठी वापरलेल्या पदव्या. बायबलमध्ये यहोवासाठी अनेक पदव्या वापरल्या आहेत. जसं की, ‘देव,’ ‘सर्वसमर्थ,’ ‘निर्माणकर्ता,’ ‘पिता,’ ‘प्रभू’ आणि ‘सर्वशक्‍तिमान.’ बायबलमध्ये यहोवाला उद्देशून असलेल्या अनेक प्रार्थनांमध्ये या आदरपूर्वक पदव्यांचा उल्लेख आढळतो.—दानीएल ९:४.

देव कसा आहे? देव आत्मिक व्यक्‍ती आहे. (योहान ४:२४) बायबल म्हणतं की “कोणत्याही मानवाने कधीही देवाला पाहिले नाही.” (योहान १:१८) बायबलमध्ये त्याच्या भावनांबद्दल सांगितलं आहे. जर लोक वाईट वागले तर त्याला दुःख होतं आणि ते चांगले वागले तर त्याला “आनंद” होतो.—नीतिसूत्रे ११:२०; स्तोत्र ७८:४०, ४१.

देवाचे अद्‌भुत गुण. देव भेदभाव करत नाही. तो सर्व राष्ट्रांच्या आणि पार्श्‍वभूमीच्या लोकांना समान लेखतो. (प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५) तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६, ७) पण त्याचे चार विशेष असे गुण आहेत जे आपल्या मनाला भिडतात.

शक्‍ती. तो “सर्वसमर्थ देव” असल्यामुळे त्याच्याकडे अमर्यादित शक्‍ती आहे. आणि यामुळे त्याने ज्या गोष्टींबद्दल अभिवचन दिलं आहे ते सर्व तो पूर्ण करू शकतो.—उत्पत्ति १७:१.

बुद्धी. देव सर्वांपेक्षा बुद्धिमान आहे. म्हणूनच बायबलमध्ये त्याच्याबद्दल म्हटलं आहे की तो “एकमेव बुद्धिमान” आहे.—रोमकर १६:२७.

न्याय. देव नेहमी योग्य तेच करतो. त्याची कार्यं “परिपूर्ण” आहेत आणि तो कधीही अन्यायीपणे वागत नाही.—अनुवाद ३२:४.

प्रेम. बायबल म्हणतं की “देव प्रेम आहे.” (१ योहान ४:८) देव फक्‍त प्रेम दाखवतो असं नाही तर तो स्वतः प्रेम आहे. तो जे काही करतो ते तो त्याच्या अतुल्य प्रेमामुळे प्रेरित होऊन करतो आणि आपल्याला यामुळे खूप फायदा होतो.

देवाचं मानवांसोबत असलेलं घनिष्ठ नातं. देव हा आपल्या सर्वांचाच प्रेमळ पिता आहे. (मत्तय ६:९) जर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवला तर आपण त्याचे मित्र बनू शकतो. (स्तोत्र २५:१४) खरंतर, देव आपल्याला आर्जवतो की आपण त्याला प्रार्थना करावी आणि त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातं जोडावं. तो म्हणतो की आपण “आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून” द्याव्यात कारण त्याला आपली “काळजी आहे.”—१ पेत्र ५:७; याकोब ४:८.

देव आणि येशू ख्रिस्त यांच्यामधला फरक

येशू हा देव नाही. येशू एका बाबतीत खूप विशेष आहे. फक्‍त तोच असा आहे ज्याला देवाने स्वतः घडवलं. म्हणूनच बायबलमध्ये त्याला देवाचा मुलगा असं म्हटलं आहे. (योहान १:१४) येशूला बनवल्यानंतर यहोवाने त्याला “कुशल कारागीर” म्हणून वापरलं. मग येशूने सर्वकाही, म्हणजे निर्जीव आणि सजीव दोन्ही गोष्टी घडवल्या.—नीतिसूत्रे ८:३०, ३१; कलस्सैकर १:१५, १६.

‘मी देव आहे’ असा येशूने कधीच दावा केला नाही. याउलट, त्याने म्हटलं: “मी त्याच्या [देवाच्या] वतीने आलो आहे आणि त्यानेच मला पाठवलं आहे.” (योहान ७:२९) येशूने आपल्या एका शिष्याशी बोलताना यहोवाला, ‘माझा पिता व तुमचा पिता’ आणि ‘माझा देव व तुमचा देव’ म्हणून संबोधलं. (योहान २०:१७) येशूचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि स्वर्गात आपल्या उजव्या हाताकडे बसवलं व त्याला मोठा अधिकार दिला.—मत्तय २८:१८; प्रेषितांची कार्ये २:३२, ३३.

येशू ख्रिस्त आपल्याला देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडायला मदत करतो

येशू त्याच्या पित्याबद्दल शिकवण्यासाठी या पृथ्वीवर आला. यहोवाने स्वतः येशूबद्दल म्हटलं: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं ऐका.” (मार्क ९:७) यहोवाला सर्वात जवळून ओळखणारा फक्‍त येशू आहे. त्याने म्हटलं: “पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि ज्या कोणाला तो पित्याविषयीचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”—लूक १०:२२.

येशूने देवाच्या गुणांचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. येशूने त्याच्या पित्याच्या गुणांचं इतकं हुबेहूब अनुकरण केलं की तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.” (योहान १४:९) येशूने त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या पित्याचं प्रेम दाखवलं आणि यामुळे लोकांना देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडायला मदत झाली. त्याने म्हटलं: “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.” (योहान १४:६) त्याने असंही म्हटलं: “खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील. कारण खरं पाहता पिता अशाच प्रकारे उपासना करणाऱ्‍यांना शोधत आहे.” (योहान ४:२३) जरा कल्पना करा, यहोवा तुमच्यासारख्याच लोकांना शोधत आहे ज्यांना त्याच्याबद्दल खरी आणि अचूक माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे.