व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

प्रार्थना केल्यामुळे काही फायदा होतो का?

प्रार्थना केल्यामुळे काही फायदा होतो का?

 बरेच तरुण लोक म्हणतात की आम्ही प्रार्थना तर करतो, पण दररोज करत नाही. या तरुणांपैकी काहींना कदाचित असं वाटत असेल, की प्रार्थना केल्यामुळे खरंच काही फायदा होतो का? की आपण फक्‍त मनाच्या समाधानासाठी प्रार्थना करतो?

 प्रार्थना म्हणजे नेमकं काय?

 प्रार्थना करणं म्हणजे ज्याने सगळं काही बनवलं, त्या निर्माणकर्त्याशी बोलणं. विचार करा, किती मोठी गोष्ट आहे ही! आपला निर्माणकर्ता यहोवा आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. तरी, “तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रेषितांची कार्यं १७:२७) बायबल तर आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणतं, “देवाच्या जवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”​याकोब ४:८.

 तुम्ही देवाच्या जवळ कसं येऊ शकता?

  •   एक मार्ग म्हणजे प्रार्थना करणं​—प्रार्थनेत तुम्ही देवाशी बोलता.

  •   दुसरा मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करणं​—बायबलमधून देव तुमच्याशी “बोलतो.”

 असा दोन्ही बाजूंनी संवाद होण्यासाठी तुम्ही प्रार्थना आणि बायबलचा अभ्यास केला पाहिजे. असं केल्यामुळे तुमची देवाशी पक्की मैत्री होईल.

 “यहोवाशी, या विश्‍वातल्या सगळ्यात उच्च व्यक्‍तीशी बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे, याची तुलना कशाशीच करता येणार नाही.”—जेरमी.

 “प्रार्थनेत यहोवाकडे माझं मन मोकळं केल्यामुळे मला तो एका जवळच्या मित्रासारखा वाटतो.”—मिरँडा.

 देव खरंच ऐकतो का?

 तुम्ही देवाला मानत असला आणि त्याला प्रार्थना करत असला, तरी तुमच्या मनात कदाचित ही शंका असेल, की तो खरंच ऐकतो का? पण बायबलमध्ये यहोवाला ‘प्रार्थना ऐकणारा देव’ असं म्हटलंय. (स्तोत्र ६५:२) इतकंच नाही, तर बायबल तुम्हाला सांगतं, की “आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या.” का? “कारण त्याला तुमची काळजी आहे.”​—१ पेत्र ५:७.

 जरा विचार करा: तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांशी बोलायला नियमितपणे वेळ काढता का? देवाच्या बाबतीतही तुम्ही हेच करू शकता. त्याला नियमितपणे प्रार्थना करा, आणि यहोवा हे त्याचं नाव घेऊन प्रार्थना करा. (स्तोत्र ८६:५-७; ८८:९) बायबल तर म्हणतं, सतत “प्रार्थना करत राहा.”​—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

 “प्रार्थनेत मी माझ्या स्वर्गातल्या पित्याशी बोलतो, तेव्हा मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगतो.”—मॉइझेस.

 “मी जशी माझ्या मम्मीशी किंवा बेस्ट फ्रेंडशी बोलते, तसंच यहोवाशीही अगदी मनमोकळेपणाने बोलते.”—कॅरन.

 प्रार्थनेत काय म्हणायचं?

 बायबल सांगतं: “सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.”​—फिलिप्पैकर ४:६.

 म्हणजे आपण आपल्या प्रॉब्लेम्सबद्दलही देवाला सांगू शकतो का? हो! बायबल तर असं म्हणतं, की “तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल.”​—स्तोत्र ५५:२२.

 पण याचा असा अर्थ होत नाही, की आपण देवाशी फक्‍त आपल्या प्रॉब्लेम्सबद्दलच बोललं पाहिजे. शँटेल नावाची एक मुलगी म्हणते, “मी जर नेहमी यहोवाला मदतच मागत राहिले, तर त्याला चांगली मैत्री म्हणता येणार नाही. मला तर असं वाटतं, प्रार्थना करताना सगळ्यात आधी मी यहोवाला थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि मी अशा बऱ्‍याच गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे, ज्यांबद्दल मला यहोवाला थँक्यू म्हणायचंय.”

 जरा विचार करा: तुमच्या जीवनातल्या कोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही यहोवाचे आभारी आहात? आज तुम्ही यहोवाला कोणत्या तीन गोष्टींसाठी थँक्यू म्हणू शकता?

 “कोणतीही साधीशी गोष्ट असू शकते. जसं की, तुम्ही एखादं सुंदर फूल पाहता, तेव्हाही तुम्ही पटकन यहोवाला प्रार्थना करून थँक्यू म्हणू शकता.”​—अनिता.

 “निसर्गातली एखादी गोष्ट, जी तुम्हाला खास आवडते किंवा बायबलमधलं एखादं वचन, जे तुमच्या मनाला स्पर्श करून जातं त्यावर तुम्ही विचार करू शकता. आणि मग यहोवाला त्याबद्दल थँक्स म्हणू शकता.”​—ब्रायन.