व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा

 विल नावाचा एक तरुण म्हणतो, “तुम्हाला जर बायबल वाचायची योग्य पद्धत माहीत नसेल तर साहजिकच  तुम्हाला ते बोरिंग वाटेल.”

 बायबल वाचन मजेशीर कसं बनवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.

 बायबलमधली माहिती जिवंत करा!

 वरवर वाचू नका तर माहितीच्या खोलात जा. यासाठी,

  1.  १. बायबलचा एखादा अहवाल निवडा. अभ्यास करण्यासाठी तुम्ही बायबलमधली एखादी घटना किंवा शुभवर्तमानातल्या एखाद्या पुस्तकातला उतारा निवडू शकता. तसंच, तुम्ही jw.org वर असलेल्या बायबल उताऱ्‍यांच्या नाट्यवाचनांमधला एखादा अहवालसुद्धा निवडू शकता.

  2.  २. अहवाल वाचून काढा. तुम्ही एकतर स्वतःच तो अहवाल वाचू शकता किंवा तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातल्या सदस्यांसोबत तो अहवाल मोठ्याने वाचू शकता. अहवालात वेगवेगळ्या व्यक्‍तींचे संवाद वाचण्यासाठी तुम्ही ते आपसात वाटून घेऊ शकता.

  3.  ३. यांपैकी कोणतीही एक गोष्ट करून पाहा:

    •   त्या अहवालाचं वर्णन करणारी चित्रं काढा किंवा एकानंतर एक घडलेल्या घटना दाखवण्यासाठी कॉमिक्समध्ये असतात तशी छोटी-छोटी चित्रं काढा. आणि त्याच्याखाली थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण लिहा.

    •   डायग्राम/आकृत्या काढा. उदाहरणार्थ, बायबलमधून देवाच्या एखाद्या विश्‍वासू सेवकाबद्दल वाचताना, एका बाजूला त्याचे चांगले गुण आणि त्याने केलेली चांगली कामं लिहून काढा आणि त्याच्यासमोर त्याला मिळालेले आशीर्वाद लिहा.

    •   त्या अहवालाचं न्यूज रिपोर्टमध्ये रूपांतर करा. अहवालातल्या वेगवेगळ्या व्यक्‍तींच्या दृष्टिकोनातून त्याचं वर्णन करा. तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही अहवालातल्या मुख्य पात्रांच्या आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मुलाखती सामील करू शकता.

    •   तुम्ही जो अहवाल वाचत आहात त्यात कदाचित एखाद्या व्यक्‍तीने चुकीचा निर्णय घेतला असेल. याच अहवालाचा एक वेगळा शेवट कसा होऊ शकला असता याची कल्पना करा. उदाहरणार्थ, पेत्रने येशूला तीन वेळा नाकारलं होतं. (मार्क १४:६६-७२) लोकांनी जेव्हा पेत्रवर दबाव टाकला तेव्हा तो त्याचा यशस्वीपणे सामना कसा करू शकला असता?

    •   तुम्हाला काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर आपल्या कल्पनाशक्‍तीचा वापर करून या अहवालावर आधारित एक नाटक लिहा. या अहवालातून कोणते धडे शिकायला मिळतात ते या नाटकात दाखवा.​—रोमकर १५:४.

      तुम्ही बायबलमधले अहवाल जिवंत करू शकता

 लपलेली रत्नं शोधा!

 अहवालातल्या बारीकसारीक माहितीचा सगळ्या बाजूंनी विचार करा. असं केल्यामुळे तुम्हाला त्यात लपलेली रत्नं सापडतील. कधीकधी तर अहवालातल्या फक्‍त एक-दोन शब्दांवरूनही तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते.

 उदाहरणार्थ, मत्तय २८:७ आणि मार्क १६:७ या वचनांची तुलना करून पाहा.

  •    येशू लवकरच आपल्या शिष्यांना “आणि पेत्रला”  भेटेल ही जास्तीची माहिती मार्कने आपल्या अहवालात का दिली?

  •  विचार करा: मार्कने तर स्वतः या घटना पाहिल्या नव्हत्या; त्याने जी काही माहिती लिहिली ती त्याला पेत्रकडून मिळाली होती.

  •  या अहवालात लपलेलं रत्न: येशूला आपल्याला भेटायची इच्छा आहे हे जेव्हा पेत्रला कळलं तेव्हा त्याला दिलासा का मिळाला असेल? (मार्क १४:६६-७२) येशूने कसं दाखवून दिलं की तो पेत्रचा खरा मित्र होता? तुम्ही येशूसारखं वागून खरे मित्र कसे बनू शकता?

 अशा प्रकारे जेव्हा तुम्ही बायबलमधले अहवाल जिवंत करता आणि त्यात लपलेली अनमोल रत्नं शोधून काढता, तेव्हा बायबल वाचन आणखी मजेशीर बनतं.